डॉ. संतोष पद्माकर पवार, सहयोगी प्राध्यापक मराठी विभाग,अण्णासाहेब आवटे कॉलेज, मंचर गंगाधर अहिरे
Read More
डॉ. संतोष पद्माकर पवार, सहयोगी प्राध्यापक मराठी विभाग,अण्णासाहेब आवटे कॉलेज, मंचर
गंगाधर अहिरे यांची एक सशक्त कवितानिर्मिती म्हणून ‘आम्ही लोक आणि हिंस्त्र कळपाच्या कविता’ या कवितासंग्रहाचा विचार करावा लागेल.
परिवर्तनवादी कवितेला मराठी कवितेच्या इतिहासातूनही हद्दपार करण्याचे प्रयत्न झाले आहेत; मात्र तिचे अस्तित्व कुणाला संपवता आलेले नाही. परिवर्तनवादी कविता आपल्या अस्तित्वाचा केवळ संघर्ष करत नाहीत तर ती व्यवस्थेला आव्हान निर्माण करते. हे आव्हान निर्माण करताना ती पारंपरिक मूल्य मोडीत काढते; आपल्या नव्याची प्रस्थापना तिथे करते. भाषेची मोडतोड करते. नव्या कल्पना आणि अनुभवक्षेत्राला साहित्य विश्वात जागा करून देते. शोषित, वंचित, रगडल्या आणि भरडल्या गेलेल्या समूहाला आपला स्वतःचा आवाज प्रदान करते. हा आवाज प्रदान करताना ती आपले आदर्श आणि मानदंड यांना पुन्हा पुन्हा वाचकांसमोर आणते. नवमूल्यकल्पना या नव्या विचारदात्यांकडून येत असतात.साहजिकच तथागत, महाकारुणिक गौतम बुद्धापासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारव्युहाला आपलेसे करणारी मराठी कविता या परिवर्तनाची कविता म्हणून ओळखली जाते. कवितेतील परिवर्तन जाणीवा या कथित सौंदर्य आणि भावकविता यांच्या निर्मितीपलीकडे जाणाऱ्या असल्याने त्या वेगळ्या ठरणाऱ्या असतात आणि त्या परंपरेला आव्हान देतात. समग्र व्यवस्था बदलाचा ध्यास या कवितेला असतो. आपल्या सामाजिक आणि राजकीय घटनातून आपले माणसाचे जीवन नियमित केले जाते. मात्र विपरीत अशा सामाजिक आणि राजकीय परिस्थितीत परिवर्तनवादी कविता आपला वैचारिक संघर्ष उभा करते. असा वैचारिक संघर्ष घेऊन गंगाधर अहिरे यांची कविता उभी राहते. तो वर्तमान घटितांचा अन्वयार्थ लावतो. त्यांच्यातील विसंगती कवीला अस्वस्थ करते. त्याला आपला उज्ज्वल परिवर्तनाचा इतिहास आठवतो. त्या इतिहासाच्या मानदंडाला तो आजचे वर्तमान सांगतो आणि संतप्त होऊन क्रोधाने तो आपली कविता बोलू लागतो. गंगाधर अहिरे यांच्या कवितेचा रूपबंध असा वर्तमान ते आपले वैचारिक आदर्श यांच्या दरम्यान झडणाऱ्या संघर्षाला अक्षरबद्ध करणारा आहे. कवितेकडून कायम सौंदर्यपरंपरेची मागणी केली जाते, तिच्या अनुभवाच्या विशुद्ध असण्याची खात्री मागितली जाते; मात्र हा व्यवस्थेशी असलेला संघर्ष आणि त्यातून निर्माण होणारा आक्रोश हा परिवर्तनवादी कवितेच्या मर्मस्थानी येतो. त्याकारणानेही परिवर्तनवादी कवितेचे सौंदर्यशास्त्र स्वतंत्र आहे. अर्थात शरद पाटील यांनी याबाबत विस्ताराने चिकित्सा केली आहे. संघर्ष आणि व्यवस्थाबदलाची भाषा, वैचारिक आदर्शांसाठी आंदोलन हे या कवितेचे मानदंड आहेत. गंगाधर अहिरे यांची ‘आम्ही लोक आणि हिंस्त्र कळपाच्याकविता ’ही निर्मिती या विचारव्युहातून जन्मली आहे.
त्या त्या काळातील कवितेला आपापले संघर्ष असतात हे खरेच आहे. व्यवस्थेविरुद्ध विद्रोह करणे हे आंबेडकरी चळवळीचे आद्यकर्तव्य राहिले आहे. शोषित, वंचित. पीडितांच्या न्याय हक्कासाठी झटणे हे चळवळीचे प्रथमापासूनचे संघर्ष आजही कायम आहेत. लोकांच्या रक्तात रुजलेली जातीयता आणि त्यातून आलेली भेदभाव नीति ही येथल्या व्यवस्थेची देण आहे. पूर्वी हा अन्याय, अत्याचार आणि पीडा होतीच पण आज हा संघर्ष अतिविकोपाला गेला आहे कारण संविधानविरोधी जमात सत्तेत राजरोस येऊन बसली आहे. ती वरकरणी संविधानाचा गुणगौरव करते पण त्याआडून मात्र चळवळीला नेस्तनाबूत करण्याची चाल खेळत आहे. आणि हळूहळू त्यात यशस्वी होत आहे, त्याबाबतचे पुरावे म्हणजे कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या आजकाल घडलेल्या घटना होत. एक ना अनेक. त्यांची जंत्री तरी कुठून कशी लावणार. भारताच्या सार्वभौमताबद्दल घाला घालणारे लोक एक विशिष्ट धर्म देशाच्या केंद्रस्थानी येऊन आपल्या राष्ट्राची घोषणा करत आहे. इकडे संविधान घोष करायचा तिकडे संविधान फाडून टाकायचे. संविधान सोडून मनुस्मृतीसारखा ग्रंथ पुढे आणून त्यातील अस्तंगत विचार देशाच्या माथी मारण्याचे रीतसर डाव खेळले जाऊ लागले आहेत. पोलीस आणि न्याययंत्रणा यांचेही अनेक निर्णय या विचारांची पाठराखण करणारे होत आहेत. अनेक गुंते त्यातून जन्माला येत आहेत.
गेल्या १४ ते २४ या कालखंडात झालेल्या दमनाचीकहाणी या कविता जणू आपल्याला सांगत आहेत. त्या इतक्या जोरकसपणे वर्तमान कवितेत कुणी सांगितल्याचे पाहण्यात उदाहरण नाही. त्यासाठी असावी लागणारी संवेदनशीलता आणि टोकाचा वैचारिक संघर्ष देण्याची त्यांची तयारी आहे. गंगाधर अहिरे यांचे शब्द अक्षरश: तुटून पडतात. अशावेळी ते शब्दही हल्लेखोर बनून आपल्या मेंदूचा ताबा घेतात. संतप्तता आणि लढाऊपणा दाखवत कवितांनी गगनभेदी घोषणा देणे सुरु केले आहे.या ‘आम्ही लोकांचा स्वर…
आम्ही लोक…
तुकोबाच्या वाणीतून विचारतो सवाल
तर मंबाजीचे भक्तगण उठवितीबवाल
नक्सली, देशद्रोही म्हणत धोपटतात भुई
जयचंदाचे वारसदार डिजिटलमीडियात नाचतात थुईथुई
राबतो ड्रेनेजच्या मॅनहोलमध्ये नि डोंगर दरीत
कधीदडपून, गुदमरुन मरतो कोयला खाणीत
जिथे रक्त आटते आणि असते मरण टपून
तिथेअसतो आम्हीच सर्वस्वाने दटून
उन्हातान्हात कोसळत्या पाऊस धारेत
माखतो-भिजतो-राबतो धूळमातीत
तरीही आमची किंमत शूद्र, चांडाळ, गलिच्छ म्हणून
ठरतोय उपरे काळ्या माउलीचे मूळ वंशज असून
आम्ही लोक…
असा उंच स्वरुपात लागलेला दिसतो. यातील संस्कृती संदर्भ वाचन अनार्य परंपरेच्या बाजूने कवी करतो आहे. तो झुंडशाही निर्माण करून इतरांच्या जगण्याला नख लावणाऱ्यांच्या परंपरेला तीव्र स्वरूपाचा नकार देतो. एका मोठ्या बिघाड झालेल्या व्यवस्थेत करावयाची दुरुस्ती त्याला आपल्या सुधारकी परंपरेत दिसते. नामदेव ढसाळ यांनी दिलेल्या शब्दलढ्याची बूज राखून आणखी पुढे जाऊन कवी आपल्या संस्कृती संघर्षाला उजागर करतो आहे.
सत्ता मुकुटाने श्वापदांच्या
गळी घातले विजयाचे सोनकडे
अधर्मी युद्धात रणशिंग वाजले मोकाट
मुक्त धर्म योद्धे सीमेवर पुन्हा जमले सुसाट..(पृ….)
अशा विपरीत काळात बिल्किस बानो या देशाची आता एक जखम बनून राहणार आहे. कारण दंगलखोर आणि बलात्कार करणारांना या व्यवस्थेने मोकळीक दिली आहे. या संग्रहातील ही अत्यंत महत्त्वाची आणि अस्वस्थ करणारी कविता आहे. याच रेषेत येणारी ‘रक्तात माखलेले हात’, ‘ आदिमायांनो..’ या कविता स्त्रियांच्या जीवांचा अस्वस्थ वर्तमान आपल्या समोर मांडतात. एकूणच अल्पसंख्याकापासून सुरु झालेले हिंस्त्र कळपांचे हल्ले महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचे आपल्या अनीतिचे वर्तुळ पूर्ण करतात. याची अस्वस्थकारक नोंद अहिरे करतात.
अहिरे हे चळवळीचे कवी आहेत आणि गीतातली प्रबोधकता त्यांच्या काही कवितांमधून डोकावते. बाबुराव बागुल, वामन दादा कर्डक यांच्या धर्तीवर शब्दरचना आणि कल्पना यांचा आदर्श समोर ठेवून अहिरे काही कविता आणि गीत सदृश रचना करत आहे. ‘ बंधो: जगणं निघू दे उजळून’, ‘अरे माणसा माणसा’, ‘जागवावी; जगवावी माणसं माणसांसाठी ’ या त्या काही कविता होत. जागवावी; जगवावी माणसं माणसांसाठी ’ या कवितेत चीड, संताप यांचा शब्दात प्रकटणारा कवीचा सूर चढा असून तो त्याच पद्धतीने लावला पाहिजे हे आशयाची गरज म्हणून लक्षात येते. तिने सर्व इतिहास आणि वर्तमान यातून मनुवादी व्यवस्थेने आपला भोवताल कसा दर काळात नासवला आहे याबद्दलची मांडणी केली आहे.
तुम्ही निधर्मी राष्ट्राचं स्वप्न उरात जपलंय
नि त्यांनी उभारलाय संगणकीय अफवालय
मध्ययुगीन कैफातून ते प्ले करतात काचेरी श्रद्धेला
अहिरेंचे कार्यकर्ता असणे या कवितांमधून प्रकर्षाने जाणवते. प्रसंग आणि त्यातील बारीक तपशील, लोकमानसाचे आवाज असे त्यात सर्व एकत्रित मिसळले जाताना दिसतात. खचाखच भरलेला तपशील आणि त्यातील नेमकी तत्त्वच्युती यांचा शोध अहिरे खुबीने घेतात. रक्ताळलेले वर्तमान हातात यावे आणि त्यातून मन हताश होण्याची अस्वस्थ भावनाही या कविता देतात. आईवरील तिन्ही कविता उत्तम असून ‘मोर्चेवाली माय’, ‘आई…’, ‘ चळवळीतल्या आईसाठी’ या कविता मुळातून वाचायला हव्या अशा आहेत.
‘इतिहासावर धूळ साचलेल्या काही नोंदी’ सारखी उत्तम कविता बहुजनांच्या लढ्याचा इतिहास ते वर्तमान सर्व संदर्भानिशी समोर आणते. माणसाच्या भटकंतीची आणि त्याच्या सर्व वणवणीची कहाणी सांगत ती जगात घडलेल्या आदिम ते स्थानिक उच्छेदाची नोंद ती करते. एका बाजूला मानववंशशास्त्र तर एकीकडे विकसित होत गेलेल्या बुद्धाच्या सभ्यतेची नोंद घेत ही कविता पूर्णत्वाला जाते. ‘मीही शरपंजरी सिद्धार्थ’ ही कविता याचे उत्तम उदाहरण होय. एकूणच संग्रहातील कविता आपापली उंची वाढवत अखेर बुद्धाच्या वाटेवर शरणागत म्हणून विसावते. ही कविता आशयकेन्द्री असल्याने तिच्यातील भाषासौंदर्य, कल्पना, चमत्कृती, तिच्यातील प्रतिमा, प्रतीके, रूपके, मिथके यांची वेगळ्या अर्थाने जंत्री शोधणे आवश्यक असल्याचे ही कविता सांगते.
Show Less