"नमस्कार वाचक मित्रहो, काही ग्रंथ आणि पुस्तके ही आपल्या जीवनाला एक विधायक वळण देण्याचा प्रयत्न
Read More
“नमस्कार वाचक मित्रहो,
काही ग्रंथ आणि पुस्तके ही आपल्या जीवनाला एक विधायक वळण देण्याचा प्रयत्न करतात त्यातील हे एक पुस्तक. ‘गोष्ट पैशापाण्याची’ हे पुस्तक प्रकाशनानंतर लगेचच प्रसिद्ध झाले आणि वाचकांच्या गळ्यातला ‘ताईत’ बनले. बरेच दिवस झाले हे पुस्तक मिळवून वाचण्याची ओढ होतीच. काही अशी पुस्तके असतात, की ती एकाच बैठकीत वाचून होतात. त्या पठडीतलं हे पुस्तक ‘गोष्ट पैशापाण्याची’. अर्थशास्त्रासारखा किचकट , कठीण परंतु अतिशय महत्त्वाचा विषय ‘गोष्ट’रुपात सांगण्याचं कसब लेखक प्रफुल्ल वानखेडे यांनी लिलया करून दाखवलंय. ‘गोष्ट पैशापाण्याची’ वाचताना आपण एखाद्या लाकूडतोड्याची किंवा जंगलातल्या सिंहाची मनोरंजक गोष्ट वाचत आहोत असेच वाटते. वाचता वाचता आपल्यावर अर्थ संस्कार होत जातात. अर्थसाक्षर होण्यासाठीची ही ‘एबीसीडी’ आहे असे मला हे पुस्तक वाचल्यानंतर वाटते.
लेखक प्रफुल्ल वानखेडे स्वतः प्रतिथयश उद्योजक असणारे, विशेषतः पुस्तक प्रेमाने भरलेले असून ‘लेट्स रीड’ सारख्या ग्रंथ चळवळीतून वाचन संस्कृतीच्या विकासासाठी ते अथक कार्यरत आहेत. प्रत्येकाने संग्रही ठेवावं असं हे पुस्तक आहे. ‘जेव्हा तुम्हाला मार्गदर्शनाची गरज भासेल तेव्हा हे पुस्तक घ्या आणि त्यातल्या गोष्टी वाचा. प्रत्येक गोष्ट वाचून आपल्याला एक नवीन प्रेरणा मिळते. नवीन उमेद मिळते. गोष्ट पैशापाण्याची ह्या पुस्तकातून आपल्याला आर्थिक बाबी तर कळतात परंतु पैशासोबत माणसं, आरोग्य, ज्ञान, विज्ञान या गोष्टींचीही किंमत सांगणार हे पुस्तक आहे. सोशल मीडियाच्या जगात जिथे लोक मनोरंजनात व्यग्र आहेत तिथं प्रफुल्ल वानखेडे आर्थिक साक्षरता आणि उद्यमशीलतेचे धडे देत असतात. योग्य पद्धतीने पैसा मिळवणं, वाढवणं आणि समृद्ध जगण्यासाठी तो खर्च करणं यासाठी मूल्य संस्कार रुजवण्याचे काम प्रफुल्ल वानखेडे अथकपणे करीत आहेत.
या पुस्तकात एकूण 31 प्रकरणांचा समावेश केलेला आहे. त्यातील श्रीमंतीचा दिखाऊपणा, उत्तम शिक्षण यशाची गुरुकिल्ली !, पैशाचा प्रवाह आणि बचतीचे धरण !, पुस्तक वाचनातून अर्थसाक्षरतेकडे !, समाजसेवेची नशा, जाणीतो महत्त्व वेळेचे, माणुसकीची श्रीमंती, सहीसाक्षर व्हा ! प्रवास करा जगभर, गोष्ट ऊर्जेची ही प्रकरणे आणि ह्या ‘गोष्टी’ मला विशेष करून आवडल्या. आर्थिकदृष्ट्या प्रबळ होण्यासाठी, अर्थसाक्षरतेच्या गोष्टी सहजपणे शिकण्यासाठी हे पुस्तक जरूर वाचावे.”
Show Less