अश्विनी विनायक चिकटे जयकर ज्ञानस्रोत केंद्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ. बिनपटाची चौकट-
Read More
अश्विनी विनायक चिकटे
जयकर ज्ञानस्रोत केंद्र,
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ.
बिनपटाची चौकट- इंदुमती जोंधळे (आत्मचरित्र)
बिनपटाची चौकट म्हणजे ‘पट नसलेली चौकट’ यापेक्षा सोप्या भाषेत सांगायचे झाले तर दार नसलेली चौकट. बरेच जण शीर्षक किंवा लेखक वाचून त्याच्या वाचनाकडे आकर्षित होतात. माझ्याही बाबतीत तेच झालं बिनपटाची चौकट म्हणजे काय, नेमकं काय असेल याच्यात याचं उत्सुकतेपोटी मी हे आत्मचरित्र वाचण्यासाठी घेतलं.
इंदुमती जोंधळे यांचे हे आत्मचरित्र आहे. लेखिकेने त्यांना त्यांच्या आयुष्याच्या वाटेवर आलेले वेगवेगळे अनुभव, दैनंदिन जीवनातील समस्या, सुख-दु:ख एका माळेत गुंफण्याचा प्रयत्न केला आहे. या आत्मचरित्रामध्ये लेखिकेला ज्या हाल अपेष्टांना सामोरं जावं लागलं, आणि खेळण्या बागडण्याच्या वयातचं आपल्या लहान भावंडांचे आई आणि वडील बनून त्यांची जबाबदारी पार पाडायची वेळ आली. नंतर वेगवेगळ्या वसतिगृहांमध्ये १० पेक्षा जास्त वर्षे काढायला लागले. हे सारं काही लेखिकेने त्यांच्या या आत्मचरित्रात सांगितले आहे. लेखिकेच्या वाटेला जे आयुष्य आलं ते त्यांच्या वडिलांच्या संशयी स्वभाव आणि रागामुळेच आले असं मला वाटतं, जर व्यक्तिमध्ये राग आणि संशय असेल तर कोणतेच नाते टिकून राहू शकत नाही.
मूळ ब्राह्मण असलेली कमला ढोले (लेखिकेची आई) पळून जाऊन साहेबराव जाधव (लेखिकेचे वडील) जे की दोन मुलांचे वडील आहेत हे माहिती असून देखील त्यांच्याशी विवाह करते. आणि साहेबरावांची दुसरी पत्नी म्हणून संसारही थाटते. ब्राह्मण कुटुंबातून पळून आलेली लेखिकेची आई चार मुलांची आई होते, आणि त्या चार मुलांना घेऊन त्यांचा संसार ही थाटते. घरदार सोडून आलेले हे दोघे शाळा, किराणा मालाचे दुकान अश्या वेगवेगळ्या उदयोगांची जोड देऊन आपला संसार चालवत असतात. अचानक लेखिकेच्या वडिलांच्या रागीट आणि संशयी स्वभावातून दोघांची भांडणं होतात आणि त्या भांडणात लेखिकेच्या आईचे डोके दगडी जात्यावर आपटते आणि मृत्यू होतो. त्यानंतर वडील स्वतः पोलिस स्टेशन मध्ये जाऊन त्यांच्या हातून जे घडलं ते सांगतात व त्यांना २० वर्षासाठी तुरुंगवास होतो. आणि ही चारही भावंड (लेखिका, त्यांचे दोन लहान भाऊ आणि सहा महिन्यांची लहान बहीण मुन्नी) आई-वडीला विना पोरकी होतात.
“वेळप्रसंग आले की मुलं अकालीच शहाणी होतात”. त्याप्रमाणे लेखिका त्यांच्या लहान भावंडांची भूक भागविण्यासाठी शेजारी असलेल्या शेळ्या- मेंढ्याच्या कोंडवाड्यात अंधारात जायची आणि चोरून शेळ्या मेंढ्याच दूध काढून घेऊन यायची.
लेखिकेच्या आतेभावांना त्या चार लेकरांची दया-माया आली असावी, त्यांनी त्या चारही भावंडांना आपल्या घरी नेले. असेच एकेक करत सर्व सामान-सुमान, दाग-दागिने त्यांनी त्यांच्या घरी आणले. जनावरेही त्यांच्याच दावणीला आली. आणि दुसर्या दावणीला ही चार भावंड बांधली गेली, म्हणजे त्या भावंडांना मूकपणे पडेल ती कामे करायला लागायची. झाडझुड, धुणीभांडी, जनावरांचं शेणमूत काढणं, गोठा साफ करणे, नदीवर जाऊन पाणी आणणे, आणि लेखिकेला पहाटेच उठवून जात्यावर बसवले जायचे, व चार-पाच शेर दळण दळल्याशिवाय सुटका व्हायची नाही. मध्येच लहान मुन्नी उठली की तिला बाजूला झोपवून परत दळण दळायला लागायचं. मुन्नी आठ-नऊ महिन्याची असेल. या चार भावंडात तिचेच जास्त हाल झाले. मुन्नीला ना दूध मिळायचं ना भात, बिचारी रडत भाकरीचा तुकडा चघळत चघळत कधी झोपी जायची हे ही कळायचं नाही. असेच एकदा दुपारी लेखिका मुन्नीच्या हातात भाकरीचा तुकडा देऊन दळण दळत होती, इतक्यात शेजारची एक वयस्कर बाई येते- जी त्यांच्या ओळखीची होती. बोलता बोलता ती मध्येच ओरडली… “अगं माय… इंदे अगं लेकरू गेलं की गं….” ती रडू लागली. आपण कुत्र्या-मांजरांना सुद्धा पुरण्यासाठी चांगली जागा शोधतो. पण इथे लेखिकेच्या आतेभावाने त्या चिमुकल्या मुन्नीला उकिरड्या शेजारी पुरताना बघून त्या तिनही भावंडांच्या संवेदना अक्षरशः गोठून जातात.
त्यानंतर तुरुंगात असलेल्या वडिलांनी पत्र लिहून केलेल्या मागणीमुळे या तिनही भावंडांची रवानगी वेगवेगळ्या शिशुसदनात होते. लेखिकेचे दोन लहान भाऊ- रमेश याची शिशुसदन पद्मपुरा आणि श्रीराम याची रिमांड होम (सर्टिफाइड स्कूल फॉर बॉइज) येथे रवानगी होते; आणि लेखिकेची पैठण, औरंगाबाद, शिरुर, इथल्या वसतिगृहानंतर कोल्हापूरच्या हिंदकन्या छात्रालयात रवानगी होते. अशा प्रकारे या तिनही भावंडांच्या ताटातूटीला सुरुवात होते.
कोल्हापूरचे छात्रालय हेच लेखिकेचे विश्व. कशा प्रकारे लेखिकेला छात्रालयात दिवस काढावे लागले, तीनही मोसमात थंडगार पाण्याने आंघोळ करायला लागे, दिवसभराची कामे करण्यासाठी ठराविक गट केलेले असायचे. दहा-पंधरा दिवसातून एका गटाकडे स्वयंपाकाची पाळी ठरलेली असायची. लेखिकेला स्वयंपाकाची पाळी आली की धसकाच बसायचा. कारण हे फारच कठीण काम असायचं. आदल्या दिवशी रात्री गव्हाचे कणीक मळून घ्यावे लागे, बारा ते पंधरा किलोचा हा गोळा मळताना हात खूप दुखायचे, बारा-पंधरा किलो कणकेच्या पोळ्या चुलीवर लाटायला लागायच्या. सुट्ट्यांमध्ये छात्रालयातील विद्यार्थी आपापल्या गावी, घरी किंवा नातेवाईकांकडे जात असत. परंतु लेखिकेला घरदार, नात्यागोत्याचे असे कुणीच नसल्यामुळे छात्रालयातच मुक्काम करावा लागे.
याच छात्रालयात लेखिकेला अण्णा, ताई, मामा, बाबा, नाना, सरूबाई, शारदाबाई, मातृत्वाचा अनुभव फक्त जन्म देऊनच अनुभवता येतो, हे खोटे ठरवणारी वसुमती पेंढारकर (सुपरिटेंडेंट), सरोज चिटनीस ऊर्फ कल्पना दळवी, सुभद्राबाई गायकवाड, वसुंधरा देशमाने, सखाराम वाळुजकर या अशा रक्ताच्या नात्यापेक्षाही जास्त आपुलकी, जिव्हाळा देणाऱ्या व्यक्तींचा सहवास लाभला. लेखिकेच्य आयुष्यात आलेल्या विविध व्यक्तींचे वर्णन करताना त्या म्हणतात की, आपल्या हाताची बोटे जशी सारखी नसतात तशीच आपल्याला भेटलेली माणसेही सारखी नसतात. लेखिकेच्या आयुष्यात आलेल्या राक्षसी वृत्ती असलेल्या निकम साहेबांसारख्या व्यक्तींचे वर्णन लेखिकेने आपल्या या आत्मचरित्रात केले आहे.
इथेच लेखिकेला पित्यासमान वात्सल्य देणारे अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे लाभले. अण्णासाहेबांनी लेखिकेला स्वतःची मानसकन्या मानून जीव लावला. ते शेवटपर्यंत लेखिकेच्या शिक्षणाची, राहण्याची, जेवण-खाण्याची व्यवस्था करत राहिले. एवढेच नव्हे तर त्यांनी लेखिकेच्या पुढील आयुष्यासाठी योग्य असा जोडीदार निवडण्यासाठीही मदत केली. थोरामोठ्यांच्या सल्ल्याने लेखिकेचा पत्रकार-लेखक असलेल्या महावीर जोंधळे यांच्या बरोबर विवाह झाला.
त्यानंतर लेखिकेला त्यांच्या सासरी सासूकडून मिळणारी अस्पृश्यासारखी वागणूक, सासूच्या रूपाने कौटुंबिक पातळीवर आलेले दाहक अनुभवही लेखिकेने आपल्या वाट्याचे भोग म्हणून कशा प्रकारे स्विकारलेले आहेत हे सारे काही लेखिकेने त्यांच्या या आत्मचरित्रात सांगितले आहे.
हे आत्मचरित्र का वाचावे?
आपण आपल्या जीवनात कितीही संकटे, कुठल्याही क्षणाला आली तरीही आत्मविश्वासपूर्वक, आणि समर्थपणे त्याचा सामना करून कसे जगावे हे कळण्यासाठी हे आत्मचरित्र वाचणे आवश्यक आहे.
आई वडील नसलेल्या मुलांचे काय हाल होत असतील, त्या मुलांना कोणत्या परिस्थितीतून आयुष्य पुढे ढकलत न्यावे लागते आपल्याला हे आत्मचरित्र वाचून समजेल.
जीवन जगत असताना आपल्याला वेगवेगळ्या लोकांचा सहवास लाभतो, त्या व्यक्तींच्या सहवासातुन आपण आपले आयुष्य कशा प्रकारे घडवू शकतो. हे समजण्यासाठी हे आत्मचरित्र वाचले पहिले.
जीवन जगताना आलेल्या समस्यांपासून दूर न जाता त्या समस्यांना संयम आणि विवेकाने कशा प्रकारे सामोरे जाऊन आपन आपले आयुष्य यशस्वी आणि परिपूर्ण बनवून जीवन जगू शकतो हे जाणण्यासाठी इंदुमती
जोंधळे यांचे आत्मचरित्र आवर्जून वाचले पाहिजे.
Show Less