नाव :- अश्विनी लहानू माळेकर जयकर ज्ञानस्त्रोत केंद्र ( ग्रंथालय प्रशिक्षणार्थी ) सावित्रीबाई
Read More
नाव :- अश्विनी लहानू माळेकर
जयकर ज्ञानस्त्रोत केंद्र ( ग्रंथालय प्रशिक्षणार्थी )
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे
प्रस्तावना :-
सुधा मूर्ती यांच्या “महाश्वेता” या कादंबरीशी माझा संबंध आला तो २०१४ मध्ये झालेल्या एका पुस्तक प्रदर्शनात. त्या महाश्वेता ह्या नावाने आणि त्यावर असलेल्या मुखपृष्टाने मला ते पुस्तक बघण्यास प्रवृत्त केले. एका सुंदर रुपवतीच मनमोहक रूप, केसात माळलेले पांढरी फुले,व शांत चेहरा हे आकर्षून घेण्यासारख आहे. आजवर ‘श्वेत म्हणजे पांढरे’ इतकेच माहित असलेली मी नक्की महाश्वेता चा काय अर्थ असेल? हे जाणून घेण्याची तसेच बाह्य पृष्ठाची माहिती वाचून तर कोणताही वाचक ती कादंबरी वाचली नसावी अशी नसेल.
एका चर्मारोगाविषयीचे समाजातील मत आपण एकविसाव्या शतकातही पूर्णपणे बदलू शकत नाही. एखाद्या वयात आलेल्या मुलीच्या अंगावर येणारा पांढरा डाग तर साऱ्या घराण्याचा शाप बनतो ही परिस्थिती आजचीही आहे.
ही कथा आहे एका सर्वसामान्य कुटुंबातील गरीब शाळा मास्तरांच्या शिक्षित, दिसायला रूपवान, सुंदर, देखणी, मनमोहक, समजदार, जबाबदार, हुशार, अभिनयात नाविन्य प्राप्त असलेली तसेच पुढे नोकरीकरून वडिलांना आर्थिक मदत करण्याची स्वप्न असलेली नायिका अनुपमाची.
तर कथेचा नायक आनंद हा एक उच्चशिक्षित, हुशार, पेशाने डॉक्टर, सौंदर्योपासक, श्रीमंत घराण्यातील एकुलता एक व विदेशात शिक्षणाचा ध्यास धरलेला तरुणाची.
एका नाटकात ह्या दोघांची भेट होते व तिच्या मनमोहक सौंदर्याला भाळून आनंद तिला त्याच्या घराण्याच्या काही अपेक्षा विरहीत, व सर्व मागण्यांना डावलून तिला लग्नाची मागणी घालतो. लग्न होते , केवळ मृत्यु आपल्याला वेगळ करेन असे वचन देऊन तो लग्नानंतर उच्च शिक्षणासाठी विदेशी जातो.
राधाक्का ह्या आनंद ची आई, घरंदाज, जुन्या विचारांच्या, कर्मकांडात रमलेल्या, व श्रीमंतीचा अति प्रभाव असलेल्या अशा तापट व निर्दयी स्वभावाच्या आहेत.
या कथेत एक नणंद, तसेच अनुपमाची सावत्र आई, तिची वागणूक व बहिणी, ही पात्र कथा अजून ज्वलंत ठेवण्यास मदत करतात.
उत्कृष्ट अशा लेखनशैलीत मांडलेल्या ह्या विषयामुळे ही कथा जिवंत वाटते.आनंद विदेशी गेल्यानंतर एका प्रसंगामुळे तिला आलेल्या कोडाच्या छोट्या डागामुळे तिच्या आयुष्यात झालेला बदल, समाजाकडून तर होणारच पण आपल्या नजीकच्या व्यक्तीकडून ही झालेल्या अवहेलनेची ही कहाणी पुढे काय वळण घेईल? याची उत्सुकता आपणास वाचताना येईलच.
अशा प्रकारे बहिष्कृत केलेल्या स्त्रीला नक्कीच आत्महत्येचा ही विचार येईल अशा प्रसंगात अनुपमाने घेतलेल्या निर्णयाची तसेच तिच्या जीवनात आलेल्या वादळाचे वर्णन, तिने दाखवलेला संयम आणि त्याच बरोबरीने सर्व दुःख मागे ठेवून आपले मोठ्या बहिणीचे तसेच मुलीचे कर्तव्य कसे पार पाडते, आज ह्या परिस्थितीतून जाणाऱ्या प्रत्येक स्त्रीला ही कादंबरी तिची कहाणी वाटावी अशी आहे.
एका शुल्लक अशा पांढऱ्या डागामुळे समाजात पावलोपावली होणाऱ्या अपमान आणि कुचंबना यामुळे तिला जगावे की मरावे असा विचार येतो पण ती जगण्यास प्राधान्य देते, शिक्षणाचा आधार घेऊन ती आयुष्यात पुन्हा उभी राहते. पुढे सरता तिने जे निर्णय घेतले त्यावेळी अनेक व्यक्ती तिला भेटतात त्यातच डॉ. वसंत यांचे आगमन ह्या कथेत होते, व कथेला वेगळे वळण प्राप्त होते आणि अनुपमाच्या आयुष्यात वेगळी दिशा देते. डॉ. वसंत हे तिला तिच्या आहे त्या परिस्थितीत स्वीकारायला तयार असूनही तिने पुढे घेतलेला निर्णय काय आणि कसा योग्य आहे ? याबाबत आपला ही विचार दृष्टीकोन बदलण्यास मदत होते.
अनुपमाचे इतके पत्र पाठवूनही एका शुल्लक पांढऱ्या डागामुळे त्याने एक ही उत्तराचे पत्र न पाठविण्याचे निर्णय बघता तो नक्की तिच्या वर खर प्रेम करत होता का? नक्की सौंदर्य म्हणजे काय? ह्यावर विचार करायला लावणारी ही कादंबरी सर्वांनी वाचावी, नक्कीच ही कादंबरी आपले मत आणि मनपरिवर्तन करते ही हमी मी देईन.
आनंद ची बाजू वाचताना आजचा पुरुष उत्तम पद्धतीने रेखाटला आहे आजच्या २१ व्या शतकातही अशी माणसे आहेतच म्हणून ही कथा जिवंत वाटते. तसेच इतक्या संघर्षमय जीवनातुनही अनुपमाने घेतलेले आधुनिक काळातील निर्णय हे यथायोग्यच वाटतात.
तुमच्या दृष्टीने सौंदर्य म्हणजे काय? संपूर्ण कादंबरी याच प्रश्नावर आणि त्याच्या उत्तरावर केंद्रित आहे. आजची तरुण पिढी ही बाह्य रुपावर भाळून निर्णय घेणारी आहे, ह्या वयात माणसाचं दिसण अधिक महत्वाच वाटू लागत परंतु तो माणूस सुंदर दिसण्यापेक्षा सुंदर असण्याचे महत्व अधिक आहे आणि माणसाचे सौंदर्य त्याच्या बाह्य रूपापेक्षा त्याच्या आंतरिक रूपाचे सौंदर्य म्हणजेच स्वभाव, गुण, व्यक्ती बघण्याचा दृष्टीकोन ही कादंबरी देईन ही खात्री तसेच या कथेचा शेवट हा अतिशय योग्य आणि समर्पक असा आहे ते जाणून घेण्यासाठी ही कादंबरी अवश्य वाचावी ही विनंती.
वैयक्तिक विचार
मी हे पुस्तक सर्वांना विशेषतः तरुणांना आवर्जून वाचण्यास सांगेन. बाह्य सौंदर्यात अडकलेली ही तरुण पिढी हे विसरून जातेय की बाह्य सौंदर्य हे क्षणभंगुर आहे. सौंदर्य म्हणजे काय? ह्याची व्याख्या बदलवणारे हे पुस्तक आहे. वैयक्तिक पातळीवर मी हे पुस्तक यामुळे अनुभवले की माझ्या आईला ही कोड हे बाळंतपणात शरीरात वाढलेल्या उष्णतेने झाले. आम्हा भावंडांमध्ये कोड कोणालाही नसून तरीही घरात आलेले आम्हा बहिणीच्या लग्नावेळीची अनुभव, लोकांचा विचार करण्याची पद्धत ही जवळून अनुभवली. नक्कीच अनुपमा एवढे वाईट प्रसंग अनुभवले नाहीत पण समाजाची विचार शैली अजूनही तीच आहे हे मात्र अनुभवले. यासाठी अशा ज्वलंत विषयावर पुस्तकाद्वारे जनजागृती केली जावी ही अपेक्षा व्यक्त करते. यातूनच समाज मत परिवर्तन होईल . पुस्तक वाचताना जणू काही आपल्या सोबतच ही कथा पुढे जातेय अशी अनुभूती मी पार्श्वभूमीमुळे अनुभवू शकली पण निश्चितच सर्वजण हे अनुभव घेतील ही ग्वाही.
अनुपमाने घेतलेले निर्णय नक्कीच प्रत्येक स्त्री ने विचार करण्यासारखे आहेत. सर्वात आधी मी स्वतःला स्वीकारेन आणि मग समाजाने मला स्वीकाराव ही अपेक्षा करेन, नक्कीच ती पूर्ण होवो अशी इच्छा मी बाळगणार नाही आणि दुःखी, कष्टी आयुष्य मी जगणार नाही. सुख आणि समाधानासाठी कोणावर ही अवलंबून राहणार नाही हा अनुपमाने घेतलेला निर्णय आपलयाला एक नविन उमेद देतो. म्हणून अवश्य वाचावी अशी महाश्वेता.
Show Less