
सावलीची झाडे
By प्रभाकर साळेगावकर.
'सावलीची झाडे' हा व्यक्तिचित्रणात्मक काव्यसंग्रह वाचनीय आहे. या काव्यसंग्रहातील व्यक्तिचित्रणे वाचकाला आपल्या आजूबाजूच्या माहन व्यक्तींची आठवण करुन देणारे आहेत. प्रत्येक परिसरात महान व्यक्ती असतात, होऊन गेलेल्या असतात. या कवितासंग्रहातील व्यक्तिचित्रणे जगातील महान व्यक्तींचे प्रतिनिधित्व करतात असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
सावलीची झाडे: व्यक्तीचित्रणाचा बहुरंगी कॅनव्हास
भारत अंकुशराव सोळंके, Ph.D. संशोधक विद्यार्थी मराठी विभाग,
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
Bharatsolnkae49@gmail.com
कवी प्रभाकर साळेगावकरांचा ‘सावलीची झाडे’ हा व्यक्तिचित्रणात्मक काव्यसंग्रह वाचनात आला. मराठीतील अनेक महत्त्वाच्या कवींनी व्यक्तिचित्रणात्मक कविता लिहिलेली आहे. त्यापैकी प्रभाकर साळेगावकर एक महत्त्वाचे कवी आहेत.’सावलीची झाडे’ या काव्यसंग्रहात एकूण पंचाण्णव कवितांचा समावेश आहे. प्रभाकर साळेगावकरांनी व्यक्तींबद्दल लिहिताना अभंग, ओवी, अष्टाक्षरी आणि मुक्तछंद यांसारखे विविध रुपबंध हाताळलेले आहेत. अभंग’ अष्टाक्षरी आणि ओवी यांसारख्या रुपंबंधात व्यक्तिचित्रण रेखाटण्याचे कसब साळेगावकरांकडे आहे. अनेक व्यक्तींच्या कार्याची, कर्तृत्वाची दखल त्यांनी आपल्या कवितेतून घेतलेली आहे. आदरणीय व्यक्तींच्या कार्याचा आढावा घेतांना त्यांनी प्रतिमा, प्रतीक, उपमा, रुपकांचा अचूक वापर केलेला आहे. प्रतिमा, प्रतीक, उपमा आणि रुपकांचा अचूक वापर करणे हे त्यांच्या काव्यशैलीचे वैशिष्ट्य आहे.
महात्मा गांधीजीसारख्या महान व्यक्तिंपासून मराठीत नव्याने कविता लिहिणाऱ्या रमजान मुल्ला यांसारख्या कवीवरही त्यांनी कविता लिहिलेली आहे. त्यांच्या कवितेतील व्यक्तींमध्ये राजकीय, सामाजिक, क्रीडा, संगीत, साहित्य अशा वेगवेगळ्या क्षेत्रात ज्या ज्या व्यक्तींनी मोलाची कामगिरी बजावली आहे अशा अनेक व्यक्तींच्या कार्यावर त्यांनी प्रकाश टाकलेला आहे. ‘सावलीची झाडे’ या एकूणच काव्यसंग्रहातून कवीच्या परीसरातील अनेक व्यक्तींचे चित्रण आल्याले आहे. कवीच्या परिसरातील वैभवाचा प्रत्येय ‘सावलीची झाडे’ या काव्यातून येतो. ‘सावलीची झाडे’ या काव्यसंग्रहातील पृ. क्र. ब्याएंशी वरील ‘ग्रंथसखा’ ही कविता पाहू,
ग्रंथाचा संस्कार
वारसा पित्याचा
झेंडा वाचनाचा
घरोघरी।
ही कविता ‘अभंग’ या रुपबंधात रचलेली आहे. एकाद्या व्यक्तीच्या कार्याची दखल ‘अभंग’ या रुढ पण कठीण असलेल्या रुपबंधात घेणे हे सृजनशील कवीचे लक्षण आहे. प्रभाकर साळेगावकर हे सृजनशील कवी असल्याची प्रचिती त्यांच्या वरील कवितेतून येते. ‘ग्रंथसखा’ ही कविता त्यांनी एकूण सहा कडव्यात बांधलेली आहे. कथा, कांदबरीसारखा विषय कवितेसारख्या छोट्या रुपबंधात बसवणे ही कठीण बाब आहे. पण हेही आव्हान त्यांनी पेललेले आहे. ‘ग्रंथसखा’ या कवितेत समाजसेवेचा वसा हाती घेतलेले शिक्षणमहर्षी मोहनराव सोळंके यांच्या कार्याचा आणि कर्तृत्वाचा त्यांनी यथायोग्य आढावा घेतलेला आहे.
प्रभाकर साळेगावकर नवख्या व सुप्रसिद्ध कवींवर आणि कवींच्या कवितेवरही प्रेम करतात त्यांच्या प्रेमाचा प्रत्येय आपणाला त्यांच्या ‘सावलीची झाडे’ या काव्यसंग्रहातील पृ. क्र. त्रेसष्ट आणि पृ.क्र. त्र्याण्णव वरील ना. धो. महानोर आणि मराठी कवितेती तरुण व कवितेतील शाश्वत चेहऱ्याचे कवी रमजान मुल्ला यांच्यावरील कवितेतून येईल.ना. धो. महानोरांवर लिहिलेली ‘रानकवी’ ही कविता पाहू,
‘पक्ष्यांचे लक्ष थवे’
अचानक सकाळीच कुठे गेले..?
‘पानझड’ झालेल्या झाडीत ‘त्या
आठवणींचा झोका’ झुले.
ना. धो. महानोर यांच्या निधनामुळे प्रभाकर साळेगावकर व्याकूळ झालेले दिसतात. ना. धो. महानोर यांच्या काव्यप्रवासाचा आढावाच त्यांनी ‘रानकवी’ या कवितेतून घेतलेला आहे. कवी. ना. धो. महानोर यांच्या निधनामुळे मराठी मनावर झालेल्या अघाताचे चित्रण त्यांनी आपल्या ‘रानकवी’ या कवितेतून केलेले आहे. ‘रानकवी’ या कवितेत ‘आठवणींचा झोका’ या ओळीत त्यांनी प्रतीकाची निर्मिती केलेली आहे ‘आठवणींचा झोका’ हे रित्या मनाचे प्रतीक आहे. ना. धो. महानोर यांच्या निधनामुळे मराठी कवितेत निर्माण झालेल्या पोकळीचे दर्शन त्यांनी घडवलेले आहे.
‘कवितेतील रमजान’ या कवितेतून महापुराचे पाणी घरादारात घुसून बेचिराख झालेल्या घरांची आणि मनांची हकिकतच प्रभाकर साळेगावकर यांनी सांगितली आहे. ‘कवितेतील रमजान’ ही कविता वाचल्यास आपणाला कुसुमाग्रजांच्या ‘कणा’ या प्रसिद्ध कवितेची आठवण झाल्या खेरीज राहणार नाही. ‘कवितेतील रमजान’ या कवितेतील काही ओळी पाहू,
‘अस्वस्थ काळरात्रींचे दृष्टांतात’
चिंब ओले करायला,
कृष्णामाय पुन्हा घरात आली
याला आपण काय समजायचं’?
नैसर्गिक संकटाशी दोन हात करणाऱ्या तरुण कवीच्या हिमंतीचे दर्शन प्रभाकर साळेगावकर यांनी घडवले आहे. कवितेतील रमज़ान’ ही कविता केवळ रमजान मुल्ला यांची राहात नसून ती पुरात-महापुरात घरदार-संसार वाहून गेलेल्या असंख्य पीडितांची कविता होते. कवितेला व्यापक रुप प्राप्त करुण देणे हे चांगल्या कवीचे लक्षण आहे. साळेगावकरांनी आपल्या कवितेत संवादात्मक शैलीचाही अचूक वापर केलेला आहे. त्यांच्या कवितेतील संवादात्मक शैलीचा प्रत्यय त्यांच्या ‘सावलीची झाडे’ या काव्यसंग्रहातील पृ. क्र. त्रेचाळीस वरील ‘संवाद’ या कवितेतून येतो. या कवितेत ‘कुसुमाग्रजांनी सावरकरांशी आणि सावरकरांनी कुसुमाग्रजांशी साधलेल्या संवादाचे चित्रण त्यांनी केले आहे. ‘ कुसुमाग्रज आणि सावरकर हे दोन्हीही तेजस्वी कवी आहेत. त्यांच्या तेजस्वी रुपाचे दर्शन त्यांनी ‘संवाद’ या कवितेत घडवले आहे.
प्रभाकर साळेगावकरांची कविता जगाच्या पाठीवरील अत्याचारांवरही भाष्य करते. त्यांच्या ठिकाणी असलेल्या वैश्विकदृष्टीकोणाचा प्रत्येय यांच्या ‘मदिबा’ या व्यक्तिचित्रणात्मक कवितेतून येतो. त्यांची ‘मदिबा’ ही कविता पाहू,
मदिबा,
जन्मघर होते सोन्याचे,
पण रंग का मिळाला काळा ?,
त्या गोऱ्यांना काय नाहीत,
काळ्या ढगातच असतो,
तुफानी पावसाळा.
या कवितेतून त्यांनी वर्णव्यवस्थेच्या विरोधात बंड करणाऱ्या नेल्सल मंडेला यांच्या संघर्षाचा आढावा घेतलेला आहे. वर्गभेदाला, वर्णभेदांला जातीभेदाला गाडून टाकलं पाहिजे असे त्यांना मनोमन वाटते. ते वर्गभेदाच्या, वर्णभेदांच्या जातीभेदाच्या विरोधात पोटतिडकीने लिहितात. नेल्सल मंडेला प्रमाणेच डॉ. बाबासाहेब अंबेडकरांचेही व्यक्तिचित्रण त्यांनी रेखाटले आहे. डॉ. बाबासाहेब अंबेडकरांवर लिहिलेली कविता आपण पाहू,
उन्मत्त सागर खवळला की समजावणे
लाटांनी किनार लाथाळले.
पण..
तू खवळलास अन् किनाऱ्यावरचे
जीव हसले..
तू खरंच सागर होतास,
थेंबाथेंबासाठी आसुसलेला
म्हणूनच साऱ्याच थेंबाना
ओहळाचा आकार आला.
प्रभाकर साळेगावकरांनी डॉ. बाबासाहेब अंबेडकरांच्या समाजसुधारणेच्या मूळ विचाराचे दर्शन ‘सागरा’ या कवितेतून घडवले आहे. या देशात दीन-दलितांना पाण्यासाठी झगडावे लागत असे. पाण्यासाठी वणवण करावी लागत असे. महाडचा सत्याग्रह करुन बाबासाहेब अंबेडकरांनी पाण्याला मुक्ती दिली. प्रभाकर साळेगावकर हे बाबासाहेब अंबेडकरांच्या विचारांनी भारावलेले आहेत. त्यांचा भारावलेपणा त्यांच्या वरील कवितेतून दिसून येतो.
प्रा.मिलींद जोशी यांची सहज सुंदर पाठराखण लाभलेला ‘सावलीची झाडे’ हा व्यक्तिचित्रणात्मक काव्यसंग्रह वाचनीय आहे. या काव्यसंग्रहातील व्यक्तिचित्रणे वाचकाला आपल्या आजूबाजूच्या माहन व्यक्तींची आठवण करुन देणारे आहेत. प्रत्येक परिसरात महान व्यक्ती असतात, होऊन गेलेल्या असतात. या कवितासंग्रहातील व्यक्तिचित्रणे जगातील महान व्यक्तींचे प्रतिनिधित्व करतात असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
काव्यसंग्रह : सावलीची झाडे
कवी : प्रभाकर साळेगावकर.
प्रकाशन: साहित्याक्षर , संगमनेर.
मुखप्रष्ठ : सरदार जाधव
मुल्य : रू. १५०/-