सुशिक्षित बेकाराच आयुष्य वाट्याला आलेल्या अनेकांनी जगण्यासाठी चालविलेल्या लढाईची व त्यांच्या
Read More
सुशिक्षित बेकाराच आयुष्य वाट्याला आलेल्या अनेकांनी जगण्यासाठी चालविलेल्या लढाईची व त्यांच्या मनातील अस्वस्थता यांची हि कहाणी आहे. अस्वस्थता हा माणसाचा स्थायीभाव आहे पण वर्षागणीक माणसाचे जगण्याचे प्रश्न अधिक तीव्र होत आहेत आणि आदर्श्य वादाला कवटाळून तर हि वाटचाल अधिकच कठीण होत आहे.
सध्याचा माणूस यांत्रिकीकरण, चंगळवाद, भांडवलशाहीचा विकृत विकास, धर्म, corruption , दारिद्र्य, पिळवणूक, भूक, असुरक्षितता अश्या अनेक प्रकारच्या चक्रात अडकला आहे. पण त्याही अवस्थेत त्याची लढाई चालू आहे कारण त्याचे टिकून राहिलेले अस्तित्व त्याच्या लढाऊ वृतीत आहे.
कादंबरीचा नायक शिक्षक बनण्याच्या ध्येयाने D. Ed. होतो पण त्याला नोकरी मिळत नाही. नोकरी मिळविण्यासाठी केलेल्या पायपिटीची हि गोष्ट आहे.
D. Ed ला प्रवेश मिळण्यासाठी त्याच्या वडिलांना शेत विकावे लागते. शिक्षक बनण्याचे वेडे स्वप्न घेऊन हा नायक शहरात येतो व त्याला भयाण वास्तवाचे चटके बसू लागतात. ह्या वाटचालीत त्याचा संबंध बऱ्याच लोकांशी येतो. शिक्षकाची नोकरी मिळत नाही हे लक्षात आल्यानंतर आपल्या ध्येयाला मुठ माती न देता तो दुसरी नोकरी शोधू लागतो कारण आता त्याची अस्तित्वाची लढाई सुरु झालेली असते. शिक्षक बनण्याच्या आशावाद मात्र तो जिवंत ठेवतो. अशी तडजोड स्वीकारून सुद्धा त्याला स्थिरता मिळत नाही.
प्रत्येक प्रसंगात समोरच्या माणसाचे तत्वज्ञान लेखक समतोलपणे आपल्या समोर मांडतो. कोणत्याही गोष्टीवर स्वता: चे मत न देता वाचकाला विचार करायला प्रवृत्त करतो. अश्या परिस्थितीत नाईलाजाने करावी लागणारी तडजोड व त्याची कारणमीमांसा आपल्या समोर मांडतो आणि नकळत पणे नायकाच्या पायपिटीत आपल्याला सामील करून घेतो.
नायकाला आलेल्या अनुभवा वरून १९९० ते २००० वेळचे आजही न सुटलेले प्रश्न (यांत्रिकीकरण, चंगळवाद, भांडवलशाहीचा विकृत विकास, धर्म, corruption , दारिद्र्य, पिळवणूक, भूक, असुरक्षितता) आपल्याला अस्वथ करत राहतात.
कादंबरी वाचताना आपण राज कपूर चा ‘जागते रहो’ सिनेमा बघितल्याचा भास होतो. ह्या कादंबरी वर सुद्धा एखादा सिनेमा निघू शकेल. नायक जाहिरातीसाठी पेपर वाचतो व त्यातील बातम्यांनी स्वत: अस्वस्थ होतो आणि आपल्यालाहि अस्वस्थ करतो. नायकाला धर्मांतर करण्यासाठी प्रलोभन दाखविले जाते. नक्षल वादाचे मूळ आर्थिक विषमतेत आहे, हे कटू सत्य लेखकाने सुंदर रीतीने सांगितले आहे. NGO तील गैर प्रकार अगदी थोडक्यात प्रभावी संवादातून व्यक्त केले आहेत.
हि कादंबरी जर सुशिक्षित व सुखी समाजाने वाचली आणि त्यांचे मन अस्वथ झाले तर लेखकाचा हेतू सफल झाला असे म्हणावे लागेल. हीच अस्वस्थता समाजाचे भवितव्य उज्ज्वल असल्याची खात्री असेल.
जर सरकारने पत्रकारांनी लिहिलेले साहित्य वाचण्याची यंत्रणा निर्माण केली तर समाजमनाची त्यांना कल्पना येईल व राजकीय इच्छा शक्ती असेल तर बरेच प्रश्न वेळेआधीच सुटतील.
कादंबरी संपताना नायकाचा नोकरीचा प्रश्न सुटलेला नसतो पण विद्यादानाचे काम करण्याची संधी त्याला मिळते. कादंबरीत उपस्थित केलेले बरेच प्रश्न आजही सुटलेले नाहीत. उलट त्या प्रश्नांनी उग्र स्वरूप धारण केले आहे म्हणूच लेखकाने नायकाचा नोकरीचा प्रश्नही तसाच ठेवला आहे असे वाटते.
कादंबरीचे मुखपृष्ट छान आहे. अस्वस्थतेचे प्रतिक म्हणून मासा आणि माणूस एकत्र चित्रित केले आहे. पण ध्येयाचा पतंग मात्र एका हाताने पकडून ठेवला आहे.
Show Less