Share

Original Title

एक पूर्ण-अपूर्ण

Publish Date

2006-06-05

Published Year

2006

Total Pages

111

Format

paperback

Language

मराठी

Readers Feedback

हे पुस्तक म्हणजे एका आईची हृदय विदिर्ण करणारी कहाणी!

एक पूर्ण अपूर्ण हा नीला सत्यनारायण यांचा ग्रंथ आहे. ही त्यांची स्वतःची आत्मकथा आहे. ग्रंथाली प्रकाशन ने ही प्रकाशित केलेली आहे. एकूण चार आवृत्ती आहेत....Read More

डॉ. वर्षा दसवडकर

डॉ. वर्षा दसवडकर

×
हे पुस्तक म्हणजे एका आईची हृदय विदिर्ण करणारी कहाणी!
Share

एक पूर्ण अपूर्ण हा नीला सत्यनारायण यांचा ग्रंथ आहे. ही त्यांची स्वतःची आत्मकथा आहे. ग्रंथाली प्रकाशन ने ही प्रकाशित केलेली आहे. एकूण चार आवृत्ती आहेत. पहिली आवृत्ती 2005 मध्ये आलेली आहे तर चौथी आवृत्ती 2006 मध्ये आलेली आहे. या पुस्तकाची एकूण 112 पृष्ठे आहेत. यामध्ये एकूण 14 प्रकरणे आहेत व एक परिशिष्ट आहे. ही एका आईचे हृदय विदिर्ण करणारी कहाणी आहे. एका कुटुंबाचे अग्नी दिव्य वर्णन केलेले आहे. या कुटुंबात एक डाऊन सिंड्रोम/ मतिमंद मुलगा जन्माला आला त्यानंतर आई-वडिलांचे पूर्ण आयुष्य हळूहळू कसे बदलत गेले याचे वर्णन यामध्ये केलेले आहे.
या पुस्तकातील पहिले प्रकरण आहे साठा उत्तराची कहाणी यामध्ये त्यांनी डाऊन सिंड्रोम/ मतिमंद मुलाच्या जन्मानंतर त्यांच्या कुटुंबाची जीवनशैली कशी बदलून गेली. त्याला सांभाळण्याची त्याच्या प्रत्येक गरजेनुसार त्याच्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज तसेच जगण्यासाठी जे जे लागतं ते ते त्या मुलाला देऊ केलं आणि महत्त्वाचं म्हणजे त्याला उदंड प्रेम दिलं याचं वर्णन यामध्ये केलेले आहे. यानंतर दुसऱ्या प्रकरणांमध्ये विठ्ठल कामत यांनी प्रस्तावना केलेली आहे यामध्ये त्यांनी असे लिहिले आहे की नीला सत्यनारायण यांचा आत्मानुभव एक पूर्ण अपूर्ण वाचल्यानंतर त्यांच्या मनाची ॲनाटोमी ही कशी ठळक होत गेली. आपल्या बदलत्या भूमिका नीला सत्यनारायण यांनी एखादी रंगभूमीवरील वेशभूषा बदलावी अशा बदलून त्यांच्या आत्म्यावर एकच वस्त्र घट्ट लपेटलं ते म्हणजे मातृत्वाचं ते अजन्माचं. माणसाला माणूस म्हणून प्रेमाने स्वीकारण्याच. यातील तिसरे प्रकरण आहे मुलगा झाला हो या प्रकरणांमध्ये त्यांनी त्यांच्या प्रसूतीचे वर्णन केलेले आहे.
यातील पुढचे प्रकरण आहे आनंद विखुरला यामध्ये त्यांनी मुलगा झाल्याचा आनंद तो डाऊन सिंड्रोम/मतिमंद आहे असे समजल्यानंतर त्यांचा पूर्ण आनंद विरून गेला. त्यानंतर त्यांनी पुढील प्रकरणामध्ये डाऊन सिंड्रोम म्हणजे अशा मुलांचा बौद्धिक विकास मानसिक प्रगती आणि सामाजिक कौशल्य हे सामान्य मुलांच्या तुलनेत खूप उशिराने सुरू होतात. शरीराला लागणाऱ्या सर्व हालचाली विशेषता बोटांची बारीक कामे लवकर आत्मसात होत नाहीत. जनुकांमुळे निर्माण होणारे दोषही या मुलांमध्ये आढळतात. या मुलांचा चेहरा विशिष्ट प्रकारचा दिसतो त्यांच्या तळव्यांना आपल्यासारखे उंचवटे व सखोल भाग नसतो हे सांगितले आहे.
यानंतर त्यांनी तो मुलगा हळूहळू मोठा होऊ लागल्यानंतर त्याला येणाऱ्या अडचणींचे वर्णन पुढे केले आहे. यामध्ये त्यांनी असे सांगितले आहे की त्याचा शारीरिक तोल नीट होत चालला होता परंतु त्याची बोलण्याची अडचण मात्र अजूनही होती तसे बोलणे समजायला अवघड होते त्यामुळे त्याच्याशी संवाद साधणे जिकिरीचे होई. ते त्याचे हातवारे बघून चेहऱ्यावरचे नजरेतले भाव टिपून त्यानुसार खाणाखुणा करायचे.
यानंतर थोडा मोठा झाल्यावर त्याच्या शाळेसाठी त्यांना बरीच धडपड करावी लागली. त्यांना त्याच्या शाळेसाठी बरेच वाईट अनुभव आले. त्याला कोणी शाळेत घेण्यासाठी तयार होईना. यानंतर त्यांना श्रीमती पेरीस नावाच्या व्यक्ती भेटल्या. त्या नर्सरी स्कूल चालवायच्या. पेरीस बाईंची भेट नीला सत्यनारायण यांच्यासाठी एक जगावेगळा अनुभव होता. आतापर्यंत भेटी दिलेल्या शाळांमधून आलेल्या अनुभवांपेक्षा फारच सुखद आणि वेगळा होता. पेरीस बाईंनी त्यांच्या शाळेमध्ये त्या मुलाला ऍडमिशन दिली.
ही शाळा सुरू झाली तशी त्या मुलाची प्रगती झपाट्याने होऊ लागली. पहिल्यापेक्षा तो आनंदी राहू लागला. घरी आल्यावर शाळेतल्या कविता म्हणून दाखवू लागला. शाळेतल्या सर्व कार्यक्रमात तो भाग घेऊ लागला. शाळेत जाण्यामुळे त्याच्यामध्ये लक्षणीय फरक झाला होता. त्याचा आत्मविश्वासही बऱ्यापैकी वाढला होता. मुख्य म्हणजे जगण्याची कला त्याला अवगत होऊ लागली होती परंतु आजारपण हा त्याच्या जीवनाचा अपरिहार्य भाग होता. त्याला मोठे होण्यासाठी अक्षरशः प्रत्येक दिवसाची बरीच मोठी किंमत मोजावी लागत होती. नीला सत्यनारायण यांना वाटायचे की आपल्या मुलाचे दुःख हताशपणे बघणे याहून मोठे दुसरे कुठलेही दुःख पालकांना नाही. आई म्हणून त्यांना सर्वात वाईट हे वाटायचे की मुलाचे दुःख वेदना त्या घेऊ शकत नव्हत्या.
पेरीस बाईंच्या शाळेत बरीच वर्ष काढल्यावर चैतन्यला आता पुढच्या वर्गात पुढच्या शाळेत जाण्याची आवश्यकता होती. त्याचा शारीरिक विकास समाधानकारक झाला होता. पेरीस बाईंच्या शाळेत तो नॉर्मल मुलांबरोबर शिकला परंतु यानंतर त्याला स्पेशल स्कूलमध्ये घालावे लागणार होते.
यानंतर त्यांनी त्या मुलाला नौनिहाल या शाळेमध्ये घातले. सुधा आणि लीना या दोन मुली थोड्याशा मतिमंद मुलांना घेऊन ही शाळा चालवत होत्या. या मुलांना दैनंदिन जीवनात आवश्यक असलेले शिक्षण देणे त्यांचे उद्दिष्ट होते. या शाळेमध्ये घरगुती काम, वैयक्तिक स्वच्छता, समाजात जगण्याचे कौशल्य इत्यादी विषय शिकवले जायचे. या शाळेमध्ये तो बराच काही शिकला परंतु काही कारणास्तव घर बदलावे लागल्यामुळे त्याची ती शाळा ही बदलावी लागली. तो मुलगा आता सात वर्षांचा झाला होता परंतु अजूनही तो अगदी निरागस छोट्या बाळासारखा दिसायचा आणि बाळाचे जसे सर्वच करायला लागते तसे त्याचे सर्व बघायला लागायचे.
यानंतर त्यांनी त्याला स्पेशल स्कूलमध्ये घातले. या स्कूलमध्ये गेल्यामुळे त्यामध्ये सुधारणा होऊ लागली. त्याचा आत्मविश्वास दुणावू लागला. त्याच्या शिक्षकांमध्ये मित्रांमध्ये आणि शाळेच्या इतर कर्मचाऱ्यांमध्ये तो लोकप्रिय होऊ लागला. बोलण्यात सुधारणा होऊ लागली, उच्चारातली स्पष्टता वाढली.
त्याच्या अभ्यासातील प्रगती संथ होती परंतु त्याचा रस चित्रकला, पेंटिंग, संगीत हस्तकला यांच्याकडे होता. त्याने राज्यस्तरीय आंतरशालेय स्पर्धेतून धावण्याच्या शर्यतीत दोन बक्षीस मिळवली. त्याने धावण्याच्या शर्यतीत मिळवलेले रौप्य पदक हे त्याच्या आणि नीला सत्यनारायण यांच्या जीवनाचा मानबिंदू आहे.
यामध्ये त्यांनी एक किस्सा सांगितला आहे, त्या एक दिवस चैतन्यला घेऊन बसणे प्रवास करत होत्या तेव्हा चैतन्य वन फुल वन हाफ तिकीट काढतो. त्याचे हे शब्द नीला सत्यनारायण यांना अंतर्मुख करून जातात. त्या म्हणतात आपण सामान्य माणसे स्वतःला पूर्ण समजतो आणि मतिमंद किंवा अपंग लोकांना अपूर्ण किंवा अर्धवट मानतो पण खरोखरच आपण परिपूर्ण आहोत का? चैतन्यमुळे त्यांना सातत्याने जाणवले की त्याचे जीवन समृद्ध आणि संपूर्ण आहे निरागस निष्पाप आहे. आपल्या जीवनाला मात्र आपण द्वेष, असुया, मत्सर इत्यादींनी ग्रासू देतो आणि मग आपले जीवन आणि जग दोन्ही अपूर्ण राहतात. त्याचे ते दोन शब्द त्यांना या पूर्णत्वाची आणि अपूर्णत्वाची जाणीव करून देऊन गेले.
शेवटी नीला सत्यनारायण यांनी असे म्हटले आहे की चैतन्य आमच्यापेक्षा नक्कीच वेगळा आहे पण तो आमच्यापेक्षा जास्त परिपूर्ण आहे. बसचा तो प्रवास आमचा दोघांचाही सारखा होता अंतरही तेच होतं फरक फक्त तिकिटांच्या किमतीत होता. आपल्या आयुष्याचा हा प्रवासही काहीसा असाच नाही का? ज्या दिवशी आपला समाज हे सत्य स्वीकारेल त्या दिवशी कोणी पूर्ण आणि कोणी अपूर्ण असा भेदभावच राहणार नाही. त्या दिवशी हे जग पूर्णत्वाला जाईल. प्रेमाने ओथंबलेलं हे जग, एकमेकांच्या सुख समाधानासाठी धडपडणारे हे जग एकमेकांचे सुखदुःख वाटून घेणारे हे जग निश्चितच परिपूर्ण असेल. डॉक्टरांनी चैतन्याला फक्त माणसाचा गोळा असेल त्याला काही समजणार नाही असे सांगितले होते परंतु नीला सत्यनारायण यांच्या प्रयत्नाने तो चालूबोलू शकला.
समारोप
नीला सत्यनारायण यांनी एक पूर्ण अपूर्ण ही आत्मकथा लिहिलेली आहे. त्यामध्ये त्यांनी एका वरिष्ठ महिला सनदी अधिकाऱ्याची अनुभव कथा न मांडता डाऊन सिंड्रोम असलेल्या पाल्याच्या आईची आत्मवेदना, संवेदना अतिशय हृदयस्पर्शी स्वरूपामध्ये मांडली आहे. आई होणे हे प्रत्येक स्त्रीसाठी एक सुंदर स्वप्न असते. परंतु निर्मिकाने निर्माण केलेले बाळ डाऊन सिंड्रोम असेल तर त्या आईची पूर्ण जीवनगाथाच बदलून जाते. तिला त्या बाळाचे संगोपन करताना व त्याला माणूस म्हणून घडवताना तिचा जो संघर्षमय प्रवास आहे तो वाचताना प्रत्येक वाचकाच्या डोळ्यांमध्ये अश्रू उभे राहतात. डाऊन सिंड्रोम असणाऱ्या बालकांना घडविण्यासाठी त्या आईने जे अपार कष्ट घेतले, त्याची नोंद या ग्रंथाच्या रूपाने अधोरेखित होते. अशा अनेक डाऊन सिंड्रोम असणाऱ्या बालकांच्या मातांना ही नीला सत्यनारायण यांची आत्मकथा प्रेरणा देते, जीवन जगण्यासाठीचा मार्ग दाखविते. निराश, हताश अवस्थेमध्ये कसे जीवन जगावे, यासाठीचा नवा मार्ग दाखविते. डाऊन सिंड्रोम असणारी बालके समाजामध्ये उपेक्षित असतात. समाजातील अशा उपेक्षित घटकाकडे लेखिकेने संपूर्ण समाजाचे लक्ष वेधले आहे व संपूर्ण समाजाने संवेदनशीलरित्या डाऊन सिंड्रोम असणाऱ्या बालकांकडे पाहिले पाहिजे व त्यांच्यातून नवा माणूस घडवला पाहिजे हा संदेश ही आत्मकथा देते. यासाठी सर्वांनी हे पुस्तक आवर्जून वाचावे.

डॉ. वर्षा दसवडकर

डॉ. वर्षा दसवडकर

Submit Your Review

Item Added to Cart!

What would you like to do next?

View Cart