पुस्तक परीक्षण - जाधव सुरेखा रामचंद्र , तीन वर्षीय विधी अभ्यासक्रमातील तिसरा वर्ग , भरती
Read More
पुस्तक परीक्षण – जाधव सुरेखा रामचंद्र , तीन वर्षीय विधी अभ्यासक्रमातील तिसरा वर्ग , भरती विद्यापीठाचे यशवंतराव चव्हाण विधी महाविद्यालय कराड
प्रा डॉ आ ह साळुंखे यांनी चार्वाक दर्शन या पुस्तकामध्ये सामाजिक बहिष्काराच्या शस्त्राला धारदार बनविण्यासाठी वैदिकांनी अनेक युक्त्या करून लोकांचा बुद्धिभेद केला.नास्तिक विचारांची लोकांना भीती वाटेल ,अशा प्रकारे सिद्धांत मांडले, पुराण कथा रचल्या.
चार्वाकानी ईश्वरासारखी अतिमानवी शक्ती मानलेलीच नाही. त्यामुळे वेदांचे अलोकिक्तव मान्य होणे शक्यच नाही. तेंव्हा वेद हे ईश्वरोक्त वा अपौरुषेय नसून मानवोक्त वा पौरुषेयच आहेत. म्हणजेच वेदनिर्माते ऋषी देखील कपिल,कणाद इ. ऋषींच्या मालिकेत येऊन बसतात.कपिल, कणाद वगैरेंची वचने ही जशी अनुमाने आहेत,तसेच वेदातील विचार ही देखील त्या त्या ऋषींची अनुमाने वा अनुभव आहेत.
ग्रंथ निर्मिती करणारा गट त्या ग्रंथामध्ये आपल्या सोयीचे व हिताचे नियमच लिहितो हा इतिहास आहे. उदाहरणार्थ पुरुषप्रधान व्यवस्थेमध्ये निर्माण झालेली सर्व धर्मशास्त्रे स्त्रियांच्या विरोधात पुरुषांचे हित जपतात असेच आढळते घोड्यांनी देवांची चित्रे काढली तर ती घोड्यांच्या स्वरूपात काढली असती असे म्हणतात ते सार्थच आहे विशिष्ट गट आपल्या सोयीचे ग्रंथ निर्माण करतो आणि त्याला पावित्र्य व मान्यता प्राप्त व्हावी म्हणून ते ईश्वरोक्त असल्याची जाहिरात करतो हे स्पष्ट आहे
वेदांमध्ये आलेले कर्मकांड व ज्ञानकांड म्हणजे मानवी जीवनाचे सर्वस्व असे मानता येणार नाही.
वास्तववादी चार्वाक यांनी कर्म सिद्धांतावर हल्ला केला याचा अर्थ त्यांनी अन्यायावर आधारलेल्या समाज व्यवस्थेला आव्हान दिले. पुनर्जन्माच्या कर्मावर विसंबून दैववादी बनण्याच्या प्रवृत्तीलाही त्यांनी विरोध केला वस्तूतः आपल्या कर्माची फळे आपल्याला भोगावयास मिळतात हा सिद्धांत स्वीकारणारे लोक प्रयत्नवादी व्हावयास हवे होते परंतु तो सिद्धांत वर्तमान जीवना पुरता मर्यादित न करता अनेक जन्मांचे जोडल्यामुळे हा सिद्धांत स्वीकारणारे लोक दैववादी बनले चार्वाक यांना मात्र हा दैववाद मान्य नव्हता .
पूर्वजन्म व पुनर्जन्म यांच्याशी संबंध जोडणारा अवास्तव कर्म सिद्धांत तेवढा त्यांनी नाकारला आहे दैववादी व योगायोग वादी लोक हे शठ म्हणजेच फसवणूक करणारे असतात. मनुष्य जेव्हा आपल्या कर्माच्या जोरावर एखादे फळ प्राप्त करतो तेव्हा ते प्रत्यक्ष डोळ्यांनी दिसत असते त्यालाच पौरुष,पुरुषार्थ असे म्हटले जाते
कर्म करूनही फळ मिळाले नाही तर माणसाने विवेक बाळगावा जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत सुखाने जगावे, यज्ञयागादींचे दुःख भोगू नये ,प्रसंगी कर्ज काढून तूप विकत घेतलेच तर ते प्यावे ,अग्नीत आहुती देऊन वाया घालवू नये, शरीराचे भस्म झाले तरी जिवात्म्याला अदृष्टामुळे फळ मिळेल असे समजू नये.
वैदिक अनुयायांनी पातीव्रत्याच्या संकल्पनेचा पुरुषप्रधान संस्कृतीचे हितसंबंध जपण्यासाठी व स्त्रियांचा कोंडमारा करण्यासाठी एक हत्यार म्हणून उपयोग केलेला आहे. या संकल्पनेचे पर्यवसान म्हणून सतीची चाल केशवपण यासारख्या अमानुष प्रथा अणल्या गेल्या पातीवृत्त्याच्या संकल्पनेचे कितीही उदात्तीकरण करण्यात आले तरी प्रत्यक्षात या संकल्पनेच्या मागे पुरुषप्रधान संस्कृतीमधील पुरुषांचे कुटील व क्रूर,असंस्कृत व अहंकारी आणि मत्सरी व ईर्षाखोर मन होते.उदात्त व पवित्र म्हटल्या जाणाऱ्या या तत्त्वाचे व्यवहारातील प्रत्यक्ष स्वरूप हे अमानुषच होते. सीतेसारख्या निरपराध स्त्रियांचे अवघे जीवन या संकल्पनेपायी उध्वस्त झाले आणि अशा स्त्रियांची भारतीय समाजामध्ये कधीच उणीव नव्हती.मानवी जीवनातील सर्व प्रकारची मधुर सुखे स्त्रीच्या हातून हिसकावून घेण्यासाठी या संकल्पनेचा दुरुपयोग करण्यात आला आहे.म्हणूनच मानवी जीवनाकडे केवळ पुरुषांच्या दृष्टिकोनातून न पाहता स्त्रियांच्या दृष्टिकोनातून पाहण्याचा भारतीय संस्कृतीच्या इतिहासातील एक स्पृहणीय प्रयत्न चार्वाक यांच्या वरील वाक्यातून व्यक्त होतो.
ऐतिहासिक व समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिले तर पातिव्रत्य हे काही त्रिकालाबाधित असे मानवी मूल्य नव्हे, पातिव्रत्य ही पुरुषप्रधान संस्कृतीची निर्मिती आहे हे एक शास्त्रीय सत्य आहे.
चार्वाक दर्शन ही एक वास्तववादी जीवनदृष्टी आहे. जीवन सम्यक रीतीने जगण्याची एक विज्ञाननिष्ठ पद्धत आहे.या दर्शनानुसार जीवन ही एक वस्तूस्थिती आहे स्वप्न वा भ्रम नव्हे.जीवनातील समस्या सोडवावयाच्या असतात, लपवावयाच्या नसतात या समस्या सोडविण्यासाठी प्रामाणिकपणाने त्यांना सामोरे जावयाचे असते. त्यांच्यापासून दूर पळावयाचे नसते.म्हणून जीवनाच्या विविध अंगांचा विचार करताना चार्वाक दर्शनाने खोटी प्रतिष्ठा दुटप्पीपणा इत्यादींना थारा न देता प्रत्येक वेळी वास्तववादी जीवनवादी भूमिका स्वीकारली आपण जगण्यासाठी जन्माला आलो आहोत,मरण्यासाठी नव्हे. मृत्यू हा अटळ असेल परंतु म्हणून काही तो जीवनाचा उद्देश ठरू शकत नाही.जगणे आणि आनंदाने जगणे हाच जीवनाचा उद्देश आहे .हा उद्देश सफल करण्यासाठी पारलौकिक वा कल्पित अशा अति मानवी शक्तींचा आश्रय घेण्याची गरज नाही.
हा आनंद स्वैराचाराने वा इतरांचे शोषण करून मिळवावा असे त्यांनी कधीही सांगितले नाही.समाज व्यवस्थेच्या निकोप नियमांचे पालन करावे,परंतु विशिष्ट नियमामुळे समाज व्यवस्थेत बिघाड वा अन्याय निर्माण होत आहे असे आढळल्यास ते नियम बदलावेत.तात्पर्य चार्वाक दर्शन हे पारलौकिक व आध्यात्मिक अशा कल्पित आनंदाला बाजूला सारून ऐहिक,पार्थिव व स्वकष्टार्जीत अशा वास्तव आनंदाचा पुरस्कार करणारे दर्शन आहे.
Show Less