राहुल ससाणे, संशोधक विद्यार्थी, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे MA (Marathi) MPhil, SET, NET with JRF, एखादा
Read More
राहुल ससाणे,
संशोधक विद्यार्थी,
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे
MA (Marathi) MPhil, SET, NET with JRF,
एखादा लेखक जेव्हा एखादी कलाकृती निर्माण करतो. त्या कलाकृतीची निर्मिती प्रक्रिया व प्रेरणा कोणत्या होत्या. ते तो सांगत असतो अथवा वाचक आपल्या वाचनामधून आकलनामधून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणूनच साहित्य व्यवहारात पुस्तक परिक्षण या घटकाला विशेष असे महत्त्व आहे. याठिकाणी मराठी साहित्यातील जेष्ठ अभ्यास व विचारवंत लेखक रावसाहेब कसबे यांच्या ‘भक्ती आणि धम्म’ या ग्रंथाचे परिक्षण येथे करणार आहे.
आधुनिक महाराष्ट्रातील वैचारिक साहित्याची खूप मोठी परंपरा आपल्याकडे आहे. यामधील एक महत्त्वाचे नाव म्हणजे डॉ. रावसाहेब कसबे होय. प्रामुख्याने मानव आणि धर्म व त्यांचा परस्परसंबंध याचा शोध घेण्याचा प्रयत्न ते आपल्या साहित्यातून करताना दिसून येतात. त्याचे झोत, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय राज्यघटना, आंबेडकर आणि मार्क्स, हिंदू मुस्लिम प्रश्न आणि सावरकरांचा हिंदुराष्ट्रवाद, मानव आणि धर्मचिंतन, धर्मग्रंथ आणि मानवी जीवनप्रवास आणि भक्ती आणि धम्म इ. ग्रंथ प्रकाशित आहेत. मानव त्याची उत्पत्ती व निसर्ग याचा संबंध कसा आहे? मानवची निर्मिती नैसर्गिक पद्धतीने झाली की त्याला कुठल्या परमेश्वराने, देवाने निर्माण केले? विश्व निर्मिती विषकयक विज्ञान व वैज्ञानिकांची भूमिका इ. प्रश्नःवर भाष्य करण्याचे काम त्यांचा हा ‘भक्त आणि धम्म’ करतो. प्रामुख्याने त्याच्या साहित्याचा जेव्हा आपण सखोल अभ्यास करतो तेव्हा एक सुत्र आपल्याला सापडते आणि ते म्हणजे त्यांची चिकित्सक दृष्टी होय. मानव आणि धर्मचिंतन, धर्मग्रंथ आणि मानवी जीवनप्रवास आणि भक्ती आणि धम्म या तीन ग्रंथांची एक मालिका आहे. वाचकांना भक्ती आणि धम्म हा ग्रंथ जर समजून घ्यायचा असेल तर त्यांना अगोदर वरील दोन ग्रंथ वाचने अत्यंत आवश्यक आणि महत्त्वाचे आहे. कारण या तीन ग्रंथांमधून त्यांनी आपले विवेचन मांडलेले आहे.
प्रामुख्याने ‘भक्ती आणि धम्म’ हा ग्रंथ एकूण तीन भागांमध्ये विभागलेला आहे. विभाग पहिला – भक्ती या नावाने आहे. या अंतर्गत धर्म आणि देव, प्रेम आणि भक्ती असे तीन घटकांच्या आधारे विशेषण केलेले आहे. त्यानंतर विभाग दुसऱ्यामध्ये पुनरूज्जीवन आणि प्रबोधन या शीर्षकाखाली पुनरूज्जीवन आणि प्रबोधनाचे स्वरूप, प्रबोधनकालीन राजकीय विचारांचा विकास, भारतीय पुनरूज्जीवन आणि प्रबोधन या घटनांचा समावेश आहे. आणि शेवटच्या तिसऱ्या विभागात ‘धम्म’ या शीर्षकाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय प्रबोधन चळवळीचे साफल्य , बुद्ध धम्माचा उदय आणि विकास, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा बुद्ध आणि धम्म या घटनांच्या संदर्भात सखोल अशी चिकित्सक मांडणी केलेली आहे. हा ग्रंथांचे एक वैशिष्ट्य असे आहे की कसबे यांनी आपली मांडणी करत असताना साधारपणे शंभर च्या वर इंग्रजी संदर्भ ग्रंथाचा उपयोग केला केला आहे. तसेच हिंदी मधील दहा आणि मराठीमधील वीस च्या आसपास ग्रंथ संदर्भ म्हणून वापरले आहेत.
एखाद्या मुद्दा अथवा घटक वाचकांना समजून सांगत असताना अनेक संदर्भ देऊन तो मुद्दा सांगणे हे या ग्रंथाचे वेगळेपण आहे. हा ग्रंथ वाचत असताना अनेक इंग्रजी, हिंदी व मराठीमधील अनेक प्राचीन व दुर्मिळ महत्त्वाचे ग्रंथांची आपल्याला ओळख होते. अगदी मराठीमधील संत, पंत आणि तंत यांचा देखील ते मध्ये मध्ये आवश्यकतेनुसार दाखला देत असतात. तुकाराम महाराज, संत नामदेव, संत चोखामेळा, तसेच काही सुफी संताच्या काव्याचा उल्लेख वाचकांना खिळवून ठेवतो. हा ग्रंथ तसा आकाराने मोठा आहे. पण एकदा की तो आपण वाचायला सुरुवात केली तर त्यामध्ये वाचकांना गुंतून ठेवण्यासाठी लेखक यशस्वी झालेले आहेत. या ग्रंथाचे अजून एक वैशिष्ट्य आपल्याला सांगता येईल ते म्हणजे कसबे यांनी ग्रंथाची प्रासतावना आणि समारोप एकत्रित सुरूवातीला केलेला आहे. साधारपणे १९ पानांची दिर्घ आणि अभ्यासपूर्ण प्रस्तावना व समारोप केलेला आहे. यामधून देखील वाचकांना अनेक गोष्टी समजून घेण्यासाठी मदत होते. अशा पद्धतीचा प्रयोग साहित्य विश्वात नाही. त्या आपल्या या प्रयोगाविषयी लिहितात, “वास्तविक पाहता एखाद्या ग्रंथाची प्रस्तावना आणि समारोप एकत्रित छापण्याची पद्धत नाही. परंतु हा ग्रंथ एका लेखन प्रकल्पाचा शेवट असल्याने तसे करणे आवश्यक आहे. म्हणून या दोन्हीही गोष्टी एकत्रित लिहिण्याचे ठरविले.”
मानवाने त्याच्या उत्पत्ती पासून ते आतापर्यंत जी काही सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक प्रगती केली. याचा शोध कसबे यांनी या ग्रंथांमधून घेतला आहे. मानवाच्या विविध विकास अवस्थांचे वेगवेगळे टप्पे त्यांनी समजून सांगितले आहेत. मानव आणि विश्व, मानव आणि धर्म, धर्म आणि विज्ञान, धर्म आणि विज्ञान यांच्यामधील संघर्ष या सर्व घटकांवर त्यांनी भाष्य केलेले आहे. डॉ. कसबे एका ठिकाणी लिहतात, “माणसाच्या आणि त्याने निर्माण केलेल्या समाजाच्या शक्य तेवढ्या सर्व अंगांना समजून घेण्याचा मार्ग धर्मचिकित्सेतून सापडतो.” याचा अर्थ धर्म व धर्माची चिकित्सा ही अत्यंत महत्त्वाची आहे. आजच्या काळाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्या लक्षात येते की देशभरात आणि जगभरात धर्म नावाची गोष्ट मानवी जीवनाला कशा पद्धतीने प्रभावीत करत आहे. देव धर्म व देश यांच्या नावावरून माणसा माणसात वाद निर्माण करून दंगली घडवून आणायच्या गोष्टी होत आहे. आणि या सर्वांमध्ये बळी जातो आहे. तो फक्त सर्वसामान्य माणसांचा. म्हणून माणसाला माणसासारखे जगता आले पाहिजे. भारतीय संविधानाचे त्याला दिलेल्या हक्क आणि अधिकारांचा त्याला वापर करता आला पाहिजे. इत्यादी अनेक प्रश्नांची अत्यंत परखड अशी चिकित्सक हा ग्रंथ करतो. म्हणून महाराष्ट्रांतील नव्हे तर जगभरातील वाचकांनी हा ग्रंथ वाचला पाहिजे.
वाचकाला चिंतन मनन करण्यास भाग पाडणारा व चिकित्सेच्या वाटेवर घेऊन जाणारा हा ग्रंथ वाचकांनी, अभ्यासकांनी तसेच संशोधक विद्यार्थीनी वाचून त्यांच्या मनात प्रश्न विचारण्याची व प्रत्येक गोष्ट तपासून पाहण्याची दृष्टी निर्माण होवो.
Show Less