डॉ. शिल्पा रंगनाथ शेटे सहयोगी प्राध्यापक श्री पद्ममणि जैन कला व वाणिज्य महाविद्यालय पाबळ, ता.
Read More
डॉ. शिल्पा रंगनाथ शेटे
सहयोगी प्राध्यापक
श्री पद्ममणि जैन कला व वाणिज्य महाविद्यालय पाबळ,
ता. शिरूर, जि.पुणे
यमुनापर्यटन ही पहिली मराठी कादंबरी १८५७ साली बाबा पद्मनजी यांनी तसेच हिंदू धर्मातील विविध त्रुटी दाखवून हिंदू धर्मातील विधवांचे दुःख दाखविणे त्याचबरोबर ख्रिस्ती धर्मप्रसार या हेतूने लिहिली. पुस्तकाच्या रचनेवरून हिंदू धर्मातील मुख्यतः उच्च समजल्या जाणाऱ्या जातींमधील विधवा स्त्रियांचे दुःख समाजासमोर मांडून, विधवा पुनर्विवाहाला प्रोत्साहन देणे हा मुख्य उद्देश होता त्याबरोबरच ख्रिस्ती धर्माचा प्रसार करणे हाही उद्देश होता, असे दिसते. या कादंबरीतील नायक विनायकराव व त्यांची पत्नी यमुनाबाई यांनी ख्रिश्चन धर्माचा आधीच आपल्या मनातून स्वीकार केला होता. फक्त उघडपणे हा धर्म त्यांनी शेवटी म्हणजे विनायकराव मृत्यू समयी आपल्या पत्नीकडून बाप्तीस्मा घेऊन ख्रिश्चन झाले व नंतर त्यांची पत्नीही ख्रिश्चन झाली व तिने पुनर्विवाह केला, असे दिसते.
या पुस्तकात विधवांच्या काही हकीकती विनायकरावांच्या मित्रांच्या पत्रांतून कळतात, काही हकीकती विनायकरावांचे मित्र त्यांना सांगतात, तर काही हकीकती यमुनेला स्वतः भेटलेल्या विधवा सांगतात. या हकीकतींमध्ये यमुनेची समवयस्क मैत्रीण गोदावरीची आहे. ती आत्महत्या करते. दुसऱ्या हकीगत वेणूच्या अतिशय कष्टमय जीवनाची कहाणी आहे. तिसरी हकीगत पंढरपूरला भेटलेल्या शिवरामच्या आईची, जिला नंतर यमुना आपल्याबरोबर घेऊन जाते. एक कथा विजापूरचे विधवेची आहे. कादंबरीच्या पहिल्या, दुसऱ्या तसेच चौथ्या आवृत्तीची प्रस्तावना, दिलेली आहे, तर तिसऱ्या आवृत्तीमधून कोणती प्रकरणे काढून टाकली व त्यात कोणती प्रकरणे नवीन टाकली याविषयीची केवळ सूचना समाविष्ट केलेली आहे. याशिवाय या कादंबरीला दादोबा पांडुरंग तर्खडकर यांची विदत्तापूर्ण प्रस्तावना लाभली आहे. या कादंबरीत बाबाचा कावा, केसांचा टोप, भटीन बाई, सभा, मरण इत्यादी प्रकरणे असून आठ पुरवणी अंक त्याला जोडलेले आहेत. त्यात अनुक्रमे क्र. एक मध्ये हिंदू विधवांची दुरुस्ती, क्र. दोन मध्ये विधवा विवाहास वेदाचा आधार, क्र. तीन मध्ये महाराष्ट्र व गुजराती पुनर्विवाहांची संख्या, क्र. चार मध्ये न्हावी बांधवांस सूचना, क्र. पाच मध्ये मुंबईतील प्रार्थनासमाजासंबंधी स्त्रियांच्या सभेत. क्र. सहा मध्ये केशवपण, क्र. सात मध्ये पंढरपुरातील विधवा व क्र. आठ मध्ये पुनर्विवाहासंबंधी कायदा तसेच प्रथमच झालेली हिंदू विधवांची लग्ने, हे एक जोडपत्र जोडले असून त्या कालखंडात झालेल्या दोन लग्नांची माहिती त्यामध्ये दिलेली आपल्याला पाहावयास मिळतात.
या कादंबरीचा संपूर्ण सार पाहिला असता संपूर्ण हिंदुस्थानात विधवा स्त्रियांची स्थिती किती क्लेशकारक आहे; व त्यावर एकच उपाय म्हणजे विधवा पुनर्विवाह केला पाहिजे असा दिसतो. या कादंबरीत यमुनेचा प्रवास हा दुहेरी आहे. एक म्हणजे ती त्रंबकेश्वराहून नागपूर, तेथून पंढरपूर, मग सातारा व पुन्हा त्रंबकेश्वर असा प्रवास करते व त्या सर्व भागातील विधवांची स्थिती पाहते. दुसरा म्हणजे तिचा प्रवास हिंदू धर्माकडून ख्रिस्ती धर्मापर्यंत होतो. भेटलेल्या प्रत्येक विधवांना यमुनाबाईंनी ख्रिस्ती धर्माचा उपदेश केलेला आहे, असे दिसते.
यमुनापर्यटन ही जरी कादंबरी असली तरी सुद्धा याच्यामध्ये समाजाची वास्तव मांडणी केलेली आहे. एका अर्थाने भारतीय समाजाचा इतिहास पाहण्यासाठी ही कादंबरी महत्त्वाची आहे असे वाटते. या कादंबरीत वर्णन केलेल्या विधवा या मुख्यता ब्राह्मण, मराठा, शेणवी, कायस्थ इत्यादी जातींमधील दिसतात. अनेक विधवा या चोरट्या संबंधातून भ्रूणहत्या करतात, अशी वर्णने अनेक ठिकाणी आलेली आहेत. विधवांचा पुनर्विवाह झाल्यास, त्यांना प्रतिष्ठित, सुसह्य जीवन मिळेल; या कल्पनेपेक्षा अनीतीचे प्रमाण कमी होईल ही कल्पना व भूमिका लेखकांची अधिक दिसते. ही कादंबरी समाजनिष्ठ व बोधवादी दिसते. ही कादंबरी पात्रांच्या संवादांपासून सुरू होते व कथानकाच्या ओघातच मागचा इतिहास सांगितला जातो. ब्रिटिशांनी केलेले विविध सुधारणावादी कायदे, १८५६ चा केलेला विधवा पुनर्विवाहाचा कायदा इत्यादींची चर्चा यामध्ये येते. त्याचप्रमाणे हिंदू धर्मातही विविध शास्त्रांमध्ये विधवा पुनर्विवाहाला असलेला पाठिंबा व विरोध या दोन्हींचीही चर्चा वेळोवेळी झाल्याचे दिसते. यासाठी अनेक संस्कृत भाषेतील दाखले वारंवार आलेले आहेत.
कादंबरीत असलेल्या सर्वच पात्रांचा परिपूर्ण शेवट दाखवण्याचा मोह लेखकांनी टाळला आहे. तत्कालीन विधवांची स्थिती काय आहे हे लेखक मांडतो. त्यांचे पुढे काय झाले हे सांगत बसण्याचा मोह लेखकाने आवरला आहे.
यामध्ये वास्तववाद दिसतो. नाडलेल्या विधवा अतिसद्गुनी दाखवण्याचा मोह देखील लेखकाने टाळला आहे. लेखकाने आपल्या कादंबरीत तपशीलवार चर्चा घेतलेल्या आहेत. या चर्चा केशवपण करणे, पुनर्विवाह करणे इ. इष्ट किंवा अनिष्ट इत्यादी प्रश्नांशी निगडित आहेत.
ही कादंबरी ज्या काळात बाबा पद्ममनजी यांनी लिहिली तो काळ म्हणजे १८५७ म्हणजे १९ व्या शतकाचा उत्तरार्ध. हा काळ महाराष्ट्रातील सुधारणावादाचा काळ होता. जे सुधारणावादी विचारांचे विचारवंत होते, त्यांना अर्थातच येथील प्रतिगामी विचारवंतांचा प्रचंड विरोध होत होता. या सुधारणावादी विचारांच्या मध्ये बाबा पद्ममनजी यांचा समावेश होता, असे दिसते. म्हणूनच त्यांनी आपल्या नायकाला सुधारणावादी विचारांचा पुरस्कर्ता दाखविले आहे. लेखकाने ही कादंबरी लिहिली आहे; त्या मागची भूमिका अर्थातच इथे असणाऱ्या वेगवेगळ्या हिंदू धर्मातील वाईट प्रथा बंद करणे हा आहे. त्यामध्ये बालविवाह, बालजरठ विवाह, सती प्रथा इ.चा समावेश असला, तरी त्यांनी विधवा पुनर्विवाह किंवा विधवांची स्थिती हा प्रश्न मध्यवर्ती मानून, मुख्यत्वे त्याला हात घातला आहे. या कादंबरीला जोडलेल्या पुरवणी क्र. पाच मध्ये मुंबईतील प्राथनासमाजासंबंधी स्त्रियांच्या सभेत एका बाईने वाचलेला निबंध यात ज्या पद्धतीने एखाद्या पुरुषाची पत्नी निवर्तली तर तो दुसरा, तिसरा असे कितीही पुनर्विवाह करू शकतो, तर स्त्रियांबाबतीतच हा अन्याय का असा प्रश्न विचारलेला आहे.
Show Less