(प्रा.कोंडे माउली हिरामण, प्राध्यापक, शंकरराव भेलके महाविद्यालय,नसरापूर) गनिमी कावा हा शब्द ऐकला
Read More
(प्रा.कोंडे माउली हिरामण, प्राध्यापक, शंकरराव भेलके महाविद्यालय,नसरापूर)
गनिमी कावा हा शब्द ऐकला किंवा उच्चारला गेला की, आपल्या नजरेसमोर एकच नाव येते आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. शत्रूचे हजारोंचे सैन्य असतानाही शिवाजी महाराजांचे ३००-४०० मावळे त्यांना जेरीस आणीत असत. हे शक्य होत असे ते शिवरायांनी अवलंबिलेल्या गनिमी कावा या युद्धतंत्राने. ‘गनिमी कावा’ हे पुस्तक प्रा. नामदेवराव जाधव लिखित असून त्यांच्या राजमाता प्रकाशन, मुंबई प्रकाशित आहे. सदर पुस्तकाची पहिली आवृत्ती नोव्हेंबर २०१० मध्ये प्रकाशित झालेली आहे. प्रा. नामदेवराव जाधव हे राजमाता जिजाऊ यांचे वंशज आहेत. तसेच आजवर त्यांचे अनेक संदर्भ ग्रंथ प्रकाशित झालेले आहेत. त्यांनी जागतिक स्तरावर शिवकालीन इतिहासावर जवळपास १००० व्याख्याने दिलेली आहेत. या पुस्तकाचा मुख्य हेतू छत्रपती संभाजी महाराजांच्या चरित्राचा प्रचार आणि प्रसार तसेच मराठ्यांच्या इतिहासाची पुनर्मांडणी हा आहे.
नियोजनबद्ध नियंत्रित हल्ले हे सूत्र असलेले गनिमी कावा हे युद्धतंत्र आणि त्याद्वारे महाराजांनी फत्ते केलेल्या मोहिमांची माहिती प्रा. नामदेवराव जाधव यांनी ‘गनिमी कावा’ या पुस्तकातून दिली आहे. गनिमी कावा हा शब्द अक्षरशः मराठ्यांच्या युद्धतंत्राचा जणू आत्माच आहे. त्यामुळे जगाच्या पाठीवर गनिमी कावा म्हणजे मराठे आणि मराठे म्हणजे गनिमी कावा हे समीकरण रुढ झाले. गनिमी कावा अथवा इंग्रजीत गुरिला वॉर (Guerrilla Tactics) हे एक प्रकारचे युद्धतंत्र आहे. यात अतिशय कमी संख्याबळाच्या तुलनेने मोठ्या सैन्यास जेरीस आणता येते. यात मुख्य डावपेच बेसावध शत्रूवर अचानक हल्ला करून त्याची जास्तीत जास्त हानी करून, शत्रू सावध होण्यापूर्वी माघार घेतली जाते. असे अनेक अचानक छुपे हल्ले केल्याने शत्रूचे मनोधैर्य खच्ची होते. गनिमी काव्याचा वापर करून छोटे सैन्य मोठ्या सैन्याचा पराभव करू शकते. शहाजीराजांनी निजामशाहीच्या अखेरच्या दिवसात ह्या पद्धतीचा वापर केला. हे या पुस्तकातून नमूद केले आहे.
छत्रपती शिवाजीराजांच्या युद्धनीतीत गनिमी काव्याचे महत्त्व खूप आहे. शिवरायांची पहिली लढाई, पहिला छापा, प्रतापगडाचा प्रसंग, उघड्या मैदानातील पहिली लढाई, पन्हाळ्याहून सुटका, उंबरखिंड, लालमहालातील पराक्रम, सुरतेवर चाल, पहिली आरमारी मोहीम, पुरंदरची लढाई, आग्र्याहून सुटका अशा विविध मोहिमा, युद्ध व शत्रूला नामोहरम करण्याच्या रणनीतीबद्दल सांगितले आहे. या गनिमी काव्याचे महत्त्व छत्रपती संभाजी महाराजांच्या दक्षिण दिग्विजय मोहिमेमध्ये अधोरेखित झाल्याचे दिसून येते. या दक्षिण दिग्विजय मोहिमेमध्ये म्हैसूरचा क्रूर राजा चिक्कदेवराय याच्याशी झालेल्या भयंकर युद्धाचा प्रसंग आणि विजय अगदी स्पष्टपणे केलेला दिसून येतो. या युद्धाचा विशेष म्हणजे शत्रूच्या बाणांचा सामना करण्यासाठी अगदी चामड्याच्या कातड्याचा वापर ‘वातड’ (जॅकेटस्) आणि जिरेटोप बनविण्यासाठी केला गेला. कदाचित आजच्या युगातील बुलेटप्रुफ जॅकेटचा वापर त्याकाळी केलेला असावा.
छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी कावा या युद्धनितीचा अत्यंत प्रभावीपणे वापर कसा केला, हे वाचकाला या पुस्तकातून उमगते. गनिमी काव्याने लढण्याचा मुख्य हेतू, त्याचे नियोजन, उद्दिष्टे प्रथम विषद केली आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने शत्रूला घाबरवणे किंवा दहशत बसविणे, मानसिकरीत्या शत्रूचे खच्चीकरण करणे, शत्रूला पळून जाण्यास प्रवृत्त करणे, शत्रूची दिशाभूल करणे, युद्धामध्ये वेळकाढूपणा करणे, शत्रूला दुर्बल असल्याचे भासविणे, शत्रूला पाठलाग करावयास भाग पाडणे तसेच विशिष्ट देवता प्रसन्न असल्याचे सांगणे आणि जादुगिरी करणे याचा समावेश होतो. मराठयांनी या युद्धतंत्राचा वापर केलेल्या प्रसंगांची जंत्री यात दिली आहे. शिवाजी महाराजांनी केलेली सैन्य रचना व व्यवस्थापन, गनिमी काव्यात राखली जाणारी शिस्त, गनिमी काव्यासाठी नैसर्गिक गोष्टी व परिस्थितीचा महाराजांनी केलेला उपयोग, रणक्षेत्राची अचूक निवड याची माहिती दिली आहे. या सर्व संदर्भामुळे वाचकाला हे पुस्तक खेळवून ठेवते.
या मराठ्यांच्या युद्धतंत्राची प्रेरणा घेऊन क्रांतिकारकांनी हिंदुस्थानातील छत्रपती संभाजी महाराजांच्या दोनशेव्या जयंतीचे औचित्य साधून १४ मे १८५७ रोजी पहिला राष्ट्रीय उठाव केला. जगातील ४२ गुलाम राष्ट्रांना स्वातंत्र्य मिळवण्याची प्रेरणा, ताकद याच शिवतंत्राने दिली आहे . ती राष्ट्रे स्वतंत्र झाली. ज्यामध्ये प्रामुख्याने व्हिएतनाम, जर्मनी आणि बांगलादेशचा समावेश होतो. याच गनिमी कावा युद्धतंत्राचा उपयोग सध्या जगातील प्रगत ३५ राष्ट्रांमध्ये केला जातो. ज्यामध्ये प्रामुख्याने इस्रायल देशातील मोसाद तसेच आपल्या भारत देशाची रॉ या गुप्तहेर संघटनांचा समावेश आहे. थोडक्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे युद्ध तंत्र म्हणजेच गनिमीकावा. हा गनिमी कावा समजविण्याकरिता इतिहासाची माहिती करवून घेणे अतिमहत्वाचे आहे. या पुस्तकात अतिशय विस्तृत माहिती असल्याने कदाचित नुसत्या गनिमी काव्यांची माहिती घेणाऱ्यांसाठी हे पुस्तक अजिबात नाही, परंतु शिवरायांचा अभ्यास करायचा असल्यास हे उत्तम पुस्तक आहे. प्रा. नामदेवराव जाधव यांच्या मते ‘गनिमी कावा’ ही कादंबरी नसून तो शिवचरित्राला न्याय देणारा ग्रंथ आहे. त्यामुळे या पुस्तकात लेखक प्रा. नामदेवराव जाधव यांची प्रामाणिक मेहनत दिसून येते.
Show Less