डॉ सुनील काशिनाथ खामगळ सहाय्यक प्राध्यापक मराठी विभाग तुळजाराम चतुरचंद कला विज्ञान व वाणिज्य
Read More
डॉ सुनील काशिनाथ खामगळ सहाय्यक प्राध्यापक मराठी विभाग तुळजाराम चतुरचंद कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय बारामती .
प्रसिद्ध लेखक व्यंकटेश माडगूळकर यांची ‘बनगरवाडी’ ही प्रादेशिक कादंबरी आहे. ही कादंबरी १९५५-६० मध्ये प्रकाशित झाली. व्यंकटेश माडगूळकर हे ग्रामीण साहित्याच्या प्रवाहातील अत्यंत महत्त्वाचे लेखक आहेत. त्यांनी साहित्यातून ग्रामीण प्रदेशातील माणूस, निसर्ग, प्रदेश, सण- उत्सव, माणसाच्या जगण्याच्या पद्धती, रीतीरिवाज, रूढी-परंपरा, श्रद्धा-अंधश्रद्धा, संघर्ष यावर प्रकाश टाकला आहे. ‘बनगरवाडी’ कादंबरीतून त्यांनी कायम दुष्काळाच्या छायेखाली असलेल्या सातारा जिल्ह्यातील माणदेशातील धनगर या जमातीचे चित्रण केले आहे. माणदेश हा पावसाचे कमी प्रमाण व हलक्या प्रतीची जमीन असलेला प्रदेश आहे. या कादंबरीतून त्यांनी प्रदेश वर्णन प्रभावीपणे केले आहे. धनगरांची वस्ती असलेल्या बनगरवाडी मध्ये राजाराम विठ्ठल सौंदणकर नावाचा पोरसवदा वयाचा मास्तर माळरानातून प्रवास करीत येतो. तेथील धनगरांच्या जीवनाशी समरस होऊन विश्वास संपादन करतो. बंद पडलेली शाळा सुरू करून तालीमही बांधतो. परंतु पुढे दुष्काळामुळे धनगर जगण्यासाठी मेंढरासह वाडी सोडून निघून जातात. मोठ्या जिद्दीने सुरू केलेली शाळा बंद करून मास्तर तालुक्याच्या गावी हजर होतात. असे कथानक या कादंबरीचे आहे.
कादंबरीतील प्रदेश लेखक व्यंकटेश माडगूळकर यांच्या परिचयाचा आहे. स्वातंत्र्यपूर्व काळातील माण नदीच्या आसपासच्या आटपाडी या औंध संस्थानातील पंत राजवटीच्या काळातील अवर्षणग्रस्त, दुष्काळग्रस्त परिसरातील धनगरांचे लोकजीवन लेखकाने उभे केले आहे. तेथील प्रदेश उभा केला आहे. कादंबरीतील प्रादेशिक जीवन निसर्ग वर्णनातून उभे केले आहे. शेती, पिके, झाडे-झुडपे भाषिक लकबी यांच्या वर्णनातून प्रदेश जिवंत केला आहे. उदा. उजाड माळरान बाभळीचे झाड, तरवड, नेपती, बोराटेची झाडे, टोळ, सरडे, मुंग्या, गंडीकडे, मुरमुठ्यावरील हिरवे भुंगे, घोरपड, बेडूक, लांडगा, साळुंक्या, चिमण्या, बाजरीची राने, हुलगा, तूर, मटकी, ज्वारी, करडी, हरभरा, धनगरांची कुडाची शेखरलेली घरे, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा सारखे ऋतू यातून प्रदेश आकार झालेला आहे. बनगरवाडीतील धनगरांमध्ये असलेली निरक्षरता, अज्ञान, दारिद्र्य ,संस्थानातील पंत सरकाराबद्दल त्यांच्या मनात असणारा आदर, आपुलकी, माऊली आईबद्दल असणारी श्रद्धा, तिचा उत्सव साजरा करण्याची पद्धत, लांडग्यासारख्या हिंस्र पशूशी लढाई, गावपातळीवर भांडण मिटवण्याची पद्धत, नवीन मेंढरांचा कळप करण्यासाठी मदत करण्याची रीत यातून माणदेशातील धनगराचा भाबडा व लढवय्या स्वभाव, परंपरा लक्षात येतात.
‘बनगरवाडी’ या कादंबरीमध्ये प्रदेश हा खऱ्या अर्थाने आत्मा आहे. कादंबरीमध्ये धनगरांच्या मेंढरांचे कळप, त्यांचे मेंढरामागील दिवसभराचे भटकणे, सायंकाळी जेवणापूर्वी मेंढवाड्यात ठेवलेल्या पिल्लांना आईशी मिळवणे, वाड्यातून येत असलेल्या मूताचा वास, सणासुदीच्या वेळी ढोलाच्या तालावर चालणारा नाच इत्यादी अनेक गोष्टीतून सामाजिक चालीरीती, आचार, विचार, परंपरामधून प्रादेशिकता सजीव झालेली आहे. याचा पात्राच्या वृत्ती प्रवृत्तीवर संस्कार झालेला आहे. हे संस्कार सामाजिकतेतून साधले असल्यामुळे प्रादेशिकता आणि सामाजिकता यांचा अतिशय घनिष्ठ संबंध असतो. हे कादंबरीतून अधोरेखित झालेले आहे. असे म्हणावे लागते. किंबहुना सामाजिकतेशिवाय प्रादेशिकता सजीव, परिणामकारक होऊ शकत नाही. प्रादेशिक जीवनाचे, ग्रामीण जीवनाचे, मानवी भावभावनांचे दर्शन घडवणारी ही कादंबरी साहित्यातील अतिशय प्रभावी प्रादेशिक कादंबरी आहे.
‘बनगरवाडी’ कादंबरीत लेखकाने सतत दुष्काळामुळे प्रदेशातील माणूस कोलमडून पडतो याचे चित्रण लेखकाने प्रभावीपणे रेखाटले आहे. कादंबरीचा शेवट वाचकाच्या मनात कालवा कालव करून अस्वस्थ करून सोडतो. कादंबरीत मास्तर, वाडीचा कारभारी, दादू बालट्या, आयबु, आनंदा रामोशी, जगण्या रामोशी, बाळा धनगर, शेकू, अंजी, रामा धनगर, काकुबा, संता अशी पात्रे आहेत. या पात्रांचा विकास झालेला आढळत नाही. ही सर्व पात्रं ज्या मातीत जन्म घेतात तिचे रंग रूप घेऊन जगतात. सुरुवातीला जी पात्र भेटतात तशीच ती कादंबरीच्या अखेरीस दिसतात. एकंदरीत पात्रांच्या अनुषंगाने कादंबरीचा विचार केला असता या कादंबरीत कोणतेच पात्र नायक खलनायकाच्या स्वरूपात भेटत नाही. निसर्ग हाच प्रमुख पात्राच्या स्वरूपात येतो. बनगरवाडीच नायक खलनायकाच्या स्वरूपात दिसते. लेखकाने लेखणीच्या सामर्थ्याने हे चित्र उभे केले आहे.
कादंबरीमध्ये माणदेशातील धनगरी बोलीचा संवादासाठी तर प्रमाणभाषेचा निवेदनासाठी वापर केला आहे. म्हणी, वाक्प्रचार, प्रतिमा, प्रतिके, श्रद्धा-अंधश्रद्धा, लकबी, शैली, उच्चारण्याची पद्धत हे बोलीचे सौंदर्य असल्यामुळे आणि कादंबरीत तिचा प्रभावीपणे वापर केल्यामुळे कादंबरी अधिकच वास्तवाच्या पातळीवर पोहोचते. कादंबरीची भाषा धनगराच्या जीवन पद्धतीप्रमाणे सरळ आहे. घटना, प्रसंग आणि व्यक्तिरेखा यांना बोलीमुळे सामर्थ्य प्राप्त होते. लेखकाने बोलीच्या साह्याने माणदेशातील प्रदेश जिवंत केला आहे. लेखक व्यंकटेश माडगूळकर यांनी या कादंबरीच्या माध्यमातून १९५०-६० च्या दशकातील माणदेशातील एका वाडीचे चित्र डोळ्यासमोर उभे केले आहे. वाचकालाही आज नष्ट होत चाललेल्या खेड्याचे, तेथील चालीरीती, रूढी, परंपरा, संस्कृती याचे दर्शन घडते. ही कादंबरी ग्रामीण-प्रादेशिक साहित्याच्या वाटचालीतील अतिशय महत्त्वपूर्ण कादंबरी आहे. साहित्य विश्वात मैलाचा दगड ठरलेली कादंबरी आहे. वाचकालाही ग्रामीण प्रदेश, निसर्ग, शेती, पिके, खेड्यातील माणूस, त्यांच्या रूढी, परंपरा, बोली समजून घेण्यासाठी ही कादंबरी उपयुक्त ठरेल. लुप्त होत चाललेला गावगाडा अनुभवता येईल.
दुष्काळ कायमच माणदेशातील समाजाच्या पाचवीलाच पूजलेला आहे. याची जाणीव होते. सतत दुष्काळाच्या सावटाखाली जीवन जागणाऱ्या समाजाची वाताहत, स्थलांतर केवळ दुष्काळामुळे होते. आजही हा प्रश्न तसाच अनुत्तरीत आहे. त्यामुळे ही कादंबरी अधिक प्रभावी झाली आहे. दुष्काळा सारख्या घटनेने कादंबरीचा शेवट केला असला तरी कादंबरीचे साहित्यिक योगदान व मूल्य कमी होत नाही. ती अधिकच वास्तवाच्या पातळीवर पोचते. कादंबरीचा शेवट वाचकाला अस्वस्थ करून सोडतो. वाचकही अंतर्मुख होतो. गेली सहा दशकं ही कादंबरी मराठी मनाला साद घालत आहे. आनंद देते आहे. म्हणून आजही वाचकांनी ‘बनगरवाडी’ या कादंबरीचा आस्वाद घ्यावा.
Show Less