लक्ष्मीबाई टिळक यांच्यापासून सुनिता देशपांडे यांच्या पर्यंत स्त्रियांनी विशेषतः
Read More
लक्ष्मीबाई टिळक यांच्यापासून सुनिता देशपांडे यांच्या पर्यंत स्त्रियांनी विशेषतः साहित्यिकांच्या पत्नींनी लिहिलेल्या आत्मवृत्तांमुळे मराठी साहित्यात मोलाची भर पडली आहे. ‘कुणास्तव कुणीतरी’ हे देखील मंगेश पाडगावकर यांच्या पत्नी यशोदा पाडगावकर यांचे आत्मचरित्र त्याच परंपरेत बसणारे आहे. यशोदा पाडगावकर यांनी आपल्या आत्मचरित्रात आपले नातेवाईक, सासूबाई, आजे सासूबाई, नणंदा, स्वतःची आई, भाऊ, मैत्रिणी, मंगेश पाडगावकरांचे मित्र आणि त्यांच्यासोबतचा संसार याबद्दल विस्तृतपणे लेखन केले आहे. त्यांचे सुरुवातीचे आयुष्य, कॉलेजजीवन, येरवड्यामधील घर तसेच त्यांच्या सौंदर्यामुळे आकर्षित होणारे पुरुष इत्यादी सर्व बाबींबद्दल कालानुक्रमे लेखन केले आहे,परंतु सर्वात लक्षवेधक उतरले आहे ते त्यांचे आई म्हणून असलेले कर्तृत्व आणि व्यक्तिमत्व. याशिवाय पाडगावकरांच्या कविता, इतरांना मदत करण्याचा त्यांचा स्वभाव, काही प्रसंगात पत्नीच्या धैर्याची आणि कर्तृत्वाची लागलेली कसोटी तसेच त्यांची दूरदृष्टी, मदत करणाऱ्या लोकांबद्दलची कृतज्ञता याबद्दलही लेखन केलेले आहे. यशोदा पाडगावकर यांनी मंगेश पाडगावकरांच्या लोकप्रियतेचे दडपण मनावर येऊन देता आपल्या वैवाहिक जीवनाबद्दल मोकळेपणाने लिहिलेले आहे. त्यांच्या वैवाहिक जीवनाबद्दल वाचताना पाडगावकरांसारखा कवी देखील नवरा म्हणून इतर नवऱ्यांपेक्षा फारसा काही वेगळा वागत नाही हे लक्षात येते. पत्नीच्या अपेक्षा, तिला करावा लागणारा त्याग, तिची आजारपण इत्यादी बाबतीत तर पाडगावकर अतिशय संवेदना शून्य आणि स्वार्थी आहेत असे वाटत राहते. कवी, साहित्यिक किंवा कलावंत यांच्याबद्दल आदर्शवादी कल्पना बाळगणाऱ्या आणि त्यांच्यावर द्रष्टेपणाची भूमिका लादणाऱ्या समाजाला किंवा पाडगावकरांच्या कवितांच्या चाहते असणाऱ्या रसिकांना हे कदाचित आवडणार नाही तरी पण एकंदरीतच यशोदा पाडगावकर यांचे कुणास्तव कुणीतरी हे आत्मचरित्र वाचनीय आहे
Show Less