वि. स. खांडेकर लिखित 'क्रौंचवध' ही मराठी साहित्याच्या सुवर्णयुगातील एक महत्त्वपूर्ण साहित्यकृती
Read More
वि. स. खांडेकर लिखित ‘क्रौंचवध’ ही मराठी साहित्याच्या सुवर्णयुगातील एक महत्त्वपूर्ण साहित्यकृती आहे. या कादंबरीत मानवी नात्यांतील गुंतागुंतीची, नैतिकतेची, आणि समाजातील बदलत्या मूल्यव्यवस्थेची सुंदर मांडणी करण्यात आली आहे. खांडेकर यांच्या लेखनात भावनांचा ओलावा आणि विचारांची खोली नेहमीच दिसून येते, आणि ‘क्रौंचवध’ हि साहित्य कृती त्याचे ठोस उदाहरण आहे. हे पुस्तक सर्व प्रथम १९४२ मध्ये मेहता प्रकाशन गृहाने प्रकाशित केले होते.
कादंबरीचे शीर्षक प्राचीन भारतीय ग्रंथातील “वाल्मीकी रामायणाच्या” प्रसंगावर आधारित आहे. ‘क्रौंच’ पक्ष्यांच्या जोडीतील नर पक्ष्याचा एका पारध्याच्या बाणाने वध झाल्यावर मादी पक्षी शोक करत असते, आणि तिच्या शोक महर्षी वाल्मिकींच्या अंतःकरणाला जाऊन भिडला आणि वाल्मिकींचा तो शोक श्लोक रूपाने प्रकट झाला. आज जगात क्षणाक्षणाला लाखो निरपराध जीवांची हत्या चालली आहे. ‘क्रौंच’ पक्ष्यांच्या त्या सुखी जोडप्याला दुःखी करणारा पारधी आणि आजच्या युगातील सत्तांध नेते हे दोघे सारखेच क्रूर आहेत असे लेखकाचे ठाम मत आहे. या कादंबरीत नात्यांमधील वेदना, त्याग, आणि संघर्षाचे सुरेख स्वरूपात वर्णन करण्यात आले आहे.
‘क्रौंचवध’ हे मुख्यतः मानवी नातेसंबंधांतील ताणतणाव, वैवाहिक जीवनातील चढउतार, आणि त्यातून उभ्या राहणाऱ्या नैतिक प्रश्नांभोवती फिरते. कथेतील पात्रे वैयक्तिक स्वार्थ, समाजाच्या बंधनांचा दबाव, आणि स्वतःच्या निर्णयांमुळे निर्माण होणाऱ्या परिणामांशी संघर्ष करताना दिसतात. कथेतील पात्रे अत्यंत वास्तववादी आहेत. त्यांच्या स्वभावाचे, वर्तनाचे आणि विचारसरणीचे सूक्ष्म चित्रण खांडेकरांनी केले आहे. पती-पत्नीमधील नातेसंबंधांतील संवादाचा अभाव, त्यांच्या अपेक्षा आणि प्रत्यक्ष जीवनातील परिस्थिती यांच्यातील विरोधाभास उत्तम प्रकारे दाखवला आहे. त्यांच्या माध्यमातून कथेच्या सामाजिक आणि सांस्कृतिक संदर्भांची मांडणी झालेली दिसून येते.
मानवी नात्यांतील गुंतागुंत हा या कादंबरीचा मुख्य विषय आहे. वैवाहिक जीवनातील भावनिक ओढाताण आणि त्यातून होणाऱ्या परिणामांचे भेदक चित्रण करण्यात आले आहे. तसेच आधुनिक विचारसरणी आणि पारंपरिक समाजातील तणाव यांचा समतोल शोधण्याचा लेखकाने प्रयत्न केलेला आहे.
खांडेकरांची लेखनशैली ओघवती, काव्यात्म, आणि समर्पक आहे. कथेतील प्रसंगवर्णन, निसर्गाचे चित्रण, आणि पात्रांच्या मनोव्यवहारांचे वर्णन अतिशय प्रभावी आहे. संवाद साधे आणि नेमके असून, ते पात्रांच्या मनोवृत्तीला योग्य प्रकारे प्रतिबिंबित करतात.
‘क्रौंचवध’ वाचकाला वैयक्तिक आयुष्याच्या नातेसंबंधांबद्दल आणि त्याच्या सामाजिक जबाबदाऱ्या यांबद्दल विचार करायला लावते. कादंबरीतील नैतिक प्रश्न वाचकाला अंतर्मुख करतात आणि जीवनातील मूल्यव्यवस्थेचा शोध घेण्यास प्रवृत्त करतात.
वि. स. खांडेकर यांची ‘क्रौंचवध’ ही कादंबरी मानवी जीवनातील वेदना, संघर्ष, आणि प्रेम यांचे सखोल दर्शन घडवते. साहित्य, कला, आणि नीतिमूल्यांची सांगड घालणारी ही कादंबरी वाचकाच्या मनात दीर्घकाळ घर करून राहते. खांडेकरांची लिखान प्रतिभाशक्ती आणि साहित्यिक दृष्टिकोनाचे उत्तम उदाहरण म्हणून ‘क्रौंचवध’ हि साहित्यकृती कायम स्मरणात राहील.
Show Less