पुस्तक परीक्षण :- संजय मनोहर मेमाणे , अण्णासाहेब आवटे कॉलेज, मंचर मराठीतील श्रेष्ठ लेखक वि.स.
Read More
पुस्तक परीक्षण :- संजय मनोहर मेमाणे , अण्णासाहेब आवटे कॉलेज, मंचर
मराठीतील श्रेष्ठ लेखक वि.स. खांडेकर यांच्या “ययाती” या कादंबरीला “साहित्य अकादमी” चा पुरस्कार मिळलेला आहे. ही कादंबरी अतिशय प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे. पुस्तकातील माहितीनुसार प्रथमावृत्ती १९५९ सालची आहे.
सुखलोलूप ययाती, अहंकारी देवयानी, प्रेमळ शर्मिष्ठा, कोपिष्ट शुक्राचार्य, शूर-धीर-त्यागी पुरू, संन्यासाश्रमाच्या अतिरेकातून विकृत झालेला यती, संन्यस्त तरीही जीवनातील द्वैत-संघर्ष-सौंदर्य यांचा समंजस स्वीकार करणारा कच या या कादंबरीच्या प्रमुख व्यक्तिरेखा आहेत. या कादंबरीची सुरुवात देव दानव युद्धापासून होते. नहुषाच्या मदतीने देवगण युद्ध जिंकतात पण इंद्राला इंद्रपद मुकावे लागते. इंद्रपदाने गर्वित नहुष ताळतंत्र सोडुन वागायला लागतो. इंद्रपदासोबत इंद्राणीचा ह्व्यास त्याला सप्तर्षीच्या पालखीत प्रवास करायला लावतो. उतावीळ झालेला नहुष वृद्ध अगस्त्य ऋषीचा अपमान करतो. अपमानीत गौतम ऋषी त्याला शाप देतात – “ह्या नहुषाची मुले कधीही सुखी होणार नाहीत” आणि त्याचे स्वर्गपतन होते. नहुषाचे दोन पुत्र, यति आणि ययाति. यति लहानपणी राजविलासापासून दूर संन्यासी जीवन व्यतीत करतो. ह्याला समांतर देव दानवाच्या युद्धात, शुक्राचार्याच्या संजीवनी विद्येच्या ज्ञानाने दानवाचे पारडे भारी पडते. संजीवनी विद्याप्राप्तीसाठी देवांचे कारस्थान सुरू होते. कारस्थानातील मुख्य पात्र बृहस्पतीपुत्र कच, संजीवनी विद्येच्या प्राप्तीसाठी शुक्राचार्याचा शिष्य बनतो. शुक्रचार्याची पुत्री देवयानी त्याच्यावर मोहित होते.
संसारात पैसा, कामवासना सुखं या सगळ्यांपासून असमंजसपणे पळून जाणारा, प्रत्येक सुख म्हणजे पाप आहे असं समजणारा यती विकृतीचं एक टोक आहे तर फक्त सर्वसुखोपभोग म्हणजेच आयुष्य असं मानणारा ययाती हे विकृतीचं दुसरं टोक. आयुष्यभर कामवासनांचा भोग घेत ययाती जगतो आहे. एका शापामुळे त्याला वार्धक्क्य येतं तेव्हाही स्वतःच्या मुलाचं तारुण्य उसनं मागून कामसुख मिळवत राहण्याइतका तो विषयांच्या आहारी गेलेला होता. इतकं होऊनंही जाणवणारी अतृप्ती, सगळ्या सुखसोयी हाताशी असूनही आपण सुखी नाही ही जाणीव आणि वार्धक्क्याची-मरणाची भीती ययातीला कुरतडते आहे.
‘मी नहुष राजाचा मुलगा आहे. पुरूरव्याचा पणतू आहे. मला शर्मिष्ठा हवी, मला देवयानी हवी, मला जगातली प्रत्येक सुंदर स्त्री हवी. दररोज नवी सुंदर स्त्री!-‘ हे वाक्य आहे शरीरसुख हेच सर्वस्व मानणाऱ्या आणि त्यासाठी सर्व मर्यादा ओलांडणाऱ्या हस्तिनापुरचा राजा ययातीचे.
तो एक पराक्रमी राजा असतो, कच आणि माधवाचा जिवाभावाचा मित्र असतो, अलकेवर निरपेक्ष प्रेम करणारा आणि तिची काळजी घेणारा तिचा बालमित्र असतो, सिंहासनावर आपला थोरला भाऊ यति याचा अधिकार मानणारा धाकटा भाऊ असतो. पण पुढे त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक घटनेला त्याची भोगवादी वृत्ती जबाबदार असते जी त्याला नंतर अधःपाताच्या मार्गावर घेऊन जाते. वासनेच्या आहारी गेलेला ययाति एवढा स्वार्थी होतो कि स्वतः ला शाप म्हणुन मिळालेलं वृध्दत्व तो आपल्या पोटच्या मुलाला देऊ करतो. ययाति, देवयानी, शर्मिष्ठा आणि कच ही चार मुख्य पात्र आणि त्याव्यतिरिक्त अलका, मुकुलिका, माधव, तारका, माधवी, यति, पुरू ही पात्रं अतिशय सुंदर पद्धतीने खांडेकरांनी आपल्या अप्रतिम लेखनशैलीने जिवंत केली आहेत. कचाचे संयमी जीवन, त्याचे संवाद, त्याचे विचार मनाला भावतात आणि आपल्याला बरंच काही शिकवून जातात.
अहंकारी व महत्त्वाकांक्षी देवयानी, त्यागी व निरपेक्ष प्रेम करणारी शर्मिष्ठा आणि पित्याचे वृध्दत्व स्वखुशीने स्वीकारून भावासाठी सिंहासनाचा त्याग करणारा पुरू यांची ही कथा वाचकाला शेवटपर्यंत खिळवून ठेवते. कादंबरीच्या उत्तरार्धात माधवी आणि तारका यांच्या आयुष्याची झालेली फरफट वाचुन मन अस्वस्थ आणि बेचैन होऊन जातं. थोडक्यात पौराणिक कथेचा आधार घेऊन लिहिली गेलेली ही कादंबरी आजच्या आधुनिक काळातील मानवी प्रेम, भावभावना, मत्सर, भोगवादी वृत्ती अशा अनेक पैलूंचे दर्शन घडवते. प्रत्येकाने आवर्जून वाचावी अशी कादंबरी. कादंबरीतील मला आवडलेलं वाक्य :-
“”ज्या दिवशी कुठलाही माणूस आपलं होतं त्याच दिवशी त्याच्या गुणांचा नि अवगुणांचा मनुष्याच्या मनातला हिशेब संपतो. मागे राहते ती केवळ निरपेक्ष प्रीती! अडखळत, ठेचाळत, धडपडत, पुनःपुन्हा पडत पण पडूनही भक्तीच्या शिखराकडं जाण्याचा प्रयत्न करणारी प्रीती!
Show Less