Book Review : Wagh Kailas Pandit, MGV's Loknete Vyankatrao Hiray Arts Science and Commerce College Panchvati, Nashik. श्रीएकनाथमहाराजांवा जन्म
Read More
Book Review : Wagh Kailas Pandit, MGV’s Loknete Vyankatrao Hiray Arts Science and Commerce College Panchvati, Nashik.
श्रीएकनाथमहाराजांवा जन्म साधारणपणे शके १४५५ च्या आसपास विद्येचे माहेरघर असणाऱ्या संपन्न पैठण नगरीत एका श्रेष्ठ भगवद्भक्ताच्या कुळात झाला. त्यांचे पणजोबा भानुदासमहाराज है श्रीविठ्ठलाचे अनन्यभक्त म्हणून प्रसिद्ध आहेत. ‘कानडा कर्नाटकु झालेला परमात्मा पांडुरंग त्यांच्यामुळे पुन्हा महाराष्ट्रात आला. त्या भानुदासांचे पुत्र चक्रपाणी, चक्रपाणीचे पुत्र सूर्यनारायण व त्यांचे पुत्र श्रीएकनाथमहाराज. या कुळात सदाचार व भगवद्भक्ती सुखासमाधानाने नांदत होती. त्याचे संरकार बाळपणापासून एकनाथांवर झाले. मातापित्यांचे छत्र त्यांच्या शिरावर फार काळ राहिले नसले तरी त्यांच्या वृद्ध आजा-आर्जीनी त्यांचे प्रेमानें पालनपोषण केले. पुढे त्यांच्या भाग्याने देवगिरीवर अधिकारी असणाऱ्या श्रीजनार्दनस्वामींची व त्यांची भेट झाली. आपल्या एकनिष्ठ सेवेने त्यांनी आपल्या सद्गुरूंची कृपा व प्रेम संपादन केले. त्यांच्या सान्निध्यात श्रीएकनाथमहाराजांना ज्ञानभक्तीचा अमूल्य ठेवा तर प्राप्त झालाच पण त्याबरोबरच तत्कालिन शासन व समाज यांचे जवळून दर्शनही झाले.
श्रीजनार्दनस्वामी हे त्या काळी शासनातील एक महत्त्वाचे अधिकारी होते व त्यामुळे त्यांच्याकडे भोवतालच्या लोकांकडून अनेक अर्ज, दरखास्ती, तक्रारी येत, त्यांचे न्यायनिवाडे होत. अनेक वरचेखालचे अधिकारी भेटत. त्यांची वागणूक व लोकांशी व्यवहार पहावयास मिळे, तत्कालिन शासनाच्या खऱ्या स्वरूपाचे दर्शन त्यांना जवळून झाले. एकूण सकळ लोकस्थिती काय आहे हे त्यांना लहान वयातच उमजून आले असावे आणि तिचा पदोपदी होत असणारा हास पाहून त्यांचे अंतःकरण व्यथित झाले असावे. त्याचे प्रत्यंतर आपल्याला त्यांच्या वाङ्मयामध्ये पहावयास सापडते. त्यावरून असे दिसते की, सर्व समाज आपले स्वत्व विसरून आंधळेपणाने मानसिक आधारासाठी कुणामागेही धावत होता. समाजातील आदर्श नष्ट झाले होते. तात्कालिक स्वार्थासाठी न्याय, नीती, धर्म, राष्ट्र, संस्कृती, समाज, इतकेच काय पण स्वतःचे कुटुंब यांचाही कोणी विचार करावयास तयार नव्हते. जीवनाला दिशा उरली नाही, कोणती निष्ठा राहिली नाही. जीवनाला अर्थ देणारा तत्त्वज्ञानाचा प्रकाशही लोपून गेलेला होता.
गुरुगृहीचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर श्रीएकनाथांनी तीर्थाटण केले. त्यातही त्यांना समाजस्थितीचे असेच दर्शन घडले असावे. सर्वत्र स्वधर्माचा लोप, अनाचार, स्वार्थ, परकीय दडपणाखाली चिरडला गेलेला समाज, हेच चित्र त्या काळी दिसत असे, असे इतिहासही सांगतो. साधारणतः वयाच्या वीस- एकविसाव्या वर्षापर्यंत श्रीएकनाथांनी बराच देश फिरून हे पाहिले व ते घरी परत आले. वृद्ध आजा-आजी त्यांची घरी वाटच पहात होते. लवकरच त्यांनी श्रीएकनाथांचा विवाह करून दिला व समाधानाने डोळे मिटले. श्रीएकनाथमहाराजांच्या पत्नी गिरिजाबाई या महान साध्वी होत्या. त्या सर्व प्रकारे श्रीएकनाथमहाराजांना अनुरूप होत्या. इतर साधुसंतांच्या मानाने श्रीएकनाथमहाराजांचे सांसारिक जीवन सुखसंपन्नतेचे होते असे वाटते.
पण श्रीएकनाथमहाराजांनी केवळ आपल्या किंवा आपल्या कुटुंबाच्याच सुखाचा विचार केला नाही. त्यांनी विचार केला तो सर्व समाजाच्या सौख्याचा, अज्ञान, अविचार आणि अकर्तृत्व यांत अडकून सत्त्वहीन झालेल्यां समाजाला पुन्हा आत्मोद्धाराचा मार्ग दाखविण्याचे कार्य श्रीएकनाथमहाराजांनी आपल्या सहासष्ट वर्षांच्या आयुष्यात सातत्याने केले. त्यासाठी त्यांनी भूतदया, शुद्ध आचार, खरी भक्ती यांचा प्रचार केला. सत्त्वप्रधान दैवतांची लोकमानसात स्थापना केली, पंढरीच्या वारीच्या द्वारे लोक संघटण केले व मुख्य म्हणजे या सर्वांना आधारभूत असे श्रेष्ठ आध्यात्मिक तत्त्वज्ञान सर्व स्तरांतील लोकांपर्यंत पोहोचविण्यात आले.
!!श्रीभावार्थरामायण संपादन समिती!!
कार्यवृत्तांत
महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर महाराष्ट्र शासनाने अवलंबिलेल्या, जुने संतवाङ्मय संपादून व प्रकाशित करून माफक किंमतीत ते बहुजन समाजास उपलब्ध करून देण्याच्या धोरणानुसार ‘ज्ञानेश्वरी’, ‘तुकारामाची गाथा’, ‘नामदेवाचे अभंग’, ‘श्री एकनाथी भागवत’ आदी ग्रंथ संपादून प्रकाशित केले आहेत. याच धोरणानुसार व धर्तीवर एकनाथमहाराजांचे ‘श्रीभावार्थरामायण’ शासनाने संपादून प्रकाशित करावे अशी विनंती श्रीएकनाथ संशोधन मंदिर, औरंगाबाद या संस्थेने जून १९६० मध्ये शासनास केली होती. ही विनंती लक्षात घेऊन शासनाने आपल्या दिनांक ५ डिसेंबर १९६० च्या आदेशाने ‘श्रीभावार्थरामायणा’ ची संशोधित प्रत संपादित करण्यासाठी पुढील तज्ज्ञांची समिती नियुक्त केली:
(१) श्री. बळवंत गिरिराव घाटे, औरंगाबाद (अध्यक्ष); (२) प्रा. शंकर वामन दांडेकर, पुणे (सदस्य); (३) श्री. धुंडामहाराज देगलूरकर, देगलूर (सदस्य); (४) डॉ. श्रीधर रंगनाथ कुळकर्णी, हैदराबाद (सदस्य) व (५) श्री. नरहर शेषराव पोहनेरकर (विटणीस).
पुढे, कार्याच्या गरजेनुसार समितीने ऑक्टोबर १९६३ पासून प्रा. वि. पां. देऊळगांवकर, गुलबर्गा यांना समितीचे स्वीकृत सदस्य करून घेतले.
२. शासन निर्णयानुसार समितीने पुढील दिशेने काम करावयाचे होते:
अ) श्रीएकनाथांच्या प्रकाशित प्रतींची पाहणी व तपासणी करणे, (आ) श्रीमावार्थरामायणाची विकित्सक व अधिकृत प्रत तयार करून शासनास देणे आणि (इ) आवश्यक त्याप्रमाणे संशोधन व प्रकाशनकार्याविषयी योग्य त्या सूचना शासनास करणे,
३. कार्यारंभ म्हणून समितीने आपली पहिली बैठक दिनांक ४ फेब्रुवारी १९६१ ला पैठण येथील श्रीएकनाथमहाराजांच्या समाधि मंदिरात घेतली, यावेळी समितीपुढे ‘श्रीभावार्थरामायणा’ ची पुढील चार प्रकाशित संस्करणे उपलब्ध होती
(१) श्री. भा. शं. देवस्थळी संपादित्त ‘सुबोध प्रत’ (सन १८८८), (२) श्री. य. वि. देवशास्त्री संपादित ‘इंदुप्रकाश प्रत’ (सन १९१०), (३) श्री. भा. शं. देवस्थळी संपादित ‘निर्णयसागर प्रत’ (सन १९१०) आणि (४) श्री. भा. शं. घारपुरे संपादित ‘घारपुरे प्रत’ (सन १९५७).
४. पण केवळ या प्रकाशित प्रर्तीवरच संतुष्ट न राहता समितीने महाराष्ट्रातील अभ्यासकांना व अशा कार्यात आस्था असणाऱ्या सज्जनांना वृत्तपत्रांतून आवाहन करून त्यांच्या संग्रही असलेल्या ‘रामायणा’ च्या हस्तलिखित प्रतीही मिळविल्या. यात सुमारे एक वर्षांचा काळ लोटला तरी महाराष्ट्राच्या विविध भागांतून या आवाहनास चांगला प्रतिसाद मिळाला व समितीस अकरा सज्जनांनी आपल्याकडची महत्त्वाची हस्तलिखिते उपलब्ध करून दिली. याशिवाय, धुळे येथील राजवाडे संशोधन मंडळ व तंजावर येथील.
सरस्वती महाल ग्रंथालयातूनही समितीने उपलब्ध हस्तलिखिते नकलून मिळविली. या सर्व हस्तलिखितांच्या शेवटच्या पृष्ठांची छायाचित्रे समितीने घेतली असून ती प्रस्तुत ग्रंथात अंतर्भूत केली आहेत.
५. समितीच्या संपादनकार्याची रूपरेषा पुढीलप्रमाणे ठरविण्यात आली होती:
‘संपादनसंहिता सिद्ध करण्यासाठी सभासदांनी एकेक कांड स्वतंत्रपणे निवडावयाचे. प्रकाशित प्रतीतून व उपलब्ध अशा हस्तलिखितांतून त्या त्या कांडांची पृष्ठे घ्यावयाची. संपादन करताना आणि शब्दनिश्चिती करताना नाथसाहित्य व नाथकालीन भाषाविशेष यांची जपणूक काटेकोरपणे करीत करीत प्रत्येक प्रकाशित प्रतीतून व हस्तलिखितातून प्रत्येक ओवीचे वाचन करावयाचे व आपल्या विवेकबुद्धीने पाठ निश्चित करून ते कांड संपादित म्हणून लिहून काढावयाचे. इतर प्रतींतील शब्द पाठभेद म्हणून तळटिपांतून घ्यावयाचे, जेव्हा टिपांचे प्रमाण फारच वाढू लागले तेव्हा समितीने असा निर्णय केला की, रूपभेद असणारे शब्द तळटिपांतून देण्यापेक्षा अर्थभेद असणारे शब्दच तळटिपांतून घ्यावयाचे. अशा प्रकारे सभासदांचे संहितासिद्धीचे कार्य चालू असतानाच समितीच्या सभा चार महिन्यांच्या अंतराने घेण्यात येत. त्या सभांतून प्रत्येक सभासदाच्या संहिता प्रतीच्या प्रत्येक ओवीचे वाचन होई. प्रत्येक शब्द व त्याचे स्वरूप यावर चर्चा होई आणि एकमताने सिद्धसंहिता तयार होई. सभासदांच्या संहितासिद्ध स्वीकृत शब्दात अशा वेळी बदलही करण्यात येई व तो शब्द तळटिपांत जाऊन क्वचित तळटिपेतील शब्दही अंतिम वाचनात संहितेत घेण्यात येई. संतसाहित्याच्या सेवेत जीवन व्यतीत केलेले श्री. धुंडामहाराज देगलूरकर आणि प्रा. शं. वा. तथा मामासाहेब दांडेकर यांच्या अंतिम निर्णयाने वादग्रस्त शब्दांची सिद्धसंहितेत निवड होई. म्हणजे शक्य तेवढ्या प्रकारे संहितेची प्रत निर्दोष तयार व्हावी ही समितीची दृष्टी होती आणि त्याप्रमाणेच संपूर्ण ग्रंथाची संपादित प्रत तयार झाली.”
अशा प्रकारे, संपादित प्रत संपूर्णतया साक्षेपी चर्चेतून सिद्ध झालेली आहे.
Show Less