Original Title
रिंगण
Subject & College
Series
Publish Date
2018-01-01
Published Year
2018
Total Pages
163
ISBN 13
9789382364658
Country
India
Language
Marathi
Weight
298gm
Readers Feedback
पुस्तक परीक्षण रिंगान कादंबरी
प्रा. प्रकाश दत्तात्रय साबळे, सहाय्यक प्राध्यापक, मराठी विभाग, रा.ब.नारायणराव बोरावके महाविद्यालय, श्रीरामपूर , संपर्क: +918668944889 पुस्तक परीक्षण: रिंगान (कादंबरी) लेखक कृष्णात खोत मानवाला उत्क्रांतीची नवी...Read More
साबळे प्रकाश दत्तात्रय
पुस्तक परीक्षण रिंगान कादंबरी
प्रा. प्रकाश दत्तात्रय साबळे, सहाय्यक प्राध्यापक, मराठी विभाग, रा.ब.नारायणराव बोरावके महाविद्यालय, श्रीरामपूर , संपर्क: +918668944889
पुस्तक परीक्षण: रिंगान (कादंबरी)
लेखक कृष्णात खोत
मानवाला उत्क्रांतीची नवी दिशा देणारी कादंबरी रिंगान लेखक कृष्णात खोत यांनी ही कादंबरी तुटलेल्या मुळाच्या कोंबांना अर्पण केली आहे. माणसांच्या जीवनातील तुटले पण हे असह्य असते मग ते तुटले पण घरापासून असो,निसर्गापासून असो वा मैत्रीपासून असो हा तुटलेपणा व त्यातून सावरत जाणारी व सावरता न येणारी मानवी प्रवृत्ती यांचा उत्कट संघर्ष व्यक्त करतो. माणूस असो वा झाडे झुडपे असो ते मूळ ठिकाणापासून तुटल्यानंतर ते दुसऱ्या ठिकाणी रुजू शकत नाही.
अशा परिस्थितीत निर्माण होतो तो उद्रेक अशाच प्रकारचा संघर्ष कृष्णात खोत यांच्या रिंगान या कादंबरीतील धरणग्रस्तांच्या बाबतीत पहावयास मिळतो.
आजही आपण पाहतो केवळ धरणग्रस्तच नव्हे तर शेतकरी, शेतमजूर, भटक्या जमाती अशा प्रकारे विस्थापित झाल्यानंतर आपला उदरनिर्वाह करतात. याचे अस्सल उदाहरण आपल्याला या कादंबरीच्या रूपाने समोर येते. सरकारकडून वेगवेगळ्या कारणांसाठी अनेक गावे उठवली जातात कित्येक पिढ्या विस्थापित म्हणून शिका बसतो त्यानंतर त्यांच्या जीवनात नैरास्य, दबलेपण निर्माण होते व त्यांचे जीवन अस्वस्थ होते याचे उदाहरण रिंगाण मध्ये दिसते.
रिंगण या कादंबरीत असणारा नायक किंवा मूळ पात्र देवाप्पा हा धरणग्रस्त असून विस्थापित देवाप्पा चे कुटुंब हे मूळ ठिकाणापासून लांबच्या प्रदेशात इच्छा नसतानाही जावे लागते व विस्थापित म्हणून संघर्ष करावा लागतो. नव्या ठिकाणी देवाप्पाला माणसातील जनावर, माणसातील भूत कूप्रवृत्तीची भावना शून्य माणसांचा अनुभव येतो. ती देवाप्पा सारख्याला जुळवून घेत नाहीत. सरकारनं धरणग्रस्तांना वेगवेगळ्या ठिकाणी वस्तीला जागा दिली आणि शेत दिली पण विस्थापितांचा प्रश्न असतो तो म्हणजे उठवण्याचा “उठवा पण एका जागी तर वसवा” विस्थापित म्हणून जगताना माणसांच्या जंगलात वाघाच्या काळजाचं शेळीचं कवा काळीज झालं कळलंच नाही. असे संकुचित भित्रे पण विस्थापितांच्या वाट्याला आलेले जाणवते. धरणग्रस्तांच्या जीवावर इतर लोक सुखी होणार पण आम्ही मात्र उचलेच हा देवाप्पा चा प्रश्न मानवी मनाला अंतर्मुख करणारा आहे. नव्या गावात गेल्यानंतर त्यांच्या पोशाखातही बदल होतो. मनासारखं नाही तर तडजोडीने जगाव लागत होत. देवाप्पाला सरकारकडून मिळालेल्या शेतातील हरभरा चोरीस जातो उलट त्यांच्यावर चोरीचा आरोप केला जातो. देवाप्पाच्या आईलाही कापडातली माणसं कुणाचीच नसल्याची असे वाटते. माणसा- माणसातला दुरावा प्रस्थापित विस्थापित संघर्ष कादंबरीतील काही प्रसंगातून प्रकर्षाने जाणवतो. मूळ वस्ती व तिच्या आठवणी पुन्हा- पुन्हा जाग्या होतात. नव्या सावबाची म्हातारी मेल्यावर तिला जाळण्यासाठी स्मशानभूमीत नेलं जात. पण परगावचे प्रेत आम्ही जाळू देणार नाही. असे म्हणत मानवाता हिन तेचे दर्शन घडवतात. सतत संघर्षाला सामोरे जाणाऱ्या देवाप्पाचे मन नव्या वस्तीत रमत नव्हते. म्हणून तो मनाशीच म्हणतो “इथं आपण उगवलोच नाही तर रुजल कसं” देवाप्पाचा हा प्रश्न स्वतःचेच समाधान करणारा आहे.
देवाप्पाला धरणग्रस्त म्हणून मूळ वस्ती सोडताना सगळीच जनावर बरोबर नेऊ शकत नव्हता. त्यांच्यातल्या दूध न देणाऱ्या गाई व म्हशी तिथेच सोडून दिल्या होत्या पण मूळ वस्तीत जाणाऱ्या व येणाऱ्यांकडून देवाप्पाच्या आईला कळले की आपण सोडलेल्या ढोर आता ताणपी झाल्यात त्यास्नी कोण बी धरून त्यांचं दूध बी काढून नेत्यात. तेव्हापासून देवाप्पाच्या आईने म्हशींना दावे लावून आणण्याचा देवाप्पा जवळ हट्ट धरला होता. म्हणून देवाप्पा मोदीवाल्या म्हशीला दाव लावून आणण्यासाठी दोघांना बरोबर घेऊन धरणाच्या भिंतीवर जंगलात मूळ वस्तीकडे जायला निघतो जंगलातली आपली तिथेच राहिलेली म्हशींना रेड्यांना दावे लावून आणून विकून पैसे करायची असे देवाप्पा सह सर्वांनाच वाटत होते. जंगलातल्या म्हशी देवापाला अरबाट वाटतात दूध देणाऱ्या असतील असे वाटते देवाप्पा जेव्हा या जुन्या वस्तीत येतो तेव्हा त्याचे हृदय भरून येते आपल्या शेतातील खानाखुणा बघतो तिथली झाडे-झुडपे शेत बघून त्याला भरून येत होते. देवबाप्पा जनावरांसाठी वेडा झाला होता आपल्या जनावरांचं जगणं हे जंगली झाल्याची त्याला जाणवले. त्या जनावरांचा पाठलाग करीत तो संपूर्ण जंगलभर फिरतो त्याची दमछाक होते मात्र त्या म्हशी देवापाला हुलकावणी देतात. गोल रिंगान करून रेडकांना कोंडून बसलेल्या असतात गव्यांना वाघांना म्हशी जुमानत नाही. हे म्हशींचे वेगळे रूप देवाप्पा अनुभवत होता. जनावरांनी रिंगण करून संरक्षणाचा प्रयत्न केला आता आपण सुद्धा विस्थापित वस्तीत जगण्या मारण्याचे रिंगण मांडलं असे देवापाला वाटले.
ती जनावरे देवाकडे डोकावूनही बघत नव्हती त्याने मनात विचार केला आपण गेल्यापासून ती जनावरे वाटेकडे डोळे लावून बसल्या असतील. त्यांना घासही गोड लागत नसेल. त्यांना जंगली जनावरांनी त्रासही दिला असेल. मग त्यांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता स्वतःचा संघर्ष स्वतः केला आणि आपल्या सावलीची ताकद वाढविली देवाप्पाला एक जाणीव झाली असेल. जगात कोणी कोणाचे नसते येथे स्वतःलाच स्वतःसाठी जगावे आणि मरावे लागते स्वकर्तृत्वावर जग उभे करावे लागते.
या कादंबरीत खोत यांनी झुंज दाखविली आहे ती म्हणजे देवाप्पाची झुंज प्रस्थापित लोकांबरोबर व म्हशींची झुंज जंगली जनावरांबरोबर दोघांचीही झुंज आपापल्या ठिकाणी आहे.
विस्थापितांचे व्यथामय जीवन मांडणारी कादंबरी रिंगाण
रयत शिक्षण संस्थेचे, रा.ब.नारायणराव बोरावके कॉलेज, श्रीरामपूर (स्वायत्त) वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रम अंतर्गत पुस्तक परीक्षण स्पर्धा विस्थापितांचे व्यथामय जीवन मांडणारी कादंबरी ‘रिंगाण’ डॉ.कैलास सोनू महाले...Read More
महाले कैलास सोनू
विस्थापितांचे व्यथामय जीवन मांडणारी कादंबरी रिंगाण
रयत शिक्षण संस्थेचे, रा.ब.नारायणराव बोरावके कॉलेज, श्रीरामपूर (स्वायत्त)
वाचन संकल्प महाराष्ट्राचा उपक्रम अंतर्गत पुस्तक परीक्षण स्पर्धा
विस्थापितांचे व्यथामय जीवन मांडणारी कादंबरी ‘रिंगाण’
डॉ.कैलास सोनू महाले
सहयोगी प्राध्यापक व संशोधन केंद्र समन्वयक
मराठी विभाग
प्रस्तावना :
ग्रामसंस्कृतीशी घट्ट नाते जुळलेले, मूळचेच शेतकरी कुटुंबात जन्मलेले व पेशाने शिक्षक असलेले कृष्णात खोत हे अलीकडच्या काळातील आघाडीचे कादंबरीकार आहेत. मराठी कादंबरी लेखनात त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला आहे. ग्रामीण वातावरणात वाढलेल्या खोत यांनी आपल्या लेखनातून गावगाड्याचा सर्वांगाने वेध घेतला आहे. ‘गावठाण’ (२००५), ‘रौदाळा’(२००८), ‘झड झिंबड’ (२०१२),’धूळमाती’(२०१४), ‘रिंगाण’(२०१८) या कादंबऱ्यातून त्यांनी बदलत्या ग्रामीण जीवनाचे वास्तव चित्र रेखाटले आहे. ‘नांगरल्याविन भुई’ हे ललित व्यक्तिचित्रणही वाचकप्रिय आहे. कथा आणि कविता या साहित्यप्रकारातही त्यांनी विपुल लेखन केले आहे. गावगाडा, गावगाड्यातील बदलती स्थित्यंतरे, आणि जगण्याचा संघर्ष हा त्यांच्या लेखनाचा मुख्य विषय राहिला आहे. त्यांच्या साहित्यकृतीना राज्य शासनासह अनेक पुरस्कार मिळाले आहेत. महाराष्ट्र फौंडेशनसह २०२३-२४ चा साहित्य अकादमी पुरस्कार त्यांच्या ‘रिंगाण’ या कादंबरीला मिळाला आहे. ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमाच्या निमिताने ‘रिंगाण’ या कादंबरीविषयीची माझी भूमिका येथे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
सारांश :
‘रिंगाण’ ही कादंबरी लेखकाने ‘तुटलेल्या मुळांच्या कोंबांना अर्पण केली आहे. माणसाच्या जीवनातील तुटलेपण हे असह्य असते. मूळ ठिकाणापासून तुटल्यानंतर ते दुसऱ्या ठिकाणी रुजू शकत नाही किंबहुना त्याला रुजू दिले जात नाही. धरणग्रस्तांच्या बाबतीत हेच घडत असल्याचे कृष्णात खोत यांनी या कादंबरीतील एका भागात मांडले आहे. धरणासाठी सरकारकडून अनेक गावे उठवली जातात. कित्येक पिढ्या एकाच ठिकाणी जन्मल्या-वाढल्या पण अचानकपणे एखाद्या पिढीवर विस्थापित म्हणून शिक्का बसतो. त्यानंतर त्यांच्या जीवनात दबलेपणा निर्माण होतो. त्यांचे जीवन अस्वस्थ बनते. ही अस्वस्थता प्रस्तुत कादंबरीत यथार्थपणे चित्रित केली आहे.
विश्लेषण :
रिंगाण’ या कादंबरीतला नायक देवाप्पा हा धरणग्रस्त आहे. विस्थापित देवाप्पाचे कुटुंब मुळ ठिकाणापासून लांबच्या प्रदेशात अनिच्छेने जाते. विस्थापित म्हणून त्यांना संघर्षाला सामोरे जावे लागते. नव्या ठिकाणी देवाप्पाला माणसातली जनावर, माणसातली भूत असल्याचा अनुभव येतो. ती देवाप्पासारख्याला जुळवून घेत नाहीत. सरकारन धरणग्रस्तांना वेगवेगळया ठिकाणी वस्तीला जागा दिली आणि शेत दिली. पण विस्थापितांचा प्रश्न असतो तो म्हणजे ‘उठवायचं आहे, तर उठवा पण एकजागी तर वसवा’ विस्थापित म्हणून जगताना ‘माणसांच्या जंगलात वाघाच्या काळजाच. शेळीच कवा झाल कळलंच नाही’ असे संकुचितपण, भित्रेपण विस्थापितांच्या वाटयाला आलेले जाणवते.
आशय: धरणग्रस्तांच्या जीवावर इतर लोक सुखी होणार पण ‘आम्ही मात्र उचलेच’ हा देवाप्पाचा प्रश्न अंतर्मुख करणारा आहे. नव्या गावात गेल्यानंतर त्यांच्या पोशाखातही बदल होतो. मनासारख नाही तर तडजोडीन जगाव लागत होत. देवाप्पाला सरकारकडून मिळालेल्या शेतातील हरभरा चोरीस जातो. उलट त्यांच्यावरच चोरीचा आळ घेतला जातो. देवाप्पाच्या आईला ही कापडातली माणस कुणाचीच नसल्याची असे वाटते. माणसामाणसातला दुरावा, प्रस्थापित विस्थापित संघर्ष कादंबरीतील काही प्रसंगातून प्रकर्षाने जाणवतो. मूळ वस्तीच्या आठवणी पुन्हा पुन्हा जाग्या होतात. नव्या वस्तीत सावबाची म्हातारी मेल्यावर तिला जाळण्यासाठी स्मशानभूमीत नेल जात पण ‘परगावच प्रेत आमी जाळू देणार नाही.’ (पृ.४३) असे म्हणत मानवताहिनतेचे दर्शन घडवतात. सतत संघर्षाला सामोरे जाणाऱ्या देवाप्पाचे मन नव्या वस्तीत रमत नव्हतेम्हणून तो म्हणतो, ‘इथ आपण उगवलोच नाही तर रुजल कसं ?’ (पृ.४५) देवाप्पाचा हा प्रश्न स्वतःचेच समाधान करणारा आहे.
देवाप्पा धरणग्रस्त म्हणून मूळ वस्ती सोडून जाताना सगळीच जनावर बरोबर नेऊ शकत नव्हता. त्यातल्या दुभत्या नसलेल्या म्हशी तिथच जंगलात सोडून दिल्या होत्या. पण मूळ वस्तीत जाणाऱ्या येणाऱ्याकडून देवाप्पाच्या आईला कळते की ‘आपुन सोडल्याली ढोर आता तानपी झाल्यात. त्यास्नी कोन धरुन त्यांच दूदबी काढून नेत्यात. ‘ तेव्हापासून देवाप्पाच्या आईन ‘म्हसरास्नी दाव लावून आणण्याचा देवाप्पाजवळ हटट् धरला होता. म्हणून देवाप्पा मुदीवाल्या म्हशीला दाव लावून आणण्यासाठी दोघांना बरोबर घेऊन धरणाच्या भिंतीवरन जंगलात मूळवस्तीकडे जायला निघतो. जंगलातली आपली तिथच राहिलेल्या म्हसरांना, रेडकांना दाव लावून नेऊना विकून पैसे करायचे असे देवाप्पासह सर्वांना वाटत होते. जंगलातल्या म्हशी देवाप्पाला आरबाट वाटतात. दूध देणाऱ्या असतील असे वाटते.
देवाप्पा जुन्या वस्तीत जाण्यापूर्वी आपल्या आवडी-निवडी जोपासण्याचा प्रयत्न करतो ही वस्ती सोडण्यापूर्वी त्याने शेतात नांगर धरली होती. आता मात्र या वस्तीत पुन्हा आल्यावर आपल्या शेताच्या खाणाखुणा बघतो. तिथली झुडप, शेत पाहून त्याला भडभडून येत. देवाप्पा म्हसरांसाठी वेडा झाला, भावनिक झाला. म्हसरांच जगणं जंगली झालेलं त्याला जाणवलं. म्हसरांच्या पाठलाग करीत देवाप्पा सगळ जंगल फिरतो. त्याची दमणूक होते. पण त्यान ठरविलेलं असत की मुदीवाली म्हशीला दावं लावून घेऊनच जायचं.म्हशी मात्र देवाप्पाला हुलकावणी देत देवाप्पाच्या दाव्याला अडकत नाहीत. गोल रिंगण करुन, रेडकांना कोंडून बसलेल्या असतात. गव्यांना, वाघांना म्हशी जुमानत नाहीत हे पहिल्यांदाच देवाप्पा बघत होता. म्हसरांना आंजारुन, गोंजारुन हवं तर ताकदीन दावी लावायची, शक्कल लढवून त्यांना घेऊन जायच असे तो ठरवतो.म्हसरांचं वेगळ रुप देवाप्पा स्वतःच नजरेन बघत होता. कोल्हयाच्या माग लागून त्याला तांगडणारी म्हसरं, रिंगण काढून एकटक डोळ लावून बघणारी म्हसरं, कान टवकारुन झाडांच पान पडल तरी नजर रोखून बघणारी म्हसरं हे सर्व पाहून देवाप्पाच्या मनाच्या ठिकन्या उडाल्या म्हसरांनी रिंगाण करुन स्वरंक्षणचा प्रयत्न केला. आपल्यासुध्दा जगण्यामरण्याचं रिंगाण मांडलय सान्यांनी असे देवाप्पाला वाटते.देवाप्पा म्हसरांच्या मनाचाही विचार करतो. गेलो त्यापासून आमच्या वाटकड डोळे लावून बसल्या असतील त्यांना घास गोड लागला नसल. उपाशी राहिल्या असतील. वाघा, तरसांनी त्यांना तांगडल असतं, मालकांची सावली पण दिसली नाही म्हणून त्या बावचळल्या असतील. मग हया म्हसरांनीच जीवाची पर्वा न करता पवित्रा घेतला आणि आपल्या सावलीची ताकद वाढवली.
कादंबरीत झुंज दाखवली असून देवाप्पाची झुंज प्रस्थापित लोकांच्याबरोबर तर म्हसरांची झुंज वस्तीतल्या जनावरांच्याबरोबर आहे. दोघांचीही झुंज आपआपल्या ठिकाणी आहे. कधी काळी माणसानीच गुराढोरांना त्यांच्या मूळ स्वभावाला दावं लावून आपल्याला मिरवायसाठी आपल्या दावणीला बांधल. पण देवाप्पाच्या त्या म्हसरांनी सगळया जंगलभर हिंडवत आपल्या दावणीला बांधल होतं. प्रारंभी माणसांनी म्हसरांना दाव लावल तर आता माणसांना म्हसरांनी दावणीला बांधून फिरवलं. म्हशीनं आपल्याला ओळखाव अस देवाप्पाला वाटत होतं. मुदीवाली म्हस देवाप्पाला हुलकावणी देत असतानाच देवाप्पाचा तिच्याशी कधी प्रेमाचा संवाद, कधी सातजन्माचा वैन्यासारखा वैरभावातला संवाद सुरु असतो. मुदीवाली बरोबरचा लाडीक संवाद माणूस आणि जनावरातलं नात स्पष्ट करणारा आहे.उदाहरणार्थ, ‘बाई ओळख आता तरी या देवाप्पाला तुझ्या कानात येवून बोलणाऱ्याची ओळख विसरलीस ?(पृ.११८)म्हसरं आणि देवाप्पाचा वैरत्व दर्शविणारा संवादही आढळतो दिवस बुडपर्यंत यास्नी धरणाच्या पाण्यात बुडीवतो का नाय बघा.’ (पृ.१२२)तो म्हणतो,बघा.’म्हसरं आणि देवाप्पाच्या संघर्षात देवाप्पाचा केविलवाणेपणा आढळतो.’आरं तुमच्याच शेणामुताचा वास माझ्या घामा रक्ताला येतोय वाईच हूंगून तरी (पृ. १५७)
कादंबरीच्या शेवटी देवाप्पाचा पराभव होतो याचे चित्रण येते. देवाप्पा पराभव स्वीकारतो. झगडण्यात काही अर्थ राहिला नाही असे त्याला जाणवते. देवाप्पाला हद्दीपर्यंत पाठलाग करुन हद्दीपार करुन पळवून लावतात. म्हसरं मात्र हद्दीवर थांबलीत. जनावरांनी मानवाला हद्दीतून पार केलं तर जनावर स्वत:च्या मूळ हद्दीत स्थिरावतात. म्हसरांनी मानवावर सूड उगवला हे यांतून कळून येते. विश्वासघाताने त्या म्हसरांना मानव स्वार्थीपणे सोडून जातो. त्याचा पश्चाताप मानवाला होतो. देवाप्पाची तुटली मूळ रुजविण्याची धडपड व्यर्थ आहे असे वाटते. माणसाची मूळ तुटली पण जनावरांची मूळ खोल पसरत गेलीत. एवढं मात्र या कादंबरीतून जाणवते. म्हसरांनी देवाप्पाला दिलेली हुलकावणी, म्हसरांचं जिंकण आणि देवाप्पाच हारणं हा नियतीचा खेळ आहे असे देवाप्पाला वाटते.
‘रिंगाण’ या कादंबरीतून दोन प्रकारचा संघर्ष उभा केला आहे. एक म्हणजे प्रस्थापित आणि विस्थापित यांच्यातला संघर्ष तसेच देवाप्पा आणि जंगलातली म्हसरं यांच्यातला संघर्ष विस्थापित प्रस्थापितांमध्ये मिसळत असताना होणारा संघर्ष आणि पाळीव जनावरांचं जंगली होताना माणसांशी त्यांचा होणारा संघर्ष कादंबरीतून पहायला मिळतो.
कादंबरीतील भाषा
अस्सल ग्रामबोलीचा बाज घेऊन ‘रिंगाण’ कादंबरी अवतरली आहे. संवादातून कादंबरी उलगडूत जावी अशी व्यवस्था या कादंबरीत आढळते. विशेषत: देवाप्पा आणि मुदीवाली म्हस यांच्यातील संवादातून दोघांतील जवळीक जाणवते. छोटी छोटी वाक्ये कादंबरीत आहेत. ‘ढोर’ आमची जिथल्या तिथं झाडझूडपं झाली’ (पृ.७६), ‘मनाचा कोंबडा कोंबडी होत होती.’ (पृ.९१), ‘कुठतरी चांदण गळत होतं’ (पृ.९७)या वाक्यातून ढोरं झाडझुडपं होणं, मनाचा कोंबडा कोंबडी होणं, चांदण गळणं या शब्दप्रयोगातून अनुक्रमे वस्तूभाव, मनभाव, आनंदभाव हे भाव भाषेतून प्रकट झाल्याचे पहायला मिळतात.चिकारदा (खुपवेळा), येळकाट (बांबू), आयरमीटी (वैताग, त्रास), नित्रास (निवांत), बोडण (जनावरांच्या अंगावरील केस काढण), ठग्गळ ( शक्कल, युक्ती), आच्युती (अलगद सहज), असे काही कोल्हापुरी बोलीतून आलेल्या शब्दांचा वापर आढळतो. वाक्प्रचार, म्हणींच्या प्रयोगातून अनुभवाची मांडणी झाली आहे.
ताकद आणि कमकुवत बाजू :
गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात विविध प्रकल्पांच्या नावाखाली सामान्य जनता व आदिवासी समूह विस्थापित होत आहेत म्हणजे त्यांना नाईलाजाने स्थलांतर करावे लागत असल्याचे वास्तव प्रखरतेने पुढे येते. विस्थापित होताना या लोकांच्या भावभावनांचा विचार केला जात नाही. मात्र नाईलाजाने ही माणसे आपली जन्मभूमी सोडतात. मराठी साहित्यात स्थलांतरीत व्यक्तींच्या जीवनावर मोठ्या प्रमाणात लेखन झाले असले तरी या समूहाची आंतरिक पातळीवरची व्यथा ‘रिंगाण’मधून चित्रित करण्यात कादंबरीकार कमालीचे यशस्वी झाले आहेत. माणसामाणसातील नात्याप्रमाणेच त्यांची पशु प्राण्यांशी असलेली सलगताही येथे साकार झाली आहे.
वैयक्तिक विचार :
ग्रामीण जीवनाचा , विशेषतः कृषीसंस्कृतीचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेल्या कृष्णात खोत यांनी आपल्या लेखनातून वास्तव जीवन मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आजवर ग्रामसंस्कृती साहित्यातून उभी करण्याचे काम अनेक साहित्यिकांनी केले असले तरी खोत आपल्या लेखनातून प्रत्यक्षपणे गावगाडा व तेथील विविधांगी वास्तव उभे करतात. ‘रिंगाण’ कादंबरीतून याची अनुभूती अधिक प्रमाणात येते. विस्थापितांचे व्यथामय जीवन मांडताना माणसामाणसातील परस्पर नात्यांचा ओलाव्यायबरोबरच प्राण्यांच्या भावनाही अगदी प्रखरतेने कादंबरीकार वाचकांसमोर उभी करतात. हे त्यांच्या लेखनाचे सामर्थ्य म्हणावे लागेल. विस्थापितांचे गाऱ्हाणे तमाम महाराष्ट्रापुढे वेगळ्या धर्तीवर या . ‘रिंगाण’ मधून मांडले आहे.
निष्कर्ष :
‘रिंगण’ या कृष्णात खोत यांच्या कादंबरीतून प्रस्थापित – विस्थापितांतील संघर्षाबरोबर मूळ तुटण्यातून निर्माण होणारी अस्वस्थता किती तीव्र असते याचे चित्रण येते. तसेच पाळीव जनावरांची जशी मूळाकडं जाण्याची अवस्था पहायला मिळते तसे काळाच्या ओघात मानवी जीवनाचा विचार करता नव उत्क्रांतवादाची दिशा काय असेल याचे सूचन कादंबरीकाराने अखेरीस केले आहे. ग्रामसंघर्ष,धरणग्रस्तांच्या अनंत यातना, जगण्याची स्पर्धा या साऱ्यांचे चित्र खोत यांनी अत्यंत संवेंदनशीलपणे मांडले आहे. त्याला वाचकांनीही तितक्याच संवेंदनशीलतेने दाद दिली आहे.
संदर्भ –
खोत, कृष्णात, ‘रिंगण’, मुक्तशब्द प्रकाशन, मुंबई. २०१८

