माझा गाव
By Ranjeet
`माझा गाव` या माझ्या कादंबरीतील बरीच पात्रं आणि प्रसंग तर माझ्या घरचेच आहेत. कादंबरीतील वाडा हा अप्रत्यक्षपणे आमचाच आहे. जयवंताचं पात्र हे माझ्या प्रत्यक्षातील भावभावनांतून, अनुभवांतून आकाराला आलेलं आहे. इतर पात्रं मी प्रत्यक्ष पाहिलेली आहेत. त्यांचे स्वभाव मी हेरलेले आहेत; त्यांची मांडणी मात्र नव्यानं केली आहे. तिथंच तेवढं कल्पनेचं साहाय्य घेतलं आहे. कादंबरीतील मुख्य पात्र आहे अप्पासाहेब इनामदार. हे पात्र मी वास्तवातूनच उचललं आहे. माझ्या वडिलांवरून ते सुचलं. पण कादंबरीतील त्या पात्राच्या जीवनात घडणाया घटना माझ्या वडिलांच्या जीवनातील मुळीच नाहीत. त्यांतील काही मी ऐकलेल्या आहेत. काही पाहिलेल्या आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळातील एक जुनं गाव उभं करावं, असा एक हेतू
Book Reviewed By: शिरोळे आरती गोरख
वर्ग – 𝙏𝙔𝘽𝘼
College: GMD Arts, BW Commerce & Science College, Sinnar Dist. Nashik
माझा गाव ही कादंबरी रणजीत देसाई यांनी लिहिलेली आहे. अतिशय अप्रतिम अशी ही कादंबरी आहे. मला त्यांचे सर्वच लेखन साहित्य खूप आवडते. त्यांच्या साहित्यातून प्रत्यक्ष भाव प्रकट होत असतो. अति भावनिक व मनाला भावणारे असे त्यांचे लेखन आहे. त्यांच्या कादंबऱ्या, नाटके व कथा वाचकांना खेळवून ठेवतात. कादंबरीतील पात्रांशी आपला संबंध असल्या सारखा आभास होतो.
माझा गाव या कादंबरीतील पात्र काल्पनिक नसून वास्तवेतील आहे व कादंबरीतील बरीच पात्र आणि प्रसंग लेखकाच्या घरातील आहेत. ही कादंबरी वाचत असताना मनाला खूप भावते, यामध्ये समाविष्ट असणारे घटक जसे की वाडा व इतर घटक हे दर्शवितात की, हे गावातील एक प्रतिष्ठित कुटुंब आहे, त्यांची परिस्थिती ही श्रीमंत आहे, तसेच कादंबरीतील मुख्य पात्र आप्पासाहेब इनामदार हे असून माझ्या मनाला भावलेले मला सर्वात जास्त आवडलेले पात्र जयवंत उर्फ जया हा एक लहान मुलगा. कारण त्याच्याबद्दल खूप छान वर्णन या कादंबरीत केलेले आहे. त्याची आई तो पाच वर्षाचा असतानाच त्याला सोडून जाते व तो इतक्या लहान वयात पोरका होतो. त्याचे वडील त्याच्यासाठी दुसरी आई आणण्यासाठी दुसरे लग्न न करता ते स्वतः त्याचा सांभाळ करतात व त्याच्यावर माया करणारं कोणीतरी असावं यासाठी, मोठ्या मुलाचे लवकर लग्न करतात. सुनाच्या हाती लहान मुलाची जबाबदारी देतात. जयवंत व त्याच्या वहिनीचे आई व मुलगा असे नाते निर्माण होते व प्रत्येक गोष्ट आधी वहिनीला सांगायची मग इतरांना असे त्याचे नेहमी ठरलेले असायचे. जसा मुलगा आईवर रुसतो रागावतो त्याप्रमाणे जया वहिनीवर रुसत असे. त्याचे आप्पासाहेब हे एक निष्ठावंत व प्रामाणिक व्यक्तिमत्व होते. ते गावातील कोणतीही समस्या असो नेहमी तत्पर असणारे एक आदर्श व्यक्ती होते. एक दिवस अचानक गावात दरोडेखोरांचा हल्ला झाला व त्यापासून गावचे संरक्षण करण्यासाठी आपल्या प्राणाची बाजी लावून लढले पण शेवटी त्यांना आपल्या प्राणाला मुकावे लागले. त्यांच्या कुटुंबाची व गावची शान हरवली व जयवंतचे शिक्षक तात्यासाहेब व त्यांची पत्नी यांनीही अखेरचा श्वास घेतला. जया एकदम पोरका झाला. आता त्याला त्याची वहिनी व भाऊ रायबा एवढे सोबती होते. हे सर्व घडल्यानंतर तो कोल्हापूरला जातो. कारण आता पुढील शिक्षणासाठी त्याला गावाला सोडावे लागते व शेवटी त्याच्या आयुष्याचा प्रवास सुरू होतो.
या कादंबरीत स्वातंत्र्यपूर्व काळातील एक जुनं गाव उभा करावं असा हा हेतू यातून दिसून येतो व जुन्या ग्रामरचनेतील माणूस कसा होता, हे या कादंबरीत आपल्याला स्पष्ट दिसते. तो कसा जगत होता, स्वतःला समाजासाठी कसा वाहून घेत होता, हे दिसून येते व बापाचे कर्तव्य कसे पार पाडावे, एक आदर्श व्यक्ती म्हणून गावातील लोकांच्या समस्या कशा सोडवाव्या हे कर्तव्य स्वीकारावे कसे, याचे उत्तम उदाहरण म्हणजे आप्पासाहेबांचे पात्र. एक सुसंस्कारी स्री कशी असावी, व तिची घरातील भूमिका, जबाबदारी, मोठ्यांचा आदर, घरात सासू नसतांना अतिशय चांगल्या प्रकारे आपली जबाबदारी चोक पार पडणारी, व सर्वांना समजून घेणारी सून तिचेही वर्णन अतिशय छान व एक आदर्श ठेवणारे आहे. घरात सर्वात लहान असलेला मुलगा इतक्या कमी वयात समजूतदारपणे वागतो, सर्वांचा आदर करतो आपल्या वहिनीला स्वतःच्या आईप्रमाणे प्रेम करतो व त्याचा हेवा वाटावा इतका प्रामाणिक वागतो.
मला असे वाटते की या कादंबरीतील खूप विचार घेण्यासारखे आहेत. म्हणजेच नातेसंबंध कसे जपावे, गावचा एक आदर्श माणूस कसा असावा, सर्वांच्या जीवनात चांगल्या वाईट गोष्टींमध्ये साथ कशा प्रकारे द्यावी व समस्यांना सामोरे जाताना खचून न जाता आपले कर्तव्य प्रामाणिक पार कसे पाडावे, हे सर्व गुण मी या कादंबरीतून घेतले. मला माझ्या जीवनात याचा खूप फायदाही झाला. मी जरी एक विद्यार्थी असली तरी या सर्व गोष्टींना सर्वांनाच सामोरे जावे लागते तशी माझी ही वेळ येणारच आहे.
अशाप्रकारे मला वाटते की, या छोट्याशा दुनियेतही चांगल्या प्रकारे आनंद घेता येतो, सोबत फक्त साथ पुस्तकांची हवी .