"अ हाऊस फॉर मि. बिस्वास" ही व्ही. एस. नायपॉल यांची 1961 मध्ये प्रकाशित झालेली एक अत्यंत वास्तववादी
Read More
“अ हाऊस फॉर मि. बिस्वास” ही व्ही. एस. नायपॉल यांची 1961 मध्ये प्रकाशित झालेली एक अत्यंत वास्तववादी कादंबरी. या कादंबरीचे हस्तलिखित पूर्ण झाल्यानंतर मिस्टर नायपॉल थकवा दूर करण्यासाठी जवळच्या देशात फिरायला गेले आणि परत आल्यानंतर हस्तलिखित संपूर्णपणे भिजून खराब झाले होते. नायपॉलनी ही कादंबरी परत लिहिली जी 623 पानांची होती. प्रत्येक मध्यमवर्गीय माणसाला ही कादंबरी त्याची स्वतःची कथा आहे असेच वाटते कारण स्वतःच्या कुटुंबाला सांभाळत स्वतःचे एक घर बनविणे हीच काय ती त्याची महत्त्वाकांक्षा असते. नायपॉल हा सिद्धहस्त लेखक. कादंबरीतला प्रत्येक शब्द बंदुकीतून सुटलेल्या गोळीसारखा कथानकामध्ये चपखल बसतो. ब्रिटिशकालीन भारतातून कॅरीबियन बेट त्रिनीदाद येथे उत्तर प्रदेशातून नायपॉल यांचे आजोबा लेबरर म्हणून गेले. विद्याधर सुरजप्रसाद नायपॉल हे त्यांच्या तिसऱ्या पिढीतील भारतीय वंशाचे लेखक जे पुढे जाऊन इंग्लंडला स्थायिक झाले.
कथा नायक मोहन बिस्वास यांच्या जीवनाचा मागोवा घेते. मोहनच्या जन्मापासूनच संघर्षाला सुरुवात होते. ही कथा लेखकाच्या वडिलांची आत्मकथा आहे, असे नायपॉल यांनी एका इंटरव्यूमध्ये सांगितले. हाताला असलेल्या सहा बोटांमुळे हा अपशकुनी मुलगा त्याच्या वडिलांसाठी घातक आहे अशी भविष्यवाणी गुरुजी करतात आणि मोहनच्या संघर्षाला सुरुवात होते. त्यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्यानंतर आयुष्यभर या दुर्घटनेचे ओझे त्याला वागवावे लागते. वडिलांच्या निधनानंतर मावशीकडे राहायला गेल्यानंतर सतत अवहेलना आणि कर्तृत्वशून्य म्हणून हेटाळणी सहन करावी लागते. भारतीय वंशाची बऱ्यापैकी श्रीमंत आणि मोठे घर असलेली तुलसी फॅमिली यांच्याकडे त्याला नोकरी मिळते आणि त्यांच्याच मुलीशी त्याचे लग्न होते. सासरी घरजावई म्हणून राहताना त्याला आत्मसन्मान गहाण ठेवल्यासारखे वाटू लागते. कोणत्याही परिस्थितीत स्वतःचे घर बनविण्याचा निर्णय तो घेतो आणि घर बांधताना अनेक संकटांची मालिका सुरू होते. शेवटी घर बांधून पूर्ण होते पण उर फाटेपर्यंत कष्ट केल्यामुळे मोहनचे अकाली निधन होते. गरिबीतून वर येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला आपली पहिली पिढी खर्ची घालावी लागते हे हे कादंबरी आपल्याला प्रकर्षाने जाणवून देते.
ही कादंबरी तीन भागात विभागली गेली आहे, जी बिस्वास यांच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंतच्या जीवनाचा विस्तार करते. त्याच्या संपूर्ण प्रवासात, तो कौटुंबिक, वसाहतवाद आणि सामाजिक वर्गाच्या गुंतागुंतांवर नेव्हिगेट करतो, स्वातंत्र्य आणि व्यक्तिमत्त्वाचे प्रतीक असलेले घर त्याच्या आकांक्षांचे केंद्रबिंदू बनते. परक्या मुलखामध्ये एका भारतीय घरात वाढणारा मुलगा हा दोन जगांमध्ये विभागला गेलेला दिसतो. त्रिनीदादमधील भारतीय घर प्रत्येक भारतीय माणसाला वाचताना ते आपलेच घर असल्यासारखे वाटते. नायपॉल यांनी अत्यंत बारकाईने भारतीय वंशाच्या खाणाखुणा पूर्ण कादंबरीमध्ये मांडल्या आहेत. कादंबरीचा विषय जरी वसाहतवाद नसला तरी वाचताना ब्रिटिशांच्या वसाहतीचे अनेक दाखले या कादंबरीमध्ये सापडतात. मुलांसाठी सर्वस्व पणाला लावणारे भारतीय पालक आपल्याला मोहन विश्वास मध्ये पहायला मिळतात. मोहन विश्वास हा पुरुषप्रधान व्यवस्थेचा एक पुरुष आपल्याला पाहायला मिळतो. मुलगा किंवा मुलगी यांच्यामधील एकालाच स्कॉलरशिपवर परदेशी पाठविण्याची वेळ येते त्यावेळी तो मुलीऐवजी मुलाला संधी देतो. मुलगा इंग्लंडला गेल्यावर तिथलाच होऊन जातो आणि शेवटी मुलींच्या समोर मुलाचे नाव घेत मोहन शेवटचा श्वास घेतो. प्रत्येक मध्यमवर्गीय माणूस अशीच पुढे जाण्याची केविलवाणी धडपड करत असतो. त्याच्यासाठी घर आणि कुटुंब या दोनच गोष्टी महत्त्वाच्या असतात.
नायपॉलचे गद्य तीक्ष्ण, निरीक्षणात्मक आणि अनेकदा विडंबनात्मक आहे. बिस्वास यांच्या स्वप्नांची निरर्थकता आणि मानवी स्वभावातील गुंतागुंत टिपणारे गडद विनोद आणि गहन दुःख यांचे मिश्रण असलेले त्यांचे लेखन वैशिष्ट्यपूर्ण आहे. कादंबरीचा स्वर ‘पॅथॉस आणि कॉमेडी’ यांच्यात उलगडतो, कारण बिस्वासची व्यक्तिमत्त्वे ठामपणे मांडण्यासाठी केलेली धडपड अनेकदा हास्यास्पद, दुःखद आणि कधीकधी विनोदी प्रसंगांना कारणीभूत ठरते.
कथनात्मक रचना देखील लक्षणीय आहे, कारण ती बिस्वासच्या आयुष्यातील अनेक दशके व्यापलेली आहे, त्यांच्या व्यक्तिरेखेचे आणि त्रिनिदादच्या सामाजिक-राजकीय परिदृश्याचे तपशीलवार अन्वेषण करते. बिस्वासच्या अनुभवांच्या सूक्ष्मतेवर नायपॉलचे लक्ष केंद्रित केल्याने वाचकांना नायकाच्या आंतरिक गोंधळाबद्दल मनापासून सहानुभूती मिळू शकते.
ए हाऊस फॉर मि. बिस्वास ही एक समृद्ध, बहुस्तरीय कादंबरी आहे जी वसाहतीनंतरच्या जगामध्ये ओळख, कुटुंब आणि स्वातंत्र्याच्या संघर्षांवर खोलवर वैयक्तिक आणि राजकीयदृष्ट्या चपखल दृष्टीकोन देते. नायपॉल यांची ही अजरामर साहित्यकृती आहे, जिला नोबेल पारितोषिकाने गौरविण्यात आले. प्रत्येक भारतीयाने आणि किंबहुना प्रत्येक मध्यमवर्गीय माणसाने ही कादंबरी एकदा अवश्य वाचली पाहिजे. अशा कलाकृती युगातून एकदा बनवत असतात. भारतीय वंशाच्या या लेखकाचा आम्हा सर्वांना खूप आदर वाटतो.
Show Less