भारतातील साक्षरता बऱ्याच प्रयत्नांनंतर आता कुठे जरा वाढलेली बघायला मिळते. शासन, वेगवेगळ्या
Read More
भारतातील साक्षरता बऱ्याच प्रयत्नांनंतर आता कुठे जरा वाढलेली बघायला मिळते. शासन, वेगवेगळ्या संस्था आणि अगदी व्यक्तीगत पातळीवर केलेल्या अथक प्रयत्नांमुळे हे वाढलेले साक्षरतेचे प्रमाण आपल्याला बघायला मिळते. अजूनही बराच लांबचा पल्ला गाठायचा असला तरी गेल्या पन्नास वर्षांत जाणवण्याइतपत बदल नक्कीच झाला आहे.
मानवाच्या प्रगतीसाठी अक्षरओळखीची ही साक्षरता जितकी महत्त्वाची आहे, तितकीच महत्त्वाची असलेल्या अर्थसाक्षरतेविषयी मात्र आपल्या समाजात अजूनही पाहिजे तेवढी जागृती झालेली नाही. अजूनही समाजामध्ये असा बराच मोठा शिकला सवरलेला वर्ग आहे जो आपल्या आर्थिक नियोजनासाठी सर्वस्वी दुसऱ्यावर अवलंबून आहे. आर्थिक नियोजन ही काही फार अवघड किंवा अशक्य कोटीतील गोष्ट नाही, पण त्याबाबतीतील जागरुकता दुर्दैवाने आपल्याकडे अजूनही नाही. आता कुठे यादृष्टीनेही आपल्याकडे जरा सकारात्मक पावले उचलली जात आहेत.
चांगल्या कमावत्या महिला, नुकतेच नोकरीला लागलेले तरुण-तरुणी यामध्ये तर ही उदासीनता जास्तच प्रमाणात बघायला मिळते. त्याचबरोबर अजूनही आपल्याकडे विमा, बचत आणि गुंतवणूक या तिन्हीविषयी प्रचंड संभ्रम बघायला मिळतो. हा फार किचकट विषय असल्याने, त्या नादाला न लागलेलेच बरे असा एक नकारात्मक सूर दुर्दैवाने बघायला मिळतो. आता त्यामध्येही बदल होतोय पण यामध्येही आपल्याला बराच लांबचा पल्ला गाठायचा आहे.
या अर्थसाक्षरतेविषयी असलेल्या उदासीनतेमुळे किंवा परावलंबित्वामुळे, बऱ्याचदा आपण आपले आर्थिक नियोजन स्वतःचा फायदा न होता दुसऱ्याचा (बऱ्याचदा आर्थिक सल्लागाराचा) फायदा कसा होईल अशा तऱ्हेने झालेले बघतो. पण त्यावेळी वेळ गेलेली असते आणि आर्थिक नियोजनातील महत्त्वाची वर्षे सुद्धा आपण गमावलेली असतात.
“तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार” या न्यायाने आपले आर्थिक नियोजन खरेतर आपल्या गरजांनुसार आणि आपल्या आवश्यकतेनुसार व्हायला पाहिजे. निश्चितच त्यामध्ये आर्थिक /गुंतवणूक सल्लागार हा महत्त्वाचा घटक आहे पण तो जे नियोजन आपल्याला सांगतोय ते आपल्याला समजण्यासाठी, आपल्यालाही यातील जुजबी ज्ञान आवश्यकच आहे.
हे जुजबी ज्ञान कसे मिळवायचे याबद्दल मनात संभ्रम निर्माण होणे स्वाभाविक आहे. पण यावर अतिशय जालीम उपाय म्हणजे सीए. अभिजीत कोळपकरांनी लिहिलेले “अर्थसाक्षर व्हा” हे पुस्तक. आर्थिक नियोजनावर इतके परिपूर्ण असे हे मराठीतील बहुधा पहिलेच पुस्तक असावे. पुस्तकातील मुद्देसुद मांडणी आणि समर्पक दैनंदिन उदाहरणांमुळे अतिक्लिष्ट वाटणाऱ्या आर्थिक संकल्पनाही अगदी सहजतेने समजतात.
‘अर्थसाक्षर व्हा !’ एकूण ६ भागांमध्ये विभागण्यात आले आहे.
१. ओळख अर्थसाक्षरतेची
२. आर्थिक नियोजन
३. विमा व कर्ज व्यवस्थापन
४. गुंतवणूक नियोजन
५. शेअर्स व म्युच्युअल फंड
६. आर्थिक फसवणुकींपासून सावधान !
तुमचे उत्पन्न किती आहे यापेक्षा मिळवलेल्या पैशाचा विनियोग तुम्ही कसा करावा, योग्य आर्थिक नियोजन करून विविध ध्येये कशी साध्य करावीत, विमा व कर्ज व्यवस्थापन कसे करावे, सुयोग्य गुंतवणूक करून तुमच्या बचतीच्या पैशाला कसे कामाला लावावे यांचे उत्तम मार्गदर्शन ‘अर्थसाक्षर व्हा!’ मध्ये वाचायला मिळते. आकर्षक चित्रे, फ्लो – चार्ट्स, तक्ते , सोपी भाषा व सुबक बांधणी ही या पुस्तकाची बलस्थानेच म्हणायला हवीत. प्रत्येक पानावर असलेले थोर अर्थशास्त्रज्ञांचे छोटे छोटे विचार आणि समर्पक संस्कृत सुभाषितांचा अनोखा वापर यामुळे तर पुस्तक एका वेगळ्याच उंचीवर गेले आहे.
Show Less