आनंद यादव यांच्या कथा अस्सल ग्रामीण कथा आहेत. ग्रामीण भागात असणारी अनेक स्वभावाची माणसं यात
Read More
आनंद यादव यांच्या कथा अस्सल ग्रामीण कथा आहेत. ग्रामीण भागात असणारी अनेक स्वभावाची माणसं यात वाचायला मिळतात. ग्रामीण भागात जे काही घटना, प्रसंग घडतात त्याचे सुंदर चित्रण कथेच्या माध्यमातून त्यांनी केले आहे.
उपाय ही कथा मल्लू आणि दुर्पि यांची कथा. मल्लूची बायको दुर्पि आत्महतेचा प्रयत्न करते आणि त्यांच्या मागे कोर्ट कचेरी यांचा ससेमीरा सुरु होतो. त्यातून वाचण्यासाठी जो उपाय केला जातो आणि त्यातून जे काही निर्माण होते ते चिंतनीय आहे.
चोर आणि चोरी यात कापड्याच्या दुकानात झालेली चोरी आणि चोरांमध्ये झालेली भांडणे, त्यात पोलिसांची भूमिका हे वाचून हसायला येते. बोराशेठ यांच्या दुकानात पुन्हा चोरी होते, पण त्याची तक्रार तो का देत नाही याची मजेशीर मांडणी यात केली आहे.
बापाचं वळण नि लेकाच शिक्षण ही गुरुजी आणि शाळा यांची कथा. यात गणप्याने शाळेवर लिहलेला निबंध वाचून हसू येते. यातील गुरुजी आणि गणपा ही दोन्हीही वेगळी पात्र वाचायला मिळतात.
ह्यो माझा बंगला ही भन्नाट विनोदी कथा. गावाकडंच्या माणसाने शहरात बंगला बांधल्यावर काय गमती जमती होतात ते यात वाचायला मिळते. गावाकडची बायको यात अधिक रंगत आणते. स्वयंपाक करण्याचा ओटा, फ्रीझ या गोष्टीवरून होणारे विनोद वाचून हसू येते.
घरी आलेल्या पाहुण्यांना बंगला दाखवतानाचा एक प्रसंग…
“ह्या माझ्या मिसेस.” कल्चरचा प्रश्न म्हणूनच तशातही ओळख करून दिली. “नमस्ते वहिनी. काय स्वैपाक चाललाय?”
“व्हय. हे बघा की आमच्या साहेबानं काय करून ठेवलंय. मी म्हणत हुती असलं वटा-बिटा बांधायचं सोंग करू नका. मी आपली खालीच स्वैपाक करत जाईन. तर होंनी ह्यो उच्च वटा बांधून ठेवला. आता झाडावर बसून भाकरी केल्यागत हुतंय बघा मला.”
उपासनीसाहेब हसले. मी तिच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून इकडं-तिकडं बघितलं तर सगळ्या स्वैपाकघरातनं लिंबू, टोमॅटो, कांदे, भाजीसाठी आणलेली बांगी घरंगळून चारी दिशांना पडलेली. फ्रिझ दाखवायला उपासनींना नेलं तर एक टोमॅटो सरळ त्यांच्या बुटाखाली आला नि त्याचा चीत्कार त्यांच्याच पँटवर उमटला.
उखाणा ही कथा नवरा बायको यांच्यातील आहे. गुंडाप्पा हा बायकोवर संशय घेत असतो. त्याचा संसार आणि घराला लागलेली घूस याचा खूप चांगला वापर यात केला आहे. बायकोने रात्री सासूबाईला सांगितलेले हुमान आणि त्याचा अर्थ कथेची रंगत वाढवतो.
माळावरची मैना कथासंग्रहाचे नाव असणारी कथा. यात सोपानराव आपल्या बैलांची नावे पोलीस व जमादार ठेवतो. त्यातून तो पोलिसांना कसा धडा शिकवतो हे वाचनीय आहे.
आशावहिनींचा सल्ला ही एक खुमासदार कथा. दत्तू आणि शोभा हे वर्तमानपत्रात आशावाहिणींचा सल्ला या सदरात पत्र लिहून सल्ला विचारतात आणि त्यातून ही खुमासदार कथा जन्माला येते. असे सल्ले कोण देते व कसे देते हे वाचून हसू येते.
आशावाहिनीच्या डोक्यावर टोपी असते, आणि तिला मिशा आहेत हे जाणून तर अधिक गंमत येते.
दत्ताचा प्रसाद कथा चोरी करण्यासाठी केलेला प्लॅन त्यांच्याच कसा अंगलट येतो हे त्यात वाचायला मिळते. चोरी करण्यासाठी केलेले नियोजन आणि त्यात झालेला घात यात वाचायला मिळते.
गुणकारी औषधं ही कथा वाचताना गंगाला मूल होण्यासाठी नक्की कोणते औषधं उपयोगी पडलं असावं हा प्रश्न वाचकांच्या मनात निर्माण होतो.
टग्याचे गाव ही गावातील नमुनेदार माणसांची कथा.
आपली बायको आणायला गेलेला सखा आणि त्याची केलेली अवस्था वाचून गाव खरंच टग्याच असल्याची जाणीव होते.
वरात ही कथा वरातीसाठी वापरलेली गाडी, त्या ठिकाणी गाडीने केलेली फजिती हे सगळं खुमासदार शैलीत मांडले आहे.
Show Less