मृत्युंजय
By शिवाजी सावंत, सावंत शिवाजी
शिवाजी सावंत यांच्या मृत्युंजय या कादंबरीचे मुखपृष्ठ पुस्तकातील आशयाला साजेशे शोभेल असे आहे. या मुखपृष्ठावर सूर्यदेवतेचा तेजस्वी प्रतिमेचा उपयोग करण्यात आला आहे. त्याचा संदर्भ कर्णाच्या जीवनाशी अगदी योग्य आहे. कर्णाला सूर्यपुत्र म्हणून ओळखले जाते आणि त्याचा संघर्ष सूर्याच्या अखंड तेजाप्रमाणे ज्वलनशील वाटतो. मुखपृष्ठाच्या मध्यभागी कर्ण रथावरून आपल्या धनुष्याचे लक्ष साधताना दाखवला आहे. यामध्ये त्याचा पराक्रम, धैर्य आणि परिस्थितीला सामोरे जाण्याची ताकद त्याचे मिश्रण आहे. पिवळसर आणि सोनेरी रंगछटांचा वापर सूर्याची उष्णता, तेज आणि कर्णाच्या उगवत्या भविष्याचे प्रतीक म्हणून केला आहे. शिवाजी सावंत यांचे मृत्युंजय या कादंबरीचे मुखपृष्ठ कादंबरीच्या कथानकात म्हणजेच हे पुस्तक वाचण्यापूर्वीच आपल्याला प्रेरणा देते. त्याचबरोबर हे मुखपृष्ठ पाहून कर्णाच्या संघर्षमय जीवनाची झलक आपल्याला देते.
शिवाजी सावंत यांचे मृत्युंजय हे कादंबरी महाभारताच्या एका महत्त्वाच्या पात्राची म्हणजे कर्णाची कथा आहे. यामध्ये कर्ण हा एक अशा प्रकारचा नायक आहे, जो कधीही आपल्या आयुष्यात न्याय मिळू शकला नाही. तरीही आपल्या कर्तव्याशी आणि सन्मानाशी प्रामाणिक राहिला.
हि कादंबरी कर्णाच्या संपूर्ण आयुष्याचा प्रवास सांगते. त्याच्या जन्मापासून ते त्याच्या मृत्यूपर्यंत कर्णाचे दुःख त्याची स्वतःची ओळख शोधण्याची लढाई आणि समाजाने त्याच्यावर लादलेल्या अपमानांना सहन करतानाही तो आपले निष्ठा कशी टिकवतो, हेही कादंबरी आपल्याला सांगते. ही कादंबरी वेगवेगळ्या पात्राच्या नजरेतून सांगितली गेली आहे. जसे की कर्ण स्वतः त्याच्या दृष्टिकोनातून बोलतो. त्याची आई कुंती तिच्या भावना व्यक्त करते. दुर्योधन त्याचा मित्र म्हणून त्याच्याबद्दल सांगतो आणि श्रीकृष्णाचे विचारही या कादंबरीत मांडलेले आहे. त्यामुळे कथा अधिक जिवंत आणि प्रभावी वाटते.
शिवाजी सामंत यांची भाषा अत्यंत सोपी सरळ आणि भावनेने भारलेली आहे. त्याचे शब्द थेट मनाला भिडतात. त्यांनी कर्णाच्या भावना वेदना आणि संघर्ष इतक्या प्रभावी पद्धतीने मांडले आहेत की वाचणाऱ्याला ते स्वतः अनुभवल्यासारखे वाटतात. कर्णाचा संघर्ष त्याला समाजाने ‘सुतपुत्र’ म्हणून नाकारले. पण तरीही त्यांनी नेहमीच स्वतःच्या कर्तुत्वावर उभे राहून आपली ओळख निर्माण केली. कर्णाच्या आयुष्याकडे पाहून आपण हा संदेश घेऊ शकतो की नशीब कितीही प्रतिकूल असले तरीही आपण नशिबासोबत झुंज खेळावी आणि आपण नशिबा समोर हार मानू नये.
ही कादंबरी वाचताना कर्णाचे दुःख आणि त्याचे स्वाभिमान मनाला भिडतो. मृत्यू जो आपल्याला शिकवते की आपण परिस्थिती कितीही वाईट असली तरीही आपले आदर्श आणि कर्तव्य सोडू नये. कर्णाची ही कथा आपल्या जीवनातील समस्यांना सकारात्मकपणे सामोरे कसे जायचे हे शिकवते.
हि कादंबरी फक्त एक कथा नाही. तर जीवनातील सत्य आणि मूल्यांचा आरसा आहे .कर्णाच्या आयुष्याच्या माध्यमातून ती आपल्याला आपल्या संघर्षावर मात करण्याची प्रेरणा देते. प्रत्येक मराठी माणसाने ही कादंबरी आपल्या आयुष्यात एकदा तरी नक्की वाचले पाहिजे.