Review By प्रा. शर्मिला देवकाते, Asst. Professor, Baburaoji Gholap College, Pune ‘हा स्पर्श मिलनाचा’ हे कुंडलिक केदारी यांचे हे
Read More
Review By प्रा. शर्मिला देवकाते, Asst. Professor, Baburaoji Gholap College, Pune
‘हा स्पर्श मिलनाचा’ हे कुंडलिक केदारी यांचे हे समकालीन नाटक अनेक दृष्टीने वैशिष्ट्यपूर्ण आहे. या नाटकाचे मुखपृष्ठ खूप काही सांगून जाते. त्यामधून हे नाटक प्रेमावरती आधारित आहे हे सहजतेने लक्षात येते. परंतु या नाटकाचा साकल्याने विचार केला तर त्यातील एकेक कडा उलगडत जाते. हे नाटक फक्त प्रेमावरती आधारित नसून जीवनातील वास्तव दर्शवणारे आहे. हे नाटक केवळ एक मनोरंजनात्मक नाटक नसून समाजातील खोल मूळं उकलून काढणारे नाटक आहे.या नाटकात रजनी, संध्या, मदन, विक्रम,कांता,कांचन ही मुख्य पात्रे आहेत. तसं पाहिलं तर रजनी अत्यंत श्रीमंत कुटुंबातली एका बिझनेस मॅन विक्रमची पत्नी ,संध्या ही दिवंगत कॅप्टनची पत्नी असून तिचे पती वारलेले आहेत.तसेच मदन हा प्लेबॉयची भूमिका करणारा पुरुष वेश्या आहे.कांता ही श्रीमंत स्त्री असून ती विकृत अशी महिला आहे. तसेच कांचन ही कॉलगर्ल (स्त्री-वेश्या) आहे, अशा प्रकारची पात्रे आणि त्यातून रंगणारे हे नाटक वास्तवाशी जाऊन भिडणारे आहे.
नाटकाला सुरुवात होते आणि बायकांमधील संवाद जसा पुढे पुढे जातो तशी एक-एक कडा उलगडत जाते. तसं पाहिलं तर या नाटकात बायकांच्या संवादातून असं काय घडलंय हे समजत नाही; परंतु त्यांच्या गप्पा जशा पुढे जातात तसे त्यांच्या मनातील अनेक पैलू , मनातील असणाऱ्या घुसमटी आणि मनावरती समाजाचे झालेले संस्कार त्यांच्या तोंडून बाहेर पडतात. एकीकडे परंपरेनुसार महिलांना दागिन्यांची, भौतिक सुखाची, श्रीमंतीची हौस असते हे आपण एक मनात बिंबवलेल आहे. परंतु यामध्ये विक्रमची पत्नी रजनी श्रीमंत कुटुंबातील आहे.तिला सर्व भौतिक सुखसुविधा आहेत; परंतु तिच्या मनातील खंत म्हणजे तिच्या अतिश्रीमंत नवऱ्याच्या कामाच्या व्यापामुळे नवऱ्याकडून मिळणारे सुख तिच्या वाट्याला येत नाही हे आहे हे संध्या आणि रजनी या दोघींच्या संवादातून आपल्याला उलगडते. स्त्रीच्या मनातील घुसमट आपल्याला जाणवते तसेच एकीकडे पुरुषाचे जे मानदंड ठरलेले आहेत ते आपण किती मनावर बिंबवले हेही उलघडते. सिमोन द बुहा या फ्रेंच लेखिकेने तिच्या ‘द सेकंड सेक्स’ या पुस्तकात “कोणी बाई म्हणून जन्माला येत नाही तर ती बाई म्हणून घडवली जाते” याचे उत्तम उदाहरण म्हणजे ही साहित्यकृती आहे .स्त्रीच्या मनातील दुःख, घुसमट यावरच थांबत नाही तर स्त्री ही कशा प्रकारे पुरुषाला शोषित करते हे या नाटकातून दाखवले आहे. आजपर्यंतच्या मराठीतील जवळपास ७० टक्के कलाकृती या फक्त स्त्री शोषित असते पुरुष हा अन्याय करणारा असतो अशा पद्धतीच्याच आहे परंतु कुंडलिक केदारी यांचे हे नाटक या सर्वांना अपवाद ठरते.यामध्ये पुरुषही कसे शोषित असतात आणि याचं कारण फक्त एक स्त्री नसून समाजव्यवस्था असते. ज्याप्रमाणे पुरुष शोषण करु शकतो त्याचप्रमाणे एक स्त्रीसुद्धा अन्याय करू शकते हे या नाटकात मांडलेले आहे.म्हणजे एकूणच काय तर अन्याय करणे हे फक्त लिंगावर अवलंबून नसून माणसाच्या प्रवृत्तीवर माणसाच्या विकृतीवर अवलंबून असते.
या साहित्यकृतीत मदनसारखा एक ‘प्लेबॉय’ दाखवला आहे. प्लेबॉय म्हणजे नक्की आहे तरी काय? हे या नाटकात केदारींनी आपल्यासमोर उलगडले आहे. हे प्लेबॉय कसे तयार होतात याचा वास्तव शोध येथे घेतला आहे. आजपर्यंत स्त्रीवेश्या व्यवसाय करणारे इतक्यापर्यंत आपण पोहोचलो होतो परंतु पुरुष वेश्या व्यवसाय करणारे असतात हे म्हणजे आपल्या मनाला आणि समाजाला पटणारे नाही. आज आपल्या समाजवर्गाने जे समोर दिसतं, जे परंपरेनुसार आलं तेच टिपत राहण्याचं काम केलं आहे;परंतु केदारींची कलाकृती समाजाच्या आतील वास्तव उलघडून दाखवते.अतिआधुनिक विचारसरणी आणि दुसरीकडे त्याच बाजूने विचारांची होणारी घसरण आणि मनाची होणारी घसरण यामध्ये दर्शवली आहे. मदन हा प्लेबॉय या व्यवसायकडे कसा ओढला जातो, त्याची होणारी फरफट आणि या सगळ्यातून त्याला होणारा मानसिक त्रास, शारीरिक त्रास या सगळ्यावर मात करणे, तसेच शिक्षित अतिउच्च कुटुंबातील स्त्रिया मदनसारख्या एका तरुण मुलाचा वापर करून घेतात. तसेच काही काळ मदनला त्याच्या आयुष्यात असलेली कमतरता, त्याच्या आयुष्याला लागलेली कीड ही मनात कुठेतरी सतत सतावत राहते; परंतु एकदा माणूस या व्यवसायाकडे वळला तर तो पुन्हा बाहेर पडणं अशक्य होतं हे मदन या पात्रातून दिसून येते. मदनसारखे प्लेबॉय निर्माण होण्यामागची कारणं काय असतील तर अतिआधुनिक विचारसरणी, राहणीमान आणि त्याबरोबरच भेडसावत जाणाऱ्या समस्या,बेरोजगारी या सगळ्यांच्या कारणांमुळे मदनसारखे प्लेबॉय हे सातत्याने निर्माण होत आहेत. हा सगळा व्यवहार केदारींनी उघडा केला आहे. आजपर्यंत स्त्रीवेश्या व्यवसाय करणाऱ्यांच्या पेठा ऐकून होतो परंतु जिगोलो (प्लेबॉय) हे या पुस्तकाच्या रूपाने आपल्यासमोर केदारींनी आणलेला आहे.ज्याप्रमाणे स्त्रिया वेश्याव्यवसायाकडे फसवणुकीतून किंवा उदरनिर्वाहसाठी या व्यवसायाकडे वळतात; त्याचप्रमाणे जिगोला हेसुद्धा एक प्रकारच्या फसवणुकीतून किंवा उदरनिर्वाहासाठीच या व्यवसायाकडे जातात. उच्च कुटुंबातील स्त्रिया ह्या जिगोलासारख्या तरुण मुलांचा कसा वापर करून घेतात, त्यांच्यावरती कशा प्रकारच्या अन्याय करतात हेही यात दिसून येते. नॉनफाईन कॉल हे जिगोलो स्वीकारतात, त्यांना बरेच चांगले पैसे मिळतात परंतु यातून त्यांना मानसिक, शारीरिक त्रासाला सामोरे जावे लागते. यामध्ये कांतासारखी एक विकृत स्री मदनसारख्या तरुणाला फसवते. आज पर्यंत स्त्रियांवर अन्याय होतात,स्त्रियांवर बलात्कार होतात हे आपण ऐकून असतो. परंतु हे नाटक ज्यामध्ये एका पुरुषावरतीही बलात्कार होतो हे आपल्याला जाणवते. हे वास्तव आपल्या काळजाला भिडते. आजपर्यंत ‘रखेल’, ठेवलेली बाई असे शब्द फक्त स्त्रियांबद्दल ऐकून होतो परंतु ही साहित्यकृती या सगळ्यांच्या चौकटी मोडून रखेल हे पुरुषाला उद्देशून बोलते. हे आपल्यासारख्या सामान्य वाचकांना पचणार नाही परंतु समाजातील ही बाजू दाखवण्याचं काम केदारींनी केलेले आहे.
मदनसारख्या प्लेबॉय मुलाला जेव्हा संध्यासारख्या एका चांगल्या माणसांची संगत लाभते तेव्हा त्याची होणारी घुसमट बाहेर पडते. ती “कोणीही प्लेबॉय म्हणून जन्माला येत नाही. सभ्य माणसांच्या वासनेला ते बळी जातात.” एकूणच हे नाटक माणसांच्या प्रवृत्तीची दशा ,व्यथा दर्शवणारे आहे. स्त्री-पुरुष यापेक्षा माणसाची विकृती यात आलेली आहे . शेवटी काय,माणूस वाईट नसतो वाईट असते ती त्याची भूक “.
Show Less