नमस्कार , मी शिवाजी सावंत यांच्या "छावा" या कादंबरीबद्दलचा माझा अनुभव लिहीत आहे . "छावा" या
Read More
नमस्कार , मी शिवाजी सावंत यांच्या “छावा” या कादंबरीबद्दलचा माझा अनुभव लिहीत आहे . “छावा” या दोन अक्षरातच सर्व सार सामावलंय कादंबरीचं. सिंहाच्या पोटी छावाच जन्म घेतो नि जन्माला आल्यापासून ते अखेच्या श्वासापर्यंत तो सिंहच राहतो. संभाजीराजे सुद्धा असेच एक सिंहपुत्र होते. ज्या आदरणीय शिवाजी महाराजांनी महाराष्ट्र घडवला, मराठ्यांचे नाव देशात उज्ज्वल केले, हिंदवी स्वराज्याचा पाया रचला, त्या मराठी स्वराज्याच्या मंदिरावर महाराजांच्या या पुत्रानं स्वतःच्या कर्तृत्वाने, बलिदानाने सुवर्ण कळस चढवला. या अशा अतिशय सुंदर कादंबरीचा मला आलेला अनुभव आणि त्यातून मी जे काही शिकलो तेच आज मी तुमच्यासमोर मांडतोय. छत्रपती संभाजी महाराज हे महाराष्ट्राच्या इतिहासातील एक अजरामर नाव अजून ते फार प्रराक्रमी होते ने इतिहासातील अनेक नोंदीनवरून दिसुन येते. संभाजीमहाराजांनी त्याकाळी एक दोन नव्हे तर एकाच वेळी पाच-पाच शत्रूंशी आघाडयांवर मुकाबला केलेला आहे याची इतिहास नोंद ठेवतो.
संभाजीराजांचा जन्म १४ मे १६५७ रोजी पुरंदर येथे झाला. शिवाजी महाराज आणि त्यांच्या प्रथम पत्नी सईबाई यांचे ते पुत्र. लहानपणीच आईच्या प्रेमाला मुकलेल्या संभाजीराजांना जीवनाचे धडे परिस्थितीनेच शिकवले. प्रत्येक छोट्या-मोठ्या प्रसंगांनी ते काहीतरी शिकत गेले, स्वत:ला घडवत गेले. परिस्थितीच्या प्रत्येक तडाख्यातून तावून-सुलाखून निघूनच त्यांच्या आयुष्याचा काळ हा सुवर्णकाळ बनून झळाळून उठला. वयाच्या आठव्या वर्षी त्यांच्यावर पुरंदरच्या तहासाठी मुघलांकडे जामीन राहायची वेळ आली, पण तरीही ते डगमगले नाहीत. त्यांच्याच सुरक्षितेसाठी पसरविण्यात आलेल्या ‘संभाजी राजांचे निधन’ या खोट्या अफवेमुळे त्यांना बराच काळ त्यांना परख्या ठिकाणी रहावे लागले ज्या वयात आई-बाबांचं प्रेमाचं, सुरक्षिततेचं छत्र सोडून दूर जाण्याची कल्पना सुद्धा आपण करू शकत नाही त्या वयात संभाजीराजे जनतेच्या कल्याणासाठी स्वतःला शत्रूच्या गोटात जामीन म्हणून ठेवायला तयार झाले होते. पित्याच्या एका शब्दाखातर एवढं साहस करणारा पुत्र विरळाच. ज्या दैवानं त्यांना जन्मजातच लढवय्या वृत्ती, मुत्सद्दी राजकारणी मन दिल होत त्याच दैवानं त्यांना एक कवी मनही बहाल केलं होत. आजूबाजूची परिस्थिती पाहून जसे ते नवीन काहीतरी शिकत होते, तसेच त्यांच्यातला कवीही मोठा होत गेला नि यातूनच निर्मिती झाली ‘बुधभूषण, या ग्रंथाची. राजकारणावर आधारित असा हा ग्रंथ त्यांनी वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी लिहला. हे पुस्तक वाचल्यावर मला संभाजी महाराजांची ओळख अनेक रूपातून झाली. युवराज, एक शूर लढवय्या, कोणत्याही प्रसंगी माघार न घेता लढणारा वीर, धोरणी राजकारणी, प्रजाहितदक्ष राजा, तरल संवेदना जाणून त्या शब्दबद्ध करणारा कवी, कर्तव्यनिष्ठ पुत्र, प्रेमळ भाऊ नि आदर्श पती . पण या सर्वातही त्यांची खरी ओळख मला पटली ती माणूस म्हणून. मराठा साम्राज्याचे राजे असूनही त्यांनी गरीब जनतेवर कधी अन्य्याय होऊ दिला नाही. प्रसंग पडताच आप्तजणांना विरोध करून त्यांना शिक्षाही केल्या, पण निरपराध्यांचा बळी पडू दिला नाही. प्रत्येक धर्माचा आदरभाव असायचा त्यांच्या मनी, कोणत्याही कैद्याला कधी त्यांनी सक्तीनं धर्मबदल करायला लावला नाही. इ.स. १६७४ मध्ये महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक झाला तो पर्यंत राजकारणातील बारकावे आणि रणांगणातील डावपेचामध्ये ने चांगले निपुण झाले होते. त्याचबरोबर अनेक कडवट प्रसंगांनाही तोंड दयावे लागले. मोगलांना सामील होणे, गोदावरीबाई यांसारखे अनेक निरर्थक प्रसंगांनाही त्यांना समोर जावे लागले वस्तुता मुघलांना सामील होऊन खेळवत ठेवणे ही थोरल्या महाराजांचीच युव्हरचणा होती याचे संदर्भ देखील आहेत . असे अनेक प्रसंग वाचल्यानंतर अक्षरशः हृदय पिळवटून जाते, अश्या अनेक प्रसंगांना माझ्या या राजाला समारे जावे लागले. अनेकांनी या माझ्या राजावर बदनामी करणारे लेख रचले हे वाचुन माझे मन सुन्न राहते.
राज्याभिषेकानंतर अवघ्या ११ दिवसांत जिजाऊ मासाहेबांचे निधन होते अन् पुन्हा एकदा मातृत्वास मुकलेला हा माझा राजा पोरका होतो. सळसळत्या रक्ताच्या संभाजीराजांचे शिवाजी राजांच्या दरबारातील कारभार्यांशी मतभेद होऊ लागले. सोयराबाई व दरबारातील काही मानकरी संभाजीराजांना अपमानास्पद वागणुक देऊ लागले. हे केवळ अण्णाजी दत्तो याच्या सांगण्यावरूनच झाले . अण्णाजी दत्तो हा महाराजांचा अमात्य, अनुभवी आणि कुशल प्रशासक पण तेवढाच लबाड वृत्तीचा मनुष्य, स्वतःच्या स्वार्थासाठी अनेक कारस्थान या लबाडाने केली व मोरोपंत पिंगळे, बाळाजी आवजी चिटणीस यासारख्या अनेक निष्ठावान कारभाऱ्यांना याने आपल्या बरोबर गुंतवून घेतले. यांच्या विरोधामुळेच संभाजीराजांना दक्षिणेच्या मोहिमेवर जाता आले नाही. तसेच महाराजांच्या अनुपस्थितीत संभाजीराजांच्या हुकम पाळण्यास अष्टप्रधानमंडळाने नकार दिलेला दिसतो. त्यामुळे महाराजांनी संभाजीराजांना शृंगारपुरचा सुभेदार म्हणून पाठवावे लागले, दक्षिण हिंदुस्थानातील मोहिमेपासुन आपणाला जाणीवपुर्वक दुर् ठेवल्याचा सल मात्र संभाजी महाराजांच्या मनात कायम राहिला. पुढे वेगवेगळी कारणे देत सोयराबाई व दरबारातील मानक-यांनी संभाजीमहाराज हे बेजबाबदार प्रशासक आहेत आणि राज्याचे योग्य वारस नाही असा प्रचार सुरू केला .उत्तर दिग्विजय मोहिम छत्रपती संभाजी महाराज यांच्या मनात होती यासाठी त्यांनी औरंगजेबचा मुलगा शहजादा मुअजम याला आपल्या बाजुने वळवुन औरंगजेबाला शह दयायचा या साठी ते दिलेरखानाच्या छावनीत स्वराज्यावर नाराज असल्याचे भासवुन गनिमीकावा केला यात त्यांच्या सोबत त्यांची ताईसाहेब राणू अक्का देखील होत्या. अफजलखान, शाहिस्तेखान यांच्यासारख्या मोठ्या शत्रूंना पराभवाची धुळ चारणारे छत्रपती शिवाजी महाराज घरातील सोयराबाई व कारभाऱ्यांच्या बेबनावापुढे दुर्दैवाने हतबल ठरले. शेवटी ३ एप्रिल १६८० मध्ये शिवाजी महाराजांच्या निधनाने सांभाजीराज्यांच्या डोक्यावरील शेवटचा मायेचा हात हिरवला गेला. या युगपुरुषाच्या अंतिम क्षणी कारभाऱ्यांनी केलेले कटकारस्थान वाचुन वाचकाचे मन हेलावुन जाते नव्हे तर स्तब्ध होते. संभाजी महाराजांना कैद करण्यासाठी कारभारी अजुन कटकारस्थान करतात, संभाजी महाराजांना पन्हाळगडावर कैद करण्यासाठी सरनोबत हंबीरराव मोहिते जे की सोयराबाई यांचे बंधु आहे त्यांना फर्माण देतात. यांस असे वाटते की सरनोबत हंबीरराव मोहिते सोयराबाई यांचे बंधु असल्यामुळे यांना साथ देतील. पण हंबीरराव मोहिते यांना सत्य स्थिती आणि स्वराज्याला त्या क्षणी संभाजी महाराजांची असलेली निकड माहीत होती यामुळेच त्यांनी संभाजी राजांची बाजु घेतली. व कारभान्यांना काही दिवस कैद करुन सोडून दिले कारण या कारभाऱ्यांनी जरी कारस्थान केले असले तरी त्यांनी स्वराज्य बांधणीत मोलाचे योगदान स्मरून संभाजी महाराजांनी त्यांना सुधारण्याची संधी दिली. १६ जानेवारी १६८७ रोजी संभाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला या सर्व सुखदुःखाच्या प्रसंगी पत्नी येसुबाईनी दिलेल्या साथीचे सुंदर चित्रण या पुस्तकात केलेले आहे.
पुस्तकाचा शेवट वाचताना तर अक्षरशः रडू कोसळते. सिंहासमान आयुष्यभर लढणारा तो वीर फसवला गेला तो स्वकीयांकडून. ज्याला शत्रूच भय कधीच वाटलं नाही त्याला आपल्याच माणसांनी फुटकळ विलोभनांपायी फसवलं. त्या महान राजाची जी विटंबना औरंगजेबाने केली त्याची कल्पना सुद्धा करवत नाही. त्यांची विदूषकाचे कपडे घालून मिरवणूक काढली, जीभ कापण्यात आली, डोळे सुद्धा काढले पण इतकं सगळं होऊनही तो छावा औरंगजेबापुढे नमला नाही. खरतर मला संभाजी महाराज विरुद्ध औरंजेब असं युद्ध या पुस्तकातून जाणवलंच नाही. संभाजी महाराज आणि औरंगजेब या दोन व्यक्ती नसून प्रवृत्ती असाव्यात इतक्या त्या एकमेकांशी एकरूप झाल्यासारखं वाटलं. आणि खरचं त्या दोन प्रवृत्तीच होत्या, तो लढा होता चांगल्या वृत्तीविरुद्ध वाईट वृत्तींचा. औरंगजेबाचं सैन्य, त्याची सत्ता निश्चितच मोठी होती. पण त्या मागचा इतिहास मात्र काळाकुट्ट होता. औरंगजेब आणि संभाजीराजांना माणुसकीच्या पारड्यात तोलायचं झालं तर निविर्वादपणे महाराजांचं पारडं विजयी ठरलंय पाठोपाठ असंही वाटतंय कशाला करू हि तुलना? कारण स्वतःच्या जन्मदात्याला कैदेत टाकणारा, सख्ख्या भावाला जीवे मारणारा, सत्तेसाठी कोणत्याही थराला जाणारा औरंगजेब आणि स्वतःच्या पित्याचा एक शब्दही खाली पडू न देणारे, सावत्र आईनं ज्यांच्या मृत्यूचा कट रचला, ज्यांच्या चारित्र्यावर कलंक लावायचा प्रयत्न केला तरीही ज्यांनी तिला माफ केलं, स्वतःच्या सावत्र भावाचा जराही दुस्वास न करता त्याच्यावर निर्भेळ प्रेम करणारे संभाजीराजे यांची तुलना होऊच शकत नाही. पण तरीही मला हि तुलना कुठंतरी गरजेची वाटली ती यासाठी कि माणूस म्हणून जगताना आपण जरी चुकलो तरी ती चुकी सुधारून सुद्धा आपल्याला आपल्या स्वबळावर जगासाठी प्रेरणास्रोत बनता येत. अनंत कालापर्यंत समाजाच्या मनावर राज्य करता येत. त्यांचे आदर्श होऊन त्यांना मार्ग दाखवता येतो. कारण संभाजीराजांना माहित होत त्यांच्या वाहून गेलेल्या रक्ताच्या एक एक थेंबातुन पुन्हा असे लाखो संभाजी जन्माला येतील जे या मातृभूमीचे सगळ्या वाईट प्रवृतींपासून रक्षण करतील. तो गेला पण जगाला एक कायमची शिकवण देऊन गेला. कितीही खडतर परिस्थिती आली तरी हार न मानता लढायची, कारण चुकतो तो माणूस असतो पण त्याची माणुसकी तेव्हाच सिद्ध होते जेव्हा तो या चुकांपासुन काहीतरी शिकतो. संभाजीराजांची हीच शिकवण मला या पुस्तकातून मिळाली. आयुष्यात स्वतःहून घेतलेल्या कोणत्याही निर्णयावर ठाम राहता आलं पाहिजे आपल्याला. कदाचित त्या निर्णयांमुळे तुम्ही चुकाल पण त्यातून सुद्धा काहीतरी शिकाल. आपल्या ध्येयासाठी अंतिम श्वासापर्यंत लढा कारण असं बलिदान कधीच व्यर्थ जात नसत. त्या बलिदानातूनच पुढच्या पिढीला जगण्याची नवीन आशा मिळते नि आपलं बलिदान त्यामुळं कृतार्थ होत. हिंदवी स्वराज्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणाऱ्या या छाव्याला मी विनम्र अभिवादन करतो, त्यांची शिकवण सदैव आपल्या मनात राहूदे हीच अपेक्षा. जयतु शंभूराजे!!
Show Less