जग बदलणारा बापमाणूस या पुस्तकाच्या मुखपृष्ठाच्या आतील बाजूस ज्येष्ठ विचारवंत आणि लेखक डॉ. आ.ह.
Read More
जग बदलणारा बापमाणूस या पुस्तकाच्या मुखपृष्ठाच्या आतील बाजूस ज्येष्ठ विचारवंत आणि लेखक डॉ. आ.ह. साळुंखे म्हणतात, ‘हे पुस्तक वाचून बाबासाहेबांविषयी अनेकांच्या मनात जे पूर्वग्रह असतात ते या पुस्तकाने दूर होतील. कुडाच्या छपरात आजीने थाटलेले बाबासाहेब ते जागतिक पदव्यांच्या आभूषणाने नटलेले बाबासाहेब दाखवलेले आहेत. प्रत्येक टप्प्यावर बाबासाहेबांना जी लढाई लढावी लागली ती लढाई त्यांनी कशी जिंकली, हे या पुस्तकात मांडलेले आहे’. जगदीशब्द फौंडेशनने प्रकशित केलेले हे पुस्तक डॉ बाबासाहेब आंबेडकरांची सावली होऊन त्यांचं विश्व सावरणाऱ्या त्यांच्या पत्नी त्यागमूर्ती रमाबाई यांना अर्पण केलेले आहे. आतापर्यंत या पुस्तकाच्या ३० आवृत्या प्रकाशित झालेल्या आहेत. जागतिक स्तरावर विक्रीचा विक्रम करणाऱ्या या पुस्तकाचे मूल्य फक्त ३५० रु. असून पृष्ठ संख्या २४४ आहे.
मागील संपूर्ण एक दशकात व्याख्यानाच्या माध्यमातून शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचा प्रचार व प्रसार करून चळवळ उभे करण्याचे काम जगदीश ओव्हाळ या अभ्यासाने केलेले आहे. एका सर्वसामान्य गवंडी काम व शेती करणाऱ्या कुटुंबात जन्मास आलेले जगदीश ओवाळ यांच्याकडे शिक्षण, लेखन व प्रबोधनाचा कोणताही परंपरागत वारसा नसताना एम. ए., डी. एड., डी. एस. एम. हे शिक्षण पूर्ण करून विद्यार्थी दशेपासूनच व्याख्यानाला आणि लेखनाला सुरुवात केलेली होती. जगदीश ओवाळ यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विचार आणि प्रचार करण्याच्या दृष्टीने केलेली भाषणे पुस्तकरूपाने वाचकांच्या समोर ठेवलेली आहेत.
नव्या पिढीला नव्या भाषेत मोटिव्हेशनल बाबासाहेब सांगायचे. जाती धर्माच्या पलीकडे प्रत्येक तरुणाला ‘मोटिव्हेशनल सिम्बॉल’ म्हणून बाबासाहेब समजले पाहिजेत आणि त्यातून त्यांना बाबासाहेबांचा लढा कशासाठी होता ? कसा होता ? याची उत्कंठा लागावी या उद्देशाने या पुस्तकाचे लेखन केलेले आहे. ‘साताऱ्यात वर्गाबाहेर बसून शिकणारा एक अस्पृश्य विद्यार्थी ते कोलंबिया विद्यापीठाच्या इतिहासातील सर्वोत्तम विद्यार्थी’ ही मांडणी विद्यार्थी आणि समाजासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे.‘उगवत्या सूर्याच्या देशात प्रज्ञासूर्य’ हे जपानमधील बाबासाहेबांच्या पुतळ्याचे वर्णन हृदयाला भिडणारे आहे. या देशात संविधान येण्याआधी इथल्या बहुजनांचं, अस्पृश्यांचं, स्त्रियांचं जग हे गुलामीचं जग होतं. त्यांचं जग समृद्ध करण्यासाठी आणि त्यांना स्वतःचे आकाश खुले करण्यासाठी त्यांचं जग बदलण्यासाठी उभे राहिलेले महामानव मुक्तीदाता म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर !
प्रत्येक शोषित, वंचित समूहाचं जग बदलण्याचं काम त्यांच्या जगाला आणि जगण्याला अस्तित्व निर्माण करून देण्याचं काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर या बापमाणसांने केलेला आहे. ज्या वयात बाबासाहेब कळतही नव्हते त्या वयामध्ये आपल्या दारात पिठाचा डबा ठेवून त्यावर कापड टाकून घरातील भिंतीवरचा बाबासाहेबांचा फोटो काढून भीमजयंती साजरी करणारे लेखकाचे आई-वडील यांनी लहान वयातच लेखकाला बाबासाहेब आंबेडकरांची ओळख करून दिली. त्यांच्या विचारांचं बाळकडू दिलं. यातूनच आज या पुस्तकाचा जन्म झाला आहे. वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी छोट्या भिवाने आपल्या आईला गमावलेले होते तोच भिवा जगातील सर्वात मोठ्या जनसमुदायाची काळजी घेणारा खंबीर बाप अन लेकरांसाठी उभं आयुष्य वाहणारा आई झाला. ज्या व्यवस्थेने ज्या विद्यार्थ्याला वर्गाच्या बाहेर बसवले त्याच विद्यार्थ्यांचा त्या शाळेतील पहिला दिवस आज सरकारला ‘विद्यार्थी दिन’ म्हणून साजरा करावा लागतो. हा प्रेरणादायी प्रवास लेखकाने इथे मांडलेला आहे. सातारच्या गव्हर्नमेंट हायस्कूल हायस्कूलच्या प्रांगणामध्ये भिवा रामजी आंबेडकर यांचं पडलेलं पहिलं पाऊल म्हणजे एका अस्पृश्यतेच्या, एका दैन्याच्या, एका मागासलेपणाच्या गर्तेतून एका नव्या शैक्षणिक क्रांतीच्या, एका नव्या स्वाभिमानाची पेरणी करणाऱ्या विश्वाच्या दारात टाकलेलं परिवर्तनाचे पाऊल होतं. हे परिवर्तन आजच्या तरुण पिढीला प्रेरणादायी ठरणारे आहे.
सध्या भारतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे फक्त सामाजिक आंदोलन करणारे, जाती धर्मासाठी लढणारे एवढेच चित्र निर्माण केले जाते. त्या सामाजिक आंदोलनाच्या अनुषंगानेच पण त्या पलीकडचे बाबासाहेब नव्या पिढीला नव्या भाषेत सांगण्याचं काम जगदीश ओवाळ यांनी केलेले आहे.
या पुस्तकाबद्दल बोलताना डॉ. भालचंद्र मुणगेकर म्हणतात, ‘ हे पुस्तक नव्या पिढीला, तरुणाईला लढण्याची, अभ्यासाची जिद्द निर्माण करेल. त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आपला नवा ‘मोटिव्हेशनल आयडॉल’ म्हणून सापडतील. हे पुस्तक वाचून वाचकांचे जग नक्कीच बदलेल व त्यांना बाबासाहेबांकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन प्राप्त होईल.’
‘या पुस्तकात न्याय देणारे बाबसाहेब ताकदीने मांडले आहेत.’- डॉ. बाबा आढाव.
‘पुरोगामी महराष्ट्राची प्रबोधनाची परंपरा पुढे नेण्याचं काम या पुस्तकाने केलेले आहे.’ – रवींद्र आंबेकर
‘जगभरातील बाबासाहेबांच्या ग्लोबल व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूंचा व विचारांचा वेध या पुस्तकाने घेतलेला आहे.’- अभिजीत कांबळे
‘आजच्या काळातील ज्या बापांना वाटते की, माझ्या पोराला नीट रस्त्यावर आणलं पाहिजे, त्या प्रत्येक बापाने आपल्या पोराला हे पुस्तक वाचायला लावावे.’- संजय आवटे.
‘आजच्या तरुणाला स्वबळावर झेप घेण्यासाठी जी प्रेरणा मिळायला हवी ती प्रेरणा हे पुस्तक वाचून मिळेल.’- प्रवीणदादा गायकवाड.
या मान्यवरांच्या पुस्तकाविषयीच्या दिलेल्या प्रतिक्रिया बघितल्यानंतर हे पुस्तक का वाचावे हे समजते.
पुस्तकाची मांडणी ‘मोटिव्हेशनल बाबासाहेब’ अशा रीतीने बाबासाहेब सध्याच्या पिढीसमोर उभे करण्यामध्ये लेखक यशस्वी झालेले आहेत. जगदीश ओव्हाळ यांची लेखनाची शैली वाचकांना खिळवून ठेवणारी आहे. हे पुस्तक वाचताना त्यातील अनेक प्रसंगातून बाणेदार बाबासाहेब, लढाऊ बाबासाहेब, प्रेमळ बाबासाहेब ,बुद्धिमान बाबासाहेब, मुत्सद्दी बाबासाहेब, राजकीय धुरंदर बाबासाहेब अशी बाबासाहेबांची अनेक रूपं वाचकांच्या नजरेसमोर उभी राहतात.
Show Less