वर्दीतल्या माणसाच्या नोंदी हे समकालीन प्रकाशनानं प्रकाशित केलेलं सदानंद दाते यांचे पुस्तक.
Read More
वर्दीतल्या माणसाच्या नोंदी हे समकालीन प्रकाशनानं प्रकाशित केलेलं सदानंद दाते यांचे पुस्तक. सदानंद
दाते यांनी भारतीय पोलीस सेवेमध्ये प्रदीर्घ काळ काम केले आहे. त्यांच्या काम करतानाच्या अनुभवांचे हे
टिपण आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून वाचकांच्या अनुभवांमध्ये ते मोठी भर घालतात. प्रामाणिकपणे
सचोटीने काम करणाऱ्या आणि प्रसंगी जीवाची बाजी लावून देशसेवा करणाऱ्या अधिकाऱ्याचे अनुभव
समजून घेण्यासाठी हे पुस्तक वाचनासाठी निवडले. सदानंद दाते हे अत्यंत सचोटीने, पारदर्शकपणे,
निरपेक्षपणे, कर्तव्यदक्ष असे काम करणारे अधिकारी. या पुस्तकाला जे. एफ. रिबेरो (निवृत्त आय.पी.एस.
ऑफिसर) यांची प्रस्तावना लाभली आहे. या प्रस्तावनेच्या पहिल्या वाक्यातच रिबेरो यांनी, “सदानंद दाते
म्हणजे पोलीस अधिकाऱ्यांच्या नभांगणातला तारा आहे”, असे म्हटले आहे. त्यांच्याविषयी रिबेरो यांनी
काढलेले हे उद्गार त्यांच्या एकूण कार्यातून आपल्याला वाचायला मिळाल्यावरती हे उद्गार खरे वाटतात.
या पुस्तकात एकूण 18 लेख आहेत. या सर्व लेखांमध्ये एक क्रमबद्धता आहे. पोलीस दलातल्या प्रवेशापासून
ते कायद्याचे राज्य बळकट करण्यासाठी कुठल्या गोष्टींची गरज आहे, कोणत्या धोरणांची आवश्यकता आहे
यावर त्यांनी प्रकाश टाकला आहे.
दारूबंदी, अवैध धंद्यांना कसे रोखायचे या संदर्भातले त्यांचे कार्य हे अत्यंत प्रेरणादायी आहे. पोलीस
अधिकारी म्हणजे केवळ कायदा सुव्यवस्थेची अंमलबजावणी करणारा अधिकारी अशी एक प्रतिमा असते.
ही प्रतिमा बरोबर आहे, परंतु कायदा-सुव्यवस्थेच्या अंमलबजावणी सोबतच पोलिसांच्या कल्याणाचा
कार्यक्रम हाती घेणे, पोलिसांनी पोलिसांविषयी असणाऱ्या लोककल्याणकारी योजना राबवणे याकडेही
त्यांनी लक्ष दिले.
लोकसहभाग ही पोलिसांचे कार्य यशस्वी होण्यासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट असते. नक्षलवादी भागांमध्ये
काम करताना आलेले अनुभव, लोकांना त्यांनी कशा पद्धतीने आपल्या बाजून सहभागी करून घेतलं हे सर्व
अनुभव भविष्यातील अधिकाऱ्यांना प्रेरणा देणारे आहेत. नक्षलवादी भागामध्ये नक्षलवाद विरुद्ध पोलीस
अधिकारी अशा पद्धतीची परिस्थिती असताना ज्या ज्यांच्याकडे सर्वसामान्य लोकांचा कल आहे, त्यांचीच
शेवटी सरशी होत असते, त्यामुळे लोकांचा विश्वास संपादन करणं हे पोलिस अधिकाऱ्यांचे अत्यंत महत्त्वाचं
कार्य आहे. हे ओळखून दाते यांनी ज्या पद्धतीने प्रयत्न केले ते अत्यंत उल्लेखनीय आहेत.
पोलीस दलात वर्धा या ठिकाणी सेवा करत असताना व्यसनमुक्ती चा अनुभव हा अत्यंत सकारात्मक कसा
आहे. पोलीसदलामध्ये असणाऱ्या कर्मचारी – अधिकारी यांना जर व्यसन असेल आणि ते व्यसन करून
ड्युटीवरती उपस्थित असतील तर त्यांच्या हातून गंभीर चुका होण्याची शक्यता असते. अशा गंभीर चुका
केल्यामुळे व्यसन करणाऱ्या कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांना कठोर शासन होते, परंतु याच्या मुळाशी जाऊन
दाते यांनी विचार केला आणि डॉक्टर अभय बंग डॉक्टर राणी बंग यांच्या मदतीने त्यांनी पोलीस दलासाठी
व्यसनमुक्तीचा कार्यक्रम राबवला. ह्या स्वरूपाच्या कार्याला खूप मोठ्या प्रमाणावर यश आले, पोलीस
दलामध्ये काम करणाऱ्या कर्मचारी अधिकारी यांच्या मानसिकतेवर कुटुंबावर या सर्व गोष्टींचा सकारात्मक
परिणाम झाला.
पोलीस सेवेमध्ये दाते यांनी एकाच वेळी गुन्हेगारांना शिक्षा करण्याचेही काम केलं, कायदा-सुव्यवस्था
राखण्यासाठी कठोर निर्णय घेण्याचेही काम केलं, अपराध्यांना शासन करण्याचेही काम केलं आणि त्याच
वेळी त्यांनी रचनात्मक काम देखील उभारले. मुंबई मध्ये काम करत असताना झोपडपट्टी पुनर्वसनाचे
अत्यंत महत्त्वाचे असे काम त्यांनी केले.
दाते यांच्या कॉलेज जीवनाविषयी त्यांच्या शालेय जीवनाविषयी देखील त्यांच्या या पुस्तकातून आपल्याला
माहिती मिळते. दाते यांचे वाचन लेखन चिंतन-मनन ही एक वाखाणण्याजोगी गोष्ट आहे. त्यांच्यामध्ये
विकसित झालेले नेतृत्वगुण, संभाषण कौशल्य , व्यवस्थापन कौशल्य एखाद्या कामाचे नियोजन करणे ते
नियोजन आत्या नियोजनाची बारकाईने अंमलबजावणी करणे, हे सर्व गुण तरुण पिढीला अत्यंत प्रेरणादायी
आहेत.
दाते यांचा स्वभाव किंवा त्यांच्या कामाची शैली ही एखाद्या प्रश्नाकडे केवळ वरवर पाहण्याची नाहीये, तर
त्या प्रश्नाच्या खोलात जाऊन काम करण्याची आहे. मग गुन्हेगारांच्या संदर्भात त्यांनी केलेला विचार असेल,
झोपडपट्टीच्या संदर्भात त्यांनी केलेल्या विचार असेल, दारूबंदीच्या संदर्भात त्यांनी केलेला विचार असेल,
नक्षलवाद्यांचे संदर्भात त्यांनी केलेल्या विचार असेल, या सर्व गोष्टी त्यांच्या खोलात जाऊन केलेल्या
विचारांचे दर्शन घडवतात.
पुस्तकाची कमकुवत बाजू अधोरेखित करताना दोन अपेक्षा मांडाव्या वाटतात. हे पुस्तक जसे मराठीत आहे
तसे ते इंग्रजीतही यायला हवे. आणखी एक मुद्दा म्हणजे त्यांनी फुलब्राईट फेलोशिपच्या संदर्भात केलेल्या
संशोधनाबद्दल दीर्घ लेखन करायला हवे. कारण देशभरातील विद्यार्थ्यांना हे पुस्तक प्रेरणादायी ठरेल.
महाराष्ट्राचे दहशतवाद विरोधी पथक अर्थात ‘फोर्स वन’च्या स्थापनेत दाते यांचं अत्यंत महत्त्वाचे योगदान
राहिलेले आहे. दहशतवादाविरुद्धच्या लढ्यात मधलं त्यांचे योगदान उल्लेखनीय आहे.
या पुस्तकामध्ये त्यांच्या एकूण तीस वर्षाच्या पोलीस सेवेमध्ये त्यांना व्यक्ती म्हणून आलेले अनुभव अत्यंत
समृद्ध करणारे आहेत. त्या त्या वेळच्या त्यांच्या मनोभूमिका, त्यांचे संघर्ष, त्यांची व्यथा या पुस्तकांमध्ये
त्यांनी लिहिलेले आहे.
हे पुस्तक ते प्रत्यक्ष जगलेले आहेत. हे केवळ अनुभव नाहीत तर देश, काल, परिस्थिती, सामाजिक
पार्श्वभूमी, प्रशासन व्यवस्था, मूल्य, तत्वे यांचा एक आरसा आहे. पोलीस प्रशासनामध्ये नाविन्यपूर्ण काम
केलेल्या कर्तव्यदक्ष पारदर्शक अधिकाऱ्यांमध्ये अत्यंत कमी अधिकार्यांची नावं घेतली जातात त्यापैकी
सदानंद दाते हे एक आहेत.
या पुस्तकाला जर रेटिंग द्यायचे असेल तर ते पाच पैकी पाच इतके द्यायला हवे. कारण सदानंद दाते यांचे
कार्य नैतिकता, सचोटी, न्याय, योग्य कृती यासाठी भविष्यकाळातही प्रेरणादायी ठरेल. केवळ पोलीस
सेवाच नव्हे वेगवेगळ्या क्षेत्रात कर्तृत्ववान होऊ इच्छिणाऱ्या युवा पिढीसाठी हे पुस्तक दीपस्तंभा प्रमाणे
आहे.
Show Less