‘आमचा बाप आणि आम्ही’ एक फिनिक्स झेप
कु. हर्षाली प्रभाकर पवार M.Sc.-1,
वनस्पतीशास्र विभाग, सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे
pawarharshaliprabhakar@gmail.com
मराठी साहित्य आणि संस्कृतीच्या आजपर्यंतच्या इतिहासात ज्या पुस्तकाने सर्व रेकॉर्ड ब्रेक केलेले आहेत की ज्या पुस्तकांच्या सहा लाख प्रती खपून लेखकाला कोट्यावधी रुपयांचा नफा झालेला आहे ते पुस्तक म्हणजे आंतरराष्ट्रीय किर्तीचे थोर अर्थतज्ज्ञ, विचारवंत, साहित्यिक, कवी, कुलगुरु व प्रशासकीय अधिकारी डॉ. नरेंद्र जाधव यांचे ‘आमचा बाप आणि आम्ही’ हे होय. या पुस्तकाचे परीक्षण करताना मला अनेक पैलू व भारतीय समाजाच्या धारणेचे दुवे सापडले ते याठिकाणी मी मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे.
मुखपृष्ठ पुस्तक नामांकनानंतर पुस्तकाचे पहिले पान येते ते पुढीलप्रमाणे, “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आस्मिता जागृत झालेल्या एका कुटुंबाची ही कहाणी. आमच्या आई-वडिलांनी आम्हाला जन्म दिला असला तरी माणूस म्हणून त्यांना व आम्हाला जगण्याचा हक्क मिळवून दिला तो सर्वस्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आणि म्हणूनच तर या यशोगाथेचे मूकनायक आहेत ते, व्यापक अर्थाने आम्हा सर्वांचे ‘बाप’ असलेले परममूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर!” ही प्रेरणा व आदर्श या पुस्तकाचा मूलगामी गाभा आहे. या पुस्तकाच्या या वाचनापर्यंत १७१ आवृत्त्या निघाल्या आहेत. ही आवृत्ती ७ एप्रिल २०१४ साली प्रकाशित झाली. ग्रंथाली प्रकाशनाने प्रकाशित केलेले हे पुस्तक लेखक डॉ. नरेंद्र जाधव यांनी अर्पण करताना, “आंधळ्या’ राही आजीच्या ‘दूर’ दृष्टीस, ‘अशिक्षित’ दादांच्या बौद्धीक प्रगल्भतेस आणि आई ‘सोना’ बाईच्या वाट्याला आलेल्या ‘गरिबी’ च्या चटक्यांस…” अर्पण केलेले आहे. ही उपेक्षित दलित समाजातील अपमान, वंचना, मानहानी सामाजिक, आर्थिक चणचण सोसलेल्या जन्मदात्या बापाविषयीची मानवंदना आहे.
वाचन संस्कृती लोप पावली आहे. अशी ओरड होत असताना हे पुस्तक १७ भाषांमध्ये अनुवादित होते व सहा लाख प्रती विकल्या जातात हे एक आश्चर्य आहे. या पुस्तकाला देश-विदेशातल्या भाषामधली प्रकाशनातून एक कोटी रॉयल्टी मिळते, याबद्दल काय म्हणावे. या पुस्तकांत नरेंद्र जाधव यांचा परिचय झालेला आहे, वडाळ्याच्या मुंबई वस्तीत दादा होण्याची स्वप्ने पाहणारा माणूस आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व प्रशासकीय क्षेत्रात दादा होतो. ही कमालीची गोष्ट आहे.
अर्पण पत्रिकेनंतर या पुस्तकांत डॉ. नरेंद्र जाधव यांच्या सामाजिक, सांस्कृतिक, अर्थशास्त्रीय, प्रशासकीय, वाङ्मयीन व आंतरराष्ट्रीय कार्याचा परिचय करून दिलेला आहे. तद्वतच त्यांना मिळालेले विविध क्षेत्रातील राज्य, शालेय, विद्यापीठ, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय ६१ पुरस्कारांची यादी आलेली आहे. त्याचबरोबर त्यात त्यांना मिळालेल्या विविध विद्यापीठातील मानद पदव्यांची यादीही त्यात समाविष्ट आहे. हे सर्वच मानपान व पुरस्कार अचंबीत करणारे आहेत. त्याचबरोबर त्यांची ग्रंथ संपदा विपुल प्रमाणांत असलेली दिसून येते.
‘आमचा बाप आणि आम्ही’ हे पुस्तक बहुआयामी असून त्याचे विविध भाग पुढीलप्रमाणे आहेत.
भाग १- मायबाप या शीर्षकाखाल, राहीआई गं!, आमचा बाप, मातोसरी इ.
भाग २- दादांचे आत्मचरित्र स्वतः दामोदर रुंजाबाबा जाधव यांनी स्वतः लिहिलेले अनुभव
एकूण सहा प्रकरणात आलेले आहेत. त्यामध्ये लहानपणाच्या गोष्टी, मुंबई नगरीची ओळख, युरोपेन सायबाच्या संगत, जायपी रेलवईची नवकरी, सौंसार सुखादुखाचा, प्रगतीची सुरवाद इ.
भाग ३- आम्ही या भागात आम्ही या शीर्षकाखाली, वडाळ्याचीवस्ती, आम्ही असे घडलो, मी जे.डी.जाधव, मी सुधाकर जाधव, मी दिनेश जाधव, मी नरेंद्र जाधव, आम्ही साऱ्याजणी इ. विषयी माहिती येते.
भाग ४- मध्ये जनरेशन नेक्स्ट मध्ये मी, अपूर्वा जाधव.
भाग ५- मध्ये परिशिष्ठ एक ‘आमचा बाप’…. विलक्षण प्रवास !
तर परिशिष्ठ दोन मध्ये या पुस्तकाबद्दलच्या मान्यवरांच्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत.
‘माय बाप’ या भागात नरेंद्र जाधव यांनी आजी राहीआई, वडील, दामोदर जाधव व आई सोनाबाई यांच्या व्यक्तिमत्वाची सूक्ष्म ओळख करुन दिलेली आहे. ‘राहीआई गं! या प्रकरणात आपली धाडसी आज्जी राहीआई हिचा संघर्षशील जीवनप्रवास चित्रित करताना, तिचे रुंजाबाबा बरोबर (आजोबा) यांच्याशी झालेले लग्न, दामोदर (दादा) नाजुका यांचा जन्म बालपण व चुलते माधवराव याच बरोबर दलित जीवनातील उपेक्षित, वंचित व कष्ठमय जीवनप्रवास चित्रित केलेला आहे. राहीआई आज्जीला हे सगळे आई म्हणून संबोधतात. तर स्वतःची आई सोनाबाईला ‘बाई’ म्हणून संबोधतात. ‘सुहीआईचे’ दोन मुलांसोबत एकाकी मुंबईला यणे, जीवनांतील कष्ठ व रोजगार करुन मुलांना घडविणे, जगविणे हा वृत्तांत येतो तर त्याचवेळी तिचे सासर, माहेरचा आधार व पती गेल्यानंतरच्या जीवनाची बाराखडी येते. तिचा जीवनप्रवास जीवघेणा व हृदय पिळवटून टाकणारा आहे. तिच्या शेवटच्या प्रवासापर्यंतची कहाणी व धाडसाने भरलेले चरित्र जाधव कुटुंबाच्या कलात्मक जीवनाची यशोगाथा चित्रमय शब्दांनी अधोरेखीत झाल्याचे समजते. आपला दीर माधवच्या खान-पान व जोपासनेसाठी ती लहान मुलांना घेवून मुंबईला विना तिकीट प्रवास करून आली पण माधव जबाबदारी झटकून मूळगाव ओझर जि. नाशिकला परतला. पण तीने मुंबई न सोडता दोन लेकराला घेवून मुंबईत राहिली. तिच्या धाडस व कर्तृत्वाने आजचे नामांकित जाधव कुटुंब कसे घडले याची कहाणी सांगताना डॉ. नरेंद्र जाधव म्हणतात, “माधव ओझरला निघून गेल्यानंतर तू मुलांसह मुंबईतच का राहिलीस? तू मुंबईत राहिलीस कारण तुला पॉसिबिलीटीज दिसू लागल्या होत्या. नव्हे, त्या तू पाहू शकत होतीस, एवीतेवी, गावात जमीनजुमला नावाला होता आणि घर म्हणून एक एक पडके खोपटे होते. आयुष्यभर तुझा ओढा गावाकडे राहिला असला तरी कुटुंबाच्या प्रगतीच्या संधी तुला आकलन झाल्या होत्या. नंतरच्या काळात तुला अंधत्व आले तरी तुझ्याकडे दुरदृष्टी मात्र कायम होती. तुझ्या नंतरच्या पिढीने आमचा बाप आणि बाई यांनी ज्या तडफेने आपल्या कुटुंबाची उभारणी केली, त्या जिद्दीचा मूलस्त्रोत्र असलेली तू त्यावेळी जिगर दाखवली होती. तुला आजी न म्हणता ‘आई’ का म्हणायचे हे आता कळते, आई! ही कृतज्ञता आज्जीच्या कष्ट, प्रेम व दूरदृष्टीची गमक असलेले दिसते.
‘आमचा बाप’ या प्रकरणांत डॉ. नरेंद्र जाधव यांनी वडील दामोदर जाधव यांच्या व्यक्तिमतत्त्वावर प्रकाश टाकताना त्यांचा धाडसी स्वभाव, आंबेडकरवादी निष्ठा, शिका संघटीत व्हा आणि संघर्ष करा हा बाबासाहेबांनी दिलेला मूलमंत्र, त्यांचे युरोपियन साहेबांच्या सानिध्यात येणे, इंग्रजी शिकणे, मुलींच्या शिक्षणासाठी आग्रही असणे व मुलांना घडविणे, पत्नीच्या सहकार्याने प्रपंचाचाचा गाडा हाकणे व मुलांची प्रगती बघून प्रसन्न होणे इ. गोष्टींना उजाळा दिलेला आहे. त्यात चार मुलांना उच्च विद्याविभूषित करताना व मुलींना शिक्षण देताना झालेली परवड व घेतलेला त्रास याचे वर्णन येते. पण आपण डॉ. आंबेडकरांच्या आदशीने व प्रेरणेने माणसात आलो ही कृतज्ञतेची जाणीव प्रकट झालेली आहे. डॉ. नरेंद्र जाधव आपल्या वडीलांविषयी म्हणतात, “आम्ही सर्व भावंडे त्यांना ‘दादा’ म्हणत असू, मध्यम उंची, काळा-ओबडधोबड चेहरा, मुद्रा करारी, पण लहान मुलांशी बोलताना डोळ्यांमध्ये एक खट्याळ छटा, धोतर व पांढरा सदरा, खाकी कोट आणि काळी टोपी हा त्यांचा नित्याचा पेहराव, हातात काठी, मात्र त्या काठीचा उपयोग आधारापेक्षा इतरांना दमबाजी करण्यासाठी जास्त, मध्यम वर्गीय नोकरपेशे ‘ऑफीसमधून’ येत असतात. दादा कामावून यायचे आणि येताना आम्हा मुलांसाठी नानकटाई आणायचे.’ हे बापाचे वर्णन ठळक स्वरुपात आलेले आहे.
‘मातोसरी’ या प्रकरणात, “आरे, कलेटरची मातोसरी हाये मी” असे म्हणणाऱ्या आई सोनाबाईची जीवनकहाणी येते. नरेंद्र जाधव व सर्व भावंडे व नेक्स्ट जनरेशन तीला ‘बाई’ म्हणायचे. गोरीपान असलेली बाई. सर्व सहा मुलांसाठी अहोरात्र झटायची त्यांच्या शिक्षण आणि विकासासाठी राबायची, प्रथम तिने माळव्याचा व्यवसाय केला व संसाराला हातभार लावला. ती नरेंद्र जाधवला ध्रुव म्हणायची. पण उच्चार धुरवा अशी करायची. आपल्या सोनाबाई उर्फ बाई बद्दल नरेंद्र जाधव म्हणतात, “माझ्या लहानपणीची बाई मला आठवते ती सतत राब राब राबणारी. सकाळी आम्ही भावंडे उठायच्या खूप आधीपासून तिची कामे चालू झालेली असत आणि रात्री खूप उशिरापर्यंत त्यात खंड पडत नसे” (पान नं. ३५) ते म्हणतात, “धुरव जन्माला आला आन् त्यान मह्या डोक्यावरची माळव्याची पाटी खाली उतरवली म्हणून ती उगाच मला श्रेय देते (आ.बा.आ.आ-पान नं. ३५) घरात पाळीव प्राणी सांभाळणारी, त्यात बकऱ्या, कोंबड्या असत. असे करुन संसारात आर्थिक भर घालणारी आई नवऱ्याबरोबर भांडत भांडत प्रेम करणारी, मुलेबाळे, नातवंडे यांच्यावर छाया धरणारी सोनाबाई ‘आई’ या प्रकरणात खूपच लाघवी वर्णन आलेले आहे.
‘दादांचे आत्मचरित्र’ हे प्रकरण त्यांनी स्वतः लिहिलेले आहे. दामोदर जाधव उर्फ दादा यांचा जन्म १९०९-१० चा सांगितला आहे. पण कळत्या वयापासून त्यांनी अस्पृश्यतेचे चटके सोसले. गरिबी पाहिली. जन्मगाव, आजोळ यांचा आसरा घेत शिक्षणाशिवाय जीवन काढले पण जगण्याच्या धडपडीत आयुष्य कळले. डॉ. आंबेडकरांच्या चळवळीला आधार दिला. म्हणून ते नरेंद्र जाधवांना म्हणतात. ‘काय पण हो, पण टापला जायला पाहिजे!’ त्यांचा आणि शेवटचा मुलगा म्हणून नरेंद्रचा खूप स्नेह होता. याचे वर्णन अनेक ठिकाणी येते पण दादांनी लहानपणापासून सोसलेला त्रास अवर्णनीय आहे. युरोपियन साहेबांच्या सानिध्यात ते वावरले. इंग्लिश शिकले. त्याचवेळी दुनियादारी कशी असते ते अनुभवले. रेल्वेत नोकरी केली, बॉम्बे पोर्ट ट्रस्ट मध्ये नोकरी करुन सेवानिवृत्त झाले पण स्वतःच्या अनुभवांनी व प्रामाणिकपणानी ते सोन्यासारखे उजाळून निघाले. आईच्या सहकार्याने बाप गेल्यानंतर सावलीसारखे राहून पेपर विक्रेता, ते बॉम्बे पोर्ट ट्रस्ट केबिनधारी पदापर्यंत पोहचून त्यांनी मुलाबाळांना घडवून एक इतिहास घडविला. मोठा मुलगा जे.डी. जाधव कलेक्टर, पंतप्रधानाचा उपसचिव, सचिव पदापर्यंत पोहचला. नरेंद्र जाधव आर.बी.आय. चे प्रशासकीय सल्लागार झाले. अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय प्रशासकीय पदांचा हक्कदार झाले. तरी वादांचे पाय जमिनीवर राहिले, बीडीच्या व्यसनांने अनेक शारिरीक आघात सोसले पण जिद्द आणि चिकाटी सोडली नाही. संघर्ष, अनुभव व कष्टाने जीवन कळलेला हा माणुस मुलांच्या प्रगतीमध्ये दुवा ठरलेला आहे. हे पुस्तक वाचून लक्षात येते.
हे घडताना काय संघर्ष व तडजोड असते हे सांगताना ‘आम्ही असे घडलो’ या प्रकरणात नरेंद्र जाधव म्हणतात, “प्रगतीची सुरवाद झाली असे दादा म्हणतात, वडाळ्याच्या त्या छोट्याशा घरात आम्ही एकून नऊ जण, आजी, दादा, बाई, आम्ही चार भाऊ आणि दोन बहिणी. आजी डोळ्याने जवळ-जवळ आंधळी पण तिचा भारी धाक. तिला आम्ही ‘आई’ म्हणत असू.’ (आ.बा.आ.आ.पान नं. ११५) हे असे एकत्रित दलित जीवन चित्रित होते.
‘मी जे. डी. जाधव’ या प्रकरणात ते लिहीतात, “सिद्धार्थ कॉलेजमध्ये वैचारिक दिशा मिळत गेली. कॉलेजच्या वार्षिकात त्यावेळी निबंध स्पर्धा असे. शिवाय वादविवाद स्पर्धा असत. या स्पर्धांचे विषय सदैव डॉ. आंबेडकरांच्या बहुलक्षी कामगिरीशी संबंधित असत. त्यात हिरीरीने भाग घेवून मी बक्षिसे पटकावू लागलो. हा प्रगतीचा आलेख आहे. हे जे.डी. जाधव पुढे कलेक्टर, महाराष्ट्र शासनाचे उपसचिव, सचिव झाले. पंतप्रधान इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या सानिध्यात प्रशासकीय काम केल्याचे समाधान व्यक्त करताना आढळतात.
‘मी सुधाकर जाधव’ या प्रकरणात त्यांच्या जीवनाचा लेखा-जोखा आलेला आहे. शिक्षणात प्रगती करुन तो आखाती देशात स्थायिक झाला. दुबईला त्याने नोकरी केली. पण मुंबईचे वेध लागल्याचे सांगताना म्हणतात, ‘दुबईत कामगारांना चांगला पगार मिळतो, पण त्यांचे आपल्याकडच्यासारखं फाजील लाड केले जात नाहीत. कामगारपुढारी किंवा कामगार संघटनांना तिथे थारा नाही.’ (आ.बा.आ.आ.पान नं. १६८) हे आंतरराष्ट्रीय कामकाजाचे वर्तमान आहे.
‘मी दिनेश जाधव’ या प्रकरणात ‘छबिलदास’ मध्ये शिकून मोठा झालेला दिनेश म्हणतो, “छबिलदास शाळेने माझे व्यक्तिमत्त्व घडविले. तसे पाहिले तर दलित समाजात जन्माला येऊनही माझ्यात न्यूनगंडाची भावना अशी नव्हती. माझा स्वतःवर विश्वास होता. डॉ. आंबेडकरांनी लिहलेले ‘शूद्र पूर्वी कोण होते?’ हे पुस्तक अगदी लहानपणी वाचनात आल्यामुळे की काय पण, आपण इतरांपेक्षा कमी नाही आणि ते आपल्या वागण्यातून, अभ्यासातून, चारित्र्यातून सिद्ध करायचे या भावनेतून मी वागत राहिलो.” (आ.बा.आ.आ.पान नं. १७१) हा डॉ. आंबेडकरांच्या विचारांचा व वडील दामोदर जाधव यांच्या संस्काराचा प्रताप आहे.
‘मी नरेंद्र जाधव’ या प्रकरणात नरेंद्र जाधवांनी शिक्षण, नोकरी व जबाबदाऱ्या पेलत असतानाचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अनुभव सांगितले आहेत. पण ते सगळे बापाच्या संदर्भानेच येतात. ते म्हणतात, “”गळ्यात नरोटी आणि कमरेला झाडू’ या स्वरुपाची अमानूष जातियता नष्ट झाली असलीतरी त्यामुळे जातीयतेची विषवल्ली आपण समूळ गाडून टाकलेली आहे असे मानने भाबडेपणाचे आहे.” (आ.बा.आ.आ.पान नं. १८३) हे चिंतनशील व सूक्ष्म विचारशील विश्लेषण आहे. जे आजही विचार करायला भाग पाडते. याशिवाय या प्रकरणात त्यांची झालेली बापाच्या साक्षीने जडण-घडण ही सुद्धा विचार करायला भाग पाडते.
‘आम्ही साऱ्या जणी’ हे प्रकरण डॉ. नरेंद्र जाधवांच्या सौभाग्यवती सौ. वसुंधरा जाधव यांनी लिहिलेले आहे. आंतरजातीय विवाह करुन जाधवांच्या कुटुंबात स्थिरावतात व सगळ्यांच्या हृदयात आपले स्थान पक्के करतात. सासरे (दादा) बद्दल त्यांना अभिमान वाटतो. तर सासू (बाई) यांच्यात त्यांना आई सापडते. सासर, माहेर, मुलगा चिन्मय, मुलगी अपूर्वा, दोन नणंदा, चार जावा, दीर व नरेंद्राच्या जीवनातील त्यांचे स्थान इ. विषयींचे कमालीचे लाघवी वर्णन असेलेले हे प्रकरण वाचकांच्या मनाचा ठाव घेते.
या आत्मकथनात ‘जनरेशन नेक्स्ट’ हे प्रकरण अपूर्वा नरेंद्र जाधव यांनी लिहिलेले आहे. यामध्ये तीने सर्व घरादाराविषयी, स्वतःच्या अमेरिकेतील व मुंबईतील शिक्षण व जडण-घडणीचा लेखाजोखा मांडला आहे.
दोनशे नळ्यान्नव पृष्ठसंख्या असलेल्या या आत्मकथनात शेवटी दोन परिशिष्ठे येतात. वेळोवेळीच्या आवृत्यांच्या निमित्ताने ‘आमचा बाप…’ विलक्षण प्रवास! या शीर्षकाखाली काही चिंतने, पुस्तकाची पार्श्वभूमी, काही मान्यवरांची मते, पत्रांची विश्लेषणे, समीक्षापर मते व मान्यवरांचे अभिप्राय आलेले आहेत. ते विचार करायला लावणारे आहेत. या पुस्तकाबद्दल कुसुमाग्रज म्हणतात, “ही कथा आहे सामान्यातील एका असामान्याची… प्रगतीसाठी मुलांना सतत प्रेरणा देणाऱ्या, त्यांची मने घडविणाऱ्या, मी पणाच्या बाह्यांगापासून दूर असलेल्या आणि तरी खूप मोठ्या असलेल्या एका बापाची.” हे खूपच साक्षेपी मत आहे. तर ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांचा अभिप्राय मुखपृष्ठावरच येतो तो असा, “साने गुरुजींनी महाराष्ट्राला आदर्श आई दिली आणि डॉ. नरेंद्र जाधव यांनी महाराष्ट्राला दिला आदर्श बाप!” हे खरचं म्हणावे लागेल. पुस्तकाच्या मुखपृष्ठावर ‘आमचा बाप आणि आम्ही’ हे लाल अक्षरातील शिर्षक शोभून दिसते. तर मलपृष्ठावरील तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग व नरेंद्र जाधवांचा प्रसांगिक फोटो लक्ष वेधून घेतो.
लाखो प्रती खपलेले, जगातल्या वीस भाषात भाषांतरीत झालेले हे आत्मकथन दामोदर जाधव उर्फ दादा या बापाभोवती फिरते. वाड्मयीन दृष्ट्या हे आत्मकथन वाङ्मयीन मूल्य व जीवनमूल्य जोपासते. एक डोळस आत्मशोध व समूहशोधाची भावना यात आहे. आंबेडकरवादी प्रेरणा व आदर्श हा या आत्मकथनाचा स्फुल्लींग आहे. इंग्रजी व हिंदी भाषेत येणारे संवाद मनाची पकड घेतात. ती, ती पात्रे आपल्या व्यवहार भाषेत बोलताना आढतात. ही शौर्याची व उत्कर्षाची आत्मकथा अनेकांना स्फुरण देणारी असून ती राखेतून झेप घेणाऱ्या फिनिक्स पक्षासारखी आहे. ती ‘सर्च फॉर एक्सलेन्स’, ची गरुडभरारी वाटते. या आत्मकथनाने मराठी साहित्यात मोलाची भर टाकली असून, मराठी आत्मकथनाचा एक उत्कृष्ठ नमुना म्हणून त्याकडे पहावे लागेल. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दृष्टिक्षेप टाकून असे आई, बाप, आजी, आजोबा, भाऊ, बहिणी व जाधव कुटुंबासारखी कुटुंबे शोधावी लागतील. ती ‘आमचा बाप आणि आम्ही’ या डॉ. नरेंद्र जाधवांच्या आत्मकथनाप्रमाणे मराठी मनाला समृद्ध व विचारी बनविण्यास सहकार्य करतील. एवढेच सांगून मी भैरवी घेते.
Show Less