प्रेम, लग्न, संसार,जोडीदार,सहजीवन या सर्व संकल्पना कधीच आदर्श अशा नसतात आणि परिपूर्णही नसतात.
Read More
प्रेम, लग्न, संसार,जोडीदार,सहजीवन या सर्व संकल्पना कधीच आदर्श अशा नसतात आणि परिपूर्णही नसतात. बरं त्यांचा जाती-धर्माशी काही संबंधही नसतो. तुम्ही आंतरधर्मीय लग्न करा किंवा सधर्मीय लग्न करा काही टक्केटोणपे तर तुम्हाला खावे लागणारच. यशस्वी वैवाहिक सहजीवनाचा कोणताही रेडीमेड फॉर्मुला उपलब्ध असत नाही. या पुस्तकात हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन,शीख, जैन, बौद्ध अशा आंतरधर्मीय विवाह केलेल्या पंधरा जोडप्यांच्या मुलाखती आहेत.
पुस्तकाच्या मुखपृष्ठावर सूर्याच्या पार्श्वभूमीवर दोन पक्षी युगुलांमध्ये फुलणारे प्रेम आणि खाली विजेच्या तारांवर बसलेले पक्षी पाहून वाटते की प्रेमाची वाट काही सोपी नाही. आणि विशेषतः ती आंतरधर्मीय किंवा आंतरजातीय प्रेमाची असेल तर ती खूपच खाचखळग्यांनी भरलेली असणारच.
कोणी एकेकाळी सामाजिक सुधारणा आधी व्हाव्यात की स्वातंत्र्य आधी मिळावे हा प्रश्न होता खरंतर आता स्वतंत्र मिळालेले आहे परंतु तरीही सामाजिक सुधारणांच्या बाबतीत आपण अजूनही खूपच मागासलेले आहोत. पुस्तकातील आंतरधर्मीय विवाह करणारी पंधरा जोडपी त्यामानाने वैचारिक दृष्ट्या खूपच प्रगल्भ असून स्वतः घेतलेले निर्णय अमलात आणण्याच्या बाबतीत प्रचंड ठाम अशी जाणवतात.त्यांच्या मुलाखतींमधून आंतरधर्मीय विवाहितांचे सहजीवन समजून घेण्याची धडपड आहे. या जोडप्यांचे जरी प्रेमविवाह झालेले असले तरी व्यवहारिक पातळीवर परस्परांशी, कुटुंबीयांशी आणि सभोवतालाशी कशा पद्धतीने त्यांनी जुळवून घेतलं, त्यांच्या एकमेकांविषयीच्या, स्वतःच्या आणि परस्परांच्या धर्माविषयीच्या समजुती काय होत्या त्या मोडल्या की त्यात नवीन भर पडली,या प्रकारच्या सहजीवनात एकमेकांविषयीच्या जाणिवा किती समृद्ध होतात की आणखी आकुंचित होतात इत्यादी बाबी जाणून घेतल्या आहेत. आपल्या नात्याकडे निरपेक्षपणे आणि खुलेपणाने पाहू शकणाऱ्या या जोडप्यांकडून मिळणार संचित अमूल्य असं आहे आणि म्हणूनच माणूसपणाच्या जाणिवा अधोरेखित करणारं आहे. हिना कौसर खान यांची अतिशय अभ्यासपूर्ण प्रस्तावनादेखील वाचनीय आहे. त्या प्रस्तावनेत म्हणतात त्याप्रमाणे आत्ताच्या दहशत आणि द्वेषाच्या जगात प्रेमासह जगून दाखवणे याला पर्याय नाही आणि या आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या या पंधरा जोडप्यांनी ते शक्य करून दाखवले आहे.
Show Less