पुस्तक परिचय प्रा. डॉ. अशोक दातीर (उपप्राचार्य व विभाग प्रमुख, अगस्ति कला, वाणिज्य व दादासाहेब रुपवते विज्ञान महाविद्यालय, अकोले)
गांधींचा उच्च ध्येयवाद हा समाजातील काही लोक स्वतःच्या स्वार्थासाठी, दुसऱ्याची पिळवणूक करून वापरतात तरीही समाजमाणसात आदर्शवत मिरवतात. त्याचवेळी काही लोक मात्र परस्ठीतीने गांजलेली असतानादेखील हाच उच्च ध्येयवाद जोपासून समाजाच्या उन्नतीसाठी प्रयत्न करतात याची जाणीव विविध कथांच्या माध्यमातून वि. स. खांडेकर यांनी सांजवात या कथासंग्रहातून करून दिली आहे. उच्च ध्येयवाद काही काळ, काही ठिकाणी मानवाच्या विकासासाठी उपयोगी ठरला असेलही परंतु काही ठिकाणी, काही वेळा हाच उच्च ध्येयवाद एखाद्याचे आयुष्य कसे होरपळून टाकतो हे वाचताना अंगावर शहारे येतात. मानवी महत्वाकांक्षेचं राक्षसी रूप व त्यामुळे त्याचे सर्व विकार, वासना, असत्प्रवृत्ती यांनी मांडलेले थैमान या कथांद्वारे स्पष्ट होते. अर्थात या काळातही प्रामाणिक लोक कोणत्याही मोहाला बळी न पडता ठिकठिकाणी आपले कर्तव्य करीत आहेत. हे ठीकठिकाणचे तेजपुंज आहेत.
देशातले असे लोक मानवधर्माच्या ध्येयवादाने प्रेरित होऊन काम करत असतात
म्हणून हे जग चाललेले आहे असे वाटते. १९४८ साली लिहिलेल्या या कथांमधून
खांडेकरांनी जे विचार व्यक्त केले आहेत ते आजही विचार करायला लावणारे
आहेत.