कर्मयोगी जानकीबाई आपटे हा चरित्र ग्रंथ जानकीबाई यांचे चिरंजीव भा.प आपटे यांनी लिहिला आहे. या
Read More
कर्मयोगी जानकीबाई आपटे हा चरित्र ग्रंथ जानकीबाई यांचे चिरंजीव भा.प आपटे यांनी लिहिला आहे. या चरित्र ग्रंथात एकूण ९ प्रकरणांचा समावेश असून १११ पृष्ठ संख्या असलेला हा ग्रंथ आहे. प्रस्तुत ग्रंथाचे लेखक भा. प. आपटे यांनी कर्मयोगी जानकीबाई आपटे यांचा दुर्लक्षित इतिहास मांडून चरित्रनायिकेच्या कार्याला न्याय दिला आहे .त्यामुळे हा ग्रंथ ऐतिहासिक दस्तावेज ठरलेला आहे. या चरित्र ग्रंथामुळे आपणास जानकीबाई आपटे यांच्या समाजसुधारणेतील व स्वातंत्र्य चळवळीतील योगदानाचा परिचय होईल आणि महाराष्ट्रातील समाजसुधारणावादी व स्वातंत्र्य चळवळी खालच्या स्तरातून कशा उदयाला आल्या होत्या याचेही ज्ञान होईल. जानकीबाई आपटे यांची मोठी ओळख म्हणजे त्या गांधीवादी विचारसरणीच्या होत्या. गांधीवादी चळवळीमध्ये त्या सहभागी होत्या .स्वातंत्र्यलढ्यात त्यांनी प्रारंभीपासूनच महत्वाची भूमिका बजावली होती.
हा ग्रंथ समाजसुधारणावादी चळवळीमध्ये व स्वातंत्र्यलढ्यामध्ये मोलाचे कार्य करणाऱ्या जानकीबाई आपटे यांच्या चरित्राची आणि त्यांच्या कार्याची ओळख करून देणारा तर आहेच पण त्याचबरोबर जानकीबाई आपटे यांच्या सहवासात आलेल्या उपेक्षित ,वंचित व्यक्तीच्या कार्याची ओळख होण्यासाठी देखील या ग्रंथाची मदत होणार आहे.
“ प्रपंचातील जानकीबाई ” या पहिल्या प्रकरणात जानकीबाईंचे बालपण वर्णन केलेले आहे. देशभक्तीने भारावलेल्या वातावरणात जानकीबाईवर संस्कार झाले तसेच भरल्या संसारात राहून जानकीबाईनी प्रपंच व्यवस्थित केला. त्याचबरोबर सामाजिक कार्य याचा आढावा प्रस्तुत प्रकरणांमध्ये घेतलेला आहे
“ स्वातंत्र्यलढ्यातील योगदान ” या दुसऱ्या महत्त्वाच्या प्रकरणात लेखकाने जानकीबाई आपटे यांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाचा इतिहास उजेडात आणण्याचे कार्य केले आहे. लेखकाने स्वातंत्र्य लढ्यातील जानकीबाईंचे योगदान मांडत असताना देश प्रेमाने भारावलेल्या जानकीबाई यांचे महिला समितीची निर्मिती , भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या फैजपूर अधिवेशनातील कार्य , शहर काँग्रेसच्या कार्यकारणीतील कार्य , वैयक्तिक सत्याग्रहातील कार्य, त्यांना झालेला कारावास ,छोडो भारत चळवळीतील कार्य यांचा आढावा लेखकाने प्रस्तुत प्रकरणांमध्ये घेतलेला आहे तो अत्यंत महत्त्वाचा ठरतो .
सामाजिक कार्य या तिसऱ्या प्रकरणात हिंदसेविका संघाची स्थापना , विविध उपक्रम, माता बालक मंदिराची स्थापना , रुढीला धक्का देणाऱ्या कृती , विधवा विवाह , वेश्याची खणा-नारळाने ओटी भरणे , परंपरागत व्यवसायातील कला वस्तूंचे प्रदर्शन , प्रौढ स्त्रिया साक्षरता वर्ग , महिलांची पहिली सहकारी संस्था , कोळगाव दुष्काळ केंद्रात मदत कार्य अशा सामाजिक क्षेत्रातील सहभागाची चर्चा केलेली आहे.
ट्रेड युनियन चालवणारी महिला या चौथ्या प्रकरणात म्युनिसिपल कामगार संघाच्या अध्यक्ष , विडी कामगार संघटना , अन्नपूर्णा परिषद या संबंधित जानकीबाई यांच्या कार्याची चर्चा केलेली आहे.
“ हिंदू मुस्लिम ऐक्य ” या पाचव्या प्रकरणात कट्टर बुरखाधारी मुस्लिम महिलांशी थेट संपर्क ,गौरी हळदीकुंकू कार्यक्रमात मुस्लिम स्त्रियांचे संवाद व गाणी अशा कार्यक्रमांचे चर्चासत्र यांचे या प्रकरणात वर्णन केलेली आहे.
“ अस्पृश्योद्धार ” या सहाव्या प्रकरणात स्पृश्य , अस्पृश्य संघटना चांभार मुलींचे घरात संगोपन , बार्शीला दलित वस्तीत सभा या जानकीबाईंच्या कार्याचा आढावा या प्रकरणात घेतलेला आहे
“ बालिकाश्रम : एक लोकोत्तर कार्य ’’ या सातव्या प्रकरणात बालिकाश्रम स्थापना , ट्रस्टची स्थापना , समर्पित भावनेचा उदात्त अविष्कार , बालिकाश्रम आगळे वेगळे संस्कार केंद्र , समतेच्या पातळीवर सांघिक जीवन , हरिजन मुलीसह मंदिर प्रवेश , निवासी शाळेची संकल्पना , प्राथमिक शाळेची सुरुवात , निधीसाठी भ्रमंती या जानकीबाईंच्या कार्याची चर्चा या प्रकरणात केलेली आहे.
“अष्टपैलू व्यक्तिमत्व’’ या आठव्या प्रकरणात नियोजन , कार्यनिष्ठा , संघटन , कौशल्य , कल्पकता , कृतीशीलता , जिव्हाळा , प्रयत्नांची पराकष्टा , स्वयंप्रेरणा , व्यवहारचातुर्य , जाती धर्मनिरपेक्षता या जानकीबाईंच्या गुणकौशल्याचा आढावा या प्रकरणांमध्ये घेतलेला आहे .
“ अखेरचा प्रवास’’ या नवव्या प्रकरणात जानकीबाईंचे आजारपण , प्रिय व्यक्तींच्या मृत्यूचे आघात , जानकीबाईंचा मृत्यू , अंतदर्शनासाठी स्त्री-पुरुषांचा अखंड ओघ , सार्वत्रिक दुखवटा या जानकीबाईंच्या शेवटच्या काळाच्या प्रवासाची चर्चा या प्रकरणात केलेली आहे
ग्रंथाच्या अखेरीस परिशिष्टात जीवन पटाची नोंद केलेली आहे प्रथम आवृत्ती नंतर वाचकांच्या प्रतिक्रिया या द्वितीय आवृत्तीच्या ग्रंथात दिलेल्या आहेत तसेच जानकीबाईच्या संदर्भात अनेक छायाचित्र या ग्रंथात दिलेली आहेत
• ग्रंथाच्या जमेच्या बाजू :-
१) प्रस्तुत ग्रंथ हा लेखकाने साध्या , सरळ व सोप्या भाषेत मांडला आहे.
२) या ग्रंथात वंचितांचा, शोषितांचा इतिहास प्रभावीपणे लेखकाने मांडलेला आहे.
३) प्रस्तुत ग्रंथातील चरित्रनायिकेच्या कार्याची नोंद घेताना लेखकाने समकालीन घटना घडामोडी व व्यक्तिरेखांची मांडणी करून छोटे खाणी पुस्तकाच्या माध्यमातून दुर्लक्षित इतिहास समाजासमोर मांडलेला आहे
४) जानकीबाई आपटे यांचे व्यक्तिमत्व अष्टपैलू होते हे या ग्रंथरूपाने आदर्श व्यक्तिमत्व नव्या पिढीसमोर मांडण्यात लेखक यशस्वी ठरले आहेत
५) भारतीय सुधारणावादी चळवळ , स्वातंत्र्य चळवळ खालच्या स्तरातून कशी विकसित होत गेली याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा ग्रंथ होय.
• ग्रंथाच्या मर्यादा :-
प्रस्तुत ग्रंथ लेखकाने बालिकाश्रमातील जुने रेकॉर्ड , त्या काळातील वर्तमानपत्रे , नगरची साप्ताहिके , दैनिक हे संघशक्ती व बालिकाश्रमाच्या स्मृती विशेषांक यातील लेख व आठवणी , नातेवाईकांचे अभिप्राय , लेखकांच्या स्वतःच्या आई विषयीच्या आठवणी या सर्व माहितीच्या आधारे लिहिलेला आहे असे मनोगतात संगीतलेले आहे मात्र त्याची संदर्भसूची दिलेली नाही. विषय ऐतिहासिक असल्यामुळे संदर्भ साधने अधिक महत्त्वाची ठरतात त्या संदर्भ साधनांची संदर्भसूची देणे अपेक्षित होते .
• ग्रंथाचे ऐतिहासिक मूल्यमापन :-
प्रस्तुत ग्रंथाची ही द्वितीय आवृत्ती आहे. प्रथम आवृत्ती 23 ऑगस्ट 1997 ला प्रकाशित झाली होती. प्रथम आवृत्तीनंतर ग्रंथाबद्दल आलेले अनेक व्यक्तींचे अभिप्राय द्वितीय आवृत्तीतून 22 नोव्हेंबर 2023 रोजी प्रकाशित केलेले आहेत . ग्रंथाबद्दल आलेले ते सर्वच अभिप्राय सकारात्मक आहेत. ग्रंथाला यदुनाथ थत्ते यांनी प्रस्तावना दिली असून प्रस्तावनेत ते म्हणतात “1936 ते 1946 या दशकात जानकीबाईंचे चतुरस्त्र कार्य ऐन भरात होते ’’ लेखकाने जानकीबाईच्या आयुष्यातील विविध घटना आणि आठवणी यांची गुंफण करून त्याचे मनोज्ञ दर्शन वाचकांना घडवलेले आहे . जानकीबाईंच्या जीवनातील प्रसंगांची रेखाटने व छायाचित्रे यामुळे पुस्तक चित्ताकर्षक झाले आहे. प्रस्तुत ग्रंथात कर्मयोगीनी जानकीबाईच्या म्हणजे आपल्या आईच्या अज्ञात राहून गेलेल्या कार्यास प्रसिद्धी देण्याचे मोलाचे कार्य लेखकाने केलेले आहे.
प्रस्तुत ग्रंथ हा चरित्रनायिकेच्या चिरंजीवाने लिहिलेला असल्याने ग्रंथातील माहिती , नोंदी , विधाने, मजकूर यावर कोणताही आक्षेप नाही. बालिकाश्रमातील जुने रेकॉर्ड , त्या काळातील वर्तमानपत्रे , नगरची साप्ताहिके, दैनिक शंख शक्ती व बालिकाश्रमाचे स्मृती विशेषण यातील लेख व आठवणी नातेवाईकांचे अभिप्राय आणि स्वतः लेखकाने आपल्या आईच्या आठवणी यावर आधारित लिहिलेला हा ग्रंथ आहे थोडक्यात ऐतिहासिक चरित्र ग्रंथ लिहिताना सर्व गोष्टींची खूप बारकाईने दक्षता घ्यावी लागते . त्यामुळे प्राथमिक साधनांचा आधार अत्यंत महत्त्वाचा ठरतो . ऐतिहासिक सत्य आणि स्वीकारलेले सत्य यातील वेचक वेधक चिकित्सा लेखकाच्या दृष्टीने महत्त्वाची ठरते. प्रस्तुत ग्रंथात काही उणीव असल्या तरी एका दुर्लक्षित नायिकेला प्रकाशात आणण्याचे केलेले काम हेच या ग्रंथाचे ऐतिहासिक मूल्य ठरते.
Show Less