प्रा. सोमेश सुनिल कुलकर्णी , सहाय्यक प्राध्यापक, मराठी विभाग,रा. ब. ना. बोरावके महाविद्यालय,
Read More
प्रा. सोमेश सुनिल कुलकर्णी , सहाय्यक प्राध्यापक, मराठी विभाग,रा. ब. ना. बोरावके महाविद्यालय, श्रीरामपूर , संपर्क: 9665667816
प्रस्तावनेतले विचार:
राम मनोहर लोहियांच्या “आपल्या समाजातील नैतिकतेची संकल्पना स्त्रीच्या एका अवयवाभोवती केंद्रित झाली आहे.” या अर्थाचे वाचन अॅथॉल फ्यूगार्डच्या आयलंड दीर्घांकात भूमिका करताना अनुभवत असलेली अॅन्टिगनी यांत या नाट्यलेखनाची पाळंमुळं असल्याचं लेखकानं अधोरेखित केलं आहे. नैतिकतेची व्यापक व्याख्या मांडण्यासाठी लिहीत असलेलं नाटक नीती-अनीतीच्या संकल्पनांवर प्रश्नचिन्ह निर्माण करुन स्त्री-पुरूष शरीरसंबंधांवर थेट बोलतं. वेगवेगळ्या कालखंडात घडणाऱ्या घटनांमध्ये काही भेद असले तरी बरीचशी साम्यस्थळं असल्याचं लेखकाने नमूद केलं आहे. इतका कालावधी लोटला, उलथापालथ झाली तरी काही प्रश्न कायम अनुत्तरित राहतात असं लेखकाला वाटतं. अनेक मान्यवरांनी केलेल्या समीक्षणातून लेखकाला नाटकाचे इतर आयाम गवसता आले आणि त्रुटी समजल्या. किरण-मनोज-शिल्पा यांच्या आंतरिक विश्वाला मिळालेला कमी अवसर, मावशींनी आळवणी न नेसणं, ‘युगधर्म’ एकांकिका ही मोठ्या नाटकाचा विषय होऊ शकते या आणि अशा मिळालेल्या सूचनांचे लेखकाने स्वागत केले आहे.
नाटकातला कालखंड: तीन वेगवेगळे कालखंड १९५०, २०००, २००२
लेखकाने नाटकात मांडलेल्या गोष्टी:
ऐतिहासिक किंवा कौटुंबिक विषयावर नाटक न घेता साधनाने प्राचार्य दमयंती यांना सुचवलेलं स्त्रीपुरुषसंबंधावर आधारित ‘देहभान’ या कादंबरीवरील मुलांनीच लिहिलेलं नाटक सादर करायचं सर्वानुमते ठरतं. सोहोनी सरांचा शेवटपर्यंत अशा ज्वलंत आणि चारचौघात सहजासहजी न बोलल्या जाणाऱ्या विषयाला विरोध असला तरी दमयंती मॅडम कथानकाला परवानगी देतात. शेवटपर्यंत स्वतःच्या भावविश्वात हरवलेली दमयंती, उघडपणे व्यक्त होत जाणारी साधना, संशयी आणि प्रश्न उपस्थित करणारे सोहोनी सर, रेड लाईट एरियात अल्पवयीन मुलीवर हात टाकण्यास न धजावलेला किरण, लग्नाला बेधडकपणे नकार देणार असलेली शिल्पा अशी वेगवेगळी पात्रं लेखकाने रंगवली आहेत. ‘नाटक बसवायचं तर ऐतिहासिक’ असं मत असलेले सोहोनी शेवटपर्यंत निवडलेल्या नाटकाचा विरोध करताना दिसतात. दुर्गामावशी विधवा झाल्यावर आसरा म्हणून गाठलेल्या वाड्यात तिच्या पदरी वसुधेला टाकून आयुष्यभरासाठी बंधन योगात अडकवणारे दादासाहेब वसुधेच्या विवाह करण्याच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी संस्थेच्या उद्दिष्टांचा पाढा वाचताना दिसतात. संस्थेतल्या तरुण-तरुणींच्या मनातल्या सुप्त शारीरिक इच्छांना ‘पाप’ संबोधून त्या टाळण्याकरता केलेले चुकीचे अघोरी उपाय आणि दुसरीकडे काहींची होणारी मानसिक कुचंबना आणि त्यातून त्यांच्या घेतल्या गेलेल्या चुकीच्या निर्णयामुळे होणारी फसवणूक…. या आणि अशा अनेक गोष्टी दाखवताना लेखकाने त्यांच्या अंतरंगात डोकावण्याचा प्रयत्न केला आहे. हे नाटक बसवताना किंवा लिहिताना साधना आणि इतर पात्रं या नाटकाच्या परिस्थितीचा स्वतःच्या सद्य परिस्थितीशी संबंध लावू पाहतात आणि त्यातून निष्पन्न झालेले निष्कर्ष नाटकाला कलाटणी देतात. केवळ ‘समाजातली आपली प्रतिमा मलिन होऊ नये’ या एकाच उद्दिष्टासाठी स्वतःच्या सुखांना, स्वप्नांना, अव्यक्त प्रेमाला तिलांजली देणारी महत्त्वकांक्षी प्रा. दमयंती ही एका दृष्टीने अपेक्षित ध्येयप्राप्ती झाल्यानंतरही शेवटपर्यंत स्वतःचा शोध घेताना दिसते. त्यातून पद्मनाभ या चित्रकाराविषयीची तिची आत्मीयता आणि दुसरीकडे विद्यार्थ्यांची तिच्याविषयीची आदराची भावना या दोन विरोधाभासी परिस्थितींचा समन्वय लेखकाने साधला आहे. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणारी साधना आपल्या नात्याविषयी जितकी उघड बोलते, तितकंसं उघडपणे दमयंतीला बोलता येत नाही. माणूस प्रतिमेच्या आहारी जाऊन कितीतरी गोष्टींना कसा मुकतो हे दमयंती आणि दादासाहेब या पात्रांकडे बघितल्यावर कळतं. ‘समाज काय म्हणेल’ या एका प्रश्नाच्या भीतीपोटी स्वार्थाचा त्याग करणं सरतेशेवटी त्यांना आपल्या कृतीचं फलित शोधायला भाग पाडतं. सेक्स एज्युकेशन हा एक अतिशय महत्त्वाचा आणि गंभीर विषय नाटकात उद्धृत केला आहे. कशाने काय होतं, काय करावं, काय करू नये याची पूर्ण माहिती नसलेल्या आणि किशोरावस्थेकडे झुकलेल्या मुलामुलींची मानसिक आंदोलने आणि त्यांचं शंकानिरसन करू पाहणाऱ्या मास्तरांना संस्थेकडून होणारा विरोध यांतून समाजव्यवस्था कुठल्याही गोष्टीकडे डोळसपणे न बघता एक ठराविक साच्यात स्वतःला आजही बंदिस्त करू पाहते आणि समाजात बदल घडवण्यासाठी क्रांती, संघर्ष, विरोध आणि बलिदान अपरिहार्य आहे ही गोष्ट लेखकाने अधोरेखित केली आहे. आजच्या काळात ‘मूल्य’ ही संकल्पना कितीतरी निकषांवर तपासली जाऊ शकते. या जगात सातत्याने होत असलेले बदल, लोकांचे बदलत असलेले विचार, त्यातून निर्माण होत असलेल्या नवनवीन विचारधारा या सर्वांचा विचार करता आपण नेमके कुठल्या गोष्टींना चिकटून बसलो आहोत हे तपासण्याची गरज आहे. प्रत्येक कालखंडातील विचारवंत समाजव्यवस्था टिकून राहण्यासाठी त्या त्या कालानुरूप समाजाला अनुकूल योग्य निर्णय घेत असतात. त्यातून संस्कृतीरक्षण हा मूलभूत उद्दिष्टाचा भाग असतोच, परंतु एखादी गोष्ट कालबाह्य झालेली किंवा होत आलेली असताना त्या गोष्टीचा आजच्या समाजाला किती उपयोग आहे आणि आजचा समाज तितक्याच आत्मीयतेने ती गोष्ट आजही स्वीकारतो आहे का हे जाणून घेणे जास्त महत्त्वाचे आहे. प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने एखादी गोष्ट साध्य करायची असेल तर प्रवाह कसा चुकीचा आहे ते पटवून देण्यासाठी योग्य पुरावे असणंही आवश्यक आहे. मात्र सगळ्याच गोष्टींसाठी आपल्याकडे पुरावे उपलब्ध असतील असे नाही. जुना कालखंड दाखवताना त्यातल्या पात्रांकडे ही डोळस वृत्ती असूनही केवळ तितकेसे पुरावे नसल्याने किंवा प्रयोगक्षमतेला समाजव्यवस्थेकडून तितकासा वाव न मिळाल्याने या गोष्टी तशाच पुढे चालू राहिल्या हे लेखकाने दाखवले आहे. समाजकारण आणि राजकारण या दोन्ही एकच नाण्याच्या बाजू आहेत. समाजकारण करताना आवश्यक असणारा पैसा आणि सत्तेचं पाठबळ या गोष्टी राजकारणातूनच मिळत असतानादेखील केवळ स्वतःची पोळी भाजणारे स्वार्थी राजकारणी या समाजकारणात ढवळाढवळ करून संस्थेचे आहे ते कार्य बंद पाडू नयेत या एका कारणासाठी संस्थासदस्यांनी संस्थेला आर्थिक मदतीची गरज असतानाही धनदांड्यांकडून मदत न स्वीकारण्याचा घेतलेला निर्णय एका दृष्टीने योग्यच आहे. दुसऱ्या बाजूने विचार करता अशा निस्वार्थी सेवाभावी संस्था बंद पडू लागल्या तर समाजाचे पुढे चित्र काय असणार याबाबत साशंकता निर्माण होते; कारण वैयक्तिक पातळीवर चांगली कामे करणारी माणसे नक्कीच आहेत, परंतु चांगल्या माणसांनी एकत्र येऊन एखादी संस्था निर्माण करणे आणि ती टिकवणे या दोन्ही गोष्टी आव्हानात्मक आहेत. समाजातल्या दुष्ट प्रवृत्ती स्वतःच्या स्वार्थासाठी किंवा आसुरी आनंदासाठीदेखील अशा गोष्टी बंद पाडण्यासाठी विनाकारण कार्यरत असतात. समाजाची प्रगती हे उद्दिष्ट असणाऱ्या लोकांच्या वाट्यालाही प्रतिमा-मलीनतेचा, चारित्र्यहीनतेचा अनामिक भीतीचा कलंक सातत्याने पाठलाग करत असलेला बघायला मिळतो.
रंगमंचीय आव्हाने:
१) तीन कालखंडात घडत असलेल्या या नाटकात कथानकाच्या प्रवाहानुसार दृश्यांची मांडणी केली आहे. नेपथ्य करणाऱ्यांसाठी एका दृष्टीने ही आव्हानात्मक बाब असली तरी कथानकाच्या दृष्टीने तिची अपरिहार्यता लक्षात घेणे अत्यावश्यक आहे.
२) आहार्य अभिनय हे दुसरे रंगमंचीय आव्हान म्हणता येईल. असा संवेदनशील विषय मांडताना लेखकाने केलेली दृश्यांची सरमिसळ परिणामकारकरीत्या प्रेक्षकांसमोर येते.
३) दृश्यसंख्येचा विचार करता नाटकाची व्यापकता हे तिसरे रंगमंचीय आव्हान आहे.
नाटकातल्या जमेच्या बाजू:
१) प्रवाही कथानक
२) तीन कालखंडाची सोप्या पद्धतीने केलेली मांडणी
३) व्यक्तीनिष्ठता आणि तत्वनिष्ठता यांची केलेली प्रमाणबद्ध तुलना
४) पात्रांच्या माध्यमातून अनेकविध सामाजिक आणि सांस्कृतिक प्रश्नांचा घेतलेला व्यापक परामर्श
Show Less