डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे व्यक्तिमत्व राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा लकाकणारे होते. त्यांनी अनेक क्षेत्रात झपाटल्यासारखे केलेले कार्य हे दैदीप्यमान आहे.
‘आठवणीतले बाबासाहेब’ या ग्रंथाचे वैशिष्ट्य म्हणजे, डॉ. आंबेडकरांच्या जीवन कार्यावर बऱ्याच लेखकांनी लेखन केलेले आहे, परंतु योगीराज बागुल यांच्या लिखाणातले वेगळेपण म्हणजे त्यांनी बाबासाहेबांच्या सहवासात जे-जे व्यक्ती होते म्हणजे वामनराव गोडबोले, न्या. भालचंद्र वराळे, डॉ. नामदेव एम निमगडे, आसाराम मो. डोंगरे, बनस्पतीबाई दुलगज, बाळ साठे, प्रा. नरेंद्र.एस.कांबळे, शिवराम जाधव, मनोहर पवार इत्यादींची भेट घेऊन त्यांच्याकडून बाबासाहेबांच्या जीवनातल्या अशा घटनांची माहिती मिळवली जो वाचकांसाठी कांचनयोग ठरावा. त्यामुळे ही साहित्यकृती अतिशय देखणी ठरते.
बाबासाहेबांच्या चित्रकलेच्या छंद बद्दल लेखक आपल्याला सांगतात. बाबासाहेबांना आयुष्याच्या उत्तरार्धात चित्रकलेचा छंद लागला होता, अगदी त्यांनी सुरुवातीला कावळा, बगळा, चिमणी व हरीण अशी चित्रे काढले होती. आणि उत्तम सरावानंतर त्यांनी भगवान बुद्धाचे अतिशय सुरेख चित्र काढले होते.
या साहित्याच्या माध्यमातून वाचकांना समजते की संगीताची सुद्धा बाबासाहेबांना उत्तम जाण होती, कारण ते लहानपणापासूनच उत्तम तबला वाजवीत होते पण नंतर इ.स.१९५१ ते १९५३ दरम्यान ते व्हायोलिनवादन सुद्धा शिकले.
न्या. भालचंद्र वराळे यांच्या मुलाखतीच्या माध्यमातून लेखक माहिती सांगतात की बाबासाहेब ज्यावेळेस जागतिक बौद्ध परिषदेसाठी ब्रह्मदेशात रंगूनला गेले होते, तेव्हा त्यांना तिकडची जगप्रसिद्ध खीर आवडली होती. विशेष म्हणजे त्यांनी ती कशा पद्धतीने बनवायची त्याचीही माहिती मिळवली होती. आणि भारतात आल्यानंतर त्यांनी ती खीर स्वतः बनवली आणि आपल्या मित्र परिवारास खाऊ पण घातली. असा हा क्रांतीसुर्य इतक्या हळव्या व लाघवी मनाचा आहे हे या साहित्यातून आपल्याला समजते. कारण ही खीर विशेष करून भालचंद्र वराळे यांच्यासाठी होती कारण त्यांना जेवणामध्ये गोड खाण्यास आवडत होते आणि हे भालचंद्र नेमाडे वयाने त्यावेळेस खूप लहान आहेत.
या साहित्याच्या माध्यमातून आपल्याला हे देखील समजते की डॉ.आंबेडकरांना स्थानिक इतिहासाची प्रचंड आवड होती कारण बाबासाहेब ज्या ज्या शहरात किंवा गावात परिषदेसाठी जात किंवा भाषणासाठी तर प्रथम त्या गावचा इतिहास समजून घेत आणि तिथे गेल्यानंतर तेथील ऐतिहासिक स्थळांची आवर्जून भेट घेत. ही साहित्यकृती वाचताना वाचकांच्या असे लक्षात येते की आपला खरा इतिहास हा गावच्या मातीतच दडलेला आहे.
बाबासाहेबांनी आपले संपूर्ण आयुष्य दलितांच्या उत्कर्षासाठी खर्ची घातलेले आहे. ते फक्त सत्याग्रह, भाषणे करून थांबले नाहीत तर अगदी दैनंदिन जीवनातल्या छोट्या छोट्या घटनांकडे त्यांचे लक्ष होते, उदा. बाबासाहेबांना कोणीच कोणाचे उष्टे अन्न खाल्लेले आवडत नसे , त्यांच्या मते असे अन्न खाणे म्हणजे आपला स्वाभिमान गमावणे. त्याचबरोबर ते दलित महिलांसाठी सुद्धा बरेच संदेश देत,जसे की महिलांनी पायघोळ लुगडे नेसावे, स्वच्छ राहावे, मुलांना चांगले संस्कार द्यावे.
या साहित्यकृतीच्या माध्यमातून आपल्याला बाबासाहेबांना जेवणात काय आवडत होते हे सुद्धा समजते म्हणजे त्यांना मेथीचे भाजी आणि भाकरी हे खूप आवडत होती.
योगीराज बागुल यांची ‘आठवणीतले बाबासाहेब’ ही साहित्यकृती वाचताना वाचकांना हा विश्वरत्न एक वेगळ्या अंगाने समजतो. जो प्रेमळ, हळवा आहे, अगदी लहान मुलाप्रमाणे छोट्या छोट्या पक्षांची चित्रे काढतो आणि आपल्या मनातल्या भगवान बुद्धाचे चित्र रेखाटतो, त्याचबरोबर लहान मुलासाठी खीर पण बनवतो. आणि आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धात व्हायोलिनवादन सारखे वाद्य शकतो. खरंच डॉ.आंबेडकर बुद्धिमत्ता, चारित्र्य आणि कर्तुत्व यांचा ते हिमालय होते.