Share

Original Title

मराठी आत्मकथनांतील पारधी समाजजीवन (समीक्षा)

Publish Date

2023-01-01

Published Year

2023

ISBN

978-81-960011-0-0

ISBN 13

978-81-960011-0-0

Country

INDIA

Language

मराठी

Readers Feedback

मराठी आत्मकथनांतील पारधी समाजजीवन (समीक्षा)

आधुनिक भारताच्या वाटचालीत काही महत्त्वाच्या घटना घडल्या. त्यामध्ये स्वातंत्र्यप्राप्ती आणि संविधानाची निर्मिती यांचे स्थान महत्त्वाचे आहे. भारताने वासाहतिक व्यवस्थेकडून प्रजासत्ताक व्यवस्था स्वीकारली. येथील प्रजेचे प्रश्न,...Read More

पानसरे चेतना दगडू

पानसरे चेतना दगडू

×
मराठी आत्मकथनांतील पारधी समाजजीवन (समीक्षा)
Share

आधुनिक भारताच्या वाटचालीत काही महत्त्वाच्या घटना घडल्या. त्यामध्ये स्वातंत्र्यप्राप्ती आणि संविधानाची निर्मिती यांचे स्थान महत्त्वाचे आहे. भारताने वासाहतिक व्यवस्थेकडून प्रजासत्ताक व्यवस्था स्वीकारली. येथील प्रजेचे प्रश्न, समस्या आणि धोरणे सोडवणारी, ठरवणारी आधारशिला संविधान ठरले. सरंजामशाही, वासाहतिक व्यवस्थेकडून भारताचे संविधानाकडे झालेले स्थित्यंतर त्यामुळेच महत्त्वाचे ठरते.

संविधानाने स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्ये महत्त्वाची मानली. ही एक आदर्शात्मक व्यवस्था स्वीकारली असली तरी, माणसांच्या वर्तन व्यवहार त्याचे प्रत्यंतर लगेचच अनुभवायला मिळाले नाही. जीवनात आधुनिक मूल्य आणि पारंपारिक मूल्य व्यवस्था यातील संघर्ष प्रत्ययाला येत होते. या संघर्षाचे धार्मिक, जातीय पैलू मराठी साहित्यात येऊ लागले. त्याचे अधिक वास्तवदर्शी चित्रण १९६० नंतरच्या मराठी साहित्यात अधिक जोरकसपणे समोर आले.

मात्र तरीही मराठी साहित्यात समाजातील सर्व घटकांचे चित्रण आले असे म्हणता येत नव्हते. करण यामध्ये पारधी जमातीचे चित्रण यायला वर्ष २००० उजाडावे लागले. स्वातंत्र्यानंतरचा हा जवळपास पन्नास वर्षांहून अधिकचा कालावधी सामाजिक अभिसरणाची गती दर्शवतो. वास्तविक ‘बळी’ या कादंबरीने १९५० मध्येच पारधी जमातीचे दुःख मांडले होते. कादंबरीतील हे वास्तव – कल्पित अपरिचित अनुभवविश्वाने मराठी वाचक हादरला होता. पण २००० नंतर पारधी जमातीची आत्मकथनांतून अभिव्यक्त होणाऱ्या स्वानुभवांनी जीवनाचे एक नवे विश्व समोर आणले. या विश्वाने एक प्रश्न समोर उभा केला. तो म्हणजे ब्रिटिश सरकारने पारधी समाजाचा गुन्हेगार जमातींमध्ये नोंद केली होती. ही नोंद स्वातंत्र्योत्तर भारताच्या वाटचालीत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कायम राहिली. अशावेळी पारधी समाजाची स्वातंत्र्योत्तर वाटचाल अधिक वेदनादायी होते.

या वेदनेची विविध रूपे पारधी समाजाचे चित्रण करणाऱ्या आत्मकथनांतून पाहावयाला मिळतात. यातील काही विशिष्ट आत्मकथनांची चिकित्सा डॉ. राजेंद्र गवळी यांनी केली आहे. आजवर मराठी साहित्यात पारधी समाजाचे चित्रण करणाऱ्या आत्मकथनाची स्वतंत्रपणे चिकित्सा झाली नाही, तो पहिलेपणाचा प्रयत्न डॉ. गवळी यांनी केला. या अर्थाने ही समीक्षा पहिली ठरते.

डॉ.राजेंद्र गवळी यांची समीक्षा ही मुख्यतः पीएच.डी. साठी केलेले संशोधन आहे. कुठलेही संशोधन हे अंतिमतः नसते, या न्यायाने गवळी हे एक आकलन नोंदवत आहेत. त्यातून त्यांच्या हाती आलेले काही निष्कर्ष मौलिक आहेत. उदाहरणार्थ, पारधी समाजाचे चित्रण करणारी ही आत्मकथने रडगाणे नाहीत, तर बहुसंख्य शोषित उपेक्षितांचे जीवनगाणे आहेत किंवा पारधी समाजातील ही आत्मकथने लेखकाच्या आत्मशोध स्वजातीच्या स्थितीगतीचे चित्रण करणारी , रूढी परंपरा, जातपंचायत, जीवनशैलीचे चित्रण करणारी आहेत. त्यामुळे ही आत्मकथने एक सामाजिक दस्तऐवज ठरली आहे. आंदकोळ, चोरटा, पारध्याचं जीणं आणि उदई या पारधी जीवन चित्रण करणाऱ्या आत्मकथनांच्या लेखकांवर तथागत गौतम बुद्ध, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव आहे. म्हणून ही आत्मकथने जीवन जगण्याचे तत्वज्ञान मांडणारी, पुरोगामी व परिवर्तनवादी विचाराला प्रेरक ठरणारी आत्मकथने आहेत. अशी काही निष्कर्ष डॉ. राजेंद्र गवळी यांच्यातील समीक्षकाचा प्रत्यय देतात

स्वातंत्र्योत्तर काळात मराठी साहित्यात समाजातील उपेक्षीत, वंचित घटकांचे जीवनचित्रण आले. या प्रवाहात एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला काही आत्मकथनांतून पारधी समाजाचे चित्रण येऊ लागले. यातील व्यथा, वेदनांचा पीळ काही वेगळा होता. जीवनाचे आणखी एक उग्र, दाहक, भीषण रूप पुढे आले. यातील एक आश्वासक बाजू म्हणजे, या लेखकांचे स्वभान आणि प्रतिशोध.

मराठी साहित्यात नव्याने दाखल होणाऱ्या अशा काही वैशिष्ट्यपूर्ण आत्मकथनांचा अभ्यास डॉ. राजेंद्र गवळी यांनी केला आहे. त्यांचा हा प्रयत्न निश्चितच वेगळा आहे. वाचक या प्रयत्नाचे स्वागत करतील, अशी अपेक्षा.

Submit Your Review