नाव: अभ्यंकर मुक्ता महेश (सहाय्यक प्राध्यापक)
श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ फार्मसी, कोंढवा, पुणे
प्रसिद्ध लेखिका सुधा मूर्ती यांच्या स्वर्गाच्या वाटेवर काहीतरी घडले ह्या लीला सोहनी अनुवादित पुस्तकात सकारात्मक संदेश देणाऱ्या सत्यकथा आहेत. प्रखर वास्तवात आशेचे किरण निर्माण करणाऱ्या ह्या वैविध्यपूर्ण कथा आहेत. प्रत्येक कथेत वेगळा अनुभव मांडला आहे त्यामुळे वाचतांना उत्सुकता वाटते. स्वीकार ह्या पहिल्याच कथेत तृतीयपंथी लोकातील व्यक्तीचे दुःख समजून त्याचा स्वीकार आपल्या घरात करणारी सून कौतुकास्पद वाटते. ह्यातील काही कथा वाचतांना अंगावर नक्कीच काटा येतो. अल्झायमर सारख्या भयंकर आजारपणामुळे हिंसक झालेल्या आजोबांच्या पाठीशी तरुण मुलगा खंबीरपणे उभा राहतो हे वाचून आनंद वाटला. एका जीवघेण्या अपघातातून एक तरुण आई कशी धडपड करून आपल्या मुलांचा चेहरा डोळ्यापुढे ठेवून वाचते ही कथा ही काळजाला भिडणारी आहे. ह्याकथा वाचल्यावर असे निश्चितच वाटते की जगात चांगुलपणा अजूनही निश्चितच शिल्लक आहे.सर्व कथा प्रेरणादायी व आनंद देणाऱ्या आहेत.एक आगळे वेगळे पुस्तक म्हणून सगळ्यांना वाचनीय आहे