उत्सुकतेने मी झोपलो
By श्याम मनोहर
कौटुंबिक सामाजिक आशयातून विचार प्रणालीवर प्रश्नचिन्ह उभी करणारी कादंबरी एकूण तीन कथानके तिन्हीतून स्वतंत्र स्थळ काळाची मांडणी |
Book Review in 500 to 1000 Words | उत्सुकतेने मी झोपलो (२००६)
लेखक : श्याम मनोहर पॉप्युलर प्रकाशन मराठी कादंबरी
२००८ सालचा साहित्य अकादमी प्राप्त कादंबरीकार श्याम मनोहर यांच्या उत्सुकतेने मी झोपलो या कादंबरीत एकूण तीन प्रकरणे येतात. कुटुंब आणि चांदणे कुटुंब आणि फुलपाखरू आणि कुटुंब आणि पाऊस या तिन्ही वेगवेगळ्या विषयांतून कुटुंब हा एकच समान आशय श्याम मनोहर मांडत राहतात. श्याम मनोहरांच्या इतर कादंबऱ्यातून फिरत राहणारे मूलभूत प्रश्न जे की – समाजव्यवस्था सभ्यता संस्कृती वाचनसंस्कृती ज्ञाननिर्मिती आत्मशोध आध्यात्म इत्यादी या कादंबरीतून देखील मांडले गेले आहेत. ही या कादंबरीची ढोबळ ओळख म्हणता येईल. कादंबरीत सुरुवातीचं प्रकरण कुटुंब आणि चांदणे यात मूळ किंवा दुय्यम पात्रे असा भेदभाव नाही. मनोहर यांच्या कोणत्याच लिखाणात हा भेद नसतो. पुण्यात एमए करायला निघालेल्या माधुरीचं एमए चौथ्या पानापर्यंत आटोपत म्हणजे पुन्हा काळाला छेद. मनोहर यांच्या कादंबरीला स्वतंत्र असा आपला एक वेग असतो ती कादंबरी ठरवून वेगाने किंवा ठरवून सावकाश वाचता येत नाही. वळणावळणावर विचार प्रवणतेत बुडालेली माधुरी जागतिक सिनेमा काढण्याच्या स्वप्नात असताना तिचं लग्न एकत्रित कुटुंबात होतं. तिथून शोध सुरू होतो कुटुंबात विचारांना एकांताला आणि वैयक्तिक माणसाला असलेल्या स्थानाचा. सासरे प्रोड्यूसर असल्याने माधुरीचा सिनेमा क्षेत्रातला खडतर प्रवास संपला असं सर्वांना वाटतं मात्र माधुरीला गवसतं वेगळंच. आईने वडिलाने नवऱ्याने बायकोने काकाने काकूने जावयाने सुनेने इतकंच काय तर शेजाऱ्यांनीही कसं वागावे याचे ठोकताळे मराठी समाजात रूढीबद्ध झालेले आहेत. ती रूढी फोडण्याचा प्रयत्न करणारी माधुरी जी लग्नानंतर सुमाधुरी होते आणि तिला या रूढीमध्ये रुजवू पाहणारा सुबोध या दोघांच्या घालमेलीत त्यांच्या बाळाचा जन्म होतो – सुब्बू. त्यानंतर कुटुंबात विचारच होत नाही आणि कुटुंबात माणूसच समजत नाही या दोन साक्षात्कारांना सुमाधुरी सामोरं जाते आणि प्रकरण आटोपतं. पुरोगामी परिवाराची आखणी करणारे माधुरीचे आई वडील, भाऊ ही पात्रेही गंमत आणतात. धागे गुंतत जाण्याऐवजी धागे सुटत निघाल्याची अनुभूती मनोहरांच्या कादंबऱ्या देऊ शकतात. कुटुंब आणि फुलपाखरू या प्रकरणात हेच घडत जातं. पात्रांचा सोस असला तरी जसजशी त्यांची विचारप्रक्रिया कळत जाते तसतशी ती पात्रे सुटीसुटी होत जातात. आईच्या अफेअरमुळे पछाडलेला हर्षद विज्ञानात नवनिर्मितीकडे झुकलेला विलास आणि मोठं कुटुंब सांधण्याच्या प्रयत्नात असलेली विलासची चुलत बहीण वनिता ही यातली मूळपात्रे. ज्याप्रमाणे आईचं अफेअर कुटुंब व्यवस्थेत कसं बसवायचं हे हर्षदला कळत नाही त्याचप्रमाणे वैज्ञानिक ज्ञान कुटुंबात कसं जमवायचं हे विलासला आकळत नाही. या दोघांच्या शोधात फसलेली आणि एकत्रित कुटुंबासाठी धडपडणारी वनिता राजकारणाची पाळेमुळे शोधण्यात अडकलेली. छंद म्हणून फुलपाखरांवर शोधनिबंध लिहिणारा विलास त्याचं पडेल वाटत राहणं, हर्षदचा लैंगिक कल्पनाविलास आणि त्याचं व्यसनाधीन होत जाणं वनिताचं द्वेषाने भरत जाणं सोबतच राजकारणी मानसिकतेत शिरणं तर यात आहेच. यासोबत सामाजिक, राजकीय, वैज्ञानिक तरीही अंधश्रद्धाळू भक्तगणांवर कसून डार्क ह्युमरचा वर्षाव या प्रकरणात मनोहरांनी केलेला आहे. कुटुंबव्यवस्थेत ज्ञानाला जागा नाही या ठोकताळ्यापर्यंत आलेला विलास आणि संशोधन करणाऱ्यांसोबत आपण कसे वागायला हवे या प्रश्नापर्यंत आलेली वनिता हा या प्रकरणाच्या शेवटाकडे नेतात. यात पुन्हा हर्षदचं काय आणि चुलत भावा–बहिणीचा स्नेह (कि प्रे) कुटुंब व्यवस्थेत कितपत बसू शकतं हा प्रश्न मनोहर वाचकावर लादतात. मराठी सुखी कौटुंबिक अवकाशात तरुण, निरोगी आर्थिकदृष्ट्या सबल आणि तरुण कुटुंबालाच जागा आहे. बरोबर याच्या उलट ब्रॉंकायटिसचा त्रास असणारा सदुसष्ट वर्षांचा विधुर म्हातारा कुटुंब संरचनेत कुठे बसतो याचा शोध तो घेत राहतो हे प्रकरण क्रमांक तीन – कुटुंब आणि पाऊस. अंतिम सूर गवसावा तसे मनोहर पानापानावर वाचकाला घायाळ करत पुढे सरकतात. एका पावसाळ्यात सदुसष्ट वर्षांचा विधुर म्हातारा त्याच्या मुलीच्या आत्याबहिणीच्या सैपाकीणबाईंच्या आणि आतापर्यंतच्या वैयक्तिक अनुभवांवर समाजाचा कुटुंबाचा समाजातील भंपकतेचाआध्यात्मिक संकल्पनांचा लैंगिकतेचा रॅशनॅलीटीचा परिणामी एकूण जीवनाचा शोध घेत जातो. मानवी मनाचा तळ खोदण्याच्या त्याच्या या अथांग व्यापात हा सदुसष्ट वर्षांचा विधुर म्हातारा अंती उत्सुकतेने मी झोपलो असे म्हणून झोपतो तेव्हा खरी कादंबरी घडत जाते ती वाचकांच्या मनात विचारात.
मी केवळ एक कादंबरी वारंवार लिहित आलोय असं मनोहर म्हणतात. ते स्वत:ला कादंबरीकार न म्हणता कथात्म साहित्य (फिक्शन) लेखक म्हणतात. त्यांचे काही मूलभूत प्रश्न वारंवार येत असले तरी मूळचे भौतिकशास्त्राचे प्राध्यापक असणारे मनोहर या प्रश्नांना अशा कलेने वाचकापर्यंत पोहोचवतात की वाचक स्तिमित. कथात्म साहित्य लिहिणारे मनोहर अवजड वाटो अथवा अनाकलनीय मनोरंजनाचा रूळ सोडून प्रत्येक वाचकाने वाचायला हवेत. खिळवून ठेवणारे, लेखनाचे नवे ताळतंत्र आणणारे जागतिक दर्जाचे साहित्य मराठीत कसं भासेल हे अनुभवायचं असेल तर श्याम मनोहर वाचणे आलेच. हे अनुवादित केले जाऊ शकत नाही याचं मूळ कारण मनोहरांची वैयक्तिक भाषानिर्मिती. कोणत्याच गटाशी स्वतःला बांधून घेणारा – त्यामुळे लिहिताना सर्वांवर समान बरसणारा हा माणूस वाचकाच्या जीवनाचा भाग होईल तेव्हा त्याचं दैनंदिन जगणं त्याला वेगवेगळे प्रश्न उत्त्पन्न करून देईल. माझ्यासोबत हे घडलं परिणामी श्याम मनोहरांची ओळख आपल्याला व्हावी म्हणून मी ही समीक्षा लिहिली. वाचलीत. धन्यवाद.
|