प्रवीण जोशी हे लेखक व शिक्षक म्हणून सर्वदूर परिचित आहेत. त्यांची माणूसकीचा गाव, घरकूल, गल्हाट ही
Read More
प्रवीण जोशी हे लेखक व शिक्षक म्हणून सर्वदूर परिचित आहेत. त्यांची माणूसकीचा गाव, घरकूल, गल्हाट ही पुस्तके अत्यंत गाजलेली आहे. प्रवीण जोशी यांची ‘पनव्या ‘ ही कादंबरी परिस पब्लिकेशन, पुणे यांनी २०२४ मध्ये प्रकाशित केली आहे. ‘पनव्या ‘ ही कादंबरी भटक्या समाजाचे जीवनवास्तव साकारते. ही कादंबरी एकूण १४४ पृष्ठात विभागलेली असून या कादंबरीला प्रा. कुंडलिक कदम यांची सकस अशी प्रस्तावना लाभली आहे. तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. संदीप सांगळे यांनी मलपृष्ठावर कादंबरीचे मर्म नोंदवलेले आहे .
वासुदेव, भविष्य व नंदीबैलाच्या खेळ यावर उदरनिर्वाह करणाऱ्या मेढंगी जोशी या जमातीचे वास्तव चित्रण या कादंबरीतून साकारलेले आहे. प्रवीण जोशी यांनी पनव्या ही कादंबरी काल्पनिक स्वरूपात मांडलेली असली तरी ती वाचत असताना वास्तवाची अनुभूती देऊन जाते. या कादंबरीची सुरुवात कापारेश्वराजवळच्या केडद या गावापासून सुरू होते.
केडद या गावातील एका पिढीतील पाच बहिणींची ही कथा व्यथा आहे. कादंबरीचे नाव पनव्या आहे. हे नाव तसे अपरिचित, कुठेही शोधले तरी सापडत नाही. मुलीला पनव्या असे या समाजात म्हटले जात असावे. मेढंगी जोशी या भटक्या समाजातील स्त्रियांचे भावविश्व लेखकाने साकारलेले आहे. लेखक हे भटक्या समाजातील नाही तरी ही कादंबरी वास्तवाचा ठाव घेते. गावोगावी भटकंती करत घरोघरी जावून गोधड्या शिवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या या महिलांची भटकंती कादंबरीत साकारली आहे. हा समाज महाराष्ट्रभर विखुरलेला आहे , त्यांच्यातही गरीब श्रीमंतीची दरी आहेच.
सांग सांग भोलानाथ पाऊस पडेल काय हे गीत पिढ्यानपिढ्यांपासून आपण ऐकत आहोत. पण यांच्या जीवनात आनंदाचा पाऊस अजून पडलेला नाही. पावसाचे भविष्य सांगणारा हा नंदीबैलवाला आपले खरे आयुष्य दारिद्र्यात जगतो आहे हा अनुभव लेखक मांडत जातात.
प्रवीण जोशी यांनी कादंबरीच्या पानापानातून भटक्या समाजातील एकूणच परिवाराच्या व्यथा वेदना मांडलेल्या आहेत. या समाजाच्या रूढी परंपरा वेगवेगळ्या आहेत त्याचेही कादंबरीतून दर्शन घडते. प्रवीण जोशी यांनी भटक्या समाजाचा अनुभव आपल्या कादंबरीतून मांडला असला तरी तसा या समाजाचा त्यांचा जवळून संबंध नाही. पण शिंदे गुरूजींच्या मनातला संकल्प त्यांनी वास्तवात आणला हे त्यांचे मोठेपण नाकारता येत नाही.
प्रवीण जोशी यांनी कादंबरी लिहायची हे ठरविल्यानंतर अनेक ठिकाणचा त्यांनी प्रवास केला. अनेक गावांची भटकंती केली. या मेढंगी समाजाबद्दल काहीही माहिती नव्हते . लेखक हे ब्राह्मण समाजातील आहे तरीही त्यांनी या कादंबरीची मांडणी केली. लेखक कादंबरीत एकरूप होताना दिसतात. ही कादंबरी वाचत जाताना लेखकाने हे जीवन अनुभवलेले आहे असे वाटते .
मेढंगी हा समाज आपले पोट भरण्यासाठी गावोगाव भटकंती करतो. राघू आप्पा आणि पारूबाई यांच्या कुटुंबातील ही भटकंतीची व्यथा आहे. या कादंबरीचे नाव पनव्या असे आहे. मुलींना पनव्या अशी उपमा लेखकाने दिलेली आहे. व्हकीला, इंदू, सुरजमुखी ,म्हस्कू, बारकू, चंद्रा, सुली ,शिवाजी असा राघूआप्पा आणि पारूबाई यांचा गावोगावी भटकंती करणारा परिवार दुःखाचा डोंगर घेऊन फिरतो. दरवर्षी पाळणा हालतच होता. ही कादंबरी भटक्या समाजातील पनव्यांचा खडतर प्रवास मांडते.
पोटाची खळगी भरण्यासाठी हे कुटुंब गावोगाव भटकंती करतात. मुलांची संख्या अधिक असल्याने त्यांची होणारी ससेहोलपट राघूआप्पा आणि पारूबाई यांच्या रूपाने मांडली आहे. जीवनाचा शेवट करून घ्यावा असे प्रसंग या कादंबरीच्या पानापानातून ठिकठिकाणी आले आहेत. अशा अनेक घटना प्रसंगातून ही कादंबरी साकारत जाते. या कादंबरीत नसबंदीचा काळ दाखविलेला आहे. राज्यभर नसबंदी चालू होती. लग्न न झालेल्या तरूणांची सुध्दा नसबंदी केली जात होती. प्रलोभनाने अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. या समाजाला नसबंदी काय प्रकार आहे माहिती नव्हता. त्यांनाही या प्रसंगाला सामोरे जावे लागले. हा प्रसंग लेखकाने मांडला आहे.
आज भटकंती करणारा हा समाज मुख्य प्रवाहापासून दूर आहे . अशा या समाजाविषयी प्रवीण जोशी यांनी भटक्यांचा जीवनपट या कादंबरीतून मांडलेला आहे. भटक्या समाजाचे आयुष्य असेच भटकंतीला बांधलेले असते. गावोगाव फिरायचे पदरात पडेल ते घ्यायचे कमरेला सुया बांधून गावोगाव फिरत गोधड्या शिवायच्या, काटक गोळा करून मुळी बांधायची आणि घरी यायचे असा रोजचा दिनक्रम आहे. कादंबरीचे वेगळेपण म्हणजे मेढंगी जोशी समाजाची भाषा आज लुप्त होत आहे. ती भाषा या कादंबरीतून आपणास बघावयास मिळते. लेखकाने मेढंगी जोशी या समाजाची बोलीभाषा कादंबरीत मांडलेली आहे,`ए पोरांनू लोभायला जाव. टापी मागायला जाव. टापी वईत. उपाशी लूगातू का मण?` अशी ही नष्ट होऊ पहाणारी बोलीभाषा कादंबरीच्या रूपाने काहीशी जतन करण्याचा प्रयत्न लेखकाने केलेला आहे.
एकूणच ही कादंबरी भटक्या समाजाचे जीवनवास्तव साकारते. नक्कीच या कादंबरीला वाचक स्वीकारतील अशी आशा आहे.
Show Less