
By पाटील विश्वास
मराठी मातीच्या, मराठी मनाच्या सर्वोच्च सद्गुणांचा अन् दुर्गुणांचा
मिलाफ झालेल्या या ऐतिहासिक रणाला नव्या अस्सल कागदपत्रांच्या
आधारे जिवंत करणारी कादंबरी. '
मराठी माणसाला इतिहासात रमायला नेहमीच आवडतं. त्यातही तो
इतिहास आपल्या पूर्वजांच्या कर्तृत्वाच्या कहाण्या सांगणारा असला, तर
बघायलाच नको! वर्तमानातील कठोर वास्तवापासून दोन क्षण का होईना
दूर जाता येणं, हा त्यातील बहुधा सर्वात मोठा लाभ असावा. त्यामुळेच
कायम गतकालात, इतिहासात रमणार्या व्यक्तीची पलायनवादी अशा
शब्दात अनेकदा हेटाळणीही केली जाते. तरीही ‘पूर्व दिव्य ज्यांचे, त्यांना
रम्य भावी काल!’ या पंक्तीवर भरवसा ठेवून असेल कदाचित, मराठी
माणूस हा इतिहास आणि पुराणकथांमध्येच रममाण झालेला आढळतो.
त्यातही मराठी माणसाचा सर्वात आवडता काल म्हणजे सतराव्या शतकात
छत्रपती शिवरायांपासून सुरू होणारा आणि पुढे एकोणीसाव्या शतकात
पेशवाईच्या अखेरीस येऊन थांबणारा, हे आता सर्वश्रुत झालं आहे.
त्यामुळेच मराठीतील अनेक कादंबर्या आणि नाटकं ही याच कालातील
गौरवशाली घटनांवर आधारित आहेत.
त्यात पुन्हा छत्रपतींनी उभं केलेलं राज्य पेशव्यांनी बुडवलं, या प्रचलित
समजाची झालर या सार्या कालखंडास असल्यानं तर या दोनशे वर्षांच्या
इतिहासाच्या दंतकथा कधी बनून गेल्या आणि त्यातून अनेक गैरसमजांचे
देव्हारे कसे उभे राहिले, हे कोणाच्या लक्षातही आलं नाही.तरीही मराठी
मनाचं या सार्या कालखंडाविषयीचं आकर्षण कमी झालेलं नाही.
पेशवाईच्या शे-सव्वाशे वर्षांच्या कालखंडात अनेक गौरवशाली घटना
घडल्या. अटकेपार मराठी झेंडा फडकवण्याची घटना जशी त्याच
काळातील, त्याचबरोबर पानिपतच्या युद्धात पदरी आलेला
मानहानीकारक पराभवही त्याच काळातील. पानिपतवर मराठ्यांच्या
पदरी आलेल्या पराभवास आज जवळपास सव्वा-दोनशे वर्षं लोटली
आहेत. तरीही ती जखम कुरवाळण्यात आणि तो पराभव नेमका कोणामुळे
नशिबी आला, याविषयीचं चर्वितचर्वण करण्यातच मराठी माणूस धन्यता
मानतो.
अर्थात, एखादा संवेदनक्षम आणि इतिहासाचं थेट घटनास्थळी जाऊन
अध्ययन करणाची इच्छा असलेला सृजनशील लेखक या सार्याकडे अगदी
वेगळ्याच दृष्टीकोनातून बघू शकतो आणि त्यातून अद्वितीय स्वरूपाची
कलाकृती उभी राहू शकते. विश्वास पाटील यांची ‘पानिपत’ कादंबरी हे
अशाच चिंतनशील लेखनाचं दुर्मिळ उदाहरण आहे. पाटील हे महाराष्ट्र