हिंदू संस्कृती आणि स्त्री - डॉ. आ. ह. साळुंखे सदर पुस्तकात हिंदू समाजाच्या स्त्रीविषयक धारणांचा
Read More
हिंदू संस्कृती आणि स्त्री – डॉ. आ. ह. साळुंखे
सदर पुस्तकात हिंदू समाजाच्या स्त्रीविषयक धारणांचा आढावा घेतलेला आहे. भारतीय समाजात हिंदू बहुसंख्य आहेत आणि प्रस्तुत पुस्तकाचा लेखक हिंदू समाजाचा घटक आहे, प्रस्तुत पुस्तकाच्या लेखनाची प्रेरणा लेखकाला चार्वाकदर्शनाच्या अभ्यासातून मिळाली. महाराष्ट्र शासनाने या पुस्तकाला उत्कृष्ट वाङमयनिर्मिती बद्दलचा १९९०-९१ सालचा ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर’ पुरस्कार दिला आहे
डॉ. आ. ह. साळुंखे यांनी लिहिलेल्या ‘हिंदू संस्कृती आणि स्त्री’ या पुस्तकामध्ये भारतीय स्त्रीच्या व्यथेला वाचा फोडण्याचे काम केले. स्त्रीवर शतकानुशतके पुरुषाने केलेल्या जुलमी अत्याचारांचा कडक निषेध करून तिच्या न्याय्य हक्कांची जाहीर मागणी करण्याचा प्रयत्न केला. ‘हिंदू संस्कृती आणि स्त्री’ असे प्रस्तुत पुस्तकाचे शीर्षक असून हिंदू संस्कृतीच्या एक स्त्रीची प्रतिमा या पुस्तकात रेखाटली आहे. स्त्रीवर लादलेले निकृष्ट जीवन हे एकूण भारतीय समाजाच्याच निकृष्टतेचे व दुरवस्थेचे एक अत्यंत महत्त्वाचे कारण आहे, आजही हे चित्र फारसे पालटलेले नाही. आता तर सतीच्या प्रथेचे अत्यंत उघडपणे आणि अभिमानानेही समर्थन व उदात्तीकरण केले जात आहे. प्राचीन काळापासून स्त्रीला हीन लेखण्याची प्रवृत्ती पुरुषांमध्ये कशी रुजलेली आहे आणि त्या प्रवृत्तीमागे कोणत्या धार्मिक अंधश्रद्धा आहेत, हे जाणून घेतले असता त्या अंधश्रद्धा दूर सारून सध्याची परिस्थिती पालटण्यास मदत होईल.
आजवर झालेले लिखाण हे ब्रिटिश वसाहतवादाला उत्तर देण्यासाठी म्हणून झालेले आहे. त्यामुळे खरोखरच सर्वसामान्य स्त्रीचे स्थान काय होते, याचा विचार झालेला नाही. आजच्या स्त्रीमनाची जडणघडण बदलायची असेल तर हा इतिहास समजून घेणे आवश्यक आहे. केवळ हिंदू संस्कृतीतच नव्हे तर जगातील बहुतेक सर्व छोट्या-मोठ्या राष्ट्रांच्या इतिहासात डोकावले तर स्त्री कमी-अधिक प्रमाणात दुर्लक्षित झाल्याचे दिसते. अत्यंत पुरोगामी विचारसरणी असलेल्या रशियासारख्या राष्ट्रात आजदेखील समान हक्कांसाठी स्त्रीला झगडावे लागत आहे. भारताच्या संदर्भात स्त्रीच्या पारतंत्र्याची सुरुवात मूलनिवासी आणि परकीय आर्यांच्या संघर्षामध्ये झाली, असे मानले जाते. हिंदू समाजात भिनलेली स्त्री-पुरुषभेदाची आणि स्त्रीला अत्यंत हीन लेखण्याची प्रवृत्ती प्राचीन आणि मध्ययुगीन संस्कृत ग्रंथांमध्ये- प्रामुख्याने धर्मशास्त्रविषयक ग्रंथांमध्ये आढळते .
जन्माच्या आधीपासून सुरू होणारी स्त्रीची विटंबना तिचे अवघे आयुष्य व्यापते आणि मरणापर्यंत तिची सोबत करते याचे अत्यंत उत्तम स्पष्टीकरण या पुस्तकात केले आहे. तसेच स्त्रीविषयीचा तिरस्कार हिंदू संस्कृतीत किती वाढलेला होता, हे समजून येते. डॉ. साळुंखे यांनी संस्कृत धर्मग्रंचांच्या चौकटीत रेखाटलेले हिंदू स्त्रीच्या वैवाहिक जीवनाचे विदारक चित्र वेदनादायक आहे.
हिंदू संस्कृतीमध्ये धर्मशास्त्रकारांचा आणि त्यांनी घडवलेल्या हिंदू समाजाचा स्त्रीविषयक दृष्टिकोन डॉ. साळुंखे यांनी हिंदू धर्मग्रंथ वेद, ब्राह्मणे, उपनिषदे, धर्मसूत्रे, स्मृति, रामायण, महाभारत त्यांचप्रमाणे नंतरच्या काळातले यासारखे प्रतिष्ठित ग्रंथ साहित्य या सर्व वाङमयामधून स्त्रीविषयक संदर्भाचे संकलन करून आणि त्यांचे सविस्तर विवेचन करून मांडला आहे. मनुस्मृतीमध्ये आणखी खोलवर डोकावले तर तत्कालीन समाजात बोकाळलेल्या अराजकाचे चित्र दिसते. वर्णव्यवस्थेतून निर्माण झालेल्या अठरापगड जाती, स्वैराचाराने घातलेले थैमान आणि सुकाणू नसलेल्या नावेप्रसाणे भरकटत चाललेला समाज यांची साक्ष देणारे सूचक उल्लेख मनुस्मृतीत आढळतात. भारतीय समाजजीवनाला किडी सारखी ग्रासणारी जातिभेदाची आणि स्त्रीविषयीच्या तुच्छतेची भावना फोफावण्यास मनू प्रामुख्याने जबाबदार आहे, असे मलाही वाटते. या पुस्तकाच्या रूपाने एका महत्त्वाच्या राष्ट्रीय समस्येवर त्यांनी केलेले हे प्रकट चिंतन असलेल्या हळव्या संवेदनशीलतेची आणि सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेची पुरेपूर साक्ष देते. हे पुस्तक वाचकाच्या मनात अनेक शंका उपस्थित करते.
स्त्रीवर शतकानुशतके पुरुषाने केलेल्या जुलमी अत्याचारांचा कडक निषेध करून, तिच्या न्याय्य हक्कांची जाहीर मागणी करण्याचा प्रयत्न या पुस्तकात झाला आहे. सदर पुस्तकामध्ये विविध ग्रंथामधील विशेषता मनुस्मृती, वेद व पुराण यातील लोकांचा संदर्भ वेळोवेळी दिलेला आढळतो, तसेच त्या श्लोकाचे विश्लेषण केलेले आढळते. हिंदू खेरीज इतर समाजांनी स्त्रीच्या बाबतीत कोणती भूमिका घेतली याचा अत्यंत स्थूल असा परिचय करून देण्याचा लेखकाचा हेतू होता.
एकीकडे धर्मशास्त्रांनी घालून दिलेल्या नियमांची चाकोरी आणि दुसरीकडे स्त्री-पुरुषसमतेचे आधुनिक विचार अशा दोन वाटा आता भारतीय समाजापुढे आहेत. समतेच्या विचारांबद्दल अनेक गैरसमज असून त्यावर अनेक आक्षेपही घेतले जातात. या विचारांमुळे आपल्या समाजात स्वैराचार, अनैतिकता, उपभोगवाद, पाश्चात्यांचे अंधानुकरण, कुटुंबसंस्थेचा विध्वंस इ. दोष निर्माण होतील, अशा अर्थाची टीका अनेकदा केली जाते. स्त्रीस्वातंत्र्याचा विचार ही एक फॅशन असून सवंग लोकप्रियतेसाठी हे विचार मांडले जातात, असाही आक्षेप घेतला जातो. वस्तुतः समतेच्या व स्वातंत्र्याच्या विचारांचा अशा प्रकारे नकारात्मक अर्थ घेण्याऐवजी विधायक अर्थ घेतला, तर ही टीका निरर्थक ठरते आणि सुज्ञ लोकांनी असा विधायक अर्थच घेतला पाहिजे. विशिष्ट मूल्ये आपल्या धर्ममग्रथांनी मांडली आहेत, की पाश्चात्यांनी वा इतर कोणी मांडली आहेत, हे महत्त्वाचे नाही. ती मूल्ये हितकारक व न्याय्य आहेत की नाही, हे महत्त्वाचे आहे आणि या बाबतीत आपला विवेक, आपले तारतम्य हाच सर्वश्रेष्ठ निकष होय. विशिष्ट पूर्वग्रहांच्या दडपणाखाली जीवनमूल्ये स्वीकारण्यापेक्षा खुल्या मनाने व चोखंदळपणे त्यांचा स्वीकार करणे, हेच व्यापक हिताचे ठरणार आहे.
या पुस्तकात प्रकरण दोन पासून ते प्रकरण सात पर्यंत स्त्री जीवनाव तील विविध टप्पे (गर्भावस्था, उपनयन, विवाह, वैवाहिक जीवन, वैधव्यानंतर जीवन व जीवनव्यापी गौणत्व इ.) व त्यातील प्रामुख्याने अवहेलना मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच पुस्तकातून शतकानुशतके अंधश्रद्धांच्या कैदखान्यात पिचत पडलेल्या स्त्रीविषयी विचार करण्यास वाचकाला अंतर्मुख करते यातच या पुस्तकाचे यश सामावले आहे.
Show Less