पुस्तक परीक्षण : जाधव प्रतीक्षा मनोहर, लोकनेते व्यंकटराव हिरे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय,
Read More
पुस्तक परीक्षण : जाधव प्रतीक्षा मनोहर, लोकनेते व्यंकटराव हिरे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पंचवटी, नाशिक
कविता म्हणजे आपल्याला कमी शब्दात व्यक्त होण्याचं, लोकांपर्यंत भावना पोहचवण्याचं एक भावनाशील माध्यम आहे. प्रत्येकजण व्यक्त होत होतो फक्त प्रत्येकाचे माध्यम वेगवेगळे असतात. कविता ही कवीची स्वतंत्र निर्मिती असते. कवितेतून कवीच्या जीवनजाणीवा, भावना व अनुभव अभिव्यक्त होत असतात. कवीचे अनुभव व वाचकाचे अनुभव यामध्ये जीवन जाणिवांच्या पातळीवर वेगळेपण असू शकते. चांगली कविता ही वाचकाला अंतर्मुख करते. काव्यव्यापारात कवीइतकेच वाचकालाही तेवढेच महत्व असते. कवी प्रशांत केंदळे यांच्या कवितेचा विषय हा अतिशय साधा सोपा रोजच्याच जीवनाचा भाग आहे म्हणून त्यांची कविता वाचकाच्या अंतर्मनाला भिडत.
‘गुलमोहराचं कुकू’ या अनोख्या शीर्षकवरून आपल्याला या कवितासंग्रहातील कवितांबद्दल कुतूहल निर्माण होते. ‘गुलमोहराचं कुकू’ ही कल्पना अतिशय वेगळी भासते कारण गुलमोहराचे झाड तसे रखरखीत उन्हात न खचता न डगमगता बहरत असते. लाल, हिरव्या रंगानी बहरलेला गुलमोहर पाहणाऱ्यांना जणू निसर्गाची महतीच सांगतो आहे. आजच्या धावपळीच्या जगात कवी प्रशांत केंदळे यांनी त्यांच्या कवितेतून रुक्ष होत चाललेल्या वातावरणात आपल्या कवितेने नवचैतन्य आणले आहे. त्यांच्या या कवितासंग्रहातील अतिशय बोलक्या आणि अर्थपूर्ण आहेत. हा कवितासंग्रह एकूण चार विभागात विभागला आहे. प्रत्येक विभागाचे मथळे ही खूप समर्पक व आतील कवितेला साजेसे आहेत. माझ्या कवितेचा मळा, वृक्षलळा, काळीज कळा, ऊन झळा -पाऊस कळा अशी ही शीर्षके आपल्याला कवी केंदळे यांच्या कवितेतील प्रयोगशील कवितेची सूक्ष्मशी जाणीव करून देतात. कविता नुसती कवितासंग्रहाच्या शीर्षकाच्या वा उपविभागांच्या अंगानेच प्रयोगशील भासते असे नाही तर त्या कवितेत असणारे सौंदर्य, विषय, वेगळा आशय आणि कवितेच एक ठसठसीत रूप वाचकाला भावते.
कविता माणसाला कशी बदलून टाकते. कवितेने माणूस कवितामय होतो व त्याला कवितेशिवाय काहीच दिसत नाही. ‘भिने देहात कविता’ या कवितेत कवी देहात कविता भिनल्यावर शरीराचा होणारा सगळा दाह कमी करतो व स्नेह वाढत जातो हे स्पष्ट करतो.
‘भिने कविता देहात
झाला कवितेचा देह
सारे शमविले दाह
आणि मिळविला स्नेह’ (पृष्ठ १७)
कवितेने मला काय दिले? या प्रश्नाचे परिपूर्ण उत्तर देणाऱ्या अर्थाची ही कविता शारीरिक व मानसिक स्थेर्य कशी निर्माण करते याचे ज्वलंत चित्रण कवी केंदळे यांच्या या कवितेतून योग्य प्रतिमा व प्रतीकांच्या साहाय्याने येते. मृत्यू सुद्धा ये कवितेमुळे एक आनंदाचा सोहळा होणार आहे याचे चित्रण या कवितेत येते.
‘विठू मातीत उगावा’ या कवितेतून कवीने शेतकऱ्याचे मनोगत व्यक्त केले आहे. माझ्या शेतात चांगलं पीक येऊ दे आणि माझ्या रानामध्ये गणगोत गोळा होऊ दे. फुलपाखरे, मुंग्या, जनावरे ही सगळीच या सृष्टीचा भाग आहेत. हे सर्व जर आपल्या शेतात येत असतील तर तो त्या शेताचा सोहळा आहे. आणि गणगोत या रानात गोळा होणे हा भाग्याचा सोहळा आहे. संत तुकारामांच्या अभंगात येणाऱ्या प्रतिमा कवीच्या नेणीवेतूनच येथे येतात असे लक्षात येते. साधुसंत येती घर तोची दिवाळी दसरा म्हणणारे तुकाराम तर इकडे कवी केंदळे म्हणतात की,
‘माझा तुकोबाचा मला
साऱ्या साऱ्यांचाच व्हावा
लुटालूट अशी होता
विठू मातीत उगावा’ (१८)
माती आणि पंढरपूरचा विठ्ठल याच्याशी साधर्म्य सांगणारी व मातीची सृजनशीलता, काळ्या आईचे वात्सल्य स्पष्ट करणारी व्याकुळता या कवितेत व्यक्त होते.
आजच्या काळात गाव लोकल कडून ग्लोबल कडे जातांना दिसते. अनेक बदल या गावात झाले पण कवीच्या मनात असणारे गावाबद्दलचे स्वप्न आपल्याला दिसते. गावाला असणारा रंग, मातीचा सुगंध, हिरव्या गार झाडांची रंगसंवेदना, गावातली जुनी घरे, मातीबरोबर नाती जपणारी माणसे गावात सुखाचे वारे वाहते व हे वारे सुखाचा दरवळ निर्माण करते. एकीने लोक राहतात व नेकीने संसार करतात. असे स्वप्नवत जाणवणारे गाव वा गावाबद्दलचे स्वप्न कवीला दिसते.
गावात सुखाच्या
वाऱ्याची वर्दळ
इथल्या मातीला
प्रेमाचा दरवळ (२१)
‘येता श्रावण महिना’ या कवितेमध्ये श्रावण महिन्यात येणारे सण -समारंभ, व्रत- वैकल्याचे वर्णन त्याबरोबरच श्रावणात येणारा उत्साह, निसर्गाचे रूप व तरारलेली पिके यांचे वास्तव चित्रण या कवितेत येते.
श्रावण सोमवार, नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, कृष्ण जन्माष्ठमी, बैल पोळा अशा अनेक विध सणाची व परंपराची माहिती कवी आपल्या कवितेत देतांनाच श्रावण महिन्याने डोळ्यांचेच नव्हे तर स्वप्नांचेही पांग फेडतो असे ठसविण्याचा प्रयत्न केला आहे.
तुकोबांचे जगणे मांडतांना भंडारा डोंगर व देहू या प्रांताचे स्थळ व काळाचे चित्रण कवी करतांना तुकारामांचे अभंग, इंद्रयानीचे पात्र, जगाच्या कळ्यांचे सूत्र व तुकोबांच्या प्रतिभेने प्राप्त केलेले अलौकिकत्व मांडण्याचा प्रयत्न करतात. अगदी सहज असे शब्द येत जातात व या कवितेत शब्द सौंदर्याने अपुन जणू मोहित होतो.
‘तुकोबाची वाणी
बोले इंद्रायणी
शब्दाकळे पाणी
अभंगाने’ (पृष्ठ २८)
वृक्षकळा या दुसऱ्या कवितेच्या विभागात कवी माणसाला निसर्गाकडून शिकवण देण्याचे महत्वपूर्ण काम करतो. ‘झाडाचे व्रत घेऊन शिकत जावं देणं
साऱ्या देहाला फुटावी हिरवी हिरवी पानं’(पृष्ठ ३२)
या कवितेतून कवी झाड जसे स्वतः ऊन,वारा, पाऊस झेलून आपले सर्वस्व सर्वांना बहाल करते. घेण्याची भूमिका इथे महत्वाची नाही तर देण्याची भूमिका महत्वाची आहे. देण्यासाठी माणसाला स्थितप्रज्ञ असणे गरजेचे आहे. असंख्य संकटात स्थितप्रज्ञ राहून मातीशी पर्यायाने निसर्गाशी इमान राखणारे झाड हे इतरांना नेहमी देत राहते. ही देण्याची भूमिका माणसानेसुद्धा आत्मसात करावी अशी कवीची एक भूमिका आपणास दिसते.
प्रशांत केंदळे हे निसर्गकवी असून कवितेत निसर्गाचे अनेक रूपे स्पष्ट करण्याच सामर्थ्य त्यांच्या कवितेने केले आहे. भावसौंदर्य, नादसौंदर्य यांनी ओतप्रोत भरलेली व भावगर्भ आणि गोष्टीरूप शैलीने प्रकट झालेली त्यांची कविता आपल्या मनाला एक प्रकारचा गोडवा देते. प्रखर कल्पकता तसेच कवितेतून निर्माण होणारी चित्रमयता तसेच सूक्ष्म निरीक्षण क्षमता व संवेदनशीलता ही त्यांच्या गुलमोहराचे कुंकू या कवितेतील अतिशय महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत.
मानवी नात्यांचा शोध घेण्याची क्षमता त्यांच्या या कवितेमध्ये आपल्याला दिसते. निसर्गाची जशी विविध रूपे कवितेमध्ये येतात तशीच माणसाची आजची प्रवृत्ती, तुटलेली नाती यांचा विचार करतानाही संवेदनशीलतेने कवी विचार करतो.
कवी हा कृषक संस्कृतीतील असल्यामुळे त्याची निसर्गाशी झाडाझुडपांशी जवळीकता आहे. पाऊस पडल्यावर निसर्ग बहरू लागतो तेव्हा आनंद होतोच पण दुष्काळातसुद्धा त्याला आनंद दिसायला लागतो आणि कवी आपणास भावणारा आनंद आपल्या कवितेतून मांडत जातो. कवी आपली जी भूमिका आहे ती भूमिका व्यक्त करण्याचं काम करत असतो. कविता लिहिली जाते तर त्याच्यामागे नुसता इतिहास नाही तर कवी जे वास्तव समाजात अनुभवलं आहे त्याचे शब्द कवीच्या काव्यातून येतात.
काळीजकळा नावाचा तिसरा विभाग कवीने लिहिलेला आपल्या काव्यसंग्रहात घेतला आहे. या विभागातून त्यांनी आपल्या काळजाची ओल असणाऱ्या नात्यांच्या कविता घेतल्या आहेत. माय, बाप, मुलगी, बाई, कृष्ण, सये असे अनेक नात्याचे बंध येतांना दिसतात. कारुण्यरसात बुडवणारी ही कविता आपल्याला एकवेळ अंतर्मुख व्हायला भाग पाडते. हीच खरी कवीच्या शब्दांची ताकद आहे.
माय अमृताचा घडा माय प्राजक्ताचा सडा
माय रोज शिकविते मला जीवनाचा धडा
लेकरांना भरविते माय उपाशी राहून
गर्द सावली टी होते जाळ उन्हाचा साहून
तरी सरीत प्रेमाच्या कशी काढते न्हाऊन?
कधी ओलावू न देई माझ्या डोळ्यांच्या या कडा (पृष्ठ ४५ )
अतिशय मार्मिकपणे या कवितांमधून शेतकरी व कष्टकरी आईचे चित्रण कवी करतात. आई आपल्या मुलावर किती प्रेम करते, किती खस्ता खाते याचे मूर्तिमंत उदाहरणे या कवितेतून कवीने दिली आहेत. या कष्टातही टी कशी प्रेम देते असा प्रश्न कवीला उभा राहतो. प्राचीन काळापासून आलेल्या सर्व महिलांची उदाहरणे देतांना कवी अस्तित्वाची लढाई कशी लढते हे पण स्पष्ट करतो.
आईवर अनेक महागीते लिहिली जातात पण काव्यातून उपेक्षित राहणाऱ्या बापाला कवी केंदळे यांनी न्याय दिला आहे बाप हा घराचा कणा आहे. कर्तव्याची माळ आहे. आईं चंद्र असेल तर बाप सूर्य आहे. आई मुलाशी गप्पा मारते मनातल्या गोष्ठी सांगते पण बाप मात्र बोलत नाही. तरी त्याचे दुख मुलाला काळात नाही असे नाही. बाप मुलाला शिक्षा करतो म्हणजे संस्कार देतो. तो आपला पाठीराखा असून त्याच्या अस्तित्वाचा दरारा तो कायम ठेवतो. बाप नसतांना काय? इथेही कवीला प्रश्नचिन्ह निर्माण होते. बाप घरात किती महत्वाचा आहे हे या कवितेतून कवी रेखाटतो.
मुली काय असतात हे बापलेकीची कहाणी, मुलीचा चेहरा, रूप लेकीचं पाहून व मुली या कवितांमधून कवी व्यक्त होतो. सगळ्या जगातील सुंदर नाते हे बापलेकीचे नाते असते. ते कसे बहरात जाते अन मुलीच्या लग्नानंतर बापाला कसे दुख होते हे या कवितेतून कवी मांडतो. एकूणच एकत्र कुटुंबपद्धती त्यात असणारे मुलीचे स्थान व मुलीची माया याचे प्रत्यंतर या कवितांमधून येते.
ऊन झळा पाऊस कळा या चौथ्या विभागातून कवीने एकूण १४ कविता लिहिल्या आहे या कवितांमधील विषय हे दुष्काळ, उन्ह, मल्हार, नभाळ्या, भुई, सूर्य, ढग, पाऊस व शीर्षक कविता गुलमोहराचं कुंकू अशा विषयावरच्या कविता आलेल्या आहेत. एकूण चारही भागात अतिशय उत्कृष्ठ कविता कवीने लिहिल्या असून या कवितांमधून अतिशय समर्थपणे आपली काव्यामागील भूमिकाही जाणवते. एकूणच कवी प्रशांत केंदळे यांनी लिहिलेली कविता ही प्रामुख्याने निसर्ग, दुष्काळ, मानवी नाती, माणसांचे नात्यातील द्वंद्व या घटकांच्या आधारे कविता फुलात जाते. माणसाचे जीवन हे गुंतागुंतीचे आहे पण त्याची जर चांगली उकल अनुभवाच्या माध्यमातून झाली तर कवितेत त्याचे प्रतिबिंब दिसते असेच प्रतिबिंब या कवितासंग्रहातून आलेले आहे.
आजचे युग हे लोकल राहिले नाही तर ते ग्लोबल झाले आहे. हा बदल आपण धीराने स्वीकारला पाहिजे त्याचे अवडंबर न माजवता अतिशय शांतपणे आपल्या कवितेतून कवी प्रशांत केंदळे यांनी मांडण्याचा प्रयत्न आहे. तक्रार नाही खंत नाही पुर्तीसाठीच प्रवास असतो या कुसुमाग्रजांच्या कवितेप्रमाणेच हा कवी केंदळे यांचा कवितेचा प्रवास आहे. कवी केंदळे यांना निसर्ग व सामाजिक कवितेची एक आगळीवेगळी पायवाट सापडली आहे. त्यातून त्यांची कविता पुढे बहरणार आहे. त्यांची एक विशिष्ठ अशी शैली आहे त्या शैलीचा विकास होण्यासाठी त्यांनी आपले अनुभवक्षेत्र आहे तसे ठेवावे वा अजूनही वाढवावे. कारण पुढचा त्यांचा कवितेचा प्रवास हा त्यांच्या अनुभवावर अवलंबून आहे.
Show Less