डॉ.विजय बालघरे, बाबुरावजी घोलप महाविद्यालय सांगवी, पुणे डॉ. अशोक बाबर यांचे आंबेडकरवाद हे खूप
Read More
डॉ.विजय बालघरे, बाबुरावजी घोलप महाविद्यालय सांगवी, पुणे
डॉ. अशोक बाबर यांचे आंबेडकरवाद हे खूप मौलिक पुस्तक वाचून झाले. अभिप्राय लिहिण्याच्या किंवा पुस्तक परीक्षण करण्याच्या भानगडीत मी आजपर्यंत फार पडलो नाही. पण ‘आंबेडकरवाद’ हे पुस्तक वाचल्यानंतर लिहिल्याशिवाय राहावले नाही.आंबेडकरवाद हे डॉ. अशोक बाबर यांचे अत्यंत महत्त्वाचे असे पुस्तक आहे.या पुस्तकामध्ये जसे मार्क्सवाद किंवा इतर साहित्य सिद्धांतांच्या दृष्टिकोनातून साहित्याचा अन्वयार्थ लावता येतो तशाच पद्धतीने ‘आंबेडकरवादी साहित्य सिद्धांत’ पद्धतीने भारतामधील साहित्याचे मूल्यमापन करणे हे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे, असा दृष्टिकोन घेऊन लेखकाने या सैद्धांतिक पुस्तकाचे लेखन करून मराठी साहित्यास एक अपरिचित असा साहित्यसिद्धांत व साहित्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन दिला आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. या पुस्तकामध्ये डॉ. अशोक बाबर यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची देशीवादी दृष्टिकोनातून तर्कसंगत मांडणी केली आहे.बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकंदर जीवनकार्यावर बोधिसत्व गौतम बुद्धांच्या तत्त्वज्ञानाचा प्रभाव दिसून येतो. त्यामुळे त्यांच्या जीवनदृष्टीत आध्यात्मिकता देखील दिसून येते.ही बाबर यांनी केलेली चिकित्सा खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे बुद्ध, बौद्धधर्म, कार्ल मार्क्स,मार्क्सवाद, हिंदूधर्म,हिंदुत्ववाद,महात्मा गांधी, गांधीवाद आणि नेमाडे यांचा देशीवाद यांचे अत्यंत तर्कदृष्ट्या विश्लेषण या पुस्तकामध्ये करण्यात आलेले आहे. हे करताना आधीच्या अभ्यासकांच्या मतांचे खंडन-मंडण व आंबेडकरवादी साहित्य सिद्धांत हे बाबर यांच्या मांडणीमधील महत्त्वाचे विशेष आहेत. त्यांच्या या ग्रंथामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याबरोबर त्यांच्या साहित्यविषयक दृष्टीची जाणीव अभ्यासकांना होईल. पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्येच त्यांनी आपली भूमिका विशद केलेली आह. साहित्य सिद्धांत म्हणून मार्क्सवाद संपूर्ण जगात स्थिरस्थावर झालेला आहे;पण आंबेडकरवाद अजून मराठीत आणि भारतातही साहित्य सिद्धांत म्हणून मान्यता प्राप्त का झाला नाही ही खंत त्यांनी व्यक्त केलेले आहे. म्हणूनच आंबेडकरवाद हा साहित्य सिद्धांत हा स्थिरस्थावर व्हावा कारण आंबेडकरवाद हा देशी मूल्ये आत्मसात करून
वैश्विकतिकडे वाटचाल करणारा आहे असे सूत्र घेऊन त्यांनी लेखन केलेले आहे. आपण अनेक पाश्चात्य सिद्धांत साहित्याला लावतो व आपल्याकडील सकस अशा अनेक देशी सिद्धांताकडे डोळेझाक करतो ही बाबर यांची निरीक्षण खूप महत्त्वाचे आहे. या पुस्तकातील काही मुद्द्यांवर दृष्टीक्षेप टाकला तरी या पुस्तकामध्ये किती मूलभूत विचार मांडले आहे याची जाणीव आपणास होईल.स्वदेशी,विदेशी की देशी?, बुद्ध की मार्क्स?सर्व धर्म नष्ट व्हावेत!, आंबेडकरांचे विपरीत वाचन,त्यांचे काठमांडू येथील भाषण,बुद्ध आणि मार्क्स साम्यभेद,बुद्धांची तत्वे, धर्म आणि धम्म यांच्यामधील साम्य भेद,कार्ल मार्क्सची तत्वे, हुकुमशाही की लोकशाही?पुरुषार्थाच्या सिद्धांताची फेरमांडणी, भारतीय इतिहास,धर्मांतर, हिंदू कोड बिल, भारताची फाळणी,भाषावार प्रांतरचना, लोकशाही आणि राज्य समाजवाद, भारतीय साहित्यशास्त्र, सत्यशोधक शास्त्र, भारतातील स्त्रियांची गुलामगिरी,साहित्य सिद्धांत,आंबेडकरवादी प्रमाणके, न्याय,स्वातंत्र्य, समता, बंधुता इत्यादी विविध मुद्द्यांच्या आधारे आंबेडकरवादी साहित्य सिद्धांत प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने डॉ.अशोक बाबर यांचे हे पुस्तक म्हणजे एक महत्त्वाची पायरी आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ‘भारतातील जाती’ (१९१६) या निबंधापासून ते ‘बुद्ध आणि त्याचा धम्म’ (१९५६) या ग्रंथापर्यंतच्या सर्व साहित्याचा साकल्याने विचार करून आपणास आंबेडकरवाद आणि आंबेडकरवादी साहित्य सिद्धांताची मांडणी करता येते,असे त्यांनी प्रतिपादन केले आहे.भारतीय साहित्याचे आकलन, विश्लेषण, मूल्यमापन आणि मूल्यनिर्णय सुद्धा आंबेडकरवादी साहित्य सिद्धांताच्या आधारे होऊ शकते असे त्यांनी ठामपणे सांगितलेले आहे.
Show Less