कधी कल्पना केली आहे का? दिवसाचे चोवीस तास तुमच्यावर कोणी तरी नजर ठेवून आहे.तुम्ही काय करता? कुठे
Read More
कधी कल्पना केली आहे का? दिवसाचे चोवीस तास तुमच्यावर कोणी तरी नजर ठेवून आहे.तुम्ही काय करता? कुठे जाता?कोणाला भेटता? थोडक्यात तुमच्या प्रत्यक हालचालीवर कोणी तरी सूक्ष्म नजर ठेवून आहे.असा विचार जरी मनात आला तरी, कुठलाही सुज्ञ नागरिक अस्वस्थ झाल्याशिवाय राहणार नाही. कारण अशा अवस्थेत नागरिकांच्या आयुष्यात खाजगी अस काहीच उरणार नाही.त्यांच्या संभाषणावर,वर्तणूकीवर आणि अशा प्रत्यक गोष्टीवर लक्ष ठेवणारी ही भितीदायक शक्ती कुणाला लपूण बसण्यासाठी जागाच शिल्लक ठेवणार नाही.अशीच भिती माझ्याही मनात निर्माण झाली,जेव्हा मी ब्रॅड थॉर यांचे ‘ब्लॅक लिस्ट’ हे पुस्तक वाचायला घेतले.
ब्रॅड थॉर हे रहस्यमय आणि थरारक कथा लेखक म्हणून ओळखले जातात. ही कथा देखील रहस्यमय आणि थरारक अनुभव देणारी आहे. पुस्तकातील मांडणी वैशिष्टेपूर्ण आहे,त्यात एका समांतर वेळेत वेगवेगळ्या ठिकाणांचा वापर करत कथा मांडली आहे. ब्रॅड थॉर यांची लेखनशैली गतिमान आणि उत्कंठावर्धक आहे. त्यांनी कथेतील घटनांचे वर्णन अत्यंत तपशीलवार आणि प्रभावी पद्धतिने केले आहे.
कथेची सुरुवात एका गुप्त माहिती लीकमुळे होते, त्याने अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण होतो. अमेरिकेतील कार्लटन ग्रुप ही एक खाजगी गुप्तहेर संघटना आहे.त्यांच्या सदस्यांवर अचानक कोणी तरी हल्ला करून त्यांना संपवण्याचा प्रयत्न करत आहे. या हल्ल्यांमागे कोण आहे? हे शोधण्यासाठी हॉर्वाथ हे प्रकरण आपल्या हातात घेतो आणि त्याला एक गुंतागुंतीचा कट उलगडायला लागतो, ज्यामध्ये विविध देशांचे गुप्तहेर, राजकारणी, आणि हल्लेखोर सामील असतात. लेखकाने स्कॉट हार्वथचे पात्र खूप प्रभावीपणे साकारले आहे. हॉर्वाथ हा एक हुशार, धाडसी, आणि रणनीतीत कुशल गुप्तहेर आहे, जो कोणत्याही आव्हानाला सामोरा जाण्यास तयार असतो.शेवटी हॉर्वाथ आणि त्याच्या साथीदारांनी कशा पध्दतीने होणारा हल्ला रोखला,लेखकाने याची मांडणी रोमांचकपणे केली आहे.
ब्रॅड थॉर यांचा रहस्यमय आणि थ्रिलर कथा लेखनामध्ये कोणी हात धरू शकत नाही,त्यात ते सर्वोत्कृष्टच आहेत.पण या पुस्तकातील एका वेगळ्याच मुद्दयाने माझे लक्ष वेधले आहे.तो म्हणजे ‘अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा नागरी स्वतंत्रतेसाठी धोका’.पुस्तकातील अनेक संवादातून तंत्रज्ञानाच्या धोक्याचे स्वरूप लेखकाने प्रभावीपणे मांडले आहे.आज संपूर्ण जग अधुनिक तंत्रज्ञानाने व्यापलेले आहे.जगातील प्रत्यक व्यक्ति कुठल्या ना कुठल्या प्रकारे त्याच्याशी जोडलेला असून या सगळ्यातून अमर्यादीत असा माहितीचा साठा निर्माण झालेला आहे. परंतू याच माहितीचा गैरवापर एखाद्या संस्थेने किंवा सरकारने करण्याचे ठरवले तर काय परिणाम होवू शकतो याचा विचार करणे आवश्यक वाटते.ब्रॅड थॉर यांनी हाच मुद्दा मुख्यता पुस्तकात वाचकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. पुस्तकात आधुनिक तंत्रज्ञान, विशेषतः डिजिटल डेटा आणि सर्व्हेलन्स सिस्टम्स कसे लोकांच्या गोपनीयतेस आणि स्वातंत्र्याला बाधा पोहोचवू शकतात, हे ठळकपणे थॉर यांनी दाखवले आहे.
खर तर तंत्रज्ञानाची निर्मिती मानवी जीवन सुलभ करण्यासाठी केली आहे.मानवाच्या विकासात विज्ञान आणि तंत्रज्ञानाने मोलाचे योगदान दिले आहे.परंतू हे तंत्रज्ञान नेहमीच सुयोग्य कामासाठीच वापरले असे नाही,इतिहासात डोकावल्यास त्याचे अनेक उदाहरणे आपणास दिसून येतात. ब्रॅड थॉर यांनी या पुस्तकात देशाच्या सुरक्षेसाठी निर्माण केलेले तंत्रज्ञान नागरिकांच्या विरोधात कसे वापरले जाऊ शकते, हे परिभाषीत करण्याचा प्रयत्न केला आहे.मुख्यता पाळत ठेवणारे तंत्रज्ञान आणि माहिती संश्लेषन हा विषय या पुस्तकाचा केंद्रबिंदू आहे.पुस्तकातील कथानकात अत्याधुनिक सर्व्हेलन्स (पाळत ठेवणारे) तंत्रज्ञानाचा वापर करून नागरिकांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले जाते. सरकार आणि इतर गुप्त संस्था आपल्या नागरिकांच्या खासगी माहितीचा कसा गैरवापर करू शकतात, हे पुस्तकात स्पष्ट केले आहे.
माहितीचे संश्लेषन आणि त्याचा परिणाम यावर लेखकाने विशेष भर दिला आहे.आज बहूतेक नागरिक विविध प्लॅटफॉर्म्सचा उपयोग आपल्या दैनंदिन जीवनात करत आहेत. ब्रॅड थॉर यांनी अशा प्लॅटफॉर्म्सद्वारे नागरिकांची वैयक्तिक माहिती गोळा करून, ती कशी वापरली जाऊ शकते, यावर प्रकाश टाकला आहे. या प्रक्रियेमुळे नागरी स्वतंत्रता धोक्यात येते, कारण नागरिकांना त्यांच्या माहितीचा कसा उपयोग केला जातो, याची जाणीवच नसते.त्याचबरोबर कथेत सायबर हल्ले आणि त्याद्वारे निर्माण होणाऱ्या संकटांवरही भर दिला आहे. सायबर सुरक्षेचा अभाव असल्यास नागरी स्वातंत्र्यावर परिणाम होतो, कारण सायबर हल्ल्यांद्वारे माहिती लीक होण्याची शक्यता वाढते.तसेच या पुस्तकातील कथेमध्ये सरकारकडून तंत्रज्ञानाचा वापर हुकूमशाही नियंत्रणासाठी कसा केला जाऊ शकतो, हे अधोरेखित केले आहे.
ब्लॅक लिस्ट मधील कथा जरी काल्पनिक असली तरी,थॉर यांच्या संशोधनक्षमतेमुळे, ती अत्यंत विश्वासार्ह वाटते आणि वास्तव जगातील कार्यपद्धतींवर आधारित असल्याचे जाणवते. आज प्रत्यक व्यक्ति इंटरनेटशी जोडलेला आहे,फेसबुक,व्हाट्सअप,इन्स्टाग्राम,एक्स यांसारख्या सोशल माध्यमांवर आपली वैयक्तिक माहिती टाकत असतो.जिकडे तिकडे सी सी टी कॅमेऱ्यांची यंत्रणा उभारलेली दिसते.ही सर्व यंत्रणा जरी नागरिकांच्या सुरक्षेसाठी असली,तरी तीचा वापर पाळत ठेवण्यासाठी होवू शकतो, याची शक्यता नाकारता येत नाही.याचा गैरवापर देशविरोधी काम करणाऱ्या संघटनाही करू शकतात.
म्हणूनच मला त्या स्वतंत्रप्रिय नागरिकांना सूचित करावस वाटत, सावधान…तुमच्या प्रत्यक हालचालीवर कोणाची तरी नजर आहे.
Show Less