कुब्र (एका शुष्क पानझडी जंगलातल्या नोंदी

By पाटील सत्यजित

Share

Original Title

कुब्र (एका शुष्क पानझडी जंगलातल्या नोंदी

Publish Date

2022-12-19

Published Year

2022

Total Pages

120

ISBN 13

9788195979226

Country

भारत

Language

मराठी

Readers Feedback

कुब्र (एका शुष्क पानझडी जंगलातल्या नोंदी

पुस्तक परीक्षण :- कु.केदारी समीक्षा सुरेश , तृतीय वर्ष वाणिज्य ,अण्णासाहेब आवटे कॉलेज, मंचर सत्यजित पाटील या लेखकाचे म्हणण्यापेक्षा निसर्ग अभ्यासकाचे 'कुब्र' हे छोटेखानी पुस्तक...Read More

Kedari Samiksha Suresh

Kedari Samiksha Suresh

×
कुब्र (एका शुष्क पानझडी जंगलातल्या नोंदी
Share

पुस्तक परीक्षण :- कु.केदारी समीक्षा सुरेश , तृतीय वर्ष वाणिज्य ,अण्णासाहेब आवटे कॉलेज, मंचर
सत्यजित पाटील या लेखकाचे म्हणण्यापेक्षा निसर्ग अभ्यासकाचे ‘कुब्र’ हे छोटेखानी पुस्तक आहे. खूप दिवसांनी आपण काहीतरी मूलभूत वाचल्याचा साक्षात्कार या पुस्तकाने मला दिला. लेखकाने नेमके काय द्यायला हवे, हा प्रश्न नेहमीच विचारला जातो. मुळात कुठलाही कलावंत जे मांडत असतो त्यात नवे असे फारच थोडे असते, बरेचदा जुनेच असते.
तथाकथित पर्यटन करणाऱ्या सर्व पर्यटकांना ताडोबा राष्ट्रीय उद्यान ठाऊक आहे. आपण हौस म्हणून अशी अभयारण्ये गाडीतून फिरून येतो. फोटो काढतो. माध्यमांवर डकवतो. वाघ , बिबट्या, अस्वल, हरीण वगैरे दिसले. मुळात ही जी काही निरागस, नैतिक जीवसृष्टी आहे, तिच्या तळाशी जाऊन तिचा कानोसा आपण कधी घेत नाही. सगळे वरवरचे आणि तकलादू, तेवढ्यास तेवढे असते. नंतर आपण आपले भोगवादी उद्योग करायला मोकळे असतो. सत्यजितचे कौतुक यासाठी आहे की त्याने या जीवसृष्टीच्या तळाशी असणाऱ्या पाचोळ्यात हात घालून, डोळ्यात संपूर्ण जीव ओतून ही सृष्टी न्याहाळली आणि तिचा एक लसलशीत तुकडा ‘कुब्र’च्या रुपाने आपल्या समोर, तिच्याशी नाते जोडण्यासाठी ठेवला आहे. आपले तथाकथित माणूस असणे पूर्णपणे विसरुन त्याने हे केले आहे. तसे करणे हीच या निरीक्षणाची पूर्वअट होती. ती त्याने मुळाबरहुकूम पाळली.
कुब्र हे एक निबिड अरण्य. अस्पर्शीत अरण्य. अस्सल रान. नुसता हिरवा दिसणारा झाडा बांबूंचा समुच्चय नाही आणि त्यातल्या जनावरांची हालचाल, जगणं नाही. ही एक प्राचीन व्यवस्था. माणसाच्याही आधीची.’ अगदी पहिल्या पानावरले हे एक विधान या पुस्तकाचे अंतरंग दाखवणारे आहे.
तीन ऋतूत विभागलेले हे पुस्तक. उन्हाळा, हिवाळा आणि पावसाळा. पर्यावरणवादी अतुल देऊळगावकर यांची अतिशय नेमकी प्रस्तावना आणि त्यानंतर हे पुस्तक कसे एकमेकांना भिडून असणारे. सोबत कॅमेरा न नेता लेखकाने ज्या संवेदनेतून हे अभयारण्य टिपले आहे ते कुठल्याही कॅमेऱ्याच्या चौकटी बाहेरचे आहे. जंगलाच्या संपूर्ण लयीत स्वतःला मिसळूनच असे काही लेखन होऊ शकते. चेतनेचा उगम आणि विलय रानातून रानाकडे केल्याशिवाय अश्या अरण्यविलयाची नाडी सापडत नाही. मी याला अरण्यवाचन नाही म्हणणार. त्यात कुठेतरी एक प्रकारची तटस्थता असते. इथे कुठलीही तटस्थता नाही, तर आरपार झोकून देणे, ‘स्व’ चा विलय करणे आहे. रानातल्या ऊन पावसात हरवून जाणे, पालापाचोळा होणे, पावसात पाऊस होणे, उन्हात उन्ह. सगळे काही गमावून बसल्यासारखे रानात सामावून जाणे म्हणजे ‘कुब्र’.
लेखकाच्या निवेदनातून ती आकार घेत जाते. वाघनाला चितारताना लेखक लिहितो, ‘कोरड्या नदीपात्रातून नाल्या-नाल्यातून रेतीखाली दबत दबत खोलवर कुठेतरी निघून जात आहे पाणी.’ अतिशय आंतरप्रवाही असे हे निरीक्षण. या नाल्याच्या भोवतालची सगळी जीवसृष्टी लेखक मग जिवंत करत जातो. अगदी वाघ असो की इवलेसे कीटक, त्याच्या नजरेतून सुटत नाहीत. साळींदराची पावलं त्याला लहान मुलाच्या तळव्यासारखी दिसतात. सर्पगरुड, लंगुर, वाघाच्या आगमनाची खात्रीशीर सूचना देणारे कोतवाल सगळे काही चित्रमय पद्धतीने येत जाते.
लेखक केवळ निरीक्षण करत नाही, तर नकळतपणे जंगल समजून देणारी एक भाषाही घडवत जातो. जिभेने टिपलेले उष्ण श्वास, या प्रकरणात तो ‘चितळ हरणांचे गर्भडोहाळी कळप’ असे एक वाक्य वापरतो. रानकुत्र्यांची ‘जीवघेणी चंद्रकोर’. हे सगळेच वाचकाला दिसणाऱ्या वरवरच्या दृश्याबाहेरचे आहे.

अरण्याच्या अनेक दुर्लक्षित अंगांना स्पर्श करत जाणारे हे लेखन आहे. जे आपल्याला ठाऊक आहे, तरी आपण त्याबाबत पूर्ण अडाणी असतो, असे बरेच काही लेखक झाडांबद्दल, प्राणी, पक्षी, विनाशाबद्दल सांगत जातो. अरण्याला लागणारे वणवे हा असाच एक गंभीर विषय आहे. प्राणी वनस्पतींच्या अस्तित्वाशी निगडित असलेला. या वणव्याचे कितीतरी पैलू जाळरेषा या प्रकरणात दिसतात. ‘वणव्यात मेलेला सस्तन प्राणी किंवा अर्धवट जळालेला मृतदेह अजून तरी पाहिला नाही.’ हे लेखकाचे एक महत्वाचे निरीक्षण प्राणी देखील किती सावध असतात, त्यांना आगीचे येणे किती आधीपासूनच कळते हे सांगणारे आहे. खरे म्हणजे हे माणसापेक्षा अधिक सूक्ष्म शहाणपण आहे. ‘हा वणव्याचा काळ आहे. अगदी कोणत्याही क्षणी ह्या डोंगरांची शिखरं पेट घेतील आणि आगीची चंद्रकोर खाली पसरु लागेल असं वाटत रहातं…. वाघदरीतलं तळहातायेवढं दुर्मिळ होत चाललेलं फुलपाखरु भिरभिरत धुराच्या लोटात हरवू लागतं.’ खरं म्हणजे या अरण्याच्या निमित्ताने लेखक एका युगांताची गोष्ट सांगू पहातोय. ती ‘माणसाला’ समजेल की नाही हा खरा प्रश्न आहे.
कुब्र म्हणजे निबिड अरण्य. बरीच अरण्ये किंवा त्याचे काही भाग असे आहेत की जिथे अजून हिंस्त्र आणि विकृत माणसांचा स्पर्श झालेला नाही. खरं म्हणजे कदाचित हाच स्वर्ग असावा. सत्यजित पाटील या स्वर्गाच्या शोधात आपले पूर्ण आदिम मन, जे या सृष्टीचाच एक अभिन्न अंग होते, घेऊन निघाले आहे पुन्हा त्याच पवित्र आदीमत्वाच्या शोधात. ‘रानाला भूतकाळ नसतो’ असं ते सांगतात. रक्तचंदनाच्या झाडावर कोसळलेल्या विजेचे अतिशय शहारे आणणारे निरीक्षण ते मांडतात. ती वीज थोडी अलीकडे कोसळली असती तर? लेखक मृत्यूला काखेत घेऊन फिरत असतो जंगलात. असे खूप प्रसंग आहेत. वाघीण आणि तिची पिल्ले, वाघ यांची आणि लेखकाची समोरासमोर झालेली भेट, हा प्रसंग असाच शहारे आणणारा आहे. अश्या प्रसंगातून खूपदा प्राणी आणि पक्षी यांचं शहाणपण, नैतिक असणं कळत जातं. जगण्याची भाषा, पोटाला लागेल तेवढेच घ्यावे हा संतभाव प्राणीच आपल्याला शिकवू शकतात, आपली तयारी असेल तर. सगळ्या ऋतूंना पांघरून लेखक जंगलातून फिरत जातो. तो केवळ शास्त्रीय भाषेत ऋतुचक्र समजून देत नाही. ज्यांना निसर्ग समजून घ्यायचा आहे, त्या सगळ्यांना सहज समजेल अशी त्याची भाषा आहे. रानडुकरांच्या परिवाराचा गांडूळशोध हाही त्याच्या निरीक्षणाचा भाग होतो तेव्हा निरीक्षणाची सुक्ष्मता अधिक लक्ष्यात येते. हिरव्या प्रकाशाची गोम हे तर थक्क करणारे प्रकरण आहे. अश्या कितीतरी गोष्टी आहेत ज्या अजूनही मानवाच्या नजरेत आलेल्या नाहीत, संशोधकांच्याही नाही. काजवे, गोम यांची ‘जीवदीप्ती’ समजून घेणे म्हणजे निसर्ग समाधीत जाणे. साप हा देखील माणसाच्या भीतीयुक्त उत्सुकतेचा विषय आहे. लेखक एखाद्या धामणीला मांडीवर घेऊन खेळवतो तेव्हा वाचकांच्या अंगावर शहारे येतात. सापावरल्या गोचिडांचा लेखकाने लावलेला शोध हाही असाच कोणाला ठाऊक नसणारा. ‘धामणरेषा’ हा शब्द लेखक जेव्हा अतिशय सहजपणे वापरतो तेव्हा त्याने एक नवा शब्द दिलेला असतो, हे त्यालाही ठाऊक नसते. अशी बरीच ठिकाणं या पुस्तकात दाखवता येतील. ‘ ‘कंपनघागर’ निसर्गाच्या चोरट्या शोषणाचे एक भयावह प्रतीक म्हणून पाटील जेव्हा समजून सांगतात तेव्हा या शोषणाचे एक टोक फक्त आपल्याला दिसत असले तरी त्याची तिव्रताही ध्यानी येते. शिकार करणारे वाघ, वटवाघूळ, अनुवृक्ष, करुचे झाड, अर्जुन वृक्ष, मधमाश्या, भूतगांजा, काळ्या आंब्याचा कोळी, वाघाच्या शिकारीचे जंगलात दडवलेले सापळे, पांढरा कोल्हा, बाहेरच्या जगातून जंगलातून पसरत जाणारे प्लास्टिक आणि त्याची भयावहता किती किती अरण्यगोष्टी सांगत जातो लेखक!
हे पुस्तक वाचून अनेक प्रश्न निर्माण होतात. निसर्ग हा आपला सहकारी, मित्र आहे की आपल्या तथाकथित विकासातला अडथळा आहे? निसर्गाकडे जाणे म्हणजे वानप्रस्थाश्रम स्वीकारणे नाही. गर्दीत राहूनही आपण निसर्गाकडे जाऊ शकतो. आपल्या अबोध मनातली लसलशीत माती आणि पशु पक्ष्यांचे स्वर त्यासाठी जिवंत असावे लागतात. कुब्रच्या माध्यमातून कुठलाही आक्रस्ताळेपणा न करता सत्यजित पाटील आपल्या मनातला रानस्वर जिवंत करू पहात आहेत.
सत्यजित पाटील यांना अजून खूप सांगायचे आहे. त्याच्या खुणा या पुस्तकातून दिसतात. माणूस आणि निसर्गाचा भावबंध निर्माण करणारे असे लेखन हे अरण्यरुदन ठरू नये याची जबाबदारी सुजाण माणसांनी घेणे ही त्याची जगण्याइतकीच मोठी जबाबदारी आहे !!

Submit Your Review