बनगरवाडी

By माडगूळकर व्यंकटेश

Price:  
₹80
Share

Original Title

बनगरवाडी

Publish Date

1960-01-01

Published Year

1960

Total Pages

131

Format

PAPERBACK

Country

INDIA

Language

MARATHI

Readers Feedback

बनगरवाडी

RANI DILIP KADAM (F.Y.Bed.) SAMARTH SHIKSHANSHASTRA MAHAVIDYALAY SATPUR, NASHIK पुस्तकाचा आशय: 'बनगरवाडी' ही एका दुर्गम गावाची आणि तिथल्या साध्या निरागस लोकांची कहाणी आहे. लेखकाने या...Read More

Priyanka Kardak

Priyanka Kardak

×
बनगरवाडी
Share

RANI DILIP KADAM (F.Y.Bed.)

SAMARTH SHIKSHANSHASTRA MAHAVIDYALAY
SATPUR, NASHIK

पुस्तकाचा आशय:
‘बनगरवाडी’ ही एका दुर्गम गावाची आणि तिथल्या साध्या निरागस लोकांची कहाणी आहे. लेखकाने या पुस्तकात एका तरुण शाळा शिक्षकाच्या नजरेतून ग्रामीण जीवनाचे अत्यंत वास्तव आणि जिवंत चित्र उभे केले आहे. शिक्षक म्हणून बनगरवाडीत आलेल्या पात्राला सुरुवातीला गावातील दारिद्र्य अंधश्रद्धा आणि निराशा दिसते, पण हळूहळू त्याला त्या लोकांचे प्रेम त्यांचा आत्मसन्मान आणि निसर्गाशी असलेले नाते समजते. अखेरीस गावात दुष्काळ पडतो आणि सर्व लोक गाव सोडून जातात हा शेवट अतिशय हृदयस्पर्शी आहे.
लेखनशैली:
माडगूळकरांची भाषा अतिशय सोपी ओघवती आणि जिवंत आहे. त्यांच्या लेखनातून ग्रामीण महाराष्ट्राचा गंध येतो प्रत्येक प्रसंग आपल्याला गावात नेतो संवाद निसर्गाचे वर्णन आणि पात्रांचे जीवन हे सर्व इतके वास्तव वाटते की वाचक त्या वातावरणात पूर्णपणे हरवून जातो.
पात्रे:
मुख्य पात्र म्हणजे शिक्षक जो सुशिक्षित, संवेदनशील आणि सहृदय आहे. गावातील इतर पात्रे- नाना, काका, म्हसोबा, लक्ष्मीबाई ही सर्व खऱ्या माणसांसारखी वाटतात. त्यांच्या बोलण्यात, वागण्यात आणि विचारांत खेड्याचे जीवन स्पष्ट दिसते.
संदेश:
या पुस्तकातून मानवतेचा, संघर्षाचा आणि निसर्गाशी असलेल्या नात्याचा सुंदर संदेश मिळतो. शिक्षण, प्रामाणिकपणा आणि माणुसकी हीच खरी संपत्ती आहे हे लेखकाने अत्यंत प्रभावीपणे दाखवले आहे.
माझे मत:
‘बनगरवाडी’ हे पुस्तक वाचताना मनाला एकाच वेळी समाधान आणि वेदना दोन्ही जाणवतात. लेखकाने ग्रामीण भारताचे वास्तव इतके प्रभावीपणे मांडले आहे की ते विसरणे शक्य नाही हे पुस्तक विद्यार्थ्यांनी आणि मराठी साहित्य प्रेमींनी नक्की वाचावे.
निष्कर्ष:
‘बनगरवाडी’ ही केवळ एक कथा नाही तर ग्रामीण जीवनाचे जिवंत दर्शन आहे. व्यंकटेश माडगूळकर यांची ही कलाकृती मराठी साहित्यातील एक अमूल्य रत्न आहे.

मराठी साहित्यातील एक अस्सल ग्रामीण आशय संपन्न कादंबरी

मला हि कादंबरी फार आवडली कारण मी त्या भागातला आहे. आणि लेखकांनी जे लिखाण केले आहे ते मी लहानपणी स्वत च्या डोळ्यांनी पाहिले आहे. आणि...Read More

श्री चंद्रकांत पांडुरंग सरगर

श्री चंद्रकांत पांडुरंग सरगर

×
मराठी साहित्यातील एक अस्सल ग्रामीण आशय संपन्न कादंबरी
Share

मला हि कादंबरी फार आवडली कारण मी त्या भागातला आहे. आणि लेखकांनी जे लिखाण केले आहे ते मी लहानपणी स्वत च्या डोळ्यांनी पाहिले आहे. आणि आजसुद्धा मी ज्या वेळी गावी जातो त्यावेळी त्या गोष्टींचा थोडाफार प्रमाणात अनुभव येतो.
आता मास्तर म्हणजे “राजाराम विठ्ठल सौंदणीकर”. ज्यावेळी विभूतवाडी ते बनगरवाडी प्रवास करतात, त्यावेळी किती वाजले माहित नसताना ते प्रवास करतात. आणि बराच वेळ झाल्या नंतर तांबड फुटते म्हणजेच, सकाळ होते. आणि पुढे गेल्या वर त्यांना भूक लागते. पण पाणी नसल्यामुळे मास्तर जेवत नाहीत. पण भाकरी, सांडगे, लसणाची चटणी यांचा वास मात्र येत राहतो. मास्तर कसे बसे बनगरवाडीत येतात बनगरवाडी म्हणजे मोकळे माळरान आणि बाजरीची राने. घरे म्हणजे खपलीच्या काडाने शेकरलेली. मास्तर ज्या वेळी गावात येतात त्या वेळी एक माणूस त्यांना अंडेवाला आहे का अस विचारतो?
तसेच लंगोटी लावून शाळेत जावे आणि थुंकीने पाटी पुसावी असा मास्तर असतो का ? म्हणजेच मास्तर किती लहान पोरगा असावे ?
संध्याकाळी कारभारी येतात मास्तरांना निहाळतात. चुकलेल मेंढरू निहाळावे अश्या पद्धतीने मास्तरांकडे पाहतात आणि ओळख पटल्यानंतर शाळेची चावी देतात म्हणजेच चावी देणे म्हणजे कामाचा चार्ज दिल्यासारखे झाले. शाळा म्हणजे काय चावडीतील २ खण जागा.
मास्तर ने विचारले, पोरे कुठे आहेत, तर पोरे शेरडा मागे आहेत. जेवण झाल्यानंतर सर्व गावकरी चावडीजवळ आले. आणि कारभारी यांनी सर्व गावकरी मंडळीना सांगितले, “उद्या पासून पोरे शाळेत पाठवा”.
काही जणांनी होकार दिला काही जणांनी नकार दिला. शाळेत पाठवायचे म्हणजे त्यांच्या पोटाला काय घालावे असे काहीजण म्हणाले. तर कारभारी म्हणाले पोरे जर मरु लागली तर माझ्याकडे पाठवा म्हणजेच कारभारी अज्ञानी असताना, त्या काळी शिक्षणाची तळमळ किती होती ते इथून दिसते.
सकाळ झाली म्हणजे ‘तांबड फुटले’ कि ज्या ठिकाणी वाघरी मध्ये मेंढर कोंडलेली असतात ते मिळविण्याची कामे केले जाते. म्हणजेच लहान पिल्ले वेगळी आणि मोठे वेगळी असतात . त्यांना एकत्र मिळविणे म्हणजे दुध पाजणे आणि मेंढक्याना पण दुध लागते ते झाले कि मेंढरे घेऊन रानात चरण्यासाठी जातात.
मेंढक्यांसोबत त्यांची मुले पण जातात. मुले शिकली म्हणजे त्यांचे शेतातील लक्ष उडते. ते पांढरे कपडे घालतात. अशी त्या काळी विचारसरणी होती थोडक्यात काय तर शिक्षणाला त्या काळात किंमत नव्हती.
नव्याने जर मेंढरे राखावयाची असेल, तर त्याकाळी एक पद्धत होती, ती म्हणजे मेंढरे विकत घ्यायची नाहीत. तर त्या मेंढक्याने एक खोबऱ्याची वाटी घ्यायची, त्यामध्ये भंडारा टाकावयाचा आणि ज्याच्या कडे मेंढरे आहेत त्याच्या कडे जायचे. आणि ती वाटी त्याला द्यायची आणि म्हणायचे मी बेन करतोय. त्यानुसार तो मेंढका दुसऱ्या मेंढक्याला २ किंवा ४ मेंढ्या देतो. आणि मग तो व्यवसायाला सुरुवात करतो. त्यासाठी एक नियम असतो, दिलेल्या मेंढ्या विकायचं नाहीत. तसेच कापायच्या नाहीत.

रामा बनगर यांचे वडील ‘काकूबा धनगर’. त्या वेळी पैसे बँकेत ठेवण्याची पद्धत नव्हती. तर ते पैसे मडक्यात ठेवायचे. ते चांदीचे रुपये होते ते किती होते ते माहित नव्हते. मात्र ते मोजण्यासाठी त्यांनी मास्तरांच्या कडे दिले. तर ते ३४० रुपये होते. आणि हे पैसे मोडण्यासाठी मास्तरांकडे देऊण टाकले. मात्र देताना त्यांना शंका आली नाही. याचा अर्थ त्या काळात मास्तरांवर मोठया प्रमाणावर विश्वास होता.
मास्तरांची कामे – मुलांना शाळेत शिकविणे हे मुख्य काम मास्तरांचे असते. मात्र त्याशिवाय मनी ऑर्डर लिहीणे, पत्र लिहिणे, पत्र वाचणे, नवराबायकोंची भांडणे मिटविणे, कोणाचे मेंढरू चोरीला गेले ते पाहणे थोडक्यात शाळा म्हणजे कोर्ट, चावडी, पोलीस ठाणे हे होय.
गावातील भांडणे गावाबाहेर जात नसत तर ती शाळेतच मिटत असत. एवढे काम कमी कि काय म्हणून अंजीची चोळी सुद्धा मास्तरांनी तालुक्यावरून शिवून आणली.
लग्नाची पद्धत- सध्या वर्षभरात लग्न होत राहतात. मात्र जुन्या काळी गावामध्ये वर्षातून एकदाच लग्न करण्याची पद्धत होती. त्यामुळे बराच प्रमाणात खर्च आणि वेळ वाचत होता. आणि एखाद्या गरिबाचे सुद्धा लग्न होत होते.
दादू बालटया – हा गावाचा टग्या होता. त्याने कारभारी व मास्तर यांची भांडणे लावली. अंजीला चोळी आणून दिली म्हणून कान भरले.
आनंदा रामोशी – गावात हिंडणे, मिळेल ती कामे करणे, चोऱ्यामाऱ्या करणे, मास्तरांचे पैसे याने चोरून नेले. मात्र ते त्याने त्यांना परत आणून दिले. आणि ‘फिर्याद करा किंवा तुरुंगात डाबा नाहीतर मोकळे सोडा’ असा तो म्हणाला. कोणी मागून देत नाहीत म्हणून मी मुकाटयाने नेतो. गुरे आणि पाखरे खातात तस आनंदाने खाल्ले म्हणा.
ज्या वेळी पेरलेल्या रानात पिके तयार होतात. आणि काढणीला येतात. त्या वेळेच वर्णन लेखकाने छान केले आहे. बाजरी हळू हळू वाढू लागली, कि पक्षी कणसे खाण्यासाठी जमा होतात. पहाटे शेतकरी राखणीला येऊ लागतात. रानात सर्वाना कामे मिळू लागतात. बायका पोरांना दुसऱ्यांच्या शेतात किंवा गावात रोजगार मिळू लागतात. मेंढरांना खाण्यासाठी चारा मिळाल्याने ते गुबगुबीत दिसू लागतात. बारा बलुतेदारी गावागावात फिरू लागतात. आणि धान्याची मागणी करू लागतात. कोल्हाटी उद्या मारू लागतात, दरवेशी अस्वले घेऊन खेळू लागतात, गारोडी हातचलाखी दाखवू लागतात. आणि मग शेतकरी त्यांना शेर पायली धान्य देतात. धनगराची पोरे गजी ढोल खेळू लागतात. आणि सर्व बनगरवाडी नाचू लागते, “इदिबांग डिपांग” “इदिबांग डिपांग”.
कारभारी आणि मास्तर बरेच दिवस बोलत नव्हते. त्यांच्यात कडू पण आला होता. मात्र आता ते बोलू लागले.
मास्तरांच्या मनात गावामध्ये एखादी इमारत किंवा तालीम असावी असी कल्पना सुचली. त्या वेळी त्यांनी रामोशी पाठवून गावात सर्वांना निरोप दिला. सर्व जण रात्री शाळेजवळ जमले. मात्र पैसे जमविणे हे कठीण काम होते. मग ज्यांच्याकडे पैसे नसतील त्याने रोजगार देणे, ज्याच्याकडे झाडे होती त्याने झाडे देणे, आणि ज्यांच्याकडे पैसे आहेत त्याने पैसे देणे असे ठरले .
बाळा बनगर – बाळाने झाडे देण्याचे काबुल केले होते. मात्र नंतर त्याने नकार दिला. झाड देणार नाही अस बोलला. झाडावर कुऱ्हाड चालविण्यापेक्षा माझ्यावर प्रथम चालवा असा तो म्हणाला. गावकऱ्यांनी निर्णय घेतला कि, “बाळाला वाळीत टाकायचे”. हि बातमी सर्व गावात पसरली. कोणी त्याच्याशी बोलेना. त्याचे बकरे कापण्यासाठी आयबु ने नकार दिला. रोजगारासाठी कामासाठी त्याच्याकडे कोणी
जाईना, गावातील पाणी त्याला मिळेना, तसेच कोणी गुरे चारू देईना, त्यांची पोरे शाळेत येईना झाली. ऐवढे होऊनही बाळा बनगर नमते घेत नव्हता. त्यामुळे गावात त्याची सतत अडवणूक होत होती.
तालमीचे बांधकाम चालू होते. ते थोड्या प्रमाणात पूर्ण झाल्या नंतर उद्घाटनासाठी मास्तरांनी सरकारला निमंत्रण दिले. उद्घाटनासाठी २० एप्रिल तारीख ठरली, म्हणून सरकारी अधिकारी, कर्मचारी गावात येऊ लागले. तालुक्याहून वाडीला जोडणारा रस्ता तयार झाला. शाळेच्या इमारतीची रंगरंगोटी झाली. सारे गाव कामाला लागले. गाव स्वच्छ झाले. रामोशीवाडा स्वच्छ झाला, म्हणून धनगरी बायकांना इसाळ आला. त्यांनी त्यांची घरे सारवली. सरकार गावात येणार म्हणून गावात मोठा बदल झाला. आजपर्यंत कोणी राजा कसा दिसतो ते पाहिलं नव्हते. कधी वाडीकडे ढुंकून न बघणारे अधिकारी, पाटील, कुलकर्णी, मामलेदार, आणि फौजदार वाडीला येऊ लागले.
दुसऱ्या दिवशी सकाळी ८:३० वाजता उद्घाटन होणार होते. मात्र तालीम अजून उघडी होती. झाकलेली नव्हती. म्हणून सर्व गाव रात्रभर जागून ती इमारत झाकली. मात्र हे काम करताना आयबू पडला अन बेशुद्ध झाला.
गावात सरकार आले, पोरे काखेला मारून धनगरणी वेशीकडे धावू लागल्या, राजा गावात येताच कारभारी यांनी एक नारळ आणि एक रुपया त्यांना दिला. त्यांनी हात लावला ती एक पद्धत असते.
तालमीचे बंद दार राजाने हाताने उघडले. लाल माती बघून त्यांना फार आनंद झाला. त्यांनी मास्तरांचे नाव विचारले, ‘राजाराम विठ्ठल सौंदणीकर असे मास्तरांनी उच्चारले. राजांनी त्यांना शाबासकी दिली. तालमीतील मारुतीला नारळ फोडला, सभा सुरु झाली, मास्तरांनी भाषण केले, महाराजांनी सर्वांचे आभार मानले, आणि निघून गेले. सगळ्या कार्यक्रमात तीन जण मात्र नव्हते एक बाळा बनगर, त्याने झाडे दिली नाही. म्हणून त्याला वाळीत टाकले होते. दोन दादू बालटया आजारी असल्यामुळे, आणि तीन आयबु तालमीचे काम करताना वरून पडल्यामुळे.
तालमीचे काम करताना आयबु पडला, व हात मोडला. म्हणून जगण्या रामोशी आला, त्यांने हात निट बसविला. म्हणून आयबु आता हिंडू फिरू लागला. जगण्याने मात्र एक भानगड केली. वांगी गावातील चांगल्या घरातील एक बाई पळवून आणली. त्यामुळे त्या गावातील ८ ते १० लोके रामोशी वाड्यात आली. त्यांनी रामोशी वाड्यात सर्वाना मारहाण करण्यास सुरुवात केली. व जगण्या रामोशी कुठे आहे असे ते विचारू लागले. मास्तरांना सर्व चौकशी केल्या नंतर त्यांचा राग शांत झाला. त्यांना तालमीत नेऊन चहा पान केला, आणि ‘जगण्या व ती बाई त्यांना तुमच्या ताब्यात देतो’ अशी हमी आनंदा रामोशीने दिली. तेव्हा ती लोके निघून गेली. आणि हमी घेतल्यानंतर २-४ लोके घेऊन सांगली मध्ये पळून चाललेला जगण्या व ती बाई यांना पकडून आणले आणि वांगीच्या लोकांच्या ताब्यात दिले त्या लोकांनी त्या बाईच नाक कापले, आणि सोडून दिले. थोडक्यात काय तर रामोशी समाजातील माणसांनी दिलेला शब्द पाळण्यात पक्के असतात.
तांबड फुटलं, त्यावेळी गावातील कारभारी यांना स्वप्न पडले, कि कंबरेला कडू लिंबाची डहाळी बांधलेली, केस मोकळे सोडलेली, मळवट भरलेली एक बाई आली आणि म्हणाली कि, ‘मी तुला नेण्यासाठी आलेली आहे’. कारभारी घाबरला आणि गावात सर्वांना सांगत सुटला, “मी आज मरणार आहे”. कोणी चेष्टा केली पण त्याचा काही परिणाम झाला नाही. सर्वांनी रडण्यास सुरुवात केली तर कारभारी म्हणाला रडता काय माझ काय राहील आहे. ऐवढे मोठे पंतसरकार येऊन गेले माझ्या पाठीवर हात ठेवला, आणि काय पाटील म्हणून विचारले. थोडक्यात काय तर अडाणी लोकांना सुद्धा मोठ्या लोकांनी नुस्त विचारलं तरी केवढा मोठा आनंद होतो. पण सूर्योदयाला कारभारी मरुन गेले.
कारभारी मरून गेले मात्र जाताना अंजीचा सांभाळ करण्यासाठी शकुच्या हवाली केले. सर्व सुरळीत चालले होते. मात्र शकूचे आणि अंजीचे प्रेम संबंध चालू झाले. हे शकुच्या बायकोच्या लक्षात आले. आणि त्यांनी मास्तरांच्या कानावर हि गोष्ट घातली. त्यामुळे शकूची बायको शकुपासून वेगळी राहीली. आणि शकू आणि अंजी एकत्र राहू लागले. मात्र थोड्याच दिवसात अंजी एका मेंढक्याचा हात धरून निघून गेली. आणि नंतर शकू आपल्या पहिल्या बायकोकडे आला, तेव्हा शकूची बायको मास्तरांकडे आली आणि म्हणाली “मास्तर आल आमच खूळ माघारी”
दुष्काळ पडला – नक्षत्रा मागून नक्षत्र गेली. बनगरवाडी पाण्याचा ठिपूस पडला नाही. झाडे झुडपे वाळून गेली, विहीरीच पाणी आठले, चिमणीला प्यायला सुद्धा पाणी मिळेना. लोकांच्या तोंडावरची कळा नाहिशी झाली. डोळ्यात भूक दिसू लागली. रामोश्यांचे फार हाल झाले. २- २ दिवस चुली पेटेनात. तालीम ओस पडली, शाळा ओस पडली. माणदेश्याच्या पाचवीला पुजलेला दुष्काळ आला. मेंढरे पट पट मरू लागली. रामोश्याचा दारूचा धंदा बंद पडायला लागला. दारूला कोणी गिऱ्हाईक मिळेना. वांगीची बाई पळवणारा जगण्या रामोशी दारू पिऊन पिऊन मरून गेला. शकुने बैल विकायला काढला, मात्र तो बैल खटकाने सात रुपयाला मागितला. पण त्याने दिला नाही. कोणी जनावर विकायला काढले, तर घेणारा त्याला खाण्यासाठी काय घालनार. म्हणून घेत नव्हता. एके दिवशी आनंद रामोशी आला आणि मास्तरला म्हणाला. जातो जगायला मास्तर मी. आणि जाता जाता म्हणाला, बालटयाला मी आणि आयबुने मिळून मारला “तुम्हाला लय त्रास देऊ लागला म्हणून मारला”.
रामोश्यांची सगळी माणसे गावाबाहेर पडली. रामुसवाडा रिकामा झाला. मेंढरे मरू लागली. म्हणून मेंढक्यानी गाव सोडले. रामा बनगर जाण्यापूर्वी मला भेटला आणि मी सुद्धा गाव सोडून चाललो आहे. तेवढ म्हातार काकूबा धनगर यांच्या वर लक्ष ठेवा अस सांगून गेला.
रामा बनगर, शकू, आनंद, बालटया आणि बाळया सगळे नाहीसे झाले. बरे वाईट सगळे गेले, शाळा तेथेच राहीली तालीम तेथेच राहिली. घरे, झाडे जीतल्या तिथे राहिले. आणि मंडळी निघून गेली. गावात कोणी दिसेनासे झाले. मी घरून आणलेल्या भाकरीतून २ दिवसाच्या शिळया भाकरी आयबु ला दिल्या.
एके दिवशी मला वरिष्ठांकडून पत्र आले, कि शाळा बंद करून तालुक्याच्या प्रायमरी स्कूल मध्ये दाखल व्हा. मी सामान सुमान बांधले. एक ठीके आयबुने डोक्यावर घेतले आणि काही मी घेतले. आयबू म्हणाला “हे गबाळ तुमच्या घरी टाकून मग मी माघारी जाईल”. उजाड बनगरवाडी मागे राहिली होती आणि मी परत चाललो होतो.

बनगरवाडी

डॉ सुनील काशिनाथ खामगळ सहाय्यक प्राध्यापक मराठी विभाग तुळजाराम चतुरचंद कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय बारामती . प्रसिद्ध लेखक व्यंकटेश माडगूळकर यांची ‘बनगरवाडी’ ही प्रादेशिक...Read More

Dr. Sunil Khamgal

Dr. Sunil Khamgal

×
बनगरवाडी
Share

डॉ सुनील काशिनाथ खामगळ सहाय्यक प्राध्यापक मराठी विभाग तुळजाराम चतुरचंद कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय बारामती .
प्रसिद्ध लेखक व्यंकटेश माडगूळकर यांची ‘बनगरवाडी’ ही प्रादेशिक कादंबरी आहे. ही कादंबरी १९५५-६० मध्ये प्रकाशित झाली. व्यंकटेश माडगूळकर हे ग्रामीण साहित्याच्या प्रवाहातील अत्यंत महत्त्वाचे लेखक आहेत. त्यांनी साहित्यातून ग्रामीण प्रदेशातील माणूस, निसर्ग, प्रदेश, सण- उत्सव, माणसाच्या जगण्याच्या पद्धती, रीतीरिवाज, रूढी-परंपरा, श्रद्धा-अंधश्रद्धा, संघर्ष यावर प्रकाश टाकला आहे. ‘बनगरवाडी’ कादंबरीतून त्यांनी कायम दुष्काळाच्या छायेखाली असलेल्या सातारा जिल्ह्यातील माणदेशातील धनगर या जमातीचे चित्रण केले आहे. माणदेश हा पावसाचे कमी प्रमाण व हलक्या प्रतीची जमीन असलेला प्रदेश आहे. या कादंबरीतून त्यांनी प्रदेश वर्णन प्रभावीपणे केले आहे. धनगरांची वस्ती असलेल्या बनगरवाडी मध्ये राजाराम विठ्ठल सौंदणकर नावाचा पोरसवदा वयाचा मास्तर माळरानातून प्रवास करीत येतो. तेथील धनगरांच्या जीवनाशी समरस होऊन विश्वास संपादन करतो. बंद पडलेली शाळा सुरू करून तालीमही बांधतो. परंतु पुढे दुष्काळामुळे धनगर जगण्यासाठी मेंढरासह वाडी सोडून निघून जातात. मोठ्या जिद्दीने सुरू केलेली शाळा बंद करून मास्तर तालुक्याच्या गावी हजर होतात. असे कथानक या कादंबरीचे आहे.
कादंबरीतील प्रदेश लेखक व्यंकटेश माडगूळकर यांच्या परिचयाचा आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील माण नदीच्या आसपासच्या आटपाडी या औंध संस्थानातील पंत राजवटीच्या काळातील अवर्षणग्रस्त, दुष्काळग्रस्त परिसरातील धनगरांचे लोकजीवन लेखकाने उभे केले आहे. तेथील प्रदेश उभा केला आहे. कादंबरीतील प्रादेशिक जीवन निसर्ग वर्णनातून उभे केले आहे. शेती, पिके, झाडे-झुडपे भाषिक लकबी यांच्या वर्णनातून प्रदेश जिवंत केला आहे. उदा. उजाड माळरान बाभळीचे झाड, तरवड, नेपती, बोराटेची झाडे, टोळ, सरडे, मुंग्या, गंडीकडे, मुरमुठ्यावरील हिरवे भुंगे, घोरपड, बेडूक, लांडगा, साळुंक्या, चिमण्या, बाजरीची राने, हुलगा, तूर, मटकी, ज्वारी, करडी, हरभरा, धनगरांची कुडाची शेखरलेली घरे, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा सारखे ऋतू यातून प्रदेश आकार झालेला आहे. बनगरवाडीतील धनगरांमध्ये असलेली निरक्षरता, अज्ञान, दारिद्र्य ,संस्थानातील पंत सरकाराबद्दल त्यांच्या मनात असणारा आदर, आपुलकी, माऊली आईबद्दल असणारी श्रद्धा, तिचा उत्सव साजरा करण्याची पद्धत, लांडग्यासारख्या हिंस्र पशूशी लढाई, गावपातळीवर भांडण मिटवण्याची पद्धत, नवीन मेंढरांचा कळप करण्यासाठी मदत करण्याची रीत यातून माणदेशातील धनगराचा भाबडा व लढवय्या स्वभाव, परंपरा लक्षात येतात.
‘बनगरवाडी’ या कादंबरीमध्ये प्रदेश हा खऱ्या अर्थाने आत्मा आहे. कादंबरीमध्ये धनगरांच्या मेंढरांचे कळप, त्यांचे मेंढरामागील दिवसभराचे भटकणे, सायंकाळी जेवणापूर्वी मेंढवाड्यात ठेवलेल्या पिल्लांना आईशी मिळवणे, वाड्यातून येत असलेल्या मूताचा वास, सणासुदीच्या वेळी ढोलाच्या तालावर चालणारा नाच इत्यादी अनेक गोष्टीतून सामाजिक चालीरीती, आचार, विचार, परंपरामधून प्रादेशिकता सजीव झालेली आहे. याचा पात्राच्या वृत्ती प्रवृत्तीवर संस्कार झालेला आहे. हे संस्कार सामाजिकतेतून साधले असल्यामुळे प्रादेशिकता आणि सामाजिकता यांचा अतिशय घनिष्ठ संबंध असतो. हे कादंबरीतून अधोरेखित झालेले आहे. असे म्हणावे लागते. किंबहुना सामाजिकतेशिवाय प्रादेशिकता सजीव, परिणामकारक होऊ शकत नाही. प्रादेशिक जीवनाचे, ग्रामीण जीवनाचे, मानवी भावभावनांचे दर्शन घडवणारी ही कादंबरी साहित्यातील अतिशय प्रभावी प्रादेशिक कादंबरी आहे.
‘बनगरवाडी’ कादंबरीत लेखकाने सतत दुष्काळामुळे प्रदेशातील माणूस कोलमडून पडतो याचे चित्रण लेखकाने प्रभावीपणे रेखाटले आहे. कादंबरीचा शेवट वाचकाच्या मनात कालवा कालव करून अस्वस्थ करून सोडतो. कादंबरीत मास्तर, वाडीचा कारभारी, दादू बालट्या, आयबु, आनंदा रामोशी, जगण्या रामोशी, बाळा धनगर, शेकू, अंजी, रामा धनगर, काकुबा, संता अशी पात्रे आहेत. या पात्रांचा विकास झालेला आढळत नाही. ही सर्व पात्रं ज्या मातीत जन्म घेतात तिचे रंग रूप घेऊन जगतात. सुरुवातीला जी पात्र भेटतात तशीच ती कादंबरीच्या अखेरीस दिसतात. एकंदरीत पात्रांच्या अनुषंगाने कादंबरीचा विचार केला असता या कादंबरीत कोणतेच पात्र नायक खलनायकाच्या स्वरूपात भेटत नाही. निसर्ग हाच प्रमुख पात्राच्या स्वरूपात येतो. बनगरवाडीच नायक खलनायकाच्या स्वरूपात दिसते. लेखकाने लेखणीच्या सामर्थ्याने हे चित्र उभे केले आहे.
कादंबरीमध्ये माणदेशातील धनगरी बोलीचा संवादासाठी तर प्रमाणभाषेचा निवेदनासाठी वापर केला आहे. म्हणी, वाक्प्रचार, प्रतिमा, प्रतिके, श्रद्धा-अंधश्रद्धा, लकबी, शैली, उच्चारण्याची पद्धत हे बोलीचे सौंदर्य असल्यामुळे आणि कादंबरीत तिचा प्रभावीपणे वापर केल्यामुळे कादंबरी अधिकच वास्तवाच्या पातळीवर पोहोचते. कादंबरीची भाषा धनगराच्या जीवन पद्धतीप्रमाणे सरळ आहे. घटना, प्रसंग आणि व्यक्तिरेखा यांना बोलीमुळे सामर्थ्य प्राप्त होते. लेखकाने बोलीच्या साह्याने माणदेशातील प्रदेश जिवंत केला आहे. लेखक व्यंकटेश माडगूळकर यांनी या कादंबरीच्या माध्यमातून १९५०-६० च्या दशकातील माणदेशातील एका वाडीचे चित्र डोळ्यासमोर उभे केले आहे. वाचकालाही आज नष्ट होत चाललेल्या खेड्याचे, तेथील चालीरीती, रूढी, परंपरा, संस्कृती याचे दर्शन घडते. ही कादंबरी ग्रामीण-प्रादेशिक साहित्याच्या वाटचालीतील अतिशय महत्त्वपूर्ण कादंबरी आहे. साहित्य विश्वात मैलाचा दगड ठरलेली कादंबरी आहे. वाचकालाही ग्रामीण प्रदेश, निसर्ग, शेती, पिके, खेड्यातील माणूस, त्यांच्या रूढी, परंपरा, बोली समजून घेण्यासाठी ही कादंबरी उपयुक्त ठरेल. लुप्त होत चाललेला गावगाडा अनुभवता येईल.
दुष्काळ कायमच माणदेशातील समाजाच्या पाचवीलाच पूजलेला आहे. याची जाणीव होते. सतत दुष्काळाच्या सावटाखाली जीवन जागणाऱ्या समाजाची वाताहत, स्थलांतर केवळ दुष्काळामुळे होते. आजही हा प्रश्न तसाच अनुत्तरीत आहे. त्यामुळे ही कादंबरी अधिक प्रभावी झाली आहे. दुष्काळा सारख्या घटनेने कादंबरीचा शेवट केला असला तरी कादंबरीचे साहित्यिक योगदान व मूल्य कमी होत नाही. ती अधिकच वास्तवाच्या पातळीवर पोचते. कादंबरीचा शेवट वाचकाला अस्वस्थ करून सोडतो. वाचकही अंतर्मुख होतो. गेली सहा दशकं ही कादंबरी मराठी मनाला साद घालत आहे. आनंद देते आहे. म्हणून आजही वाचकांनी ‘बनगरवाडी’ या कादंबरीचा आस्वाद घ्यावा.

Submit Your Review