डॉ .संतोष पद्माकर पवार, सहयोगी प्राध्यापक मराठी विभाग ,अण्णासाहेब आवटे कॉलेज मंचर 'युद्ध जवळ आलंय'
Read More
डॉ .संतोष पद्माकर पवार, सहयोगी प्राध्यापक मराठी विभाग ,अण्णासाहेब आवटे कॉलेज मंचर
‘युद्ध जवळ आलंय’ ही आजच्या जगामधील एक भीतीची भावना आहे. युद्ध कधीच शांत झालेलं नाही आणि ते जगात कुठे ना कुठे कायम आपली भूमी काबीज करून आहे. युरोप अमेरिकेच्या साम्राज्यशाहीने तसेच नव्याने तंत्रज्ञान आणि शस्त्रास्त्र सज्ज विकसित पावलेल्या इस्त्राईलसारख्या देशांनी जगाच्या माथी मारलेली युद्धे आपण सध्या मध्य पूर्व आशियात सातत्याने बघत आहोत. रशियातून फुटून निघालेले युक्रेन सारखे देश त्या संघर्षात भरडून निघत आहेत. सीरिया, इराण, इराक असे देश युद्धाची खाई झाले आहेत.
भांडवली अर्थव्यवस्था आणि नफेखोर गुन्हेगारी माफियांनी या जगात युद्धभूमी कायम पेटलेली राहील याची कायम काळजी घेतली आहे. देशसीमांचे निमित्त करून वर्णद्वेष, वर्गद्वेष, जातीद्वेष तसेच अंतर्गत गृहकलह माजवून नागरी युद्धे होतात. त्यात महिला, वृद्ध आणि लहान मुलांचे प्रचंड हाल आणि अवहेलना होते. त्यांचा छळ करून त्यांच्यावर माणुसकीला लाजविणारा अत्याचार केला जातो.
या अन्याय आणि अत्याचाराविरुद्ध जगभरातील अनेक कवींनी आपली लेखणी उचलली आहे.
त्याच साखळीतला महत्त्वाचा जर्मन कवी ब्रतोल ब्रेख्त लिहितो की, ज्यांच्या जेवणाच्या टेबलावर / असते पक्वान्नांची रेलचेल / तेव्हा ते धडा शिकवतात आम्हाला शांत राहा भाऊ शांत राहा… जर्मनीतले नागरी युद्ध या कवीने पाहिलेले असते आणि त्याने साम्राज्य आणि भांडवलशाही देशांनी चालवलेली युद्धे आपल्या कवितेतून दाखवली आहेत. सर्वसामान्य लोकांची पिळवणूक करणारे भांडवलशहा हे समाजाला अगतिक बनवत असताना हा कवी मार्क्सवादी दृष्टीने त्यावर टीकाटिप्पणी करत होता. त्याच्या कवितेत आलेले लेनिनचे व्यक्तित्व हे साऱ्या अत्याचारांविरुद्ध झळाळून उठणारे दिसते.” पुढारी जेव्हा शांतांबरल बोलतात जनतेला जाणीव होते युद्ध जवळ आल्याची पुढारी जेव्हा युद्धाला वाईट म्हणतात तेव्हा आदेश झालेला असतो / रणांगणावर जाण्याचा…. अत्यंत कमी शब्दात कवी युद्धखोरांची मानसिकता स्पष्ट करतात. जगातील युद्धाचा ब्रेख्त जणू भाष्यकारच, सविता करंजकर त्याची नेमकी निवड करतात. युद्धात लहान मुले आणि महिला यांना मोठी झळ बसत असते. अनेक कविता त्याच्या साक्षीदार आहेत. ब्रेख्त यांच्या सोबतीने महमूद दरवेश हा एक पॅलिस्टाईनचा विद्रोही कवी आहे. हे दोघे समकालीन होत. महमूद दरवेशने इस्रायली अत्याचाराच्या विरोधात लिहिले आहे. “जेव्हा माती होते माझे शब्द / माझी मैत्री होती गव्हाच्या ओंब्यांसोबत…” पुढे त्याचे शब्द पोलादासारखे तापत जाऊन त्याच्यातल्या नकार, विद्रोह आणि त्यासोबतच प्रेमाच्या स्वभावछटांचेही दर्शन घडवतात. ” मी एक अरब आहे / मी दगड फोडतो माझ्या मोबत्यांसोबत / होय, मी दगड फोडतो / माझ्या मुलांना देण्यासाठी / एक भाकरीचा तुकडा / आणि एखादे पुस्तक…” अरबी बाप आणि त्याच्या मुलांच्या वास्तवस्थितीने वाचकाला त्याच्या ओळी अस्वस्थ करतात.
ईवान बूनिन हा एक रशियातला कवी. रशियन कवींची निसर्गवर्णन करत वर्तमान अस्वस्थतेकडे वाचकाला नेण्याची प्रकृती जाणवते. ” अचानक आणि विनाकारणच मला जाग आली / एखादे भयावह स्वप्न पाहिले असावे मी / पानगळीच्या त्या दिवसात / ग्राड दिसत होते उघडे बोडके….” असे वर्णन करत कर्कश कावळ्याच्या ओरडण्याची आठवण करून कवी सूचक राजकीय भाष्य जणू करतो. एका कवितेत तो रशियात होऊन गेलेल्या प्रतिक्रांतीचाही संदर्भ देतो ” मनाला आवडायचे जे जे / सारंच आता मातीत मिसळलंय / फक्त उरल्यात आठवणी त्यांच्या / जे जीवन सोडून गेले / ते गेले दुसऱ्या दुनियेत / आमच्यावर जणू रुसून गेले…” आपल्या गतइतिहासाची आठवणही त्याला येते तेव्हा कबरीतल्या कवितेचे निमित्त करून तो आपल्या पुरोभूमीची गोष्ट सांगतो. इराकमधली दुन्या मिखाईल ही स्त्री कवी आपल्या देशावर लादल्या गेलेल्या युद्धाच्या दुःखाची गोष्ट सांगते. युद्ध फक्त विध्वंस घेऊन येत असते. ते सैनिकांच्या रक्तावर उभे असते. मरणारा केवळ सैनिक नसतो तर त्याच्या सोबत त्याच्या कुटुंबाची स्वप्नेही मरतात. युद्धाचे अदृश्य असे अनेक दुष्परिणाम दुन्या मिखाईलच्या कवितांमधूनही मांडलेले दिसतात. युद्धात गतप्राण झालेल्या नवऱ्याला ‘प्लांचेट’ सारख्या अतींद्रिय शक्तींच्या कल्पनेआधारे बोलते करणारी अगतिक आणि असहाय महिला दुन्या मिखाईलच्या ‘वाटी’ या कवितेत येते. मृत सैनिकाशी होणारा संवाद अस्वस्थ करणारा आहे. शेवटी जेव्हा “हे आत्म्या, जा तुला शांती मिळो तिने वाटी सरळ केली, मेणबत्ती विझवली / आणि आपल्या मुलाला हाक मारली / तो बागेत फुलपाखरे पकडत होता / गोळ्यांनी छिद्र पडलेल्या एका हेल्मेटच्या साहाय्याने…” युद्धग्रस्त भागात मुलांच्या वाट्याला असे खेळ यावेत यापेक्षा अजून काय दुर्दैव असू शकते? युद्धातून समोर येणाऱ्या समस्या आणि गुंते यांचे जे नमुनेच जणू. तसेच कैदी’ या कवितेत आपल्या युद्धकैदी मुलाला
भेटायला गेलेल्या आईला पडलेला प्रश्न अस्वस्थ करतो. “एका कैद्याच्या आईला नाही कळत / तिला आता का निघायला हवं / फक्त भेटण्याची वेळ संपलीय म्हणून…” इराकमधला दुन्या मिखाईलची कविता युद्धाची दाहकता समोर आणते.
मूळ आफ्रिकी असलेल्या माया एंजेलो या स्त्री कवीची कविताही, भूक, दारिद्र्य, दैन्य आणि व्यथा भोगणारी आहे. कोणीच राहू शकत इथे एकटे असे सांगत, ” तुम्ही लक्ष देऊन ऐकणार असाल / तर सांगेन मी मला माहीत असलेले / जमा होत आहेत वादळी ढग / सुटणार आहेत वादळे / दुःख भोगतेय मानवजातीचे मी ऐकू शकतेय विव्हळणे…” आपल्या प्रदेशातून गुलामी, दास्य या कारणाने स्थलांतरित झालेल्या माणसाची भावना या कवितेत आपल्या भेटते. सविता करंजकर यांनी ‘युद्ध जवळ आलंय’ या अनुवादित संग्रहात या महत्त्वाच्या कर्वीसोबत निलिम कुमार, रश्मी प्रभा, अमरजीत कौक, उषा उपाध्याय, उदय प्रकाश, राजेश जोशी, संगीता गुप्ता, शैल चतुर्वेदी, राजेश जोशी, निजार कब्बानी, सर्वेश्वरदयाल सक्सेना, रामकृष्ण पांडेय, अब्दुल्ला पेसिऊ, नवीन जोशी नवेंदू, निलाभ अश्क, अतुल कनक, कुमार अनुपम, आनंद गुप्ता अशा जगभरातील निवडक कवींच्या कवितांना मराठी भाषेत अनुवादित करून आपला वैचारिक पक्ष सुस्पष्ट आणि अधोरेखित केलेला आहे. त्यातल्या निवडक कवींच्या कवितांचा परिचय करून घेतला आहे. बाकीचे निर्णय वाचकांवर सोडणे योग्य होईल.
या कविता युद्धाविरुद्ध एक आंदोलन तयार करण्यात यशस्वी होतात. मानवता, करुणा यांचा पुकारा त्या करतात. कवी या कवितांमधून एक प्रकारे युद्धविरोधी भूमिका घेतात. एकूणच सविता करंजकर यांचा दुःखाने भारलेल्या प्रत्ययकारी अनुवादित कवितांचा समुदाय आपल्या या संग्रहात वाचायला भेटतो.
विविध परभाषेतील कवी आणि कवितांचा अभ्यास असणारे आणि त्यासोबतच स्वतःची स्वतंत्र कविता सजगतेने लिहिणाऱ्या कवींची संख्या तशी मोजकीच आहे. सविता करंजकर-जमाले या त्यापैकी एक आहेत. आपल्या भाषेत स्वतःची कविता लिहिण्यासोबत परकीय भाषेतील कविता अनुवादित करण्याच्या कविप्रकृतीला अधिक उंच जागा आपल्या वाङ्मयीन व्यवस्थेत असली पाहिजे.
अनुवादासाठी कविता निवडताना अनुवादक कवींची मानसिक अवस्था नेमकी कशी होत असावी याबद्दल मला नेहमी कुतूहल वाटते. आपल्याला लिहावी वाटणारी कविता या परभाषी कवींनी लिहिली असावी हीच प्रबळ भावना या अनुवादक कर्वीची असावी. या कवीने वापरलेल्या शब्दातच आपल्यालाही कविता लिहायची होती अशी आत्मसातीकरण अवस्था या अनुवाद करणाऱ्या कवींची होत असावी. ही एक उन्नत कवीवृत्ती होय.
युद्ध आणि त्याबाबतच्या अस्वस्थ विषयाच्या सोबतीने आकाराला आलेल्या सविता करंजकर-जमाले यांच्या ‘युद्ध जवळ आलंय’ अनुवाद संग्रहाने मराठीत एक महत्त्वाचा दस्तावेज तयार झाला आहे असे म्हणता येईल.
Show Less