
लक्षवेध
पुस्तकाचे नाव : लक्षवेध
लेखक: रणजित देसाई
Book Reviewed by : भदाणे कीर्तीका भरत
Class : S.Y.B.C.S.
College : GMD Arts, BW Commerce & Science College, Sinnar Dist. Nashik
महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेल्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्य स्थापनेला अनेकांचा हातभार लाभला आहे. महाराजांच्या नेतृत्वाखाली अनेक रणधुरांनी आपल्या पराक्रमाची शौर्य दाखवत स्वराज्यासाठी, स्वामीनिष्ठेसाठी बलिदानही केल आहे. अशा या हिंदवी स्वराज्याची स्थापना करताना महाराजांनी अनेक सल्तनातींचा सामना केला. कित्येक संकटातून शिवराय आपल्या हुशारीच्या जोरावर बाहेर पडले. अशाच एका संकटाची भिषणता सांगणारी ही कादंबरी ‘लक्षवेध’ च्या रुपाने रणजीत देसाई यांनी मराठी वाचकांना उपलब्ध करून दिली आहे . हिंदवी स्वराज्य अगदी सुरुवातीच्या टप्प्यात असतानाचा हा चित्त थरारक प्रसंग आहे. आदिलशाही सरदार अफझलखान स्वराज्यावर चालून आल्यावर मराठ्यांनी जो रणसंग्राम केला त्याचा वेध घेणारी ही शौर्यगाथा आहे.
विजापूरच्या दरबारात शिवाजी महाराजांना जिवंत पकडून आणण्याचा विडा उचलून प्रचंड फौजफाटा सोबत घेऊन अफजलखान स्वराज्यावर चालून आला. मराठ्यांना मोकळ्या मैदानात लढायला भाग पाडण्यासाठी वाटेत येताना त्याने हिंदूची देवळे उद्ध्वस्त केली. पंढरपूर, तुळजापूरसारखी भक्तीपिठे अक्षरशः खणून काढली. पण, शिवाजी महाराजांनी कुठल्याही विरोध न करता त्याला स्वराज्यात येऊ दिल. सुपे, इंदापूर सारखी ठाणे खानाला मोकळी करून दिली. एकंदर शिवाजी खूप घाबरला आहे, खानसाहेबांच्या माफीसाठी आतुर झाला, आहे असा भास त्यांनी निर्माण केला. खाण्यासारख्या बलाढ्य शत्रूचा सामना रांनागणात करणं शक्य नाही, हे महाराजांना पुरतं ठाऊक होतं. शत्रू कितीही बलाढ्य असला तरी त्याचा बारकाईने अभ्यास करून त्याच्या ताकदीवर त्याला लढायला भाग पाडण्यात महाराज यशस्वी झाले. कुठल्याही प्रकारची गल्लत इथे परवडण्यासारखी नव्हती कारण प्रश्न स्वराज्याच्या अस्तित्वाचा होता.
महाराजांनी खानाशी बोलणी करून त्याला वाईच्या निविड अरण्यात प्रतापगडच्या पायथ्याशी भेटायला भाग पाडलं. इथेच अर्ध यश पदरात पडलं असतानाही शिवाजी महाराजांनी अत्यंत बारकाईने ही मोहीम फत्ते केले. खानाच्या भेटीसाठी महाराजांनी कोणती माणसं निवडली, त्यामागे महाराजांचा काय हेतू होता? याचं उत्तम विश्लेषण रणजित देसाई यांनी लक्षवेध मध्ये केलं आहे. अफजलवधानंतर मराठ्यांनी केलेला रणसंग्राम अविस्मरणीय आहे. शत्रूला फक्त मारून विजय मिळवणं महाराजांना मान्य नव्हतं, त्याला पुरता नेस्तनाभूत करण्याचे धोरण त्यांनी आखलं, आणि सफल करून दाखवलं. रडतोंडीच्या घाटात मराठ्यांनी केलेल्या कत्तलीला इतिहासात तोड नाही. गर्विष्ठ अफजलखानाचा वध करून महाराजांनी १२ मावळातच नव्हे, तर आदिलशहा, मुघालांसारख्या शत्रूच्या मनात आपली दहशत निर्माण केली. ह्या रणसंग्रामाचे एक बारकावे लेखकाने आपल्या पुस्तकातून अचूक मांडले आहेत. अफझल भेटीसाठी प्रतापगड उतरणारा शिवसुर्य वाचत असताना आपलंही हृदय आपोआप धडधडू लागतं, श्वास रोखला जातो. इतिहास माहीत असतो त्यांना देखील एक अनामिक भीती मनात रेंगाळत राहते. वेळोवेळी अंगावर काटा येत राहतो. असा हा मराठ्यांचा इतिहासाला कलाटणी देणारा क्षण रणजीत देसाई यांनी ज्या ताकदीने पेलला आहे, त्याला सलाम करावासा वाटतो. इतिहासाला जराही धक्का न लावता केवळ एका प्रसंगावर पूर्ण कादंबरी लिहिण्याचं काम रणजीत देसाई यांसारख्या तुल्यबळ लेखकचं करू शकतो. अलंकारिक भाषा, ऐतिहासिक माहितीचा खजिना आणि न संपणारे शब्द भांडार यांनीही कादंबरी उत्तमरित्या जुळून आली आहे. काही ऐतिहासिक पण थोडक्यात वाचायचं असेल, तर ही कादंबरी तुम्ही वाचू शकता. आणि एकदा का ही वाचन झाली तर श्रीमान योगी वाचण्याचा मोह तुम्हाला कदापि आवरणार नाही, याची मला खात्री आहे. जगातला पहिला सर्जिकल स्ट्राइक ज्याला म्हणतात तो अझलवध नक्की वाचावा म्हणून खास वाचकांसाठी ‘लक्षवेधचा’ थोडक्यात घेतलेला हा वेध.