डॉ. मेघा राजेश बडवे प्राध्यापक तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती ग्रंथाचे नाव आहे 'रावण'' आणि
Read More
डॉ. मेघा राजेश बडवे प्राध्यापक तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती
ग्रंथाचे नाव आहे ‘रावण” आणि लेखक आहेत शरद तांदळे. हे आपल्या संस्कृतीचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित करणारे पुस्तक आहे. भारतीय संस्कृतीत रामायणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यातील खलनायक रावण याच्याबद्दलची बाजू जाणून घेण्याची उत्सुकता खूप दिवस मनात होती आणि म्हणूनच या पुस्तकाची निवड केली. आपण नेहमी दोन्ही बाजूंचा विचार करूनच आपले मत बनवावे असा दृष्टिकोन असल्यामुळेच या पुस्तकाची निवड केली. या कथेतील मुख्य पात्र म्हणजे रावण आहे. रावणाच्या जीवनाचे वर्णन या पुस्तकात केले आहे. रावण हा रामायणातील खलनायक, वेद व्यासंगी, शिवाष्टक लिहिणारा, तपाचरणाने अनेक अस्त्रे मिळवलेला, शिवतांडव स्तोत्र रचणारा, रुद्रवीणा चा निर्माता, दक्षिण द्वीपचा अधिपती इत्यादी, इत्यादी. परंतु जसे एका नाण्याला दोन बाजू असतात त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तिमत्त्वाची दुसरी बाजू ही किती भयानक असू शकते हे पुस्तक वाचल्यानंतरच लक्षात येते. या पुस्तकामध्ये लेखकाने रावणाबद्दल चे विचार अत्यंत प्रभावीपणे मांडलेले दिसून येतात. खलत्वाचा शिक्का मारण्याआधी आपण समजतो तशी ती व्यक्ती होती का? याचा शोध घेण्याचा प्रयत्न दिसून येतो. खुद्द खलनायकाचे म्हणणे काय हे समजून घ्यावे म्हणून हा प्रयास आहे असे वाटते. एखाद्या महाकाव्यातील रंजकता त्यातील कथांमुळे आणि नायकांसह खलनायकांमुळे देखील असते.
या पुस्तकामुळे मनावर अनेक प्रकारच्या भावभावनांचे तरंग उमटू लागले. त्याच्या खलत्वाची धार, त्यांचे व्यक्तिमत्व, त्याने नायकाला दिलेले आव्हान आणि यामुळे रामायणातील होत जाणारा तीव्र संघर्ष. आपल्या दोन लोकप्रिय महाकाव्यातील खलनायक कोण? हे विचारलं तर शेंबडे पोरही खाडकन उत्तर देईल, अर्थातच रावण आणि दुर्योधन हे दोन अस्सल खलनायक. आपल्या महाकाव्यात खलनायक हा पूर्णपणे काळा दाखवलेला नाही. त्याच्यातील गुणावगुण यांचे दर्शन आपल्याला होत असते. सीता हरणाचं कृत्य सोडलं तर रावण कसा होता? काळाकुट्ट दहा तोंडाचा? राम द्वेष्टा? की अन्यायाचा बदला घ्यायचा म्हणून, रागावर नियंत्रण नाही म्हणून वाहवत गेला. तो स्वतः एक व्युत्पन्न ब्राम्हण होता. वेदांचे अध्ययन केलेला रावण हा त्याच्या गर्वामुळे, शक्तीच्या अतिरिक्त उन्मत्तत्तेने त्याचे वागणे बदलत गेले. तो महापराक्रमी होता विदेशांशी त्याचा व्यापार होता. कलेचा ज्ञाता होता, वीणेचा कर्ता होता, प्रजाहितदक्ष होता. मंदोदरी वर त्याचे प्रेम होते .आपल्या बहिणीला आर्य पुत्रांनी ‘नाही’ म्हणणं मान्य केलं असतं, पण त्यांनी तिला विद्रूप करून त्याच्या कुळाला प्रचंड दुखावलं होतं. ‘एकपत्नीव्रत’ हे काही रघुकुलाचे ब्रीद नव्हते. रामाच्या वडिलांना -दशरथ यांना तर तीन पत्नी होत्या. त्यातून ‘तू लक्ष्मणाला विचार, तो अविवाहित आहे’ असे रामाने का सांगितले असेल. दोघेही तिची टिंगल करीत होते. एका राजकन्येशी वागायची ही रीत होती का? आपल्याला आवडलेल्या पुरुषाला थेट विचारायचे धाडस असुरांच्या संस्कृतीत होते, त्याचा राग येऊन तिचे नाक कान कापून तिला विद्रूप करण्याइतका क्रूरपणा का बरं घडला असावा? ती राजकन्या होती हे ठाऊक असूनही हे जाणीवपूर्वक केलेलं कृत्य होतं. त्याचे परिणाम मात्र सीताहरण आणि युद्ध असे भीषण होत गेले. शुर्पणखाचा अपमान हा रागाची ठिणगी पडायला कारणीभूत झाला. खरं पाहता दंडकारण्य हा प्रदेश असुरांच्या राज्याचा भाग होता. त्यात हे तिघे निष्कासित तरुण येऊन राहिल्याने त्याचे, आदिवासी समाजाचे काही बिघडणार नव्हते पण तेथे ऋषिमुनींचे यज्ञ दंडकारण्य प्रमुख स्त्रीच्या (त्राटिका) परवानगी खेरीज करणे योग्य होते का? त्राटिकाला मारणे, शुर्पणखेकला विद्रुप करणे हे राजपुत्रांना शोभते का? शत्रुपक्षातील स्त्री म्हटली कि तीला मारणे क्षम्य, तिचे रूप वर्णन तर श्रोत्यांच्या अंगावर काटा येईल असे करणे योग्य होते का? तिचे रामावर जडलेले प्रेम हे कोणत्या अर्थाने इतक्या भीषण शिक्षेला पात्र होते. रामायणाची कथा सूर आणि असुरांच्या संस्कृतीचा संघर्ष आहे. दोन समाजातील वीरांची कथा आहे. असुरांचा राजा हा सुरांच्या संस्कृतीवर विश्वास न ठेवणारा आहे. त्याच्या राज्यात जातीव्यवस्था नाही. यज्ञाची परंपरा नाही. पतिनिधनानंतर सती जाण्याची पद्धत नाही. ती स्त्री काही दिवसानंतर दुसरा विवाह करू शकत होती. देवांमध्ये मात्र स्त्रीच्या पवित्रतेविषयी कठोर नीतिनियम होते. पुरुषांसाठी मात्र काही नियम नव्हते. तर हे युद्ध दोन भिन्न विचारांचे असू शकते. बिभीषणाने आर्य संस्कृती चे समर्थन करून ती स्वीकारली. असुर हरले म्हणजे सारेच त्याज्य ठरते का? एकीकडे रावण खलनायक, दुष्ट प्रवृत्तीचे प्रतीक तर दुसरीकडे तो लाखो लोकांचे परमदैवत. त्याची अनेक मंदिरे मध्यप्रदेशातील रावण ग्राम येथे आहेत. श्रीलंकेतही रावणाच्या चरित्राबद्दल अनेक अभ्यास सुरू आहेत. त्याचे कलासक्त असणे, तंत्रज्ञ असणे, श्रीलंकेची समृद्धी, प्रजाप्रेम असे त्याचे अनेक गुण लोक समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.
सध्याच्या परिस्थितीत रावणाच्या विचारसरणीचे लोक जास्त दिसून येत आहेत. विनयभंग, बलात्कार यासारख्या घटना वारंवार घडताना दिसतात. रावणाने सुद्धा अनेक ऋषिकन्यआवर बलात्कार केले होते. हे योग्य होते का? ही कमकुवत बाजू या ग्रंथात विचारात घेतलेली दिसत नाही. समाजात आज असंख्य असे पुरुष आहेत की जे त्यांच्या पत्नीवर झालेल्या अन्यायाला, अत्याचाराला त्यांच्या दुबळेपणामुळे किंवा अन्य कारणांमुळे समाजापुढे आणू शकत नाहीत आणि त्याचा बदलाही घेऊ शकत नाहीत.
हे पुस्तक तरुण वयातील सर्वांनी वाचणे योग्य ठरेल ज्यांची आकलनक्षमता आणि परिपक्वता योग्य आहे त्यांनी या पुस्तकावर विचार करून आपल्या संस्कृतीने ज्यांना खलनायक ठरवले आहे ते योग्यच होते हे त्यांना समजून येईल आणि आपली संस्कृती किती श्रेष्ठ आहे याची प्रचिती येईल
Show Less