Reviewed by: Shri. Latesh Nikam, Head, Dept of Chemistry (Affiliation: Annasaheb Magar Mahavidyalaya, Hadapsar, Pune 411028) मुद्रित शोधक ते लेखक ह्या प्रवासात बायकोची
Read More
Reviewed by: Shri. Latesh Nikam, Head, Dept of Chemistry (Affiliation: Annasaheb Magar Mahavidyalaya, Hadapsar, Pune 411028)
मुद्रित शोधक ते लेखक ह्या प्रवासात बायकोची मिळाले अप्रत्यक्ष भक्कम साथ, मुलाचं शिक्षण, नोकरी , प्रेमविवाह आणि स्वतःचे घर घेण्यासाठीचे प्रयत्न तसेच सुनेनं केलेला तिरस्कार , बायको मेल्यानंतर केलेला छळ आणि काळीज पिळवटून टाकणार अंत हा वाचकाला शेवटपर्यंत खिळवून ठेवतो. कथेमध्ये संवाद कमी आणि वर्णन जास्त आहे. ही कथा ललित साहित्याच्या अंगाने जाणारी आहे असं वाटतं. कथेची सुरवात लेखकाच्या साठी पासून होते . या वयात त्याला न्यायालयावर कादंबरी लिहायची ईच्छा होते. कारणही तसंच होतं न्यायालयाच्या आवाराशेजारी नवीन घर घेतलं होतं. न्यायालयाशेजारी कुणी घर घ्यायला तयार नव्हते म्हणून स्वस्त घर मिळाले.त्यामुळे न्यायालयाच्या कामकाजात विषयी, तिथे येणा-या माणसांविषयी उत्सुकता निर्माण झाली होती. दररोज येवढी माणसं का आणि कुठून येतात , दिवसभर काय करतात या विषयी लेखकाला कुतुहल निर्माण झाले होते. शहाण्यानी कोर्टाची पायरी चढू नये म्हणतात पण लेखकाने कादंबरी लिहिण्यासाठी कोर्टाची पायरी चढायचा निर्णय घेतला. या विषयावर कादंबरी लिहूण वेगळा इतिहास घडवायचा होता. कादंबरी विषयी विचार करता करता लेखक गतकाळातील म्हणजे विशीतल्या आठवणीत जातो. वयाच्या विशित त्याला मुद्रितशोधकाची नोकरी मिळाली पगार जेमतेम. मुद्रितशोधकाचं काम करता करता आणि लेखकांच्या चुका काढता काढता त्याचे व्याकरण आणि भाषा पक्की झाली होती. मुद्रित तपासून तपासुन मुद्रितशोधकाचा स्वभाव कसा हेकट आणि तिरसट होतो हे नमूद केलं आहे . शेलक्या शब्दात लेखकांची तावातावात लायकी काढायची सवय अधोरेखित केली आहे . मुद्रितं तपासताना लेखकाला उकळ्या फुटायच्या, तो शिव्या द्यायचा , अक्कल काढायचा. हे सांगताना राजन खान यांनी मराठी वाचक का दुरावत चालला आहे हे सांगून टाकले. परंतू लेखकाचा स्वभाव भिडस्त होता , पगार मागताना तो जोश गळून पडायचा.
मुद्रितं तपासताना अनेक विषय मनामध्ये यायचे आणि यातूनच आपणही लेखन करू शकतो याची जाणीव निर्माण झाली. पैश्यांसाठी लेखकाला मुद्रित शोधकाचे काम करावे लागायचे परंतू त्यात वेळ वाया जातो असे लेखकाला वाटते. नवनवे विषय सुचन्याची प्रक्रिया अखंडपणे चालू राहायची जुने विषय तसेच राहायचे . लेखक सुचलेले विषय आपल्या बायकोला ऐकवायचा. कसदार लेखन होण्यास मुद्रित शोधकाचे कामाबरोबरच , बायको आणि आयुष्यात भोगलेले अभाव ही कारणं आहे असे लेखकाला वाटते. विषय डोक्यात घोळवत ठेवण्या ऐवजी तो बायको समोर बडबडायचा. लेखक सुचलेला विषय बायकोला आवडेल का याचा सतत विचार करायचा. बायको सामान्य वाचकाची प्रतिनिधी आहे असं लेखकाला वाटायचं. सुंदर अक्षर आणि बिनचूक मजकूर संपादकाला नियतकालिकाची पान भरायला हवा असायचा , सुरवातीला तो फुकट मिळायचा त्यामुळे मागणी वाढली . वाचकांना पसंत पडायला लागल्यावर संपादक आवर्जून मागू लागले व पैसे मिळू लागले. असे करत करत चाळीशीयेईपर्यंत तो ब-यापैकी लेखक झाला होता. त्याला मान मिळू लागला साहित्य वर्तुळात कौतुक होऊ लागले. राजन खान यांनी जणू लेखक निर्माण होण्याची प्रक्रिया या कथेतून सांगितली आहे असे वाटते.
लेखकाच्या मते मराठी साहित्य म्हणजे काय ? तर ख-या , दमदार विषयांच्या कबरी मनात बाळगून वरपांगी विषयांच्या हातचलाख्या करत दिवस ढकलत राहणं म्हणजे मराठी साहित्य… पैशाच्या दृष्टचक्रात अडकलेल. भरपूर पैसे मिळवू , भरपूर प्रवास करू , भरपूर वाचू भरपूर संशोधन करू मग नीट लिहू अस म्हणत मराठी लेखक, लेखक होण्यासाठी आधी भरपूर वेळ नोक-या चाक-या , धंदे व्यवसायात घालवतो . त्यातून वेळ मिळेल तसा लिहीतो आणि तशी कथा वा कादंबरी निर्माण होते. लेखकाच्या मते मेंदुच्या डबक्यातला विषय कागदाच्या डबक्यात वाढला जातो अन् मग वाचकांच्या डबक्यात सोडला जातो. मराठी लेखन म्हणजे सगळा डबक्यांचा कारभार. मराठी साहित्याविषयीचे हे विचार सर्व लेखकांना आणि लेखनाला लागू होत नाही फारतर सुमार साहित्य विषयी लागू होऊ शकते.
लेखक म्हणून सिद्ध करायला लेखकाला साठी पार करावी लागली. नव घर घेतलं पण जबाबदा-या काही संपत नव्हत्या. दरम्यान मुलाचा प्रेम विवाह झाला. सुनेच्या आई वडीलांनी लेखकाचं मान आणि भविष्यात जास्त पैसा मिळेल आणि मुलीला सुख मिळेल असा विचार केला होता परंतू त्यांचा भ्रम निरास झाला.
राजन खान यांनी कथेत संदर्भ देताना संत नामदेवांचा उल्लेख करताना आक्षेपार्ह लिहीले आहे. जगायला पैसे लागतातच की हे विषद करताना त्यांनी म्हटलं आहे की , कुणी म्हणतात की नामदेव लुटालुट करायचा आणि वाटमा-या करायचा. तसेच व्यासांच्या बाबतीत पण आंधळा भिकारी , कुरुक्षेत्रावर १४ गाणी म्हणायचा असा आक्षेपार्ह उल्लेख का केला हे अनाकलनीय आहे. याला काही पुरावे आहेत का हे पहावे लागेल. संत नामदेवांवर आणि व्यासांवर असं लिखाण कुठेही आढळले नाही.
मधून मधून लेखकाच्या डोक्यात न्यायालयावर लिहायचा विषय यायचा पण लिहिणं झालं नाही आणि त्यासाठी कोर्टात जाणही झालं नाही. मुलाला परदेशी जाण्यापासून परावृत्त करताना लेखक म्हणतो की परदेशी भूमी आपली नसते कितीही कष्ट केले तरी आपण उपरेच ठरतो. इथल्या सामान्य माणसामध्ये आणि तिथल्या सामान्य माणसामध्ये काही फरक नाही . सगळीकडे जगणे सारखेच अडचणी व कष्टपण सारखेच. भटक्या कुत्र्यांमध्ये आणि आपल्या मध्ये काही फरक नाही , शेवटी आपली भूमी ती आपली भूमी. इथे आपणच मालक असतो आणि प्रत्येक गोष्टीत प्रथम नागरीक यात तथ्य असलं तरी हे विचार थोडे टोकाचे वाटतात. लेखकाच्या मते ज्ञान प्रगतही नसतं आणि मागासपण नसतं.
लेखकाला मुलगा कसा मोठा झाला ते कळलंच नाही . मुलाचं संगोपन आणि लागणा-या गोष्टी आईच पहायची . लेखकाला कधी वेळच मिळाला नाही. काळाच्या ओघात मुलगा मोठा झाला , ब-यापैकी नोकरी मिळाली , लग्न झालं , नातवंड झाली. बायको नातवंड सांभाळू लागली. घर लहान पडायला लागले . नवीन घराची गरज भासू लागली . कर्ज काढून न्यायालयासमोर नवीन घर घेतलं. कर्ज घेताना बिल्डरने मोठा लेखक म्हणून केलेला आग्रह आणि बॅंकेने व्याजात दिलेली सवलत पाहून लेखक सुखावला आणि मुलाला आपले वडील लेखक असल्याचा अभिमान वाटला. पण सुनेला कधीच आवडले नाही ती नेहमी तिरस्कार करायची . तिने एकदा लेखकाला विचारलं की, तुम्ही का लिहीताय? फायदा काय ? सासूच्या धाकामुळे ती तिरस्कार व्यक्त करू शकली नाही. नव्या घरात आल्यानंतर २० वर्ष लेखकाला न्यायालयात जायला जमले नाही. सगळा काळ पैशाच्या मागे धावत गेला . लेखक ७५ वर्षाचा असताना बायको निवर्तली. लेखक पुर्ण कोलमडून गेला. त्याला अनेक व्याध्या जडल्या. घराचं व्यवस्थापन बिघडलं , सुनेन ताबा घेतला आणि लेखकाचा छळ सुरु झाला. एक दिवस अचानक न्यायालयाच्या आवारामध्ये एका कोपर्यात लिंबा-याच्या झाडाखाली ग्लानी येऊन एक म्हातारा पडलेला आढळतो , त्याच्याकडं कोणाचाच लक्ष नव्हत. सगळे व्यवहार सुरळीतपणे चालू होते. तो म्हातारा म्हणजे लेखक. इथून पुन्हा लेखक गतकाळात जातो. साठीत गेल्यानंतर लेखकाचं लिहिणं कमी होत गेलं . मान सन्मान, चर्चासत्र, संमेलनं, भाषणं यामुळे वेळ कमी मिळत गेला. हे सर्वच लेखकांच्या बाबतीत कमी अधिक प्रमाणात होतं हे राजन खान यांना सांगायचं आहे. नव्या घरात लेखकाला स्वतंत्र खोली होती बायकोनं लिहीण्यासाठी मेज आणून दिला. परंतू काही फरक पडला नाही. मुलाने लिहीण्यासाठी संगणक घेतला पण लेखकाने वापरला नाही. घर बदलल तरी परिस्थितीत तीच राहिली. गरजा आणि कमाई याचं प्रमाण एक सारखंच राहिलं. राजन यांनी यानिमित्तानं मोठं तत्वज्ञान सांगितल आहे . ‘ परिस्थिती आणि गरजा याबतीत जगातील सर्व माणसं सारखीच. जगण्यासाठी कोण कुठली साधनं वापरतो त्यावर त्याची गरिबी श्रीमंती ठरते.’ राजन यांनी नोकरी आणि लेखकाच आयुष्य यातील फरक सांगितला आहे. नोकरी शाश्वत तर लेखकाच आयुष्य अनिश्चित. लेखक होण्याच शिक्षण कुठेच मिळत नाही. त्याने लिहीलेलं चालणार आहे की नाही किंवा गाजणारच असही सांगता येत नाही. कोण वाचणार, किती वाचणार , किती जणांना आवडणार सर्वच अनिश्चित. सर्वाच्या आवडी निवडी माहिती असणं अशक्य. लेखक अंदाज पंचे लिहीतो आणि प्रकाशक अंदाजपंचे छापतो . चाललं तर चालत नाही तर पडतं धंदेवाईक राजकारण न खेळता मोठं होणं खुप अवघड असतं . बरेच लेखक स्वतःला खपवण्यासाठी अनेक चाळे करतात, लेखन बाह्य उपद्व्याप करतात . हे राजन यांनी या माध्यमातून व्यक्त केलं आहे. संताच्या बाबतीत आणखीन एक आक्षेपार्ह उल्लेख याठिकाणी आला आहे. संत नामदेवांच्या काळात दोनशे ते अडीचशे संत कवी महाराष्ट्रात होते. त्या सर्वांना मोठं होता आलं नाही. इथे नमूद करावेसे वाटतं की संतानी प्रसिध्दी किंवा मोठं होण्यासाठी अभंग रचना केल्या नाहीतर ईश्वर भक्ती मध्ये तल्लीन होऊन रचना केल्या . राजन यांनी हे उल्लेख टाळले असते तर बरे झाले असते.
सत्तरीत लिखाण जरी कमी झाल असलं तरी , न्यायालयावर लिहायची इच्छा कधीतरी डोक वर काढायची , बायकोला सांगायचे , माझी न्यायालयावरच्या कादंबरीची कागद वर काढून ठेव.बायको ती मेजावर व्यवस्थित दिसेल अस काढून ठेवायची पण त्याला लिहायला जमलंच नाही. सत्तरी झाली तरी लेखक खर्चाच्या आणि पैशाच्या व्यापात अडकलेला . लेखकाची पुर्वी पासूनची सवय आलेला प्रत्येक पैसा बायकोकडे द्यायचा नंतर कधीही विचारायचा नाही काय केलस ते. बायकोने सगळा समतोल उत्तम साधला , घर उत्तम सांभाळलं . नव्या घरात बायको पंधरा वर्ष जिवंत होती . लेखकाची न्यायालयावर लिहायची इच्छा तशीच होती तो बायकोला नेहमी म्हणायचा , अशी भन्नाट कादंबरी लिहील की प्रत्येक माणूस दुसर्याला सांगेल ते महान कादंबरी लिहिणारे लेखक इथं राहतात. बायको श्रध्देणं ऐकत राहायची पण एक दिवस ती अचानक गेली आणि लेखकाचे वाईट दिवस सुरु झाले . सुनेनं लेखकाविषयी असलेला तिरस्कार सासू गेल्यानंतर दाखवायला सुरुवात केली. वेळेवर जेवण नाही , औषध नाही नातवंडाबरोबर संपर्क तोडला . नातवडांना लेखकाला लिहिताना अडथळा नको या सबबीखाली दुर ठेवले आणि मराठी लेखन वाचनाची गोडी लागू नये म्हणून इंग्रजी माध्यमाच्या शाळेत टाकले. नातवाचे लग्न ठरल्या वर सुनेन आणि मुलाने लेखकाला घराबाहेर हाकलले.
बायको मेल्यानंतर लेखक सर्वार्थाने खंगत आणि संपत गेला , भक्कन एकटाच पडला. बायको आपल्या आयुष्यात कोण होती हे त्याला ती मेल्यानंतर कळाले.लेखकाला आपल्याला कुठल्याहीक्षणी मरण येईल असं वाटू लागलं. त्याच्या डोक्यात कायम मरणाचे विचार घोंघावत राहीले. त्यातून बायकोच्या मरणाचा विचार प्रत्येक क्षणी जागृत राहिला.लेखकाच्या लक्षात आलं की आपण बायकोचा आयुष्यभर विचारच केला नाही. तिच्या महानतेची जाणीव झाली. तिच्यावर आपण लिहीलं पाहिजे असं वाटलं. बायकोमुळेच आपण मोठे लेखक होऊ शकलो हे सत्य त्याला कळले. लेखकाचं आख्ख जगणं बायकोने सांभाळली. बायको ही फक्त शरीराचीच गरज म्हणून राहत नाही असत नाही तर ती मनाचीही गरज असते. पण जाणीव तुम्हा आम्हास प्रतेककास होतेच असं नाही. शेवटी लेखक न्यायालयावर लिहायचे म्हणून धडपडत रस्ता ओलांडून न्यायालयाच्या आवारात पोहचला आणि ग्लानी येऊन लिंबा-याच्या झाडाखाली निपचित पडला. न्यायालयाच्या आवारात नेहमीप्रमाणे वर्दळ चालू होती . कोणाचेही लक्ष निपचित पडलेल्या लेखाकडे गेली नाही की ओळखले नाही. त्यातच त्याचा अंत झाला. न्यायालयावर महान कादंबरी लिहायची आस बाळगणा-या लेखकांचा अंत न्यायालयाच्या आवारातच व्हावा हे मन पिळवटून टाकते आणि चटका लावून जाते.
सारांश
राजन खान यांचे ‘एक लेखक खर्च झाला ‘ हे कथास्वरुप पुस्तक काही आक्षेपार्ह संदर्भ सोडल्यास आणि मराठी साहित्याविषयीचे मत सोडल्यास अतिशय सुरेख आहे . कथेची मांडणी वेगळ्या पध्दतीने केली आहे. या पुस्तकाला प्रस्तावना नसल्यामुळे राजन खान यांनी हा विषय निवडण्याचा हेतू कळत नाही. या पुस्तकाची फक्त एकच आवृत्ती निघाली असे वाटते याचा अर्थ हे पुस्तक वाचकांना जास्त भावले नाही असे वाटते पण मला खुप आवडले. या कथेमधील व्यक्तिंना नावं दिलेली नाही हे पुस्तक वाचताना वाचकाला शेवटपर्यंत जाणवत नाही हे राजन यांचे लेखन कौशल्य आणि प्रतिभेचे द्योतक आहे. कमल हसनचा पुष्पक हा सिनेमा पहाताना पण असाच अनुभव येतो, शेवटपर्यंत जाणवत नाही की हा मुकपट आहे. वाचकाला असा अनुभुती देणं हे सिनेमापेक्षा अवघड आव्हान आहे यात शंका नाही. कथा फ्लॅशबॅक पध्दतीने पुढे जाते आणि शेवट पर्यंत लेखकाभोवती फिरत राहते. लेखकाच लिहीण्याविषयी तळमळ, धडपड आलेल्या अडचणी , बायकोची निरपेक्ष साथ आणि सुनेने केलेला छळ हे परिणामकारक पणे मानले आहे. लेखकाची न्यायालयावर आणि बायकोवर कादंबरी लिहायची इच्छा अपुर्ण राहते . लेखकाचा न्यायालयाच्या आवारात झालेला ह्रदयद्रावक अंत मनाला चटका लावून जाते .शेवटी इच्छापूर्ती न होताच लेखक खर्ची पडतो. अशी परिस्थिती इतरांच्या बाबतीत ही आल्याची अनेक उदाहरणं आहेत. या कथेच्या माध्यमातून राजन खान यांनी आपली अनेक मतं आणि जीवनाचे तत्वज्ञान मांडले आहे. एकंदरीत हे पुस्तक सुरेख आणि उत्तम आहे. पुस्तकाचे नाव अतिशय समर्पक आणि अर्थपुर्ण आहे. विचाराला चालना देणारे वेगळ्या धाटणीचे पुस्तक वाचल्याचे समाधान वाटते.
Show Less