राधेय
By देसाई रणजित
राधेय ही रणजित देसाई यांनी लिहिलेली मराठी कादंबरी आहे.
ही कादंबरी महाभारतातील कर्ण या व्यक्तिरेखेवर आधारित
आहे.
“मी योद्धा आहे.
जखमांची क्षिती बाळगून भागायचं नाही.
जन्माबरोबरच सुरू झालेलं हे युद्ध
अखेरच्या क्षणांपर्यंत मला चालवलं पाहिजे.
त्यातच माझ्या जीवनाचं
यश सामावलं आहे.”
– इति ‘राधेय’, ‘सूतपुत्र’, ‘अंगराज’ कर्ण.
‘राधेय’ म्हणजे कृष्णाच्या राधेसंबंधित नसून, नववाचकांची गफलत होऊ शकते. सारथी
अधिरथ व त्याची पत्नी राधा यांनी पुत्रवत सांभाळलेल्या कर्णाने तिच्या सन्मानार्थ
‘राधेय’ हे नाव धारण केले. त्याला नेहमी ‘सूतपुत्र’ म्हणजे एक सर्वसामान्य सारथ्याचा
मुलगा असे हिणवले जाई. त्यामुळे, पांडवांसमोर कौरवांना ‘अंधपुत्र’ असे म्हणून जशी
अपमानास्पद वागणूक मिळते व या भावनेतून निर्माण झालेली वेदना समजून घेऊन,
पांडवांना शह द्यायला दुर्योधनाने पांडवांच्या पराक्रमाच्या तोडीसतोड रथीमहारथी
वीर कर्णाला ‘अंग’ या देशाचे राजेपद बहाल केले तर कर्णाला स्वतःहून ‘अंगराज’ ही
पदवी प्रदान केली. पण याच गोष्टींमुळे कर्णाच्या आयुष्याला दिशा मिळाली की त्याची
वाताहत झाली, हे लेखक वाचकांवर सोडतो.
प्रत्येक माणसाच्या मनात एक कर्ण असतो हे सत्य सांगून लेखक कादंबरीला सुरवात
करतो आणि शेवटी, तिथेच वाचकांना आणून सोडतो.
काही प्रसंगी, वर्णनात भाषेची पकड सैल होत जाते तर अचानक घट्ट होत जाते. काही
प्रसंग तपशिलाने खुलवणे शक्य होते, जसे लहानमोठी युद्धे व त्यातील वीर, साहसी
कर्णाचे पराक्रम. तर, द्रौपदी-विटंबना व वस्त्रहरणाचा वेदनादायी प्रसंग कर्णाबद्दल चीड
निर्माण करतो, जरी त्याने कितीही त्याची बाजू मांडली तरी. अर्जुनासह झालेले अंतिम
निर्णायक युद्ध डोळ्यासमोर उभे राहते. कर्णाची पत्नी वृषालीसंदर्भातील माहितीमधे
थोडी तफावत (उदाहरणार्थ, ती प्रथम की द्वितीय पत्नी याबाबत) ‘राधेय’ आणि
‘मृत्युंजय’ या कर्णविषयक दोन्ही कादंबर्यांमधे जाणवते. पण दोघांचे एकमेकांवरील
निस्सीम प्रेम आणि परस्परांवरील विश्वास, ही कर्णाची जमेची बाजू आहे. शेवटपर्यंत
प्रत्येकाने आपापल्या सोयीनुसार कर्णाला वापरून घेतले, हे त्याला उमगत जाते व
त्यातून निर्माण झालेला उबग वाचकांच्या मनातही निर्माण होतो, हे या कादंबरीच्या
भाषेचे सौंदर्य आणि सामर्थ्य आहे. आपल्याच माणसांच्या भल्यासाठी आपल्याच
माणसांशी लढाई करावी लागली, तर जिंकूनही हरणे किंवा त्यांच्या भल्यासाठी हरणे