नाव :- सानिया सुरेश दिक्षित. (एम. ए. प्रथम वर्ष , पाली व बौद्ध अध्ययन विभाग) , सावित्रीबाई फुले पुणे
Read More
नाव :- सानिया सुरेश दिक्षित. (एम. ए. प्रथम वर्ष , पाली व बौद्ध अध्ययन विभाग) ,
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ ,पुणे .
माझी जन्मठेप या सावरकरांच्या आत्मचरित्रानंतर प्रकाशित झालेली पाणी ही एक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक कादंबरी आहे. या कादंबरीचे कथानक हे काल्पनिक असल्याचे भासते परंतु ते काल्पनिक नसून अंदमानच्या बंदीगृहातील राजबंद्यांच्या कठीण जीवनावर आधारलेली आहे. अंदमानच्या बंदीगृहात अत्यंत कष्टकारक,तापदायक, अमानुष गुंडगिरीचे जीवन कसे जगावे लागत होते, याचे वास्तक चित्रण केलेले आहे.
हे कथानक एका बंदिवानाच्या न्यायालयीन अभियोगावर आधारीत आहे. हे कथानक मुख्यत्वे मालती आणि किशन या दोन पात्रांभोवती फिरत राहते. परंतु महत्त्वपूर्ण इतर पात्रेही यामध्ये तितकीच महत्त्वपूर्ण असलेली दिसतात. किशन आणि मालती यांची ओझरती ओळख व त्यानंतरच्या भयानक संकटांतून मार्ग
काढत असताना ओळखीचे प्रेमामध्ये झालेले रुपांतर हे आपल्या मनात आत्मीयता निर्माण करते. प्रथम आलेली संकटे, त्यातून मार्ग काढता काढता मिळालेली काळ्या
पाण्याची शिक्षा, अंदमानातील अंधारी, भयावह कारागृहे, रोजच्या मरणयातना आणि तरीदेखील त्यांची एकमेकांविषयी असलेली ओढ पाहून डोळे पाणावल्याशिवाय राहात
नाहीत.
एक मुलगा हरवल्याचे दुःख मनात असल्याने आपल्या एकुलत्या एका मुलीवर जीवापाड प्रेम करणारी आई, राक्षसी वृत्तीचा रफीउद्दीन, अंदमानात भेटलेले १८५७ च्या युद्धातील आप्पाजी अणि वेळप्रसंगी मदतीला धावून येणारे जावरा जातीचे सहकारी हे सर्व मनुष्याच्या स्वभावाचे विविध पैलू उलगडतात.
या कादंबरीमध्ये वीर सावरकरांनी अंदमान आणि तेथील लोक याबद्दल बरीच विस्तृत माहिती दिली आहे. त्यांच्या काही प्रथापरंपरांचादेखील विशेष उल्लेख केला आहे. त्यांच्या काही प्रथा आपल्या हिंदूधर्माशी साम्य दर्शवतात. अंदमानातील जंगली जाती नेहमी अग्नी सोबत बाळगतात, तो विझू देत नाहीत. जसे हिंदू लोक अखंड अग्निहोत्र पाळतात.अंदमानच्या घनदाट अरण्यात विषारी डास, माश्या, साप, जळवा, हिंस्र श्वापदे यांच्यापासून संरक्षण करण्यासाठी खरेतर अग्नीची आवश्यकताच आहे. त्या काळात अग्नी प्रज्वलित करण्यासाठी सोपा मार्ग नसल्याने एकदा पेटलेली आग शक्यतो अखंड तेवत ठेवणे सोयीस्कर, यावरूनच आर्यांमध्ये अखंड अग्नीहोत्राची प्रथा पडली असावी असे सावरकर म्हणतात.
सावरकर त्या बंदीगृहातील अट्टल गुन्हेगारांच्या काही विशेष करामती सांगतात. हे अट्टल गुन्हेगार स्वतःच्या गळ्यातखोबणी तयार करतात. पशु रवंथ करण्यासाठी गळ्याच्या ज्या पोकळीत चर्वण साठवून ठेवतात, ती पोकळी मनुष्यालाही त्याच जागी करुन घेता येते. अत्यंत निर्ढावलेले अपराधी गुरुपरंपरेने या विद्येत पटाईत होतात. या खोबणीत अपराध्यांना पैसे, तपकीर, इ. बर्याच गोष्टी लपवून ठेवता येतात. या पद्धतीचे बरेच विशेष आणि नवनवीन संदर्भ सावरकरांनी कथानक चालू असताना दिलोले आहेत.
या कादंबरीची लेखनशैली सुरुवातीला थोडी समजण्यास जड जाते. परंतु जसे जसे आपण वाचत जातो तसे तसे ती अधिक सुलभ आणि आकर्षक वाटू लागते. महत्त्वाचे म्हणजे या कादंबरीमध्ये अत्यंत शुद्ध मराठी भाषा वापरलेली आहे. सावरकरांनी मराठी भाषेला नव्या शब्दांची देणगी दिली, त्याचप्रमाणे जुनेच पण नव्याने प्रचारात आणलेले काही प्रतिशब्द दिले.त्यातील मला भावलेल्या काही शब्दांचा मी येथे उल्लेख करते-
अखंड टाक – फाऊंटन पेन
हातचमक- हॅण्ड बॅटरी
शिलास्थि- fossilized
टोचे -इंजेक्शन
या पद्धतीचे अनेक शब्द आपल्याला आढळतात.
या कादंबरीची वैशिष्ट्ये म्हणजे भावनिक प्रगल्भता. सावरकरांनी अत्यंत उत्कटतेने या कथानकातील सर्व पात्रांना चित्रित केले आहे. यातील आई-मुलीची होणारी ताटातूट पाहता नकळत डोळ्यांत पाणी येते. तसेच रफिउद्दीन ची राक्षसी कृत्ये पाहता संताप येतो. अशा पद्धतीने सर्वच पात्रे जिवंत असल्यासारखी भासतात. या कथानकाला वास्तविक पार्श्वभूमी आहे. सावरकरांनी काळा पाण्यावरील नरकयातनाचे यथार्थ चित्रण केले आहे. तसेच प्रेमाचे अद्भुत वर्णन – आई मुलीचा जिव्हाळा, तसेच किशन व मालतीच्या निस्वार्थी प्रेमाचे अत्यंत मार्मिक असे चित्रण येथे दिसून येते.हे सर्व त्यांनी अशा प्रकारे गुंफले आहे की त्यामधून एका उच्च
दर्जाच्या लेखकाचे, कवीचे, किंबहुना उत्कृष्ट साहित्यिकाचे दर्शन होते.
ही कांदबरी केवळ एक साहितिक कृती नसून स्वातंत्र्यपूर्व काळातील बंदिवानांच्या यातनांचे एक जिवंत दस्ताऐवज म्हणून महत्त्वपूर्ण ठरते.
सध्या आपण जे सुखसोयींनी युक्त, निर्धास्त जीवन जगत आहे त्यापाठीमागे स्वातंत्र्यवीरांनी केलेला असीम त्याग, त्यांनी भोगलेल्या यातना, त्यांची देशाप्रती असणारी निस्सीम श्रद्धा हे सर्व कारणीभूत आहे. खरेतर आपण या स्वातंत्र्यवीरांचे ऋण उभ्या जन्मात फेडू शकत नाही, परंतु निदान त्यांच्या कामगिरीची जाणीव तरी ठेऊच शकतो. याचसाठी या आणि अश्या बऱ्याच पुस्तकांचे वाचन प्रत्येकाने करावेच, जेणेकरून आपल्या राष्ट्राप्रती, राष्ट्रसैनिकांप्रती आपल्याला कायम अभिमान वाटेल.
Show Less