चंद्रकांत महामिने हे महाराष्ट्रातील विनोदी लेखक, कथाकार, कादंबरीकार, बालसाहित्यिक नाटककार, कवी
Read More
चंद्रकांत महामिने हे महाराष्ट्रातील विनोदी लेखक, कथाकार, कादंबरीकार, बालसाहित्यिक नाटककार, कवी म्हणून प्रसिद्ध आहेत. कोंडवाडा ही कादंबरी चंद्रकांत महामिने यांनी लिहिलेली एक सामाजिक कादंबरी आहे. एका सुप्रसिद्ध, प्रतिभासंपन्न, चिंतनशील लेखकाच्या लेखणीतून साकारलेली एक नितांत सुंदर कादंबरी म्हणजे ‘कोंढवाडा’. शिवपुरी सारख्या खेडेगावात सुरू झालेली या कादंबरीची कथा वाचताना पुस्तक खाली ठेवावेसे वाटत नाही. हे लेखकाचे यश आहे. ग्रामीण बाज असलेली,चटकदार भाषाशैली, सुंदर मांडणी, हुबेहू प्रसंग वर्णने यामुळे उत्कृष्ट साहित्य कृती साकारण्यात लेखक शंभर टक्के यशस्वी झाले आहेत. या कादंबरीने ग्रामीण समाज जीवनातील एक विदारक सत्य वाचकांसमोर उभे केले आहे. आणीबाणीच्या काळातील म्हणजेच 1975 च्या दरम्यान च्या कालखंडातील ग्रामीण आणि शहरी समाज जीवन कोंडवाडा या कादंबरीच्या माध्यमातून लेखकाने मांडले आहे. या काळात स्त्रियांची स्थिती कशी होती, त्यांचे समाजातील स्थान, त्यांच्यावर होणारे अन्याय- अत्याचार याविषयीचे सविस्तर चित्र या कादंबरीतून उभे केले आहे.
आपल्या समाजात अजूनही खऱ्या अर्थाने स्त्री मुक्त नाही. विशेषतः ग्रामीण भागातील स्त्रीला ज्या सामाजिक गुलामगिरीला सामोरे जावे लागते, ती अवस्था खूपच वाईट आहे. घराणेशाही आणि गुंडशाही या साऱ्यात तिची होणारी घुसमट आणि तरीही या सगळ्यांशी तिचा संघर्ष या कादंबरीच्या निमित्ताने चंद्रकांत महामिने यांनी अत्यंत गांभीर्याने अधोरेखित केला आहे.
या कादंबरीमधील स्त्रिया म्हणजे सीता, सुशीला, नीता, अरुंधती, शोभा ही होय. यातील प्रत्येक स्त्री वेगवेगळ्या भूमिकेतून वावरताना पाहायला मिळते. त्यांचा वेगवेगळ्या स्तरावर चालू असलेला संघर्ष यातून जाणवतो. सुशीला सारखी स्त्री जी वयाच्या वीस पंचवीस वर्षातच विधवा होते. तिची लहान मुलगी शारदा हिचे संगोपन करता करता उच्च शिक्षण घेते. यामध्ये तिला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. तिच्यावर संपत्तीसाठी सासरच्यांकडून होणारे अनैतिक आरोप, शिक्षणासाठी केलेली धडपड, पूर्ण होऊ न शकलेले प्रेम, नंतर केलेला पुनर्विवाह या सर्व संघर्षाचा या कादंबरीमध्ये समावेश आहे. त्याचबरोबर दुसरी म्हणजे सीता अनाथ असते ती जन्माला आल्यानंतर लगेचच तिला शिवेश्वराच्या मंदिरात बेवारस टाकून दिलेले असते. ते टाकण्यासाठी तिच्या आईची असह्यता आणि पुरुषीवासना जबाबदार असते. नंतरच्या काळात अनाथ असल्याने तिला भोगावे लागलेल्या यातना यातून दिसून येतात. यातील रायभान मोरे नावाचा तरुण हा कुणबी-मराठा घरात जन्मलेला असतो, परंतु त्यालाही पाटील, देशमुख घराण्यातील लोक खालच्या जातीतील समजत व जातीवरून हीन वागणूक दिली जात. रायभान सारखा तरुण उच्च शिक्षण घेऊन आपली व समाजाची परिस्थिती कशी बदलतो, हेही या कादंबरीच्या माध्यमातून लेखकाने मांडले आहे. कायद्याने स्त्रियांना पुनर्विवाहासाठी मान्यता दिली असली तरी समाज अजूनही विधवा पुनर्विवाहासाठी मान्यता देत नाही. या कादंबरीच्या माध्यमातून शरदराव, झांबरे वकील सुशीलाच्या पुनर्विवाहासाठी कशा पद्धतीने प्रयत्न करतात हे वाखाणण्याजोगे आहे. त्याचबरोबर मालोजीरावांचा म्हणजेच सुशीलाच्या वडिलांचा पुनर्विवाहसाठी असलेला विरोध याचेही दर्शन यातून घडते.
या कादंबरीच्या माध्यमातून स्त्रियांची असलेली सामाजिक परिस्थिती, जातीव्यवस्था, उच्चवर्गीयांमध्ये असलेला चंगळवाद, शिक्षण क्षेत्रात चालणारे गैरप्रकार, या सर्वांचा मागोवा घेण्यात आला आहे. थोडक्यात ‘कोंडवाडा’ ही ग्रामीण साहित्यातील एक अनमोल कादंबरी आहे. कादंबरीच्या पानापानावर लेखकाचे अचूक निरीक्षण, शब्दांवरील प्रभुत्व, लेखनशैली इत्यादीचा प्रत्यय येतो.
Show Less